अध्याय २९ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


गोप्य ऊचु :- मैवं विभोऽर्हति भवान्गदितुं नृशंसं संत्यज्य सर्वविषयांस्तव पादमूलम् ॥
भक्ता भजस्व दुरवग्रह मा त्यजाऽस्मान्देवो यथादिपुरुषो भजते मुमुक्षून् ॥३१॥

गोपी म्हणती विभो समर्था । शास्त्रवेदार्थे क्रूरता । बोलावया तुज योग्यता । नाहीं सर्वथा विचारीं ॥२९॥
योग्यता नाहीं कां म्हणसी जरी । यदर्थ कारण तूं अवधारीं । एकां निकटीं एका दुरी । हे अयोग्य परी तुजपाशीं ॥४३०॥
जैसें मुमुक्षु मागिले । साधनसंपन्न विरक्त भले । तुज आदिपुरुषातें सप्रेम भजले । ते नाहीं उपेक्षिले तैं तेणें ॥३१॥
जाणोनि मुमुक्षूंचें प्रेम । त्यां तैसाचि पुरुषोत्तम । भजता जाला यथाकाम । तरी आम्हां हें विषम कां वदसी ॥३२॥
आम्ही तैसिये परिपाटीं । सर्व विषयासि देऊनि पाठी । घातली तव चरणासी गांठी । भवराहाटी विसरूनी ॥३३॥
आम्ही जाणोनि निजांघ्रिभक्ता । पतिसुतधनादि आश्रमत्यक्ता । अनन्य एकांत अनुरक्ता । तुज हे वक्रता अयोग्य ॥३४॥
जेंवि जळाच्या सन्निधानें । द्रवत्वा भजिजेत असतां लवणें । जळें वारूनि काठिण्य देणें । तैं तें उणें कोणासी ॥४३५॥
यालागीं जाणूनि अभ्यंतर । आमुचा करीं अंगीकार । न होई न भजोनि निष्ठुर । शास्त्रविचारप्रवक्ता ॥३६॥
दुरवग्रहा हे स्वच्छंदा । आमुचा अव्हेर न करीं कदा । आम्ही तुझिया पदारविंदा । शरण मुकुंदा सर्वस्वें ॥३७॥
जाणोनि स्वकीयांचा छंद । तैसा क्रीडसी तूं स्वच्छंद । हें विसरूनि आपुलें बिरुद । कां विधिवाद जल्पसी ॥३८॥
करूनि आज्ञेचा अव्हेर । उल्लंघूनि शास्त्राचार । म्हणसी कां बोलतां प्रेमादर । तरी तो विचार अवधारीं ॥३९॥

यत्पत्यपत्यसुहृदामनुवृत्तिरंग स्त्रीणां स्वधर्म इति धर्मविदा त्वयोक्तम् ॥
अस्त्वेवमेतद्पदेशपदे त्वयीशे प्रेष्ठो भवांस्तनुभृतां किल बंधुरात्मा ॥३२॥

पति अपत्य सुहृद स्वजन । यांचें जें कां अनुवर्तन । हा स्वधर्म स्त्रियांलागुन । विनोदवचन हें मुख्य ॥४४०॥
आपुले कंठीं असोनि मणि । अबळां चाळविजे दर्पणीं । तेंवि तूं शास्त्रार्थअनुशासनीं । आम्हांलागुनि बोधिसी ॥४१॥
वस्तु चोरूनि ठेविजे घरीं । माग घालिजे जेंवि डोंगरीं । कीं फळें असतां शाखेवरी । जलांतरीं प्रलोभिजे ॥४२॥
ऐसा करूनियां उपहास । करिसी स्वधर्म उपदेश । तो अवघाचि फलादेश । घडो आम्हांस तुझ्या ठायीं ॥४३॥
धर्मोपदेशें धर्माचरण । तेणें फळ जें अवगम्यमान । तें तुझ्या ठायींच प्रतीयमान । असो उपदेशविषयत्वें ॥४४॥
उपदेशाचें जें का स्थान । उपदेशपद हें त्या अभिधान । मज म्हणावया काय कारण । तरी तें वचन अवधारीं ॥४४५॥
ज्ञानें करूनि अवगम्यमान । तें एक ईश्वरत्वचि जाण । वांचूनि प्राकृत प्रपंच गौण । उपदेशस्थान घडेना ॥४६॥
यथाशास्त्र धर्माचरण । पतिपुत्रादि अनुसेवन । तेणें ईश्वर संतोषोन । वैराग्यज्ञान प्रकाशी ॥४७॥
वैराग्य म्हणिजे भवनिवृत्ति । ज्ञानें ईश्वरतत्त्वावाप्ति । आम्हांसि जाली ते तव प्राप्ति । कां पां श्रीपति परतविशी ॥४८॥
म्हणसी ब्रह्मांडीं ईश्वर । मी तो नंदगोपाचा कुमर । तरी तूं आत्मा निर्विकार । सबाह्याभ्यंतर व्यापक ॥४९॥
सर्वीं सर्वत्र आत्मयाविण । भोग्यमात्रासि भोक्ता कवण । तो तूं ईश्वर श्रीभगवान । तुझेनि भवमान प्रतिभासे ॥४५०॥
मी आत्मा जरी केंवि म्हणसी । तरी तूं प्रियतम सर्वस्वेशीं । आत्मप्रियत्वें प्रपंचाई । प्रिय मानूनि कवळिजे ॥५१॥
पति अपत्यें बंधु श्वशुर । सुहृद स्वजन माता - पितर । धनें गोधनें वृत्ति क्षेत्र । प्रिय सर्वत्र आत्मत्वें ॥५२॥
आत्मराहित्यें सर्वोपचार । प्रियतम अथवा उपदेशपर । होती तैं मग शास्त्राचार । धर्म साचार प्रबोधी ॥५३॥
तरी हें आत्मत्वींच आघवें । सर्वप्रियत्व आविर्भवे । विपरीतज्ञानें मग विषयीं फावे । कां तें मावे झकविशी ॥५४॥
विंशतिवराटिकापरिमित । त्यांची एक ककिनी होत । त्या काकिनी सार्धशत । रजतमुद्रेत सांठवती ॥४५५॥
रजतमुद्रा षोडशमान । स्वर्णनिष्क त्या अभिधान । तो हस्तगत असत जाण । वृथा प्राधान्य वराटिकां ॥५६॥
तेंवि तूं आत्मा श्रेष्ठतम । आम्ही लाधलीं अवाप्तकाम । पतिपुत्रादि वर्णाश्रम । अक्षय स्वधाम तूं यांचें ॥५७॥
तुजमाजि हें अवघें सुख । पतिपुत्रादि जें पृथक् पृथक् । भ्रमें भावूनि विषयात्मक । रमती मूर्ख भवभावी ॥५८॥
आम्हांसि उपदेशाचें स्थान । तो तूं श्रीकृष्ण भगवान । त्या तुझ्या ठायींच हें असो पूर्ण । मायिक भिन्न नुपदेशीं ॥५९॥
अथवा उपदेष्टा तूं असतां । उपदेशार्थ शरणागता । आम्ही होऊनि तुज हें पुसतां । तूं धर्मवक्ता हें बोधीं ॥४६०॥
तृषित असतां जळाजवळी । त्याचे हातीं देइजे कुदळी । खनन बोधिजे तये काळीं । तेंवि वनमाळी हें वदसी ॥६१॥
तरी हें असो तुझ्याचि ठायीं जळ सांडूनि न खणूं भुई । तूं उपदेष्टा नव्हसी कांहीं । आत्मा हृदयीं सर्वगत ॥६२॥
आमुच्या कामाचें अधिष्ठान । आणि कामोपलब्धि जेथें पूर्ण । तो उभयत्र तूं एक कृष्ण । न करीं बोधन उपहासें ॥६३॥
अथवा शाखेवरूनि चंद्ररेखा । प्रबुद्ध जेंवि दाविती मूर्खा । तेंवि पतिपुत्रभावें तें ऐक । भजिजे व्यापका ईश्वर ॥६४॥
ईश्वर ऐसें पतीचें नाम । ठेवूनि धरिजे स्वधर्मप्रेम । तेथ वास्तव ईश्वर अनुभवगम्य । फावल्या कर्म कां कथिजे ॥४६५॥
म्हणसी देहवंतासि हा बोध । स्वधर्माचरणचि अविरुद्ध । तरी कर्मफळ आत्मा अगाध । जंव तूं प्रसिद्ध न फवसी तों ॥६६॥
असान्निध्य नृपाचें असतां । राजा मानूनि भजिजे दूतां । ते भूपपदवी चढल्या हाता । दूता मान्यता कोण कोठें ॥६७॥
तुझेनि मुखें उपदिश्यमान । पतिपुत्रादि जें अनुसेवन । तेथ ईश्वर असतां अधिष्ठान । ईश्वरभजन तैं तें कीं ॥६८॥
ईश्वररूपा अधिष्ठाना । वांचूनि पतिपुत्रादिव्यक्ति भिन्ना । पृथक सत्तत्त्वें वर्तमाना । भजनीय कोठें कोणत्या ॥६९॥
पेरिला उगवला जोंधळा शेतीं । जोंधळा मानूनि त्या कराबाडा भजती । तेथील धान्य चढल्या हातीं । कडबा जोपिती कोठ कोठें ॥४७०॥
तेंवि ईश्वर तूं आत्मा प्रेष्ठ । असोनि कथिसी स्वधर्मकष्ट । ते तुझ्या ठायींच अभीष्ट । सफळ संतुष्ट असोत ॥७१॥
तें जें कथिसी धर्माचरण । त्या धर्मशात्रादि अखिळ अभिज्ञ । निगमगर्भ दृढ विवरून । तुजवांचून न भजती ॥७२॥

कुर्वंति हि त्वयि रतिं कुशलाः स्व आत्मन्नित्यप्रिये पतिसुतादिभिरार्तिदैः किम् ।
तन्नः प्रसीद परमेश्वर मा स्म छिंद्या आशां भृतां त्वयि चिरादरविंदनेत्र ॥३३॥

नित्य निर्विकार निष्टंक । प्रियतम आत्मा निरुपाधिक । अगाध अक्षय सच्चित्सुख । विमळ विशोक वितृष्ण ॥७३॥
तुज आत्मयाचिये ठायीं । कुशल भजती आपुल्या हृदयीं । पतिपुत्रादि दुःखडोहीं । मोहप्रवाहीं न पडोनी ॥७४॥
पशुपतिपुत्रधनादिकें । दुःखपरंपराप्रापकें । वांचूनि जोडसी त्यागें एकें । हें नायकों मुखें शिष्टांच्या ॥४७५॥
उतरावया महापूर । कीजे नावेचा अंगीकार । पुन्हा नाव न त्यजितां तीर । विश्रांतिकर न जोडे ॥७६॥
तेंवि भवाब्धिनिस्तरणीं । प्रवृत्ति वेदोक्तधर्माचरणीं । तत्फळविरक्ति अमृतदानीं । प्रवृत्ति त्यागूनि आश्रयिजे ॥७७॥
ईषणात्यागेंवीण तत्त्वता । तें अमृतत्व न चढे हाता । यालागीं त्यागूनि तो भवगुंता । जालों अनुरक्ता तव चरणीं ॥७८॥
आतां प्रसीद शरणागतां । तूंतें भजलों भवविरक्ता । परमेश्वरा पूर्णभरिता । नुपेक्षीं तत्त्वता वंचूनी ॥७९॥
पद्मनेत्रा तव पदपद्मीं । चिरकाळ आशा धरिली आम्हीं । तें तूं निराशा न करीं स्वामी । स्वधर्मनियमीं चालवूनी ॥४८०॥
मद्वाक्याची करूनि अवज्ञा । म्हणसी कैशा मदेकशरणा । यदर्थीं ऐकावें सर्वज्ञा । आज्ञालंघना कारण जें ॥८१॥
परतोनि जावें व्रजाप्रति । तां हें आज्ञापिलें श्रीपति । चित्तचतुष्टय आपुल्या हातीं । निजात्मशक्ति हरूनियां ॥८२॥

चित्तं सुखेन भवताऽपहृतं गृहेषु यन्निर्विशत्युत करावपि गृह्यकृत्ये ।
पादौ पदं न चलतस्तव पादमूलाद्यामः कथं व्रजमथो करवाम किं वा ॥३४॥

यावत्काळ आमुचें चित्त । पतिपुत्रादिगृहासक्त । होऊनि सप्रेम विषयीं निरत । प्रपंचकृत्य संपादी ॥८३॥
तें तव गानें अंतःकरण । विषयीं वैरस्य पावून । होऊनि ठेलें प्रत्यक्प्रवण । न वचे तो न परतवितां ॥८४॥
व्यान सांडूनि निवडली वृत्ति । ते कैं प्रकटे श्रवणाप्रति । संवित्तीवांचूनि भारती । शब्दग्रहणार्थीं अनोळख ॥४८५॥
तुजमाजि विरतां अंतःकरण । सहज समरसीं चैतन्यघन । प्रपंचस्फूर्तीसि रितें गगन । कैंचें शून्य सच्छिद्र ॥८६॥
समानवायूमाजूनि चपळ । संकल्प - विकल्पांचें स्थळ । निवडूनि मानस केवळ । हरिलें तत्काळ स्ववेधें ॥८७॥
मना समाना विघडतां । तैं कैं त्वचेसि स्पर्शज्ञता । त्यागादानी हातोपाता । पाणींद्रिय न प्रवर्त्ते ॥८८॥
मानस तव वेधें उन्मन । असंकल्पें चांचल्यहीन । तैं मग कैंचा पृथक्पवन । शब्दस्पर्शन द्विगुणत्वें ॥८९॥
निजगानवेधें तुवां धिषणा । हरिली सांडवूनि उदाना । चक्षु मुकले रूपग्रहणा । मग कें चरणां संचरण ॥४९०॥
विपरीत बोधा निश्चयकर्त्ती । तुजमाजि रता मनीषावृत्ति । दहन पचन प्रकाशशक्ति । कैंची भूतीं तेजस्त्वें ॥९१॥
ऐकोनि तुझें मधुरगीत । प्राणामाजूनि निवडे चित्त । तुजमाजि होऊनि एकीभूत । जालें निश्चित चिन्मात्र ॥९२॥
प्राणा चित्ता विघडणी होतां । कैंची रसनेसि रसज्ञता । रसाभिलाषेंविण उपस्था । रतिलालसता स्फुरेना ॥९३॥
चित्त चैतन्यीं होतां लीन । भूतीं दृश्य कैंचें जीवन । सीतळ पातळ रसाळ सृजन । जलप्लावनक्लेदनपटुतर ॥९४॥
अपानामाजूनि अहंता । वेधें तव गायनीं मुरतां । घ्राणीं नुरेचि जिघ्रता । कैंची क्षरता पायूतें ॥९५॥
सूत्रात्मत्वें अहंकार । वेद्वनि वागवी जो शरीर । देहात्मभावें धुरंधर । तो अविकार जालिया ॥९६॥
कैंची पृथ्वी कैंचा गंध । कैंचा आधेयआधारबोध । सबाह्य अभेद परमानंद । श्रीगोविंद परिपूर्ण ॥९७॥
आमुचीं प्रवृत्तीसहीत करणें । तुवां हरिलीं अंतःकरणें । आतां फिरोनि जावें कोणें । धर्माचरणें करावया ॥९८॥
बागदोर हातीं धरूनी । अश्वा सोडी मोकळेपणीं । तैं तो प्रवर्त्ते भंवता भ्रमणीं । परी दुरी प्रयाणीं असमर्थ ॥९९॥
कीं नाव खुंटोनि ऐले झाडीं । पार जावया पाणी तोडी । तैं त्या न टके पैलथडी । कीं हरितां घोडीं रथ न चले ॥५००॥
तेंवि हरूनि करणनिचया । आज्ञापिसी सदना जावया । आज्ञापाळणा लंघनकार्या । कोण यदुवर्या समर्थ ॥१॥
तुझिया पादमूळापासून । इंद्रियग्राम न थरे भिन्न । यावरी आम्हां कर्तव्य कोण । तें विवरून प्रबोधीं ॥२॥
म्हणसी तुमची जे असोसी । सांगा जैसी असेल तैसी । तरी ऐकावें हृशीकेशी । उत्साहेंशीं सांगतसों ॥३॥

सिंचांग नस्त्वदधरामृतपूरकेण हासावलोककलगीतजहृच्छयाग्निम् ।
नो चेद्वयं विरहजाग्न्युपयुक्तदेहा ध्यानेन याम पदयोः पदवीं सखे ते ॥३५॥

इंद्रियग्राम रिक्त पडिला । तव विग्रहीं गोगण जडला । यालागिं आमुचा आवडला । पाहिजे घडला मनोरथ ॥४॥
हे अंग कोमल आमंत्रणें । गोपी म्हणती कृष्णाकारणें । श्रवणद्वारें तुझिये गानें । अंतःकरणें क्षोभविलीं ॥५०५॥
अग्नियंत्राचे कर्णी अनळ । स्पर्शतां उसळे यंत्रगोळ । तेंवि विवश विरहिणीमेळ । गानश्रवणें उसळलों ॥६॥
येथ तव तनुसन्निधानें । श्रवणकाळीं कलगायनें । सविलासकटाक्षमोक्षणें । स्मितावलोकनें करूनियां ॥७॥
हृच्छय म्हणिजे मदनानळ । हृदयीं प्रज्वळला केवळ । तेणें आमुचे शरीरगोळ । तापले विंगळपडिपाडें ॥८॥
ते तूं अधरामृतें शिंपीं । प्राणप्रदान आमुतें वोपीं । हृच्छयाग्नीचा दाह लोपीं । कृपेनें जोपीं स्मरलतिका ॥९॥
नातरी वियोगविरहानळ । आणि हृच्छयाग्नीचा ज्वाळ । उभय ताप होऊनि प्रबळ । शरीरें केवळ प्रज्वळितें ॥५१०॥
सांख्याभ्यासें ज्ञानानळ । अभ्यासक्रमें योगाग्निज्वाळ । मूर्धा भेदूनि ध्यानशीळ । पावती केवळ कैवल्य ॥११॥
स्मरविरहाग्निदग्धा तेंवि । ध्यानें तव चरणाची पदवी । सखया पावूं सप्रेमभावीं । आमुच्या जीवीं निश्चय हा ॥१२॥
म्हणसी आहेत तुमचे पति । तुम्ही जाऊनि तयांप्रति । स्वेच्छा रमूनि अधरामृतीं । कीजे शांति स्मरतापा ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP