मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३९ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ३९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ३९ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर क्रूरस्त्वमक्रूरसमाख्यया स्म नश्चक्षुर्हि दत्तं हरसे बताज्ञवत् ।येनैकदेशेऽखिलसर्गसौष्ठवं त्वदीयमद्राक्ष्म वयं मधुद्विषः ॥२१॥देऊनि पुन्हा हरण करणें । ऐसीं क्रूराचीं लक्षणें । क्रूराविण निर्दयपणें । ऐसें करणें न करवे ॥५४॥कपटें घेऊनि अक्रूरनामा । आलासि दत्तापहरणकामा । चक्षु हरूनि आंधळें आम्हां । करितां नामा वैयर्थ्य ॥१५५॥अमंगळासि मंगळ अभिधान । कीं राक्षसा म्हणिजे पुण्यजन । जिच्या उदयीं अकल्याण । ते कल्याणी रवितनया ॥५६॥वत्सानामींचें नामामृत । वाळुवे शर्करा संकेत । अजाभिधानें बोलिजे बस्त । वृथा तद्वत तव नाम ॥५७॥जैसा निषिद्ध पुरीषक्षार । तयासि म्हणती नवसागर । दत्तापहारी जो तूं क्रूर । वृथा अक्रूर म्हणविसी ॥५८॥तुम्हांसि देऊनि काय म्यां हरिलें । जरी तूं पुससी येणें बोलें । अमुचें चक्षुहरण कां मांडिलें । अक्रूररूपें येऊनी ॥५९॥म्हणसी अक्रूर नेतो कृष्णा । तुमच्या न करीं चक्षुहरणा । तरी कृष्णरूपामाजि त्रिभुवना । देखों नयना माजिवड्या ॥१६०॥तुझें सुष्ठु सृजनकृत्य । कृष्णरूपीं देखों समस्त । तो नेतांचि चक्षुरहित । झालों निश्चित विधात्या ॥६१॥तुझें सृष्टीचें कौशल्य सारें । कृष्णरूपींच पाहों नेत्रें । यालागिं त्वां विषदसूत्रें । कपट मैत्रें आदरिलें ॥६२॥त्रिजगच्चक्षु श्रीकृष्णनाथ । अक्रूररूपें तद्धरणार्थ । द्वेषें पातलासि तूं येथ । चक्षूरहित करावया ॥६३॥कृष्णरूप जो कां नेत्र । त्यामाजी मम सृष्टि सर्वत्र । गोपींसी कळली म्हणोनि क्रूर । अमित्र बुद्धि त्वां धरिली ॥६४॥कृष्णवियोगें आमुचे डोळे । होती स्वभावें आंधळे । सहजचि सृष्टिसौष्ठव न कळे । ऐसिये लीले आदरिसी ॥१६५॥ऐसें तुझें हें दौर्जन्य । अक्रूरत्वीं क्रूरपण । आमुचें करिसी चक्षुहरण । मूर्खासमान तव बुद्धि ॥६६॥ऐसिया विधातयासि खेदें । गोपी निंदिती बहुधा शब्दें । यानंतरें मिथानुवादें । वदती खेदें तें ऐका ॥६७॥न नंदसूनुः क्षणभ्म्गसौहृदः समीक्षते नः स्वकृतातुरा बत । विहाय गेहान्स्वजनान्सुतान्पतींस्तद्दास्यमद्धोपगता नवप्रियः ॥२२।खेदें म्हणती अहो बाई । नंदपुत्र हा कैसा काई । क्षणभंगुर स्नेहनवाई । याच्या ठायीं वर्ततसे ॥६८॥याचें सुहृदत्व क्षणभंगुर । नेणे स्वरतांचें अंतर । कार्यापुरता प्रेमादर । नोहे स्थिर सौजन्यें ॥६९॥मनीं न विचरी हा कां गे । आमुतें भुलवोनि स्नेहापांगें । वश करूनि लागवेगें । आमुचीं अष्टांगें कवळिलीं ॥१७०॥मजसाठीं या झाल्या आतुरा । ऐसें नकळे कां या चतुरा । आम्ही सांडूनियां स्वसंसारा । झालों तत्परा दास्यत्वीं ॥७१॥पति सुत सदनें स्वजन आप्त । शरीरसुखभोग समस्त । त्यागूनि झालों भवविरक्त । चित्तें आसक्त या केलीं ॥७२॥आम्ही याच्याचि मुरलीगानें । नेत्रकटाक्षें । स्मितभाषणें । गतिगौरवें तनुलावण्यें । तनुमनप्राणें वेधलों ॥७३॥साक्षात् याच्याचि दास्यासाठीं । आम्हीं केली संसारतुटी । हा कां जाण नव्हे पोटीं । प्रीति उफराटी कां याची ॥७४॥नव्या नव्यांतें प्रीति धरी । पहिल्या विरहा वरपडें करी । आम्हां दुःखितां सांडूनि दुरी । कैसा मधुपुरीं जाईल ॥१७५॥यासि राहवूं धरूनि पदरीं । ऐसिया भावें गोपनारी । बोलती ईर्ष्येच्या उत्तरीं । तेंचि चतुरीं परिसावें ॥७६॥सुखं प्रभाता रजनीयमाशिषः सत्या बभूवुः पुरयोषितां ध्रुवम् ।याः संप्रविष्टस्य मुखं व्रजस्पतेः पास्यंत्यपांगोत्कलितस्मितासवम् ॥२३॥ईर्ष्या म्हणिजे सापत्नदुःख । स्मरूनि करिती विरहें शोक । पुरजनवनितांसि होईल हरिख । सपत्नी मुख्य त्यां म्हणती ॥७७॥मथुरेचिया वनितांप्रति । आजि उत्तम शकुन होती । शुभसूचकें स्वप्नें रातीं । त्या देखती बहुतेक ॥७८॥त्यांचे लवत असती नयन । भुजा मांडिया करिती स्फुरण । प्रभाते अंगणीं पक्षिगण । लाभ दर्शनें सुचविती ॥७९॥आजिची रजनी नागरां अबलां । सूचक होईल महाफळा । प्रभाते भोगिती सुखसोहळा । अमृत डोळां प्राशुनी ॥१८०॥तीर्थें व्रतें तपें दानें । अनेकजन्मार्जितें पुण्यें । आणि भल्यांचीं आशीर्वचनें । सत्य संपूर्ण त्या जालीं ॥८१॥त्यांचे मनोरथ झाले पूर्ण । त्यांसि अमृतें उगवला दिन । आम्ही झालों अवलक्षण । म्हणोनिकृष्ण अंतरला ॥८२॥नागरां नारींसि लाभ कोण । ऐसें कल्पील अंतःकरण । तरी कृष्णमुखाचें अमृतपान । त्यांचे नयन करितील ॥८३॥कृष्ण व्रजप त्रिजगीं श्रेष्ठ । मथुरे होतांचि प्रविष्ट । त्याचें वदनारविंद स्पष्ट । पाहती तन्निष्ठ होऊनी ॥८४॥जया मुखकमळाच्या ठायीं । परमामृताची सुरसायी । ललितस्मितापांगें हृदयीं । नेती लवलाहे प्राशुनी ॥१८५॥व्रजपतीचें वदन स्मेर । ललितापांगें आनंदप्रचुर । आसव म्हणिजे मादकरत । नेत्रीं सत्वर्त ज्या पिती ॥८६॥ऐसी ईर्ष्येची कल्पना । पुढती काय तर्किती मना । तें परियेसीं कुरुनंदना । इरारमणा परीक्शिति ॥८७॥गोपी म्हणती आम्ही हरि । भाग्यें भोगिला आजिवरी । जरी गेला मथुरापुरीं । तरी परतूनि येईल ॥८८॥त्याचीं येथें मातापितरें । सुहृद ज्ञाति प्रेमपात्रें । आणि आमुच्या स्नेहसूत्रें । आकर्षूनि आणिजेल ॥८९॥एक दोनी कीं त्रिरात्र । पुरवनितांचें घडल्या मैत्र । केंवि आमुचें स्नेहसूत्र । भंगूं शके ह न म्हणा गे ॥१९०॥तासां मुकुन्दो मधुमंजुभाषितैर्गृहीतचित्तः परवान्मनस्व्यपि । कथं पुनर्नः प्रतियास्यतेऽबला ग्राम्याः सलज्जस्मिताविभ्रमैर्भ्रमन् ॥२४॥ऐका सखिया हो रहस्य । नागरी वनितांचा विलास । कटाक्ष विभ्रम सलज्ज हास । कृष्णचित्तास मोहिती ॥९१॥त्यांच्या मधुरोक्तींचे पाश । गमती माधुर्यें पीयूष । मंजुळपणें कोकिळांस । लाजविती तंतुत्वें ॥९२॥चातुर्यरचनेचिया परी । क्षीराब्धिसंभवा ज्या अप्सरी । त्यांहूनि चतुरा या नागरी । मोहिती हरी चातुर्यें ॥९३॥विरक्त योगी तपस्वी हठी । निग्रहें बैसले गिरिकपाटीं । ऐसियांतेंही अप्सरादृष्टि । वेधूनि सृष्टीं नाचविती ॥९४॥मा हा तो परम कामासक्त । ग्राम्याआभीरवनिताभुक्त । याचें नागरी मोहिती चित्त । मग निवृत्त हों न शके ॥१९५॥जरी हा नंदादिकाधीन । आणि सखेही येथ बहुत जण । तथापि नागरीं वेधिल्या मन । येथ परतोन न ये हा ॥९६॥जैसा गोरक्ष जालिया भूप । तो पूर्वस्नेहा करूनि लोप । त्यागी स्वजन मायबाप । रतिलोलुप तैसा हा ॥९७॥आम्ही पशुपी गे रानटा । अजादिपशुपाळिणी घुरटा । कर्कशकर्में तनु जरबटा । संग वोखटा पैं आमुचा ॥९८॥जेंवि दुष्काळीं अन्नाविणें । क्षुधार्त मानव सेविती तृणें । त्यांसि जोडलिया दिव्यान्नें । तृणभक्षणें लाजती ॥९९॥जरी मनस्वी धीर स्वतंत्र । तथापि दुर्गम स्त्रीचरित्र । कटाक्षमात्रें वेधोनि नेत्र । करिती पात्र मोहाचें ॥२००॥मत्तमानिनी मन्मथबाणें । कामुकां घेती जीवें प्राणें । बांधोनियां रतिसुखगुणें । स्वाधीनपणें वर्तविती ॥१॥तेथोनि कैसा परतों शके । आमुचीं काय त्या स्मरती सुखें । आम्ही न तुलों त्याचेनि तुके । स्मरकौतुकें अविदग्धा ॥२॥आजि आमुचा सुखसोहळा । होईल मथुरे माजी सकळां । भाग्योदय त्यांचियां निढळा । आमुच्या कपाळा निष्फळता ॥३॥अद्य ध्रुवं तत्र दृशो भविष्यते दाशार्हभोजांधकवृष्णिसात्वताम् ।महोत्सवः श्रीरमणं गुणास्पदं द्रक्ष्यंति ये चाध्वनि देवकीसुतम् ॥२५॥आजि तेथें मथुरापुरीं । दाशार्हादि समस्तां गोत्रीं । उत्साह भोगिजेल सर्वत्रीं । पाहतां नेत्रीं कृष्णातें ॥४॥दाशार्हकुळीं उद्धवादिक । भोजीं उग्रसेनप्रमुख । वृष्णिकुळींचे समस्त लोक । पावती सुख हरि पाहतां ॥२०५॥कंकादिक कुकुरमेळीं । सात्वतश्वफल्क मंडळी । अंधक माधव यादवकुळीं । उत्साह सकळीं भोगिजे ॥६॥आणि मार्गीं जातां देखती जे जे । तेही नाचती आनंद भोजें । कवण्या लाभें तें ऐकिजे । बरवें वोजें चतुरांहीं ॥७॥लक्ष्मी शोभा न पवे स्वगुणीं । म्हणोनि ज्याची जाली रमणी । अनंत सद्गुणांची जे खाणी । देखोनि नयनीं त्या हरितें ॥८॥देवकीसुतातें पाहतीं डोळां । दृष्टीसि होईल सुखसोहळा । धन्य मथुरेचिया अबळा । नयनें घननीळा प्राशिती ॥९॥असो तेथींचा परमानंद । स्मरतां वृद्धि पावे खेद । अक्रूरा निंदेचे वदती शब्द । तेचि विशद परिसा हो ॥२१०॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP