अनुच्चारित अनुस्वार - सर्वनामविचार

व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


नामाबद्दल येणारे शब्द ( सर्वनामें )

(१) रामा म्हणाला, रामा सिनेमास येणार नाहीं, रामाला काम आहे.
(२) विठू गोविंदास म्हणाला, गोविंदा, इकडे ये. गोविंदा माझें दप्तर शाळेंत ने. विठू मागाहून येतो.
(३) गोविंदानें उत्तर दिलें, नारायण येत आहे, नारायण तुझें दप्तर नेईल; कारण नारायण तुझा मित्र आहे.
वर लिहिल्याप्रमाणें आपण असें बोलत नाहीं.
(१) रामा म्हणाला, मी सिनेमास येणार नाहीं, मला काम आहे.
(२) विठू गोविंदास म्हणाला, गोविंदा, इकडे ये. तूं माझें दप्तर शाळेंत ने. मी मागाहून येतों.
(३) गोविंदानें उत्तर दिलें, नारायण येत आहे, तो तुझें दप्तर नेईल; कारण तो तुझा मित्र आहे.
नेहमीं आपण याप्रमाणें बोलतों. यांत रामा, गोविंदा, नारायण हे शब्द नामें आहेत. त्यांचा उच्चार वारंवार होऊं नये म्हणून मी, तूं, त्तो हे शब्द आले आहेत. नामांबद्दल येणार्‍या अशा शब्दांना सर्वनामें म्हणतात. मी, तूं, तो याप्रमाणें हा, जो, कोण, काय, आपण अशीं आणखी सर्वनामें आहेत.

(१) रामा म्हणाला, मी नमस्कार घालतों. त्याचें ऐकून गोविंदा व नारायण म्हणाले, आम्ही नमस्कार घालतों.
(२) कृष्णा, तूं इतक्यांत फिरावयास येऊं नकोस. गोपाळ, तूं पण येऊं नकोस. आधीं शाळेचा अभ्यास करा मग तुम्ही या.
(३) यशवंत, तूं मधूची संगत धरूं नकोस; कारण तो अभ्यास करीत नाहीं. अंतू व प्रताप यांच्या संगतईंत रहा. ते उद्योगी आहेत.
या लिहिण्यांत बोलणार्‍याबद्दल मी हें सर्वनाम येतें, ज्याच्याशीं बोलावयाचें त्याबद्दल तूं तें सर्वनाम येतें, ज्याच्यासंबंधीं बोलावयाचें त्या तिसर्‍याबद्दल तो हें सर्वनाम येतें असें दिसून येईल.

बोलण्यांत स्वतःबद्दल, ज्याच्याशीं बोलावयाचें त्याबद्दल, ज्यासंबंधीं बोलावयाचें त्याबद्दल जीं सर्वनामें येतात, त्यांना पुरुषवाचक सर्वनामें म्हणतात.
(१) स्वतःबद्दल येणारीं तीं प्रथम पुरुषवाचक सर्वनामें.
एकवचन - मी. अनेकवचन - आम्ही.
(२) ज्याशीं बोलावयाचें त्याबद्दल येणारीं तीं द्वितीय पुरुषवाचक सर्वनामें.
ए. व. - तूं; अ. व. - तुम्ही.
(३) ज्याच्यासंबंधीं बोलावयाचें त्याबद्दल येणारीं तीं तृतीय पुरुषवाचक सर्वनामें.
ए. व. - तूं; अ. व. - ते.

-----------------------------

(१) हा बैल इथें बांधा. तो घोडा वाड्यांत न्या.
(२) हा मोडका फळा आंत ठेव. तो नवा फळा भिंतीवर टांग.
यांत हा व तो हीं सर्वनामें जवळचा व दूरचा पदार्थ दाखवितात.
पदार्थ दाखविणार्‍या या सर्वनामांस दर्शक सर्वनामें म्हणतात.
(१) जो योग्य काटकसरीनें वागतो तो सहसा अडचणींत येत नाहीं.
(२) जो चाकू पूर्वीं चार आण्यांस मिळत होता तो आतां दोन रुपयांत मिळतो.
यांत जो हें सर्वनाम पुढील तो या सर्वनामाशीं संबंध दाखविण्यासाठीं आलें आहे. अशा जो या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात.
(१) या घरांत कोण रहातें ? आज मास्तरांनीं घरीं करण्यांस काय अभ्यास दिला ?
(२) ते कोण आहेत ? त्यांना काय पाहिजे ?
कोण आणि काय हीं सर्वनामें प्रश्न करावयाच्या वेळीं येतात; म्हणून त्यांना प्रश्नार्थक सर्वनामें म्हणतात.
(१) या वस्तूंपैकीं तुला काय पाहिजे तें घे. चिनी लोक काय मिळेल तें खातात.
(२) या विचित्र जगांत कोणी हसतो तर कोणी रडतो. कोणास कोणीं हंसू नये.
या वाक्यांत कोण आणि काय हीं सर्वनामें आलीं आहेत. काय म्हणजे कोणतीही वस्तु. कोणी म्हणजे कोणीही मनुष्य. यावरून कोण व काय या सर्वनामांचा केव्हां केव्हां सामान्य अशा अर्थीं उपयोग होतो; तेव्हां त्यांस सामान्य सर्वनामें म्हणतात.

यावरून सर्वनामाचे (१) पुरुषवाचक, (२) दर्शक, (३) संबंधी, (४) प्रश्नार्थक, (५) सामान्य असे पांच प्रकार होतात हें लक्षांत येईल.
(१) राम म्हणाला, मी आज वनांत चाललों. तें ऐकून सीता म्हणाली, मी पण तुमच्याबरोबर येणार.
(२) राम व लक्ष्मण कौसल्येस म्हणाले, आम्ही आतां वनांत जाण्यांस निघालों. तेथें सुमित्रा होतीच. त्या दोघी म्हणाल्या, बाळांनो, तुमच्या मागें आम्ही फार दिवस जगणें शक्य नाहीं.
(३) एक माकडाचें पोर झाडावरून तळाच्या विहिरींत पडलें. तेव्हां तें ओरडलें कीं, मी मेलें धावा ! तेव्हां झाडांवरील माकडें ओरडलीं, अरे, आतां आम्हीं तुला वर काढावें तरी कसें ?
(४) विसू, तूं पेटी वाजव. वेणू, तूं गाणें म्हण. वामन, पांडू तुम्ही एथें बसा. रंगूं, गंगू तुम्ही येथें बसा.
मी, आम्ही, तूं, तुम्ही हीं सर्वनामें लिंगाप्रमाणें बदलत नाहींत.
(५) हा मुलगा शाळेत जातो. ही मुलगी पण जाते. पण हें शेजारचें मूल कां जात नाहीं ? जो मुलगा अगर जी मुलगी शाळेंत जाणार नाहीं त्यांना पुढें पस्तावा होईल. जें मूल नियमितपणें अभ्यास करितें तें परीक्षेंत खात्रीनें पास होतें. शहरांत जो तो आपल्या कामांत गुंग असतो. ती स्थिति खेड्यांत नसते. तें कोण आलें ?  ते तर अंतू व मधू दिसतात. आणि त्यांच्या मागें कोण आहे ? त्या कुसूम व शकुंतला असाव्यात. तीं मुलें आतां नदीवर जाणार असें वाटतें. जे मुलगे अगर ज्या मुली व्यायाम करतात त्यांची प्रकृति निरोगी राहते. जें मूल व्यायाम घेत्त नाहीं तें पुढें अशक्त होतें. जीं माणसें दुसर्‍यावर उपकार करतात तीं सर्वास आवडतात. तुम्ही सहलीस जाल तेव्हां ह्या गूळपापडीच्या वड्या व हीं बिस्किटें घेऊन जा.
हा मजकूर वाचून पाहिला तर तो, हा, जो हीं सर्वनामें लिंगवनाप्रमाणें बदलतात. असें दिसून येईल.
हा बदल पुढीलप्रमाणें होतो.
    एकवचन        अनेकवचन
    पु.     स्त्री.    न.        पु.    स्त्री.    न.        
१. तो,      ती,     तें.        ते,     त्या,    तीं.
२. हा,      ही,    हें.        हे,     ह्या,    हीं.
३. ओ, जी,     जें.        जे,     ज्या,    जीं.

----------------------------

(१) गोविंदराव म्हणाले, “ आपण रोज कांहीं तरी लिहितों. आपण म्हणजे मी, यशवंतराव, आपण उद्यां आमचेकडे चहास या. आपण म्हणिजे तुम्ही. अहो, विठूबद्दल काय सांगावें ? आपण रोज सिनेमास जातो पण धाकट्या भावास कधीच नेत नाहीं. आपण म्हणजे तो.
यांत आपण हे सर्वनाम पुरुषवाचक असून त्याचा तिन्ही पुरुषीं उपयोग होतो हें दिसून येईल.
(२) तो कागद नीट फाड. जो नेहमीं वर्तमानपत्रें वाचतो, तो घरीं बसून जगाची माहिती मिळवूं शकतो. यांत तो हें सर्वनाम दोनदां आलें आहे. पहिल्या वाक्यांत तो याच्या पुढें कागद हें नाम आहे. अशा वेळीं त्यास दर्शक सर्वनाम म्हणावें. इतर वेळीं ( तें वाक्यांत स्वतंत्र आलें असतां ) तृतीय पुरुषवाचक समजावें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP