अध्याय २९ वा - श्लोक २७ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रवणाद्दर्शनाद्ध्यानान्मयि भावोऽनुकीर्तनात् । न तथा सन्निकर्षेण प्रतियात ततो गृहान् ॥२७॥

अचिंत्यैश्वर्यगुणकीर्तनें । विविधावतारीं विविधाचरणें । माझीं पुण्यश्रवणकीर्तनें । अंतःकरणें विवरितां ॥३८५॥
श्रवण करितां माझी कीर्ति । मद्रूपीं उपरम पावे वृत्ति । सहजचि विवर्ता निवृत्ति । चित्सुखावाप्ति अनायासें ॥८६॥
सगुण निर्गुण मद्दर्शन । हृदयीं ठसावतांचि पूर्ण । उडोनि जाय प्रपंचभान । नयनीं चिद्घन प्रकाशे ॥८७॥
जिकडे जिकडे फांके दृष्टि । तिकडे तिकडे सच्चित्सुखाची वृष्टि । अधोर्ध्व सभोंवता पोटीं । सुखसंतुष्टी मी प्रकटें ॥८८॥
मजवीण भिन्न असावें कांहीं । तरी त्याचें दर्शन घडावें कहीं । दृश्यकल्पना नाथिली पाहीं । मनाच्या ठायीं प्रतिभासे ॥८९॥
मी अद्वैतसुखाची खाणी । जिहीं विश्वासें रंगोनि श्रवणीं । प्रेमा धरिला मद्दर्शनीं । त्यांचे नयनीं प्रकाशें ॥२९०॥
मद्दर्शनें उठाउठीं । ध्यानानंद उथळे पोटीं । माझी सगुणमूर्ति गोमटी । प्रकटे सृष्टी सबाह्य ॥९१॥
श्याम राजीवलोचन । ठाणमाण गुणलक्षण । रूपरेखा लावण्यपूर्ण । वेधें तनु मन पालटी ॥९२॥
देह होय स्तब्धीभूत । चित्त चैत्नयीं विरोनि जात । तैं मग अक्षय सुख एकांत । होय संप्राप्त अबला हो ॥९३॥
विशेष काय सांगूं गोठी । वास्तव माझें आस्तिक्य पोटीं । सप्रेम बाणल्या तेंचि वोठीं । कीर्तनपरिपाटीं विस्तारे ॥९४॥
आवडतयाची काहणी । वाखाणितां न पुरे धणी । श्रवणीं सादर होतां कोण्ही । न पुरे शिराणी कथनाची ॥३९५॥
कृष्ण ऐकावा पहावा । सालंकृत सहावयवा । माजि उभा ठाके आडवा । जो आठवा देवकीचा ॥९६॥
सालंकृत ठाणठकारें । आठवे तैसा ध्यानीं भरे । ध्यानसुखाच्या आविष्कारें । विषयीं झांसुरे तद्वेधें ॥९७॥
कन्या आवडती दूरदेशीं । माता बोळवी सासुरियासी । मग ते आठवे निजमानसीं । मोहें पिशी तद्वेधें ॥९८॥
अवचित भासे दृष्टीपुढें । स्वप्नीं संवादीं पवाडे । तिचें बोलणें कानीं पडे । म्हणोनि वावडे पाहावया ॥९९॥
मुखें आळवूं जाय सुनां । तंव तिचेंचि नां ये वदना । खातां जेवितां प्राशितां जीवना । विसर पडेना तियेचा ॥४००॥
तैसी असतां सन्निधानीं । अवस्थातून नोहे जननी । पढियें प्रेम दृष्टांतकथनीं । घातलें श्रवणीं प्राकृत ॥१॥
आत्मप्रियत्वें विश्वप्रिय । तें वेधकत्व कथिजे काय । तो जगदात्मा मी स्वयें । अपैता होय सप्रेमें ॥२॥
सन्निधानें तैसा न फवें । यालागीं परतोनि गृहा जावें । श्रवणें ध्यानें सप्रेमभावें । मज चिंतावें हृतकमळीं ॥३॥
तृषिता धेनु गंगातटीं । बळें मुरडितां मारूनि काठी । कीं भणगा उठवी बैसल्या ताटी । त्याहूनि कष्टी वधू होती ॥४॥

श्रीशुक उवाच :- इति विप्रयमाकर्ण्य गोप्यो गोविंदभाषितम् ।
विषण्णा भग्नसंकल्पाश्चिंतामापुर्दुरत्ययाम् ॥२८॥

श्रुतिस्मृत्यर्थधर्मवचनें । कृष्णप्राप्तीसि करिती विघ्नें । तें विषतुल्य ऐकोनि मनें । दुस्तर चिंता पावलीं ॥४०५॥
स्वमुखें गोविंदें निगदिलें । परतोनि सदना जाणें कथिलें । वियोगदुःख दुणाविलें । तेणें मानस भंगलें गोपींचें ॥६॥
भंगोनि गेला मनोरथ । दुस्तर चिंता जाली प्राप्त । करपद अवयव जाले श्लथ । निश्चेष्टित तनुभाव ॥७॥
सखेद त्यांचीं तनुलक्षणें । शुकें परीक्षितीकारणें । कथिलीं तैसीं ऐका मनें । सावधपणें श्रोते हो ॥८॥

कृत्वा मुखान्यव शुचः श्वसनेन शुष्यद्बिंबाधराणि चरणेन भुवं लिखंत्यः ।
अस्रैरुपात्तमषिभिः कुचकुंकुमानि तस्थुर्मुजंत्य उरुदुःखभराः स्म तूष्णीम् ॥२९॥

मोडली आनंदाची हाव । स्मृति विसरली शरीरभाव । विकळ इंद्रियांचा गांव । भीरु स्वभाव उमटले ॥९॥
प्रतिकूळ उत्तरीं अभ्यंतर । तापतां श्वास सांडिती तीव्र । त्यांचिये वाफे बिंबाधर । परम सकुमार वाळले ॥४१०॥
परम कोमळ गोपीहृदयें । कृष्णीं सन्निग्ध नवनीतप्रायें । विरहतापें द्रवतां होये । चक्षुप्रवाहें बाष्पांबु ॥११॥
तेंअप्रतीकार सकज्जल । वक्षःस्थळीं सशोक जळ । सकुंकुम कुचमंडळ । पडतां केवळ क्षाळलें ॥१२॥
अंगकांति पांडुरवर्ण । शोकें गौरता जाली लीन । त्रिवेणी ऐसी हृदयावरून । असितअरुणश्वेतौघा ॥१३॥
पहातां उघडीं दिसतीं बुबुळें । आकर्ण कुरंगी सदृश डोळे । ढळमळां स्रवती सशोक जळें । अचळमौळें जेंवि घनीं ॥१४॥
स्तिमितदृष्टि झाल्या नयनीं । अपांग मूर्च्छित मानसग्लानि । विमुखरूपाभिज्ञत्वगुणीं । प्रतिमापाषाणीं समसाम्य ॥४१५॥
चरणांगुष्ठें भूतळीं रेखा । विस्मृतीमाजी वोढिती देखा । जाणों आय्ष्या करूनि लेखा । अवशिष्ट घटिका मोजिती ॥१६॥
मेरूपासूनि ज्यांचा भार । ऐसिया दुःखाचे डोंगर । खचोनि पडले अनावर । त्यांहूनि सुभर सक्लेश ॥१७॥
ऐशा ठकल्या मुहूर्तमात्र । प्रेमसंरंभा प्रजागर । तेणें परिमार्जूनि नेत्र । उदितां उत्तर द्यावया ॥१८॥

प्रेष्ठं प्रियेतरमिव प्रतिभाषमाणं कृष्णं तदर्थविनिवर्तितसर्वकामाः ॥
नेत्रे विमृज्य रुदितोपहते स्म किंचित्संरंभगद्गदगिरोऽब्रुवतानुरक्ताः ॥३०॥

शुक म्हणे गा परीक्षिति । किमर्थ गोपींची सकोपवृत्ति । झाली म्हणसी तरी तुजप्रति । कथितों निगुती तें ऐक ॥१९॥
ज्याचे प्राप्तीलागीं आम्ही । विरक्ता जालों सर्वकामीं । सांडूनि सुत धन सदन स्वामी । चरणपद्मीं अनुरक्ता ॥४२०॥
ऐसा प्रियतम आम्हांसि कृष्ण । करितां अप्रिय संभाषण । तेणें मानस जालें उष्ण । करिती स्फुंदन सद्गदिता ॥२१॥
आदरीं देखून अनादर । अमर्ष उधवूं पाहे शिर । परी कृष्णीं रंगलें अभ्यंतर । तें निष्ठुर हो न शकें ॥२२॥
सव्रीडदंपतीबुझावणी । करूं येती शेजारणी । दुःखे क्रोधोर्मि तेंवि उशिणी । अंतःकरणीं ऊठिली ॥२३॥
जेणें भंगे प्रेमलाभ । तैसा सैराट न करी क्षोभ । वाढवी प्रेमाचें वालभ । म्हणिजे संरंभ तो कोप ॥२४॥
तैसिया कोपें सकोपिष्ठा । नेत्र पुसूनि सद्गदकंठा । विरहें लज्जा विसरूनि धीटा । बोलती प्रेष्ठा कृष्णाशीं ॥४२५॥
ज्या भाषणें उपजे हर्ष । विरोनि जाय क्रोधावेश । भाषणरूपें तें पीयूष । येर सदोष विषतुल्य ॥२६॥
ऐसें भाषण जयापाशीं । त्रिजगत्प्रियतम मानी त्यासी । वृथा जल्पूनि गुणदोषांसी । मूर्खा जगेंशीं वैरस्य ॥२७॥
तैशा नव्हती व्रजकामिनी । श्रुतिमनोज्ञप्रियभाषिणी । प्रेमा प्रकटूनि अंतःकरणीं । सकोप कृष्णीं अनुरक्ता ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP