अध्याय ३० वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


आरुह्यैका पदाक्रम्य शिरस्याहापरां नृप । दुष्ट हे गच्छ जातोऽहं खलानां ननु दंडधृक् ॥२१॥

तंव कालियमथनानुकारा । दावूनि बोले एकी दारा । एक्या पायें दडपूनि शिरा । करें पुंसारा धरूनियां ॥१७०॥
म्हणे रे दुष्टा कालिय फणी । रमणकद्वीपा जाय येथुनी । जन्मलों मी चक्रपाणि । खळनिग्रहणीं जाणावें ॥७१॥
ऐशी अपरांगनेप्रति । दावूनि कालियमथनानुकृति । तेथ आणिकां गोपींप्रति । जाली वदती पैं एकी ॥७२॥

तत्रैकोवाच हे गोपा दावाग्निं पश्यतोल्बणम् । चक्षुंष्याश्वपिदध्वं वो विधास्ये क्षेममंजसा ॥२२॥

अरे गोप हो हा दावाग्नि । महाउल्बण पेटला वनीं । तुम्हीं माझिये आज्ञेकरूनी । सवेग लोचनें झांकावीं ॥७३॥
तुमचें करीन मी रक्षण । म्हणोनि अनुकरती दावाग्निपान । तंव एकी दामोदर होऊन । उलूखलबंधन अनुकरे ॥७४॥

बद्धाऽन्यया स्रजा काचित्तन्वी तत्र उलूखले । भीता सुदृक्पिधायास्यं भेजें भीतिविडंबनम् ॥२३॥

एकी भावूनि दामोदरा । अन्या यशोदा सुंदरा । अवगोनि होय शासनपरा । त्या अनुकारा परियेसा ॥१७५॥
स्वयें प्रवर्ते दधिमंथनीं । येरी कृष्णत्वें लागे स्तनीं । दुग्ध उततां देखोनि नयनीं । धांवे टाकोनि अतृप्त ॥७६॥
कृष्ण मंथनभाण्डें फोडी । सवेंचि धांवोनि शिंकीं तोडी । यशोदा धरूं धांवे तांतडी । लवडसवडी येरु पळे ॥७७॥
पुष्पमाळेनें नंददारा । उखळीं बांधी दामोदरा । ऐसिया दाविती अनुकारा । भयविकारा प्रकटिती ॥७८॥
पळतां यशोदा धरिला हरि । तेणें भयभीत अंतरीं । दोन्ही हात लावूनि वक्त्रीं । पाहे नेत्रीं भयाकुळ ॥७९॥
झणें यशोदा शिंपुटी मारी । यास्तव वामकर आड धरी । ऐसिया भयाच्या अनुकारीं । बल्लवनारी अनुकरती ॥१८०॥

एवं कृष्णं पृच्छमाना वृंदावनलतास्तरून् । व्यचक्षत वनोद्देशे पदानि परमात्मनः ॥२४॥

ऐसिया कृष्णगवेषणीं । फिरत फिरतां वनोपवनीं । पुन्हा पातल्या वृंदावनीं । यदृच्छेकरूनि भ्रमभरिता ॥८१॥
वृंदावनींच्या नाना लतिका । जाती मल्लिका मालतिका । कुंद मोगरे सेवंतिका । लवंगवल्लिका शतपत्री ॥८२॥
पाग त्रायंती वैकंकती । शंखिनी हिरण्या गरुत्मती । गजकर्णिका क्षौद्रा यूथी । मधुमालती डिंडिका ॥८३॥
ऐशा अनेक वल्लीलता । गुल्मप्रमुख जाति बहुता । त्यांसि पुसती मन्मथजनिता । विरहभ्रांता व्रजललना ॥८४॥
नाग पुन्नाग अर्जुन । चंदन चंपक रातांजन । नीप करंज राजादन । कुंजराशन न्यग्रोध ॥१८५॥
देवदार कोविदार । चूत पारियातक मंदार । पनस पलाश पारिभद्र । बीजपूर प्लक्षादि ॥८६॥
ऐशा अनेक तरुवरलता । पुढें भेटती वनीं फिरतां । त्यांतें पुसती स्मरमोहिता । प्रमुदित वार्ता कृष्णाची ॥८७॥
भूमीशीं उमटलीं पाउलें । भाग्यें दुर्लभ दर्शन झालें । तेथेंचि त्यांचें मन गुंतलें । तेंही विवरिलें तें ऐका ॥८८॥
तव आकस्मात वनप्रदेशीं । सोज्वळ भूमि शर्करे ऐशी । तेथें कृष्णाच्या पदांकाशीं । चंद्रप्रकाशीं देखती ॥८९॥

पदानि व्यक्तमेतानि नंदसोनोर्महात्मनः । लक्ष्यंते हि ध्वजांभोजवज्रांकुशयवादिभिः ॥२५॥

महांत जे कां ब्रह्मादिक । त्यांहूनि महत्त्वें अधिक । तो महात्मा नंदतोक । त्याचे पदांक हे व्यक्त ॥१९०॥
ध्वजाब्जयवांकुश देखिले । ऊर्ध्व रेखा वज्राथिले । इत्यादि चिह्नीं उपलक्षिले । व्यक्त पाउलें कृष्णाचीं ॥९१॥
तेचि घेवोनि कृष्णपदवी । गोपी विरहिणी आर्तभावीं । त्यांची जिज्ञासा आघवी । व्यक्त परिसावी चतुरांहीं ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP