अध्याय २९ वा - श्लोक २६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अस्वर्ग्यमयशस्यं च फल्गु कृच्छ्रं भयावहम् । जुगुप्सितं च सर्वत्र औपपत्यं कुलस्त्रियः ॥२६॥

न प्रबोधी सत्यहित । कपटी दुरात्मा तो निश्चित । त्याहूनि तरुवरांशीं एकांत । करितां प्राप्त सुखलाभ ॥३०५॥
म्हणोनि श्रीकृष्ण जगद्गुरु । बोधी यथार्थ शास्त्रविचारु । त्यासि प्राकृत जे म्हणती जार । नरक अघोर त्या होती ॥६॥
उपपतीपासूनि सुख भोगणें । औपपत्य हें त्यांतें म्हणणें । स्वर्गसुकृतापासूनि च्यवणें । तें या कारणें अस्वर्ग्य ॥७॥
जगीं इहलोकीं छीथू घडे । पूर्वजमाळा नरकीं पडे । गोत्रसुहृदादिकां नवडे । वदनाकडे न पाहती ॥८॥
उपपति जो जारपुरुष । त्यासि करावया संतोष । अहोरात्र तनुसंक्लेश । करितां यश नुपलभे ॥९॥
जारपुरुषाचे मातापितर । स्वजन सुहृद जाया श्वसुर । क्रूरभावें करितां वैर । परी जार समोर त्यां न वदे ॥३१०॥
परस्परें न शकती पाहों । धणीवरी एकांतीं न लाहती राहों । विश्वशत्रुत्वें हृदयीं भेवो । भुजगा भुजंगा सारिखा ॥११॥
आवडती गोष्टी सांगावया । उमसू न लाहे जारजाया । भये सर्व जगाचिया । मिळणी ठाया न लभती ॥१२॥
सांदीकोंदीमाजि रातीं । सर्वा वंचूनि कैतववृत्ती । सभय मिळणी उपदंपती । अथवा दूतीप्रसंगें ॥१३॥
अल्प अवकाश सांपडे । सांचल होतां सुरत विघडे । अभीष्टसुखावाप्ति न घडे । सान्निध्य थोडें बहुक्लेशीं ॥१४॥
कैंची शय्या सुमनोहर । सदीप एकांत मंदिर । गीत तांबूल अन्योपचार । भाषणीं चोर परस्परें ॥३१५॥
दर्शन स्पर्शन गुह्यभाषण । मिथः अवयवनिरीक्षण । नीवेमोक्षण कुचमर्दन । चुंबनालिंगन अष्टधा ॥१६॥
सुरतीं पूर्वांगें हीं अष्ट । उत्तर मैथुनादिकें अष्ट । अंगलालन दशनदष्ट । न घडे यथेष्ट जारत्वें ॥१७॥
फल्गु म्हणिजे तुच्छप्राय । फावलें तितुकें भोगिलें जाय । तितुक्यासाठीं सोसणें घाय । करितां उपाय मिळणीचे ॥१८॥
ध्वांक्ष जैसा गृहस्थद्वारीं । त्यक्तबळीचें भक्षण करी । मार्जारश्वानादिभय अंतरीं । जार त्यापरी साशंक ॥१९॥
जारिणी जालिया गरोदर । जार न करी गर्भसंस्कार । भयें उद्विग्न उभयांतर । दोहदोपचार मग कैंचे ॥३२०॥
प्रवासीं अथवा परलोकवासीं । वियोग असतं भर्ताराशीं । नारी रमोनि जारपुरुषीं । धरी गर्भासी दैवबळें ॥२१॥
सती प्रयत्नीं साक्षेप गर्भ । शिणतां तयेसी तो दुर्लभ । स्वैरिणी चुकवितां अलभ्यलाभ । एनसकोंभ उदया ये ॥२२॥
जैंहुनी गर्भ राहे पोटीं । तैंहुनी उभयतां हिंपुटीं । जुगुप्सितत्वें प्राणसंकटीं । होती कष्टी विश्वभयें ॥२३॥
वदों न शकती कोण्हापाशीं । पुसों न लागती उपायासी । विंचुवें खादल्या चोराऐसीं । निजमानसीं मिडकती ॥२४॥
उभयतांचें सौजन्य तुटे । वदती परस्परें - वोखटें । कर्म वोडवलें म्हणती खोटें । दुर्घट खोटें आठवलें ॥३२५॥
ऐसीं शिणती परस्परीं । तेथ डोहळ्यांची कवण्परी । स्रावपतनादिप्रकारीं । यत्नें अंतरीं झुरताती ॥२६॥
स्रावपतनकर्मीं प्रवीणा । कुंटिणी जारिणी वैद्यां निपुणा । शेकमूळिका भेषजें नाना । नवस नवसिती पष्टिके ॥२७॥
डोहळ्यांची ऐशी रीती । श्रमतां जैं होय गर्भोपहति । तैं त्या पापें नरकावाप्ति । यालागीं म्हणती अस्वर्ग्य ॥२८॥
श्रमतां पतनगर्भा न घडे । तैं लौकिक सोहळा वाढे । डोहळे प्रकट चहूंकडे । वाद्यघोषें नृपदंडें ॥२९॥
दीर्घताडन बीभत्सवपन । रासभयान पण्यभ्रमण । शकृन्मूत्रपुरीषसेचन । पादत्राणस्रक्भूषा ॥३३०॥
औपपत्य हें पातित्य । सर्वीं सर्वत्र जुगुप्सित । कुलस्त्रियांसि नोहे उचित । म्हणे भगवंत गोपींतें ॥३१॥
श्रोतीं आक्षेप केला येथ । अवंचक कृष्णाचा परमार्थ । तो काय हा विषयस्वार्थ । भोगें कृतार्थ नरनारी ॥३२॥
तरी हे न कीजे येथ शंका । कृष्ण न बोधी विषय निका । येथींचा गूढार्थ ठावुका । होय त्या विवेका अवधारा ॥३३॥
स्वर्ग म्हणिजे सुकृतफळ । तें निर्विषय सुख केवळ । विषयसुखीं दुःख बहळ । स्वर्गीं नरकीं समसाम्य ॥३४॥
हृदयस्थ निजात्मा मुख्यपति । स्वर्गसुखद तेथींची रति । बाह्य समस्त येर उपपति । हो कां भूपति सुर सिद्ध ॥३३५॥
प्रथम पति मरोनि गेला । द्वितीय गांधर्वविवाह केला । त्यासि म्हणती निजदादुला । चाळिती पहिला विधिवाद ॥३६॥
चोरूनि रमतां म्हणती जार । गांधर्वविवाहीं उजागर । एवं भलतैसा संसार । म्हणती चतुर चालों द्या ॥३७॥
विभांडकानें धर्मपत्नी । कोण्या सूत्रें पाणिग्रहणीं । केव्हां परिणिली होती हरिणी । जेथ शृंगमुनि जन्मविला ॥३८॥
किंवा वासवी पराशरें । कैं परिणिली विधिविचारें । जीचे जठरींच्या व्यासकुमरें । त्रिजग सारें धवळिलें ॥३९॥
मैत्रावरुणि वशिष्ठागस्ति । कोठें गर्गाची उत्पत्ति । सौभरिमुनिची संतति । कोणती सती करगृहीता ॥३४०॥
एवं यथार्थ भगवदुक्ति । ब्रह्मजिज्ञासा मुख्यश्रुति । तदनुष्ठानीं नाहीं शक्ति । धर्मप्रवृत्ति त्यां कथिली ॥४१॥
‘ लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा ’ । ज्ञानें सांख्यांची प्रतिष्ठा । विषयासक्तां कर्मचेष्टा । कथिला गोमटा कर्मयोग ॥४२॥
आत्मपतीचें न फवे सुख । म्हणोनि बाह्य हें औपपतिक । गांधर्वविवाह परी चोख । विषयात्मक विध्युक्त ॥४३॥
अभेद भोगितां आत्मरति । द्वैतबोधाची उपशांति । द्वैतावेगळी अपयशोऽवाप्ति । कोण्हाप्रति तें सांगा ॥४४॥
येरां सुरनरां विषयसिद्धि । साधितां युद्धीं अथवा वादीं । जय पराजय सर्वां बाधीं । द्वैत उपाधीमाजिवडा ॥३४५॥
फल्गु म्हणिजे तुच्छ अल्प । तें हें विषयसुखाचि स्वल्प । याज्ञिक श्रुतीचा करूनि जल्प । यज्ञें त्रिविष्टप आश्रयिती ॥४६॥
तेथ न पुरतां विषय असोसी । पुन्हा पचती गर्भवासीं । स्वर्ग्य कीं अस्वर्ग्य म्हणिजे यासी । एवं विषयांसि तुच्छत्व ॥४७॥
कृच्छ्र म्हणिजे कष्टें साध्य । तें विषसुखाचि दुराराध्य । याचा अनुभव सर्वां प्रसिद्ध न लगे प्रबोध करावा ॥४८॥
बाईल मिळतां संतोष वाटे । संसार करितां अपान फाटे । विषय मानूनि गोमटे । दुःखें दुर्घटें भोगिती ॥४९॥
जाया जोडली उर्वशीऐसी । परी उकरडां रमतां नये तिशीं । म्हणोनि करितां मंदिरासी । बहुतां क्लेशीं जांचिजे ॥३५०॥
जाती उखळें मुसळें खुंटे । सुपें टोपली पाटे परोटे । झाडणी केरसुण्या खराटे । भिंती दारवंटे कवाडें ॥५१॥
एवं अल्प सुखासाठीं । ऐशा अपार दुःखकोटी । क्षुधे तृषेची जांचणी मोठी । दुर्लभ गोठी मिळणीची ॥५२॥
यात्रा वाणिज्य सेवामिसें । रोषें तोषें दोषें प्रवासें । रोगें दारिद्र्यें विद्याभ्यासें । वियोग आपैसे ठाकती ॥५३॥
आपण स्त्रियेचा म्हणवी स्वामी । पोटार्थ विकूनि घे आणिके धामीं । मग तो देहपति आपुले सद्मीं । आस्यकर्मीं प्रवर्तवी ॥५४॥
स्त्रियेचा म्हणवी स्वयें दादुला । आपण येरांची बाईल झाला । पोटें ऐसा विलंब केला । निर्लज्जाला सुख वाटे ॥३५५॥
याहूनि धन्य तिर्यग्योनि । विषय भोगिती स्वाधीनपणीं । कोणाअधीन न होती कोण्ही । भूजलगगनीं स्वच्छंदें ॥५६॥
नरदेहींच्या विशेष ज्ञानें । कळतां वेदशास्त्रपुराणें । पोटासाठीं विकोनि घेणें । बाईल होणें आणीकांची ॥५७॥
पुरुषा पढियंती अंतुरी । ते पोष्याची धुर धरी । तेंवि सर्व कार्यें जो आवरी । तो सेवकाशिरीं प्रधान ॥५८॥
प्राधान्याचें महत्त्व आलें । भूषण मिरवी येणें बोले । पोटासाठीं आयुष्य गेलें । विकोनि घेतलें हें न कळे ॥५९॥
त्याहूनि मळहारक बरा । मूर्खपणें तो निदसुरा । येर्‍हवीं करील जरी स्वविचारा । तरि संसारा जिंतील ॥३६०॥
च्यारी घटिका मलापहरणीं । उरला काळ स्वाधीनपणीं । सप्रेम नाम स्मरेल वाणी । तरि दुर्योनि चुकवील ॥६१॥
त्याहूनि गौण प्राधान्य कर्म । शरीरवाङ्मन अविश्रम । अहोरात्र सम विषम । प्रपंच अधम उपसावा ॥६२॥
एवं स्वहिताची बोहरी । विषयस्वार्थें केली पुरी । त्या विषयार्थ झुरे अंतरीं । विपत्ति पदरीं बहुसाल ॥६३॥
करितां बहुतांचें न्यून पूर्ण । छिद्र लक्षून ते करिती विघ्न । कारागार दीर्घ ताडन । धनापहरण दुर्दशा ॥६४॥
धनिक म्हणती सधन आम्ही । स्वतंत्र धनसदनाचे स्वामी । संपन्न संतति हेमीं धामीं । ललनाललामीं सुख भोगूं ॥३६५॥
धनाचा करितां त्या आयव्यय । होय आयुष्याचा क्षय । राजिक दैविक गोत्रज भय । दस्युस्तेयनृपदंडें ॥६६॥
देवढीलाभें करूनि खत । हातीचें देऊनि देखत देखत । रडों लागती विख्यात । खत दुखवत क्षणक्षणा ॥६७॥
पुढील मुदती भंगोनि गेली । खतेंवेदना बहुत केली । रागें चुलीस पाणी घाली । धरणी घेतली तद्द्वारीं ॥६८॥
रोगी चंडिकेचिये द्वारीं । उपासपारणीं जैसा करी । तैसा अधमर्णाचिये घरीं । बैसे निर्धारीं खतेला ॥६९॥
वेसीस बांधिजे म्हणती दुःख । तैसे भवंते मिळती लोक । निळे पाय काळें मुख । सांगोनि विवेक करा म्हणती ॥३७०॥
श्यांस शेळी लक्षांस गाय । एक सांगती हा उपाय । मुळीं मुदलासीच नाहीं ठाय । तेथ व्याज काय पाहतां ॥७१॥
ऐसीं ऐकतां पंचाइती । क्षोभें भडका उपजे चित्तीं । तंव एक बोलती पक्षपाती । नृपाप्रति हें कथिजे ॥७२॥
राया वोपूनि चतुर्थ भाग । सवृद्धि द्रय गणूनि सांग । घेईजे हा उपाय चांग । करिती दीर्घ प्रयत्न ॥७३॥
तंव ते राजद्वारीचें जन । देखोनि सधन उत्तमर्ण । लांच मागती निर्भर्त्सून । करिती छलन न देतां ॥७४॥
एवं सधनाचिये पाठीं । ऐशा अनेक दुःखकोटी । केउती विषयसुखाची गोठी । सर्वदा पोटीं धनचिंता ॥३७५॥
असत्यवादी कळींचे जन । धन बुडविती विश्वासून । जन्मांतरीं त्यांचें श्वान । होऊनि ऋण मग घेती ॥७६॥
पश्वादि दासी स्त्री बाळक । अधमर्णाचे होती धनिक । भूनिक्षेपावरी पन्नक । होती अचुक धनलोभें ॥७७॥
एवं विषयाची सामग्रीं । सुखार्थ भुलवूनि घाली घोरीं । यातना जन्मजन्मांतरीं । कैंची संसारीं मग सुटिका ॥७८॥
म्हणाल स्त्रियांसि कथिला धर्म । पुरुषार्थाचें कां घेतां नाम । तरी ज्यांसि कामाचा संभ्रम । त्या सर्वही सकाम कामिनी ॥७९॥
पुरुष निःसंग उदासीन । निर्विकार निरभिमान । निष्प्रपंच स्वगत पूर्ण । नित्य निर्गुण निष्काम ॥३८०॥
येर अवघीच प्रकृति । तदंश अनेक अविद्याव्यक्ति । कामिनी म्हणून कामासक्ति । निजात्मरति त्यां कैंची ॥८१॥
म्हणोनि जुगुप्सित औपपतिक । सांडूनि बाह्यविषयसुख । पुरुष सेविजे अंतर्मुख । ऐसा विवेक हरि बोधी ॥८२॥
तो मी पुरुष अभ्यंतरीं । दुष्प्राप असतां प्रेमा भारी । सगुण सुलभत्वें संसारीं । घडे व्यवहारीं अवज्ञा ॥८३॥
म्हणोनि गोपींसी म्हणे हरि । परतोनि जावें आपुले घरीं । स्वकांत सेवितां शास्त्रनिर्धारीं । प्रेमा मजवरी असों द्या ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP