श्रीकृष्णपरमात्मने नमः ।
सच्चित्सुखकरवरकरपद्मा । पद्माप्रियतममानससद्मा । श्रीगोविंदा स्वसंविद्मा । छेदक छद्मा छंदज्ञा ॥१॥
मौळ स्पर्शतां पद्मकरें । पूर्ण सच्चिदानंद अवतरे । विषयशार्मिकगरिमा हरे । मति मोहरे पदभजनीं ॥२॥
अभेदभक्तिसुखाची गोडी । ब्रह्मानंदाच्या पडिपाडीं । तुकितां प्रणतीं अनावडी । केली रोकडी भक्तीपुढें ॥३॥
असतां ब्रह्मसुख संचलें । मिथ्या विवर्तें आच्छादिलें । गुरुपदभजनें उदया आलें । पोटीं जन्मलें भक्तीचे ॥४॥
परिस लोहाचें करी सोनें । तें केंवि तुके त्याचिये तुळणे । ब्रह्मत्व जोडे गुरुपदभजनें । तें केंवि करणें तत्तुल्य ॥५॥
अभेदपदभजनाची गोडी । देखोनि ऐक्याची मोडिली घडी । अभेदप्रेमा चढोवढीं । उभवूनि गुढी रूढविला ॥६॥
ऐसी कमला निज हृत्कमळीं । कमलदलाक्ष प्रेमें कवळी । तीं वधूवरें सप्रेमशाली । आनंदबहळीं तुज ध्याती ॥७॥
पद्माप्रियतममानससद्मीं । निश्चळ निवास तुमचा स्वामि । म्हणोनि त्यांतें अभेद ऊर्मि । कोण्हे कर्मीं न स्पर्शें ॥८॥
गुरुपदभजनीं सप्रेम रति । म्हणोनि अवाप्त ज्ञानशक्ति । करितां त्रिजगाची संस्थिति । ज्या भवभ्रांति न स्पर्शे ॥९॥
ज्याच्या पदभजनीं हा महिमा । तो गोगोप्ता गोविंदनामा । स्मरणमात्रें कैवल्यधामा । स्वसंविद्मा स्वबोधें ॥१०॥
मायाच्छद्मच्छेदनशीला । छंदाभिज्ञा प्रणतपाळा । छंदोमया गोगोपाळा । करिसी स्वलीला नटनाट्यें ॥११॥
बहुधा नाट्यें बहु अवतारीं । तव कृत कथिती ग्रंथांतरीं । येथ महाराष्ट्र मम वैखरी । दशमावरी प्रवर्त्तली ॥१२॥
त्यामाजि हा रासोत्सव । गोपी परिसोनि मुरलीरव । वनीं स्वेच्छा वासुदेव । भोगितां गर्व उदेला ॥१३॥
तो जाणोनि सर्वज्ञ हरि । स्वजनसुखदविग्रहधारी । अनुग्रहार्थ मद परिहरी । होऊनि सत्वरी तिरोहित ॥१४॥
जेंवि सद्गुरु शक्तिपात । करूनि सच्छिष्याचें चित्त । झालें जाणोनि निजात्मरत । पुन्हा जागृत भवीं करी ॥१५॥
मग त्या न रुचोनि भवभान । अनुभूतसुखीं वेधे मन । विसरोनि देहादिप्रवृत्तिस्मरण । करी गवेषण तच्छंदें ॥१६॥
तेंवि कृष्णसुखाची गोडी । गोपी चाखतां गर्वे गुढी । उभवूनि केली विघडाविघडी । झाडोझाडीं मग फिरती ॥१७॥
बाल उन्मत्त का पिशाच । देहस्मृतीचा भंगोनि माच । अनियत करणें करितां नाच । गोपी तैशाच हरिवेधीं ॥१८॥
विरहतप्ता त्या गोपिकांहीं । विरक्त होऊनि देहीं गेहीं । हरि हुडकिला वनाचे ठायीं । तिसाव्या अध्यायीं हे कथा ॥१९॥
शुक म्हणे गा कुरुवरिष्ठा । जोडलें न जिरे मदगर्विष्ठा । भगवत्प्राप्ति विना कष्टां । केंवि अभीष्टां भेटवी ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP