व्याकरण चालविणें

व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


वाक्यांतील प्रत्येक शब्दाविषयी जात, लिंग, विभक्ति, वचन इ. आपणांस असलेली माहिती सांगणें, यास व्याकरण चालविणें असें म्हणतात. शब्दाचें व्याकरण चालवितां येणें ही गोष्ट शुद्धलेखनास मदत करणारी आहे; म्हणून तीसंबंधीं माहिती मिळवू. क्रियापद चालविताना लिंगवचनाशिवाय आणखी काही गोष्टी सांगाव्या लागतात. त्यांचा क्रमानें विचार करू.

१ क्रियापदाचे काळ

१ राम जेवतो. २ रामा आंबा खातो. यांत जेवतो, खातो या क्रियापदांवरून केव्हा जेवतो ? आता. केव्हा खातो ? आता. असें समजतें.
१ रामा जेवला. २ रामानें आंबा खाल्ला. यांत जेवला, खाल्ला या क्रियापदांवरून केव्हा ? पूर्वी. खाल्ला केव्हा ? पूर्वी. असें समजतें.
१ रामा जेवेल. २ रामा आंबा खाईल. यांत जेवेल, खाईल या क्रियापदांवरून जेवेल केव्हा ? पुढे. खाईल केव्हा ? पुढे. असें समजतें.
क्रियापदाच्या रूपावरून मागे, आता, पुढे असा जो वेळेचा बोध होतो त्यास काळ म्हणतात.
१ गणू गेला. २ विठूनें पुस्ती लिहिली. यांत गेला, लिहिली या क्रियापदांवरून पूर्वीं असा वेळेचा बोध होतो. अशा क्रियापदांचा भूतकाळ समजतात.
१ यमू जाते. २ दामू अभ्यास करितो. यांत जाते, करितो या क्रियापदांवरून आता असा वेळेचा बोध होतो. अशा क्रियापदांचा वर्तमानकाळ समजतात.
१ कुसुम जाईल. २ शकू गाणें गाईल. यांत जाईल, गाईळ या क्रियापदांवरून पुढे असा वेळेचा बोध होतो. क्रियापदांचा भविष्यकाळ समजतात.
मुख्य काळ तीन आहेत. १ भूतकाळ, २ वर्तमानकाळ, ३ भविष्यकाळ.

२ क्रियापदाचे अर्थ

१ रामा ऊठ. २ गणू जा. ३ मी येऊ ? ऊठ, जा, या क्रियापदावरून आज्ञा केली आहे व येऊ या क्रियापदावरून आज्ञा मागितली आहे असा बोध होतो.
१ मुलांनीं आईबापांचें ऐकावें. २ विठू आज यावा. ३ मी शिक्षक व्हावा. यांत ऐकावें या क्रियापदावरून कर्तव्य, यावा क्रियापदावरून अजमास, व्हावा या क्रियापदावरून इच्छा या गोष्टी कळतात.
१ तूं जर हें औषध घेशील तर खचित बरा होशील. २ संग राण्यास जर जय मिलता तर दिल्लीस रजपुतांचेंच राज्य झालें असतें. या वाक्यांत अमुक केलें तर अमुक होईल असा संकेत समजतो.
१ जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा केली किंवा आज्ञा मागितली असा बोध होतो, त्या क्रियापदाचा आज्ञार्थ समजतात. जसें - विनू इकडे ये.
२ जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, अजमास असा बोध होतो त्या क्रियापदाचा विध्यर्थ समजतात. विद्यार्थ्यांनीं गुरूंची आज्ञा मानावी.
३ जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून अमुक केलें असतें तर अमुक झालें असतें असा संकेत कळतो, त्या क्रियापदाचा संकेतार्थ समजतात. जसें - जर वारा बंद पडला तर पाऊस खात्रीनें येईल.
४ रामा पोळी खातो. रामानें पोळी खाल्ली. खातो, खाल्ली या क्रियापदावरून आज्ञा, कर्तव्य, संकेत इ. कांहीं कळत नाहीं. अशा क्रियापदांचा स्वार्थ मानितात. याप्रमाणें क्रियापदाचे स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ, संकेतार्थ असे चार अर्थ मानितात.

३ संयुक्त क्रियापदें

१ रामा बोलत आहे. २ यमूनें पत्र लिहून काढलें. ३ बाळानें पुस्तक फाडून टाकलें.
पहिल्या वाक्यांत रामा आहे हें सांगावयाचें नसून त्याचें बोलणें हें सांगावयाचें आहे. या वाक्यांतील मुख्य क्रिया बोलणें ही बोलत या कृदन्तांत आहे.
दुसर्‍या वाक्यांत यमूनें पत्र काढलें हें सांगितलें नसून तिनें पत्र लिहिण्याची क्रिया केली हें सांगितलें आहे. वाक्यांतील मुख्य क्रिया लिहिणें ही लिहून या कृदन्तांत आहे.
तिसर्‍या वाक्यांत पुस्तक टाकलें हें सांगावयाचें नसून फाडलें हें सांगितलें आहे. या वाक्यांईल मुख्य क्रिया फाडणें ही फाडून या कृदन्तांत आहे.
विनायक जेवतो. काशीनें कशिदा काढिला. या वाक्यांत जेवतो, काढिला या क्रियापदांत मुख्य क्रिया असून त्या क्रियापदांनीं वाक्याचा अर्थ पुरा झाला आहे. परंतु वर पहिलीं जीं तीन वाक्यें घेतलीं आहेत त्यांतील आहे, काढलें, टाकलें या शब्दांत मुख्य क्रिया नाहींत. मुख्य क्रिया बोलत, लिहून फाडून या कृदन्तांत आहेत; पण त्यांनी वाक्याचा अर्थ पुरा होत नाहीं. जसें :- रामा बोलत, यमूनें पत्र लिहून, बाळानें पुस्तक फाडून.
वाक्यांतील मुख्य क्रिया ज्या कृदन्तांत असते तें कृदन्त व त्यापुढील वाक्य पुरें करणारा शब्द या दोहोंमिळून संयुक्त क्रियापद म्हणतात. बोलत आहे; लिहून काढलें; फाडून टाकलें हीं संयुक्त क्रियापदें होत.
संयुक्त क्रियापदांतील वाक्य पुरें करणार्‍या शब्दास ( क्रियापदास ) सहाय क्रियापद म्हणतात. वरील उदाहरणांत आहे, काढलें, टाकलें हीं सहाय क्रियापदें होत.
मधू मुंबई पाहून आला. गंगूनें कणीस भाजून खाल्लें.
यांत पाहून आला; भाजून खाल्लें हीं संयुक्त क्रियापदें भासतात, पण तीं संयुक्त क्रियापदें नाहींत; कारण पाहून, भाजून या कृदन्तांत मुख्य क्रिया नाहींत; येणें, खाणें या मुख्य क्रिया आला व खाल्लें या क्रियापदांत आहेत; म्हणून हीच मुख्य क्रियापदें होत.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP