अध्याय ८९ वा - श्लोक ४६ ते ५०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


दर्शये द्विजसूनूंस्ते मावज्ञात्मानमात्मना । ये ते नः कीर्ति विमलां स्थापयिष्यन्ति नो नराः ॥४६॥

तुज मी दावीन द्विजपुत्रांतें । ज्यास्तव जाळिसी तूं आपणातें । वृथा विलिप्त आत्मघातें । न होयीं अनुचितें आचरणें ॥८४॥
जरी तूं म्हणसी मी अनृती । सर्व ऐकतां सभासदपंक्ती । निखंदूनियां श्रेष्ठांप्रति । स्वकीय कीर्तीं बोलिलों ॥४८५॥
बोलिल्या ऐसी न घडली क्रिया । केली प्रतिज्ञा गेली वायां । आतां मुख काय दावूं लोका ययां । या जिण्याहूनियां मृत्यु बरा ॥८६॥
आणि ब्राह्मणेंसीं केला नियम । अकृत स्वाङ्गीकृत मी कर्म । निस्तरावया अनृतदोष विषम । कृष्णवर्त्मा सेवीन ॥८७॥
यास्तव सदोष मिथ्याभाषक । निर्लज्जपणें मी दुर्द्दशाङ्क । जनीं न मिरवीन निष्टंक । कोऒटकळंक संस्पृष्ट ॥८८॥
तरी आपणातें आपणा करून । एवं न निखंदीं व्रीडायमान । मी असतां नारायण । तुज दुर्घट कोण कर्तव्य ॥८९॥
ज्या कारणे आत्मघात । करिसी ते तूं ब्राह्मणसुत । ब्राह्मणा अर्पूनि समस्त । कीर्तिमंत हो जगीं ॥४९०॥
न्रनारायण उभयतां । आपण अभेदरूपें तत्वता । या निश्चयें श्रीकृष्ण पार्था । बोलिला मिथा अभेदें ॥९१॥
कीं हे इतुकेही पुरुष यादव । आणि द्वारकावासी प्रजा सर्व । आमुचें अमळकीर्तीतें स्वयमेव । अचल वास्तव स्थापितील ॥९२॥
म्हणतील धन्य धन्य अर्जुन । अमोघधन्वा क्षात्रनिपुण । प्रतपएं करी भूसुरत्राण । सत्यप्रतिज्ञ नियतात्मा ॥९३॥
ब्रह्मादिकां जें दुर्घट । ऐसें कर्म परम अचाट । साधिलें केवळ दैवनिष्ठ । हें मिथ्या प्रकट वदतील ॥९४॥
राया भरतकुळावतंसा । तव पितामहा कृष्णकुवासा । इतुकें बोलूनि अग्निप्रवेशा । करितां सहसा वर्जिलें ॥४९५॥
तो वरी षड्गुणैश्वर्य संपन्न । कृतार्थ करावया स्वप्रपन्न । द्विजापत्यानयना प्रयाण । करी संपूर्ण तें ऐका ॥९६॥

इति सम्भाष्य भगवानर्जुनेन सहेश्वरः । दिव्यं स्वरथमास्थाय प्रतीची दिशमाविशत् ॥४७॥

दारुकां करूनियां निदेश । जो दिव्यस्यंदन स्वप्रकाश । नभौनि उतरला सायुधकोश । अकृतमानुष सयंत्रहय ॥९७॥
आणविला सज्ज अति सत्वर । त्या स्वरधी पार्थासह ईश्वर । आरूढ होऊनि प्रमोदपर । पश्चिमदिशे प्रति प्रवेशला ॥९८॥
कोठवरी गेला म्हणसी जरी । तरी वक्ष्यमाणश्लोकोत्तरीं । सर्व वृत्तान्त तो सविस्तरीं । सावध श्रोतीं परियेसा ॥९९॥

सप्तद्वीपान्सप्तसिन्धून्सप्तसप्तगिरीनथ । लोकालोकं तथाऽतीत्य विवेश सुमहत्तमः ॥४८॥

पवनजित हयचतुष्क । अंतरिक्षगामी सम्यक । तिहीं वेगवंत रथ निष्टंग । चंडमयूख ज्या असम ॥५००॥
तो चालतां परमगतिमंत । ज्यामाजी सप्त सप्त पर्वत । त्या सप्तद्वीपांतें रमानाथ । आणि सप्तसिन्धूंतें लंघूनी ॥१॥
गेला पार्था सह करुणाकर । लीलालाघवें अतिसत्वर । ऐसें हें निगदिलें मात्र । व्यवस्था समग्र तें ऐका ॥२॥
एकएका द्वीपामाजी । सप्तसप्तपर्वतराजी । प्रतिद्वीपा परिघ सहजीं । एका एका सिन्धूचा ॥३॥
ऐसिया या अनुक्रमें । तयां लंघिलें पूर्णकामें । क्षणैक न लागतां विक्रमें । सुखसंगमें पार्थाच्या ॥४॥
तयानंतरें महागिरी । लोकालोक जो सर्व भूधरीं । परम उच्चतर शृंगसहस्रीं । ग्रहक्षें सारीं ज्या खालें ॥५०५॥
ज्याहूनि अर्वाक् प्रकाश । तेथवरीच लोकनिर्देश । परपाठारीं तमविशेष । शून्य आकाश आलोक ॥६॥
तया लोकालोकगिरीतें । अतिक्रमूनि कृष्णनाथें । पुधें सुमहत्तम तमातें । वेगें बहुतें प्रवेशला ॥७॥

तत्राश्वाः शैब्यसुग्रीवमेघपुष्पबलाहकाह । तमसि भ्रष्टगतयो बभूवुर्भरतर्षभ ॥४९॥

प्रावृटीं कुहूची राति । तया तमाची बहु ख्याति । त्याहूनि अनंतगुणें अति । उपमा ज्याप्रति नाडळे ॥८॥
जेथ झांकोळे चंडकिरण । तेथ इतरांचा पाड कोण । तये तमीं हय संपूर्ण । जे स्यंदन प्रवाहक ॥९॥
शैब्य सुग्रीव मेघपुष्ण । चपळ बलाहक अमूप । जाले गतिभ्रष्ट समपादप । न दिसे अल्प नयनांसी ॥५१०॥
नेत्र जालिया केवळ अंध । पुढें जावया न कळे प्रसिद्ध । यास्तव गतिविरहित मंद । जाले स्तब्ध दिव्य हय ॥११॥
भरतकुळा माजि वरिष्ट । म्हणोनि भरतर्षभ प्रकट । संबोधनें हे मुनिश्रेष्ठ । कथी सुनिष्ठविष्णुराता ॥१२॥
या वरी पुढें तो भगवान । कैसें करी हो स्वगमन । तें ही परिसा सावधान । करूनि मन एकाग्र ॥१३॥

तान्दृष्ट्वा भयवान्कृष्णो महायोगेश्वरेश्वरः । सहस्रादित्यसङ्काशं स्वचक्रं प्राहिणोत्पुरः ॥५०॥

तयां गतिभ्रष्टां अश्वांप्रति । देखोनियां रुक्मिणीपति । ऐश्वर्यनिधि अमोघकीर्ति । ब्रह्मादि ध्याती पद ज्याचें ॥१४॥
जो योगेश्वरांचा महेश्वर । ज्याई अघटितघटनापर । मायासंकल्पें ब्रह्माण्डनिकर । करूनि समग्र सांठवी ॥५१५॥
तो मायानियंता यदुराय । सहस्रादित्य प्रकाशमय । स्वचक्र पुढें प्रेरिता होय । अप्रमेयमहरणा ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP