अध्याय ३९ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - एवं ब्रुवाणा विरहातुरा भृशं व्रजस्त्रियः कृशःनविषक्तमानसाः ।
विसृज्य लज्जां रुरुदुः स्म सुस्वरं गोविंद दामोदर माधवेति ॥३१॥

एवं पूर्वोक्त प्रकारें करून । विरहें संतप्त गोपीगण । मानसें झालीं कृष्णप्रवण । करिती रुदन दीर्घस्वरें ॥२६०॥
लज्जा सांडूनियां दुरी । कृष्णविरहें दुःखभारीं । रडती आक्रोशें सुस्वरीं । व्रजसुंदरी कुरुवर्या ॥६१॥
कृष्णीं मानसें जडोनि ठेलीं । विरहदुःखें लज्जा गेली । जैसी पूर्वीं क्रीडा केली । ते वदती भुली माजिवड्या ॥६२॥
श्रीगोविंदा जय गोपति । आम्ही तुझिया वेणुगीतीं । भोगिली कैवल्यसुखसंपत्ति । ते कैं पुढती देखों पां ॥६३॥
कृष्णा तुझिया अवलोकनें । आमुचीं विश्रांति पावतीं मनें । योग यजनें तपःसाधनें । तें सुख कोणीं न भोगिजे ॥६४॥
कृष्णा तुझिये रासस्थानीं । आम्हीं भोगिल्या ज्या ज्या रजनी । तव वियोगें त्या कोठोनी । पुढती नयनीं देखों पां ॥२६५॥
कृष्णा तुझिया आलिंगनें । मनें जालीं जियें उन्मनें । तीं काय विषयरूपें वमनें । पुन्हा सेवनें करिती पैं ॥६६॥
तव करकमळें निविजे कुचीं । तव चुंबनें वदना रुचि । तव भाषणापुढें साची । अमृताची चवी लोपे ॥६७॥
तुझिया विनोदरहस्यगोष्ठी । आठवताती आमुच्या पोटीं । विरहदुःखें होऊं कष्टी । पुन्हा दृष्टी कैं पडसी ॥६८॥
कृष्णा तुझिया संगाविणें । वृथा झालें आमुचें जिणें । केलें क्षणभंगुर साजणें । लाजिरवाणें सुहृदांत ॥६९॥
सणगीं वृश्चिकें डंखिला चोर । कीं विदेशीं गेलिया प्रियतम जार । दुःखें करपे जरी अंतर । तरी बाहेर नुमसवे ॥२७०॥
कृष्णा तुझेनि प्रियतम मैत्रें । आम्हीं सांडिलीं स्वकुलगोत्रें । अति विरहदुःखाची पात्रें । होवोनि चरित्रें स्मरतसों ॥७१॥
कृष्णा तुजवीण दाही दिशा । शून्य झालिया आम्हां कैशा । जेंवि क्षेम देतां आकाशा । न पुरे आशा अणुमात्र ॥७२॥
मोहें कवळों जातां झाडें । निघती सर्वांगीं वरबडे । तैसें निष्ठुर जग कोरडें । तुझेनि पाडें कवळीतसों ॥७३॥
माता नेदी तव सुखरति । मा इतरां पितरां सुहृदीं आप्तीं । कैंची तव स्नेहाची प्रीति । म्हणोनि चित्तीं झुरतसों ॥७४॥
कीं जारपुरुष पृथ्वीवरी । थोडे असती घरोघरीं । परी आम्हां ऐशा जारिणी नारी । सहसा घोरीं न पडती ॥२७५॥
वियोग होतां त्या अन्यत्र । सवेंचि जोडिती जारमैत्र । तैसें नोहे तव चरित्र । निजात्मतंत्र केलें रे ॥७६॥
तस्कर हिरोनि नेती वसनें । पुन्हा घेइजेती नूतनें । तुवां हिरोनि नेलीं मनें । तीं नूतनें न होती ॥७७॥
कपट्या ऐसें जाणतों आम्ही । तरी कां वेधतों तुझिया कामीं । नांदत होतों संसारभ्रमीं । ते त्वां ऊर्मी भंगिली रे ॥७८॥
तुझे हातींचें सुटतें मन । तरी संसारीं समाधान । ऐसा कोणी न दिसे आन । जो तुजपासून मन मुरडी ॥७९॥
तुझिया प्रेमें ऐसें झालें । आमुचें मानस हिरोनि नेलें । विरहदुःखा वरपडें केलें । इतुकें जोडिलें तव मैत्रें ॥२८०॥
तव वियोगें पतिसुतसदनें । स्वजन आप्तें धनगोधनें । इहामुत्रादि विषयमानें । केवळ वमनासम गमती ॥८१॥
कैसें तेथ मानस रमे । केंवि तोषे भवसंभ्रमें । ऐसें केलें तुझिया प्रेमें । कर्में धर्में पालटलों ॥८२॥
जैं कामिला तुझा काम । तैंचि बुडालें रूप नाम । शेवटीं झालों अनाथ परम । केवळ वर्ष्म श्रमपात्र ॥८३॥
अहा कृष्णा काय केलें । स्नेह लावूनियां आपुलें । कैसें निष्ठुर मानस झालें । प्रेम सांडिलें केवीं पां ॥८४॥
कृष्णा आमुचें पातक काय । जेणें अंतरले तव पाय । तुझेनि स्मरणें पातक जाय । तरी कां लाहेसम मिडकों ॥२८५॥
अहा कृष्णा मुरलीधरा । अहा मुकुन्दा शार्ङ्गधरा । अहा गोविंदा दामोदरा । अहा श्रीधरा माधवा ॥८६॥
अमुच्या हृत्पंकजमधुकरा । शशिसमतर्पक नेत्रचकोरा । हा गोविंदा दामोदरा । अहा श्रीधरा माधवा ॥८७॥
प्रेमळ मानसरसशृंगारा । जगनगकारनमयभांगारा । हा गोविंदा दामोदरा । अहा श्रीधरा माधवा ॥८८॥
लावण्यसुभगा त्रिजगदाधारा । अहा रे लक्ष्मीप्राणेश्वरा । अहा गोविंदा दामोदरा । अहा श्रीधरा माधवा ॥८९॥
गोपीवलयविलासचतुरा । गोपीलालनकामातुरा । अहा गोविंदा दामोदरा । अहा श्रीधरा माधवा ॥२९०॥
कृष्णा कोमळ मानस तुझें । निष्ठुर झालें कोण्या काजें । अंतर पडलें असेल जें जें । तें साहिजे कृपाळुवा ॥९१॥
करुणा येऊं दे रे तुज । कांहीं आमुचें ऐकें गुज । तुझें न सोडूं चरणांबुज । सांडोनि लाज सवें येऊं ॥९२॥
जरी तूं आम्हां नेदिसी येऊं । तरी तव चरणीं प्राण देऊं । आतां कासया मरणा भिऊं । फुटती जीव तव विरहें ॥९३॥
अगे हा कृष्ण गेलियावरी । आमुचें काय पां ठेविलें घरीं । सरिशा जाऊं मथुरापुरीं । अक्रूरवैरी मारूं कां ॥९४॥
मरण बरवें एका घायें । कृष्णविरहें वांचोनि काय । आतां याचे न सोडूं पाय । मग जें होय तें हो कां ॥२९५॥
ऐशा वदती नानापरी । अतिदुःखिता व्रजसुंदरी । लज्जा सांडूनियां दुरी । रडती सुस्वरीं हरिप्रेमें ॥९६॥
कृष्ण कवळूनि निजमानसें । अत्यंत दुःख होय जैसें । तैशा तळमळती विरहक्लेशें । दीर्घघोषें आळविती ॥९७॥
गोविंद दामोदर गजरीं । मुकुन्द माधव नामोच्चारीं । रडती आक्रोशें सुस्वरीं । ढळती नेत्रीं बाष्पांभें ॥९८॥
आक्रोशें आणि सुस्वरीं । म्हणतां विरोध न मानिजे चतुरीं । सुस्वरता ते नामोच्चारीं । येर ते लहरी दुःखोर्मि ॥९९॥
जैसी सुवर्णाचेनि गुणें । मोलागळीं पादत्राणें । तैसें भगवन्नास्मरणें । सुस्वर रुदनें मुनि वदला ॥३००॥
एकएकी सहस्रवरी । दुःखें विलाप करिती नारी । पुढें वर्तली कैशी परी । ते अवधारीं कुरुवर्या ॥१॥

स्त्रीणामेवं रुदंतीनामुदिते सवितर्यथ । अक्रूरश्चोदयामास कृतमैत्रादिको रथम् ॥३२॥

ऐसीच समस्त शर्वरी । विरहदुःखें रुदतां नारी । उदया पातला ध्वांतारि । तंव अक्रूरें श्रोतीं ऐकिलें ॥२॥
ब्राह्ममुहूर्तीं आत्मचिंतन । करितां परिसे विव्हळ रुदन । मळोत्सर्गार्थ करितां गमन । परिसे रुदन गोपींचें ॥३॥
मग स्नानार्थ यमुनातीरीं । अक्रूर जातां देखोनि नारी । सरिशा रुदती आर्तस्वरीं । कीं अंतरीं द्रवो हा ॥४॥
स्नानसंध्या संपे पूर्ण । तंव परिसिले ललनारुदन । परि न द्रवे अक्रूरमन । काय म्हणोन तें ऐका ॥३०५॥
कृष्ण ठेवूनि गेलिया मज । विषादें क्षोभेल भोजराज । दुष्ट प्रेरूनि भंगील व्रज । एक अधोक्षज न नेतां ॥६॥
यास्तव करूनि निष्ठुर मना । अनादरूनि रुदत्या ललना । सूरोदयीं कां संध्यास्नाना । संपादूनि निघाला ॥७॥
गोपीविरहविलापगजरीं । द्रविजे कठोरां गिरिपाथरीं । सदय सात्वत सद्विचारी । निष्ठुर करी हृदयातें ॥८॥
अलोट ठाकल्या मर्यादवेळा । आक्रंदतां आप्तां सकळां । नेतां करुणा नुपजे काळा । तेंवि अबळा उपेक्षिल्या ॥९॥
कीं प्रथमप्रसवीं ललनारुदन । निष्ठुर मानसीं न गणी सुईण । इच्छूनि तिचें निज कल्याण । श्रमवूनि वेण देववी ॥३१०॥
तैसें निष्ठुर करूनि मना । अव्हेरूनि ललनारुदना । संपादूनि मैत्रविधाना । त्वरें स्यंदना जुंपिलें ॥११॥
तंव ते बलरामश्रीपती । मज्जन भोजन सारूनि पंक्ती । वसनाभरणीं सन्नद्ध रथी । रथीं बैसती साटोपें ॥१२॥

गोपास्तमन्वसज्जंत नंदाद्याः शकटैस्ततः । आदायोपायनं भूरि कुंभान्गोरससंभृतान् ॥३३॥

तयांचि सरिसे समस्त गोप । शकट जुंपूनि ससाक्षेप । घेऊनि उपायनें अमूप । शकटीं साटोप वळघले ॥१३॥
गोरसादि अनेक रस । शकटीं भरोनि पूर्ण कलश । पुढें लक्षूनि अक्रूरास । नंदप्रमुख निघाले ॥१४॥
हातींचा दुरी गेलिया कृष्ण । मग कें देखों पुन्हा वदन । कांहीं तरी संभाषण । घडो म्हणोनि ऊठिल्या ॥३१५॥

गोप्यश्च दयितं कृष्णमनुव्रज्यानुरंजिताः । प्रत्यादेशं भगवतः कांक्षंत्यश्चावतस्थिरे ॥३४॥

परमप्रियतमा कृष्णातें । आनंदयुक्त देखोनि चित्तें । ठायीं ठायीं मथुरापथें । आनंदभरिता ठाकल्या ॥१६॥
विरहसंतप्त गोपीगण । म्हणाल त्यांसी आनंद कोण । तरी लक्षूनि कृष्णसंभाषण । उत्साह पूर्ण मानिला ॥१७॥
सवेग करूनि शृंगार । लक्षूनि कृष्णाचा संचार । कृष्णापासूनि अभीष्टकर । प्रत्युत्तर वांछिती ॥१८॥
परतोनि पाहील आम्हांकडे । कांहीं अभीष्ट वदेल तोंडें । मनीं धरूनि ऐशिये चाडे । ठाकल्या पुढें पथसंधीं ॥१९॥
शीघ्र येईन या उत्तरीं । आश्वासील कांहीं तरी । ऐसी इच्छा अभ्यंतरीं । धरूनि नारी तिष्ठती ॥३२०॥
जाणोनि त्यांचें अंतःकरण । कृष्णपरमात्मा सर्वज्ञ । करिता झाला समाधान । तें सज्जन परिसोत ॥२१॥

तास्तथा तप्यतीर्वीक्ष्य स्वप्रस्थाने यदूत्तमः । सांत्वयामास सप्रेमैरायास्य इति दौत्यकैः ॥३५॥

आमुचें प्रस्थान मथुरापुरीं । या निमित्त व्रजसुंदरी । विरहतप्ता लक्षूनि नेत्रीं । सांतवी श्रीहरि यदुवर्य ॥२२॥
फिरोनि येईन मी झडकरी । स्नेह असों द्या मजवरी । तुमच्या वियोगें क्षणभरी । प्राण शरीरीं न धरीं मी ॥२३॥
तुमचें कोमळ हृदयकंज । तेथें निवास माझा सहज । सहसा विसर न पडे मज । हें निजगुज पैं माझें ॥२४॥
तुम्हीं हृदयीं जतन करा । ऐसिया सप्रेम उत्तरां । बोधूनियां दूतद्वारा । व्रजसुंदरा राहविल्या ॥३२५॥
ऐसा कथूनि गुह्यसंकेत । घडघडाट चालिला रथ । त्यावरी गोपींचा वृत्तांत । नृपा कथीत मुनीवर्य ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP