अध्याय ८९ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीकृष्णदयार्णवाय नमः ।
जय जय सद्गुरु दयासमुद्रा । तुजमाजी जन्म प्रबोधचंद्रा । तत्प्रकाशें भ्रमान्धकारा - । सह तापनिकरा नुरणूक ॥१॥
त्वद्भव शान्तिलक्ष्मी जया । सत्वसंपन्ना पवित्रहृदया । तव प्रसादें वरी तया । पूर्णैश्वर्या पात्रत्व ॥२॥
स्वानुभवाचा कौस्तुभमणी । देदीप्यमान विज्ञानकिरणीं । लेवविसी त्या सनकादिगणीं । कृतार्थपणीं पूज्यत्व ॥३॥
भावपार्यातकोपलब्धि । भजकनिर्ज्जरांतें निरवधि । तुज पासूनि त्यां फळसिद्धि । स्वमुख समृद्धिमय लाभे ॥४॥
निज निष्ठेची कामधेनु । जया अर्पिसी मंगळतनु । तयांचें सर्व ही काम पूर्ण । होती सुजनसुखकरा ॥५॥
सकाम कर्माची जे मदिरा । प्रियतम वाटे विषयी असुरां । तेचि तयांतें देसी चतुरा । जे अयोग्य प्रवरा ज्ञानामृता ॥६॥
आणि जे श्रद्धावंत अनन्य । जयांचें गेलें कामनादैन्य । त्यां तूं तदमृतदाता वदान्य । करूनि मान्य हरिहरादिकीं ॥७॥
अज्ञानरोगें क्षीण जाले । स्वसुख पौष्टिक जयांचें गेलें । तयां उपचारक जी निर्मिले । विवेका कृपाळें धन्वन्तरि ॥८॥
स्वसंभव धैर्यैरावती । ज्या देसी ऊर्जितदैवाप्रति । तो कामादिरिपु जिंकूनि सुमती । शोभे पंक्ती आमरांचे ॥९॥
उपशमशार्ङ्ग सत्वगुणें । सज्ज प्रभूचें होतां देणें । मुमुक्षु निर्विकल्प बाणे । भेदविन्दाणें निर्दळिती ॥१०॥
स्वसंवित्स्फुरणरूपा स्फूर्तीं । त्याचि दिव्याङ्गना विलसती । तव सहजस्वभावीं प्रकटती । जेथ सर्वदा रमती विबुधजन ॥११॥
स्वरूपप्रत्यय उच्चैःश्रवा । जो प्रत्यगात्मा हरिदश्वा । संकल्परथारूढ बरवा । फिरवूनि विश्वा प्रकाशी ॥१२॥
व्यतिरेकान्वयानुवृत्ती । करूनि निश्चयमेरू भंवती । जिज्ञासुवर्गा पूर्णास्थिती । सुदिनप्राप्ती करी सदा ॥१३॥
दैविकी नाभिकारकंबु । तेथ स्फुरद्रूप वेदकदंबु । जया दैवबळें तयाचा लाभु । तयासी सुलभ सकळ कळा ॥१४॥
तीव्र वैराग्य हळाहळ । धीर वीर शंभु प्रबळ । प्राशूनि अमरत्वें प्रेमळ । वंदी काळ पद तयाचें ॥१५॥
आणि अभय सत्व संशुद्धी । इत्यादि दैविसंपत्ति समुदी । हे मुक्तप्रभृति रत्नसमृद्धि । सुकृती लाहती तुजपासीं ॥१६॥
एवं अपारगुणरत्नाकर । केवळ कृपेचा तूं अकूपार । कृतार्थता मुमुक्षु निर्ज्जर । तुज नमनें मात्र संपादिती ॥१७॥
नेणों कैं अविद्या दैवबळें । जीवदशादरिद्र प्रवळे । अनैश्वर्य स्वपदा मुकले । ते दैवें पावले जवळीक ॥१८॥
अनन्यभावें शरण होतां । पद्मकर माथां स्पर्शतां । कृपासलिलीं निमज्जतां । त्रितापव्यथा निमाली ॥१९॥
अनंतजन्मीं भोगिलें दुःख । कवण करी तयाचा लेख । तेम अवघेंचि विसरूनि सुख । लाधले सम्यक अक्षय ॥२०॥
सहज दैवीसंपत्तियोगें । निजपद पावले चरणानुरागें । जीव ते झाले ब्रह्मचि अंगें । दिव्यस्थां कौतुकें हांसती ॥२१॥
मंदराचळ येसणे ढिसाळ । वासुकि ऐसे धूड विशाळ । सहाय मेळवूनि सपत्नमेळ । केला डहुळ क्षीरनिधि ॥२२॥
विष्णु आराधूनि विशेष । येवढा करूनियां सायास । कोणतें संपादिलें महद्यश । निघाले चतुर्दश पदार्थ ॥२३॥
ते विभागूनि घेतां परस्परें । अप्राप्ति लाळ घोटिजे इतरें । ईर्ष्योत्कर्षें सकामभरें । सचिन्त सुरवरें हळहळितें ॥२४॥
तथापि तद्योगें साधिलें स्वर्ग । तें क्षणिक नाशवंत व्यंग । सपत्नवैरें नित्य दगदग । त्रितापनिदाघ न चूकती ॥२५॥
जन्मादिदुःखापासोनि मुक्ति । सहसा न होय दिविजांप्रति । दिहाचे इंद्र चौदा होती । मा कवण गती इतरांची ॥२६॥
येथ प्रणतिमात्रें शरणागता । आघवयाची दैवपात्रता । न्यूनपूर्णविभागविषमता । नसोनि समस्तां सम प्राप्ति ॥२७॥
निजानंदपदींचें राज्य । पूर्णत्वें भोगिती भक्तराज । जन्ममरणाचें निमालें भोज । बाणलें सहज सुखसार ॥२८॥
हा प्रभु तुमचा महदुषकार । मादृशा दीनावरी अपार । अनंत जन्मांचा श्रमपरिहार । जाला पवित्र ये जन्मीं ॥२९॥
नये उपकृतीची निष्कृती । करावया सामर्थ्य प्रणतांप्रती । कैंचें परंतु वदनें ख्याति । जरी वर्णिजे स्वमति यथार्थ ॥३०॥
तरी मातेचिया स्नेहादरा । काय रूप करूं ये दातारा । कीं वर्षतिया जलधारा । भलतैशा चतुरा गणवती ॥३१॥
अमृतगोडीचा निर्धार । कीं भारतीवदनींचे उद्गार । पृथ्वी अंगींचे तृणाङ्कुर । कळती समग्र कवणासी ॥३२॥
तेंवि सद्गुरो श्रीदयार्णवा । तव कृपामहिमानविभवा । मिति न होय ब्रह्मादिदेवां । मां कवण केवा इतरांचा ॥३३॥
येथ रूपकें क्षीराब्धि उपमिलें । हें वास्तव महिम्ना कीडाळ गमलें । परी तव गुणीं प्रेम विगुंतलें । तें उचितानुचिता न स्मरवी ॥३४॥
पूर्वीं ममापराधराशी । सांठविल्या निजक्षमाकोशीं । आतां तेथींचिया अनुचितासी । सांठवणेंसी अर्हता ॥३५॥
म्हणोनि कृपोपकारवर्णन । न होय तेथें होणें उत्तीर्ण । हें केंवि घडेल अघटमान । तरी कार्तघ्न्यदूषण ये आंगा ॥३६॥
तद्दोषपरिहारकार्या । कायवाड्मानसिक चर्या । जोंवरी वर्तमान काया । आयुर्दायावधि टाकी ॥३७॥
अर्पूनियां अनन्यभावें । दास्यकर्मा अनुसरावें । अवंचकत्वें ओटंगावें । स्मरावें ध्यावें सप्रेमें ॥३८॥
ना तरी भावूनियां निर्गुण । साडी तव सगुण भजन । तो कृतघ्न पावे अधःपतन । उपतिष्ठे ज्ञान न कदा त्या ॥३९॥
यास्तव मम मती सकामा । अनन्ययोगें दास्यधर्मा । याहूनि न रुचे समाधिगरिमा । जे साधकां अधमा प्रिय वाढे ॥४०॥
तरी ऐसिये निष्ठेतें करणें । वरिती हें कृपेचेंचि करणें । विषयापासोनि हो करणें । निजपस्मरणें सर्वदा ॥४१॥
तरी ते कृपास्नेहाळ माउली । मजवरी स्नेहाची साउली । करूनि इच्छिले लळे पाळी । सुखाच्या सुकाळी नांदवी ॥४२॥
आतां नियोजिलें ग्रंथनकार्य । सिद्धी पाववील कृपामाय । मज घडिघडी प्रार्थना उपाय । नलगे साहाय्य उपरोधी ॥४३॥
गजादिवाहनां पंथ पुसणें । कीं पाटींच्या उदका मार्ग करणें । न लगे नेतार जिकडे नेणें । तेंवि सत्तास्फुरणें मम वृत्ति ॥४४॥
अथवा संतां श्रोतयांसी । प्रार्थनां कीजे श्रवणाविशीं । तरी ये वाग्यज्ञीं श्रोतृऋषीं । पूर्वींच घेतला श्रवणक्षण ॥४५॥
म्हणोनि आतांचें जें प्रार्थणें । दिसे अत्यंत उपहासवाणें । यास्तव सांडोनि तें बोलणें । कथेसि मनें अवलंबिजे ॥४६॥
तरी पूर्विले अध्यायीं निरूपण । कथिलें वृकासुराचें आख्यान । तेथ दर्शविलें उत्कृष्ट गहन । ऐश्वर्य संपूर्ण हरीचें ॥४७॥
इये ऊननवतितमीं । तेंचि दृढीकरणा शुकस्वामी । इतिहासान्तर श्रवणधामीं । सांडवी नियमें नृपाचे ॥४८॥
कीं पूर्णसत्वीं शुद्ध ज्ञान । ज्ञानीं नांदें शान्ति गहन । शान्ति मोक्षाचें अधिष्ठान । भजकां कल्याण अक्षय दे ॥४९॥
जया सत्वपरीक्षे कारणें । सरस्वतीतीरस्थ मुनिगणें । भृगूसि पाठविलें प्रयत्नें । पहावया नयनें त्रिदेवां ॥५०॥
तेणें ब्रह्मा शंभु परीक्षून । विष्णूसि पाहिलें प्रक्षोभून । तंव शान्तीचें एकायतन । कथिलें अनुभवून सकळांसी ॥५१॥
तिहीं ऐकूनि प्रेमोद्रेकें । निर्भय होऊनि दृढ विवेकें । शान्ति तेथें अभय कौतुकें । या निश्चयें सम्यकें हरि भजले ॥५२॥
यानंतरें द्वारकानगरीं । द्विजाची मृतसंतति श्रीहरी । अर्जुना सह महाकाळपुरीं । जाऊनि सत्वरी आणिली ॥५३॥
इये कथिचिये जी प्रान्तीं । अध्याय पावेल समाप्ती । हें इतिहासद्वय येथ सुमती । कथी नृपा प्रती शुकयोगी ॥५४॥
तेंचि सविस्तर निरूपण । जैसें नृपासि केलें कथन । तैसेंच देशभाषें करून । सावधान श्रवण कीजे ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP