अध्याय ८९ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - सरस्वत्यास्तटे राजन्नृषयः सत्रमासत । वितर्कः समभूत्तेषां त्रिष्वधीशेषु को महान् ॥१॥

शुक म्हणे गा परिसें राया । सरस्वतीतटीं यज्ञकार्या । सत्रीं असते झाले ऋषि तयां । वितर्क बरवा जाहला ॥५६॥
म्हणसी कोण तो वितर्क कैसा । तरी मुमुक्षुजना हितावहसा । तो काय निमित्त जाला मानसा । तयाच्या रहस्या त्वां ऐकें ॥५७॥
यज्ञानिमित्त अनेक ऋषी । मिळाले शास्त्रज्ञ कान्तदर्शी । वेदवृक्षावरील पक्षी । अनेक शाखीं निविष्ट ॥५८॥
सिद्धान्त पूर्वपक्षात्मक । अनेकार्थत्व निगमा देख । शाखां परस्परें अनोळख । पुराणें अनेक मतवंतें ॥५९॥
तयां श्रुतीं आणि स्मृतीं माजी । कोठें वरिष्ठत्व दाविलें आजी । कोठें तत्पुरुषचि सहजीं । स्तविला विरिंची उत्कर्षें ॥६०॥
ते पृथक् श्रुतिस्मृत्यभिप्राय । घेऊनि ऋषींहीं भजनान्वय । स्वयें रूढविलें संदेहमय । धरूनि धैर्ये अभिमानें ॥६१॥
तंव तेथ प्रसंगें संयोगवशें । मिथा संवादतां ज्ञानाभिलाषें । स्वाभीष्ट स्थापितां सावेशें । युक्तिरहस्यें बोलतां ॥६२॥
कोण्ही श्रुतिस्मृतींच्या बळें । वैशिष्ट्यें शिवा प्रतिपादिलें । त्यांतें नोकूनि आणिकीं सळें । स्वमतीं विशेषिलें विखनसा ॥६३॥
एकीं निषेधूनि सकळांतें । सर्वोत्कृष्टत्व श्रीरमणातें । प्रमाणयुक्त श्रुतिसिद्धान्तें । बहुसंमतें निगदिलें ॥६४॥
एवं विविधा अनुवादितां । न होय कदापि एकवाक्यता । परस्परें निरुत्तर करिता । संशयावर्त्तामाजी पडिले ॥६५॥
या कारणें समस्तांस । वितर्क जाला बहुवस । कीं त्रिदेवांकाजी विशेष । वरिष्ठ ईश कोण तो ॥६६॥
तये संशयनिवृत्तीस्तव । तात्पर्य कळावया वास्तव । प्रत्यक्ष बाणावया अनुभव । यत्न स्वयमेव हा केला ॥६७॥

तस्य जिज्ञासया ते वै भृगुं ब्रह्मसुतं नृप । तज्ज्ञप्त्यै प्र्षयामासुः सोऽभ्यगाद् ब्रह्मणः सभाम् ॥२॥

तपस्विवंद्य विपश्चित । भृगु ऋषीश्वर ब्रह्मसुत । पाठविते झाले त्वरान्वित । मुनिवर समस्त तयातें ॥६८॥
जरी कोठें पाठविलें म्हणसी । सत्यलोक वैकुण्ठ कैलासीं । विधि हर विष्णु पाहूनि अक्षीं । जो सत्वशान्तीसी आयतन ॥६९॥
तया जाणावयाचें इच्छें करून । निश्चयें भृगुसी प्रेरिलें जाण । आतां पुढील परिसें वर्तमान । कुरुकुळमंडन भो नृपा ॥७०॥
असतां ऋषींचा समुदाय । भृगूतेंचि कां प्रेरिलें पाहें । म्हणसी तरी जो विभूति होय । निःसंदेह हरीची ॥७१॥
देवत्रयाचें परीक्षण । करूं शके इतर कोण । महर्षीमाज मी म्हणोन । ज्या वदला श्रीकृष्ण गीतेतें ॥७२॥
मग तो स्वपितृसभेप्रति । तच्छील जाणावया निगुती । प्रथम जाता झाला सुमती । परीक्षा पुरती करावया ॥७३॥
परीक्षेचें जें का वर्म । भृगु सर्वज्ञ जाणे परम । जेणें ज्याची परीक्षा सुगम । तें हृदयंगम चतुराचें ॥७४॥

न तस्मै प्रह्वणं स्तोत्रं चक्रे सत्वंपरीक्षया । तस्मै चुक्रोध भगवान्प्रज्वलन्स्वेन तेजसा ॥३॥

कामिनीसंसर्गें करून । ब्रह्मचर्य परीक्षे पूर्ण । शूर परीक्षे मांडल्या रण । मित्र व्यसन पावतां ॥७५॥
निर्धनीं परीक्षिजे वनिता । आचारवंत दरिद्र येतां । पितृवृद्धाप्यीं जाणिजे सुता । कीं निवडे दाता संकटीं ॥७६॥
घनीं परीक्षिजे हिरा । कीं वरकलीं कार्तस्वरा । स्पर्शमणि लोहीं खरा । दुःखीं धीरा वोळखिजे ॥७७॥
निर्ममत्व परीक्षे आप्तवियोगें । कीं वीतरागी विषयसंगें । प्रारब्ध वोळखिजे भोंगें । वदान्य प्रसंगें जाणिजे ॥७८॥
शब्दें परीक्षे अंतर । संवादें पंडित साक्षर । दर्शनप्रशस्तीं योगेश्वर । कीं निर्विकार संसर्गें ॥७९॥
निरभिमान अनादरितां । कीं आत्मनिष्ठ देखोनि समता । क्षमस्वी जाणिजे क्षोभवितां । अमर्यादितां शान्त कळे ॥८०॥
यास्तव भृगु बुद्धिमंत । जाऊनियां ब्रह्मसभेंत । शिष्टाचार न केला तेथ । परीक्षार्थ सत्वाच्या ॥८१॥
म्हणसी शिष्टाचार कोणता । तरी जो सर्व जगाचा जनिता । मुनिसुरपितरां वंद्य तत्वता । आणि साक्षात्पिता ययाचा ॥८२॥
तथाप्रति गेलिया आधीं । नमन स्तवन यथाविधी । करावें परंतु हा छळबुद्धी । तपोनिधी कार्यार्थी ॥८३॥
विधिकारणें विनयें नमन । किंवा प्रेमभावें स्तवन । हें कांहीं न करिता जाला जाण । आशय आन धरोनियां ॥८४॥
पुष्पवाटिकीं सुरूचा वृक्षा । तैसाचि सभेमाजी दक्ष । सत्वीं धरूनियां अनुलक्ष । उभा प्रत्यक्ष राहिला ॥८५॥
ऐसें देखोनि उद्धतपण । ब्रह्मा रजाचें अधिष्ठान । अमर्यादा न साहोन । क्रोधायमान बहु झाला ॥८६॥
कुपथ्यें जीर्णज्वर खवळे । सुप्त पन्नग डंवचितां उसळे । तेंवि अंतरीं त्याच्या तये वेळे । क्रोध अतिबळें खवळला ॥८७॥
ताम्रवर्ण जाले नेत्र । क्षोभें तापलें संपूर्ण मात्र । ऐसा भगवान चतुर्वर्क । स्वतेजें प्रज्वळित होत्साता ॥८८॥
भृगू कारणें सक्रोध । पाहता झाला अतिविरुद्ध । जणूं शापून करील दग्ध । परी कौतुक प्रसिद्ध मोहाचें ॥८९॥

स आत्मन्युत्थितं मन्युयात्मजायात्मना प्रभुः । अशीशमद्यथा वह्निं स्वयोन्या वारिणाविभुः ॥४॥

तेंचि प्रकट ऐकें नृपती । स्रष्टा प्रभु तो धिषणापति । आपुल्या ठायीं उठिला अती । अद्भुत ये रीती जो क्रोध ॥९०॥
तयातें आपुल्या आपण । आत्मजाकारणें प्रलोभून । शमिता जाला न लागतां क्षण । कीं स्वयेंचि पूर्ण तद्रूपें ॥९१॥
जैसें जळाचें कारण वह्नी । आपणचि तद्रूपें होवोनी । तेणें स्वकार्य शमे निदानीं । पंकजयोनी तैसाची ॥९२॥
यापरी विधीचें लक्षण । भृगूनें पाहिलें संपूर्ण । वृषीं दुग्धवत् सत्वगुण । न देखोन परतला ॥९३॥

ततः कैलासमगमत्स तं देवो महेश्वरः । परिरब्धुं समारेभे उत्थाय भ्रातरं मुदा ॥५॥

तया नंतरें झडकरी । कैलासाप्रति खगापरी । जाता झाला पहावया नेत्रीं । संहारकारी त्र्यंबक ॥९४॥
कोणें एके समयीं शिव । विधीचिया भृकुटीपासाव । जन्मला म्हणोनि विधिपुत्रत्व । बंधु यास्तव भृगूचा ॥९५॥
असो तो देव महेश्वर । तया बंधू भृगूतें सत्वर । देखोनि झाला सुखनिर्भर । तें लक्षण समग्र अवधारीं ॥९६॥
हर्षें करूनि आसनाहून । उठूनि स्वबाहु पसरून । आलिङ्गावया स्नेहें पूर्ण । उदित आपण जाहला ॥९७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP