अध्याय ७२ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - एकदा तु सभामध्य आस्थितो मुनिभिर्युतः । ब्राह्मणैः क्षत्रियैर्वैश्यैर्भ्रातृभिश्च युधिष्ठिरः ॥१॥

कोणे एके दिवसीं धर्म । सभ्येंसहित पुरुषोत्तम । संपादूनि आहनिक नेम । सभासदन प्रवेशलें ॥७॥
धर्मराजा सभास्थानीं । विराजमान मुख्यासनीं । धौम्यप्रमुख भोंवते मुनी । नृप वेष्टुनी बैसले ॥८॥
दक्षिणभागीं ब्राह्मणपङ्की । चतुर्वेदी देदीप्यव्यक्ती । पावक किंवा ते गभस्ती । भ्राजिष्ठ ज्योतिर्मय गमती ॥९॥
वामभागीं पुरुषोत्तम । यशोधनक्षेत्रीं उत्तमोत्तम । वृष्णिभोजान्धकसत्तम । धृतविक्रम धीमंत ॥१०॥
अग्रभागीं अमात्यपंक्ती । पौरप्रजाजन शोभती । मुख्य मुख्य वैश्ययाती । मंत्रिवर्ग पृष्ठभागीं ॥११॥
ईषदंतरें पार्श्वीं पृष्ठीं । चौघे बंधु धर्मानिकटीं । श्वेत चामरें धरूनि मुष्टीं । मंद माद्रेय वीजिती ॥१२॥
सन्नद्ध बद्ध तयां पाठीं । गदा गाण्डीव कवळूनि मुष्टीं । भीमार्जुन प्रतापजेठी । सभास्थानीं विराजती ॥१३॥
आणिक ही प्रगल्भ धिषणामंत । धर्मसदनीं बैसणाईत । राया ऐकें ते समस्त । शुक सांगत संक्षेपें ॥१४॥

आचार्यैः कुलवृद्धैश्च ज्ञातिसंबंधिबांधवैः । श्रृण्वतामेव चैतेषामाभाष्येदमुवाच ह ॥२॥

अनेकव्यवहारशिक्षागुरु । धनुर्विद्यादिदीक्षागुरु । छत्तीस दंडी राजगुरु । मल्लप्रवर द्वंद्वांगी ॥१५॥
व्याकरणप्रमुखषडंगवक्ते । वेदांतादिशास्त्रवेत्ते । आयुर्वेदादिपरिज्ञाते । प्रश्नप्रदर्शक दैवज्ञ ॥१६॥
इत्यादि वक्तृप्रवराचार्य । क्षत्रिय कुलीन वृद्ध जे आर्य । गोत्रजबंधु सुहृद्वर्य । धैर्यमेरु धुरंधर ॥१७॥
ऐसें बसले असतां सदसीं । ऐकतां तयां समस्तांसे । धर्म विवरूनि निजमानसीं । कार्यसिद्धीसी अनुमानी ॥१८॥
समस्तां सभ्यां ऐका म्हणे । काय बोले त्यांकारणें । प्रसन्न असतां एकें कृष्णें । असाध्य साधन घडेल ॥१९॥
प्रसन्नपणें जें करील कृष्णे । तें कृत्य करूं न शके आन । ऐसें मानसीं निर्धारून । श्रीभगवान आमंत्री ॥२०॥
सभ्यांसी म्हणे युधिष्ठिर । आमुचे मनींचा हा निर्धार । कृष्णावांचूनि कोण्ही अपर । कार्य दुस्तर न साधी ॥२१॥
जी जी म्हणोनि सभासदीं । राजा पूजिला यथोचित शब्दीं । मग तो युधिष्ठिर विशाळबुद्धी । बोले संसदीं तें ऐका ॥२२॥

युधिष्ठिर उवाच - ऋतुराजेन गोविंद राजसूयेन पावनीः । यक्ष्ये विभूतीर्भवतस्तत्संपादय नः प्रभो ॥३॥

भो भो स्वामी श्रीगोविंदा । ऐकें आमुचिया मनोरथवादा । राजसूयमखेंद्रें सुरवृंदा । यजूनि मोदा पावेन ॥२३॥
म्हणसी सुरवृंद ते कोण । ज्या तव विभूति पुण्य पावन । त्या मी यजीन मखेंद्रें करून । सांग संपादन करीं तें तूं ॥२४॥
सार्वभौम जो चक्रवर्ती । हे मनोरथ त्या शोभती । ऐसें म्हणसी जरी श्रीपती । तरी ऐकें विनंती यदर्थीं ॥२५॥

त्वत्पादुके अविरतं परि ये चरंति ध्ययंत्यभद्रनशने शुचयो गृणंति ।
विंदंति ते कमलनाभ भवापवर्गमाशासते यदि त आशिष ईश नान्ये ॥४॥

हो कीं कोण्ही सामान्य नर । परंतु तुझा पादुकाधर । कालत्रयीं निज शरीर । परिचर्यापर सप्रेमें ॥२६॥
ध्यान मूर्ति हृदयकमळीं । प्रमोदोत्कर्षें सर्वदा कवळी । तव पदमहिमा सर्वकाळीं । नामावळीसह वर्णी ॥२७॥
तव पदप्रेमा म्हणसी कैसा । तरी जो नाशक दरिद्रदोषा । स्मरणमात्रें अभद्र क्लेशां । भंगी निशा रवि जेंवि ॥२८॥
जाह्नवीचें जन्मस्थान । अविरत करितां चिन्तन । प्रेमा प्रकटे अघ भंगून । करिती गनन सत्वस्थ ॥२९॥
तयांसि म्हणसी काय लाभ । तरी जे तव पादुकावल्लभ । ते भवाचा उपडूनि कोंभ । पावती सुलभ अपवर्ग ॥३०॥
जरी ते ऐश्वर्यमनोरथ करिती । ते ते अमोघ आशिष लाहती । तैसे अन्यत्र चक्रवर्ती । लाहों न शकती बहु क्लेशें ॥३१॥
ऐसें निर्द्धारें मी जाणें । म्हणोनि प्रार्थीं प्रभूकारणें । स्वभक्तपक्षपाताचें लेणें । आंगीं मिरवणें तें वदतों ॥३२॥

तद्देवदेव भवतश्चरणारविन्दसेवानुभावमिह पश्यतु लोक एषः ।
ये त्वां भजंति न भजंत्युत वोभयेषां निष्ठां प्रदर्शय विभो कुरुसृंजयानाम् ॥५॥

भो भो स्वामी देवाधिदेवा । जे कां तुझिया पादाब्जसेवा । तियेचा अनुभव येथ सर्वां । प्रकट करावा ये काळीं ॥३३॥
जो हा येथ मर्त्य लोक । त्यामाजि भाविक अभाविक । तब पदभजनाचें कौतुक । पाहोत सम्यक सर्वत्र ॥३४॥
तव पादाब्जा जे जे भजती । अथवा द्वेष्टे जे न भजती । त्या उभयतांतें निष्ठा पुरती । दावीं श्रीपती प्रकटूनी ॥३५॥
चैद्य मागध कुरु सृंजय । शाल्व सोमक हैहय । गौड मद्रक शिबि कैकय । नृपसमुच्चय हा पाहो ॥३६॥
तव पदभवजननिष्ठाबळ । यांसि दाखवीं एक वेळ । भगवद्भक्तिअनादरशीळ । लावीं काजळ तद्वदना ॥३७॥
भगवत्पदभक्तीचा महिमा । देखोनि भक्तां उथळे प्रेमा । भक्तचकोरां पूर्ण पूर्णिमा । अभक्तां अमा अभाग्यें ॥३८॥
ऐसी उभयां भजननिष्ठा । प्रकटूनि दावीं भो वैकुंठा । जरी तूं म्हणसी अभेदपीठा । वैषम्यचेष्टा या कैंच्या ॥३९॥
तरी ऐकें गा जनार्दना । वैषम्यभेदाची भावना । तुज नातळे जेंवि गगना । तुहिनादिकें न शिवती ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP