अध्याय ७२ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एकदा भातुलेयं वै प्राह राजन्वृकोदरः । न शवतोऽहं जरासंधं निर्जेतुं युधि माधव ॥४१॥

कोणे एके समयीं भीम । मातुळपुत्र जो मेघश्याम । तयाप्रति समरकाम । साधनीं अक्षम हें प्रकटी ॥६४॥
राया ऐकें कौरवपाळा । म्हणे वृकोदर भो गोपाळा । समर्थ नव्हें मी मागधा खळा । समरीं तया आणावया ॥२६५॥
मायानियंता तूं माधव । यावरी न कळे तुझी माव । माझी निःशेष भंगली हांव । समरपातवविजयाची ॥६६॥
मागध योद्धा प्रतापी सदट । ऐसा मजसीं कोण्ही सुभट । समरीं न संघटेचि धीट । मजहूनि वरिष्ठ बळिष्ठ हा ॥६७॥
ऐसीं वृकोदराचीं वचनें । श्रवणीं ऐकूनि जनार्दनें । मायालाघवी रहस्यसूचनें । करिता झाला तें ऐका ॥६८॥

शत्रोर्जन्ममृती विद्वान्जीवितं च जराकृतम् । पार्थमाप्याययन्स्वेन तेजसाऽचिंतयद्धरिः ॥४२॥

शत्रु म्हणिजे जरासंध । तयाचें जन्ममृत्यु विशद । स्वयें जाणता श्रीगोविन्द । जीवनकंद सहेतुक ॥६९॥
जें बृहद्रथाच्या उभय नारी । दोनी शकलें दोघीं उदरीं । जन्मतां टाकिलीं बाहेरी । विपरीत परी मानूनी ॥२७०॥
तेथ जरानामका राक्षसी । नगरीं भ्रमतां माजि निशीं । तिणें योजितां उभयाङ्गांसी । बैसली अनायासीं दृढ संधी ॥७१॥
यास्तव जरासंध हें नांव । प्रसिद्ध मिरवी मागधराव । याच्या मरणाचा उपाव । तोही स्वमेव येचि रीती ॥७२॥
इतुकें विवरूनि जनार्दनें । भीम पाहिला अमृतनयनें । बळप्रतापौजोगुणें । आपुलेपणें प्रौढविला ॥७३॥
आपुल्या तेजें सुतेजस्वी । भीम करूनियां ओजस्वी । मागध वधूनियां यशस्वी । व्हावया दावी गूढ युक्ती ॥७४॥

संचिंत्यारिवधोपायं भीमस्यामोघदर्शनः । दर्शयामास विटपं पाट्ययन्निव संज्ञया ॥४३॥

दुर्घटशत्रुवधोपाय । बरव्या प्रकारें चिंतिता होय । चिंन्तूनि भीमासि दाविली सोय । कैसी काय तें ऐका ॥२७५॥
सफळ दर्शन ज्या कृष्णाचें । झालिया साफल्य बहुजन्मांचें । तो भक्तांच्या छंदें नाचे । हें हरियश वाचे श्रुति गाती ॥७६॥
अरिवधोपाय बरवे रीती । हृदयीं चिन्तूनियां श्रीपति । संज्ञेकरूनि भीमाप्रति । सांगे निगुती कैवाडें ॥७७॥
दावूनि वृक्षशाखेचे फांटे । चरणीं रगडूनि उधडिजे नेटें । तैसा मागध उधडितां निवटें । संकेत कूटें दाखविले ॥७८॥
सूचना जाणोनि भीम बळी । हृदयीं बोधला प्रतापशाली । तदनुसार क्रिया केली । तेही परिसिली पाहिजे ॥७९॥

तद्विज्ञाय महासत्त्वो भीमः प्रहंरतां वरः । गृहीत्वा पादयोः शत्रुं पातयामास भूतले ॥४४॥

महाबळिष्ठ भीमसेन । कृष्णसंकेत जाणून । समरीं करिती जे प्रहरण । त्यांसि मंडन वीरवर ॥२८०॥
मागधा मस्तकें थडकूनि हृदयीं । चरण वोढूनि पाडिला मही । एक चरण रगडूनि पायीं । दुजा द्विबाहीं आकळिला ॥८१॥

एकं पादं पदाक्रम्य दोर्भ्यामन्यं प्रगृह्य सः । गुदतः पाटयामास शाखामिव महागजः ॥४५॥

दोहीं पायीं एक चरण । भूतळीं रगडिला बळेंकरून । दुसरा दोर्दंडीं कवळून । ऊर्ध्व झोंकूनि उधडिला ॥८२॥
झोंक मारितां भीम बळी । सांधा उखळला गुदस्थळीं । आधारचक्राच्या चतुर्द्दळीं । भिन्नता झाली वर्णाची ॥८३॥
जैसी चंडद्रुमाची शाखा । बळें कुञ्जर उधडितां देखा । शकलें होती तोचि लेखा । मागथाचा पैं केला ॥८४॥
आधार स्वाधिष्ठान मणिपुर । अनाहत विशुद्ध आज्ञाचक्र । त्रिकूट श्रीहट गोल्हाट पर । सहस्रारपर्यंत ॥२८५॥
औटपीठ पुण्यगिरी । भ्रमरगुंफेचिये शिरीं । ब्रह्मरंध्रींची खापरी । उधडूनि करी द्वय शकलें ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP