अध्याय ८९ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


प्रसूतिकाल आसन्ने भार्याया द्विजसत्तमः । पाहि पाहि प्रजां मृत्योरित्याहार्जुनमातुरः ॥३६॥

निकट भार्येचा प्रसूतिकाळ । होतां द्विजोत्तम दुःखाकुल । अर्जुनाप्रति जाऊनि विकळ । बोले प्राञ्जळ आम्रेडित ॥४१०॥
कीं मृत्यूपासूनि मत्प्रजेतें । रक्षीं रक्षीं पार्था निरुतें । सत्य करीं स्वप्रतिज्ञेतें । मज आर्तातें सुख देईं ॥११॥
प्रसूतिकाळ मम भार्येचा । समीप आला जाण साचा । दीप उजळीं स्ववीर्याचा । ममार्तितमाचा नाश करीं ॥१२॥
इतुकें बोलिया आर्त द्विज । तें परिसोनि तो भीमानुज । प्रतीक्षापर प्रसूतिकाज । घेवोनि पैज काय करी ॥१३॥

स उपस्पृश्य शुच्यम्भो नमस्कृत्य महेश्वरम् । दिव्यान्यस्त्राणि संस्मृत्य सज्यं गाण्डीव माददे ॥३७॥

करपदमुखीं शुद्धोदक । स्पर्शोनियां मग सम्यक । नमस्कारूनि श्रीत्र्यंबक । घेतलें कार्मृक गाण्डीव ॥१४॥
म्हणाल प्रत्यक्ष वासुदेव । पाण्डवसहाय देवाधिदेव । त्यासि कां न नमी सुभद्राधव । जो संकटें सदैव परिहरी ॥४१५॥
तरी भगवत्तत्त्व जें यथार्थ । तें नेणोनि सहसा पार्थ । उपेक्षा विप्राची निश्चित । केली हें वृत्त लक्षूनी ॥१६॥
कृष्णा न पुसून न विचारून । आदौ सद्भावें न वंदून । एवं तदवज्ञा करून । केलें वर्तन तत्कार्यीं ॥१७॥
दिव्यास्त्रें जीं चमत्कृत । स्मरणमात्रें सिद्धवत । तियें स्मरूनि एकाग्रचित्त । गाण्डीवीं सीत चढविलें ॥१८॥

न्यरुणत्सूनिकाऽगारं उरैर्नानास्त्रयोजितैः । तिर्यगूर्ध्वमधः पार्थश्चकार शरपंजरम् ॥३८॥

द्रोणदत्त इन्द्रदत्त । रुद्रदत्त असंख्यात । नाना अस्त्रें जीं प्रदीप्त । जपोनि निभ्रान्त निज वाचें ॥१९॥
तींहीं योजिल्या अनेकशरीं । ब्राह्मणस्त्री जये घरीं । प्रसूत जाली विकळगात्री । तें घर निर्धारीं निरोधिलें ॥४२०॥
आसमंतात ऊध्व अध । तिर्यग्भागीं निबिडबद्ध । शरपंजर पार्थ प्रबुद्ध । करिता जाला क्षणमात्रें ॥२१॥
जेथ प्रभंजना नव्हे रीघ । यमप्रवेशयत्न मोघ । पावकीं पिपीलिके मार्ग । न घडे अव्य्म्ग जया परी ॥२२॥
ऐसें अच्छिद्र आणि अलोट । इष्वावरन अतिबलिष्ट । अस्त्रविद्येचें सामर्थ्य प्रकट । केलें द्रढिष्ठ अलौकिक ॥२३॥
द्विजप्रजारक्षणा निमित्त । पार्थें हा यत्न केला महत । परि ईश्वरसत्तेचा संकेत । न कळे अद्भुत कवणासी ॥२४॥

ततः कुमारः सञ्जातो विप्रपत्न्यारुदन्मुहुः । सद्योऽदर्शनमापेदे सशरीरो विहायसा ॥३९॥

केल्या नंतर शरपंजर । द्विजपत्नीसी जाला कुमर । विचित्र दैवाचा प्रकार । तो ऐका सादर श्रोते हो ॥४२५॥
जन्मतांचि फोडूनि टाहो । पावोनियां जननमोहो । मुहुर्मुहु रडतां बहु । जाला पहा हो अदृश्य ॥२६॥
गारुडीकृत जैसा उरग । किंवा ऋक्षपतना अध्वग । गगनी लोपे देखतां जग । तेंवि पावला साङ्ग अदर्शन ॥२७॥
देखत देखत जननीनयनीं । सद्य न दिसे पाहतां अवनीं । दंपती विस्मित अंतःकरणीं । करिती विलपन अनुपायें ॥२८॥
म्हणती पूर्वीं तनुजप्रेत । होत होतें धरणिस्थित । हें तंव वर्तलें परमाद्भुत । सदेह गुप्त बालक हें ॥२९॥
दैव असतां प्रतिकूळ । प्रयत्नें होय हानि बहळ । ऐसें कल्पुनि उतावीळ । अर्जुना जवळ ब्राह्मण ॥४३०॥
येऊनियां तत्काळ तेव्हां । वारंवार घेऊनि आह्वा । फाल्गुना निन्दी आव्हासव्हा । तें श्रोतृदेवा परियेसा ॥३१॥

तदाह विप्रो विजयं विनिन्दन्कृष्णसंन्निधौ । मौढ्यं पश्यत मे योऽहं श्रद्दधे क्लीबकत्थनम् ॥४०॥

सभेमाजी कृष्णाजवळी । विजय बैसला अस्त्रशाळीं । तयातें निन्दी यदुमंडळीं । विषमबोलीं अपकारें ॥३२॥
पहा हो माझें मूर्खत्व कैसें । कीं मी क्लेबकथनीं विशेषें । विश्वासलों धरूनि आशे । सत्य आपैसें मानूनि ॥३३॥
क्लीव म्हणिजे नपुंसक । पुरुषार्थावांचूनि वाक्य । तें व्यर्थ निवीर्य लटिक । अर्थक्रियाविहीन पैं ॥३४॥
गर्भान्ध म्हणे मी रत्न परीक्षीं । अज म्हणे मी ताडीन सिंहवक्षीं । मशक म्हणे नभ झांकीन पक्षीं । ही बोलणीं जैसीं नपुंसकें ॥४३५॥
बोलण्या सारिखी नव्हे क्रिया । त्याचि नपुंसका बोलिया । गंधर्वनगरीं आपैसया । कोण वसतिया कैं लाहे ॥३६॥
मृगजळीं कोणी णिवाला । ऐसा कधीं नाहीं ऐकिला । वंध्यासुरतें पुत्र जाला । तो न देखिला कल्पान्तीं ॥३७॥
ऐसें असतां विश्वास तेथें । धरी निश्चयात्मकें चित्तें । मूर्खावांचूनि नाम त्यातें । कैचें निरुतें कथनीं ये ॥३८॥
तेंवि माझें मूर्खत्व खरें । वितथकत्थनीं अविचारें । जाणता भांबावलों भ्रमभरें । तें विस्तारें परियेसा ॥३९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP