अध्याय २३ वा - श्लोक ४६ ते ५३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अन्यथा पूर्णकामस्य कैवल्याद्याशिषाण पतेः । ईशितव्यैः किमस्माभिरीशस्यैतद्विडंबनम् ॥४६॥

ज्याच्या संकल्पाचें स्फुरण । ईशनशक्तीसि अधिष्ठान । तच्चिंतनें कामना पूर्ण । महा तो पूर्ण चित्सुख ॥६२॥
ब्रह्मसदनादि अखिल सुखें । तीं अवघींच कामनात्मकें । कैवल्यपर्यंत अशेखें । वरलेशें जो वोपी ॥६३॥
कैवल्यादिवरदपति । पूर्णकाम जो चिन्मूर्ति । गोपवेशें नटोनि क्षिती । पावन कीर्ति विस्तारी ॥६४॥
अस्मादृशांचा गर्वभंग । सर्वज्ञतेचा काढूनि डाग । दावावया कैवल्यमार्ग । दावी सोंग प्रभुत्वें ॥४६५॥
येरव्हीं आमुचीं थोरपणें । जाणोनि तेणें याच्ञा करणें । आम्हीं त्यासी काय देणें । अंतःकरणें विचारा ॥६६॥
ज्याचें वैभव वदतां वेद । बोलों न शकती पुरता शब्द । स्तवितां शेष पावला खेद । तो हा प्रसिद्ध परमात्मा ॥६७॥

हित्वा‍ऽन्यान् भजते यं श्रीः पादस्पर्शाशयाऽसकृत् । स्वात्मदोषापवर्गेण तद्याच्ञा जनमोहिनी ॥४७॥

लक्ष्मी लावण्य सुभगा चतुरा । डावलूनियां सुरनरपितरां । ज्याचिया पादस्पर्शाधिकारा । येकही वार इच्छोनि ॥६८॥
लावण्य चातुर्य गर्वाभिमान । महत्त्व दंभ ईर्षा सन्मान । चापल्यादि जे निजगुण । सांडोनि शरण श्री झाली ॥६९॥
एकवारही पादस्पर्श । दुर्लभ म्हणोनि आदरी दास्य । तयेवरी जो उदास । याच्ञा त्यास मायिक ॥४७०॥
नित्यतृप्तासी क्षुधा कैंची । अवाप्तकाम अन्न याची । हे जनमोहिनी माया त्याची । विश्व प्रपंची भुलवीतसे ॥७१॥

देशः कालः पृथग्द्रव्यं मंत्रतंत्रत्विंजोऽग्नयः । देवता यजमानश्च क्रतुर्धर्मश्च यन्मयः ॥४८॥

देश काल द्रव्य पृथक् । मंत्र तंत्र ऋत्विज पावक । देवता यजमान मख । धर्मप्रमुख अवघें जो ॥७२॥
जेंवि एकचि कल्पतरू - । माजीं अवघा फलविस्तारू । देश कालादि मंत्रतंत्र । सविस्तर अवघें जो ॥७३॥

स एवं भगवान्साक्षाद्विष्णुर्योगेश्वरेश्वरः । जातो यदुप्वित्यश्रृण्म ह्यपि मूढा न विद्मह ॥४९॥

तोचि हा प्रत्यक्ष श्रीभगवान । षड्गुणैश्वर्यसंपन्न । योगेश्वरांचा ईश्वर पूर्ण । विश्वव्यापन श्रीविष्णु ॥७४॥
एथ भूभारहरणकार्या । अवलंबूनि योगमाया । यदुकुळीं जन्मला ऐशिया । जाणों गुह्या पैं आम्ही ॥४७५॥
शास्त्रदृष्टी कां महर्षिमुखें । आम्हांसि असतांही ठाउकें । कार्मठ्यमोहें मूढात्मकें । ठकलों मूर्ख पैं आम्ही ॥७६॥
ऐकोनि विदित असतां पोटीं । विश्वास न घटे आमुच्या घटीं । गोपांमुखें परिसोनि गोठी । आम्हीं कर्मठीं नादरिली ॥७७॥
एवं ऐशी हरीची माया । समर्थ विधि हर मोहावया । आतां रसरसूनि काय वायां । लाभ गेलिया हातींचा ॥७८॥
तंव बोलती एक ब्राह्मण । सर्वज्ञ दीनदयाळ श्रीकृष्ण । त्याचिये कृपेनें आम्ही धन्य । हें लक्षण अवधारा ॥७९॥
आम्हां ठकिलें कार्मठ्यभ्रमें । परी कारुण्यावाप्तिकामें । आमुच्या तरणोपायप्रेमें । स्त्रिया संभ्रमें बोधिल्या ॥४८०॥
आम्हांपासूनि विमुख गेले । ते गोप स्त्रियांपें पाठविले । अन्नयाच्ञेचें मिष केलें । परी स्मरण दिधलें आम्हांसी ॥८१॥

अहो वयं धन्यतमा येषां नस्तादृशीः स्त्रियः । भक्त्या यासां मतिर्जाता अस्माकं निश्चला हरौ ॥५०॥

अहो म्हणती आश्चर्याशीं । धन्य आमुच्या तपोराशि । कीं त्या सुपत्न्या आम्हांसी । ज्या कृष्णासी भजिन्नल्या ॥८२॥
धन्य आम्ही ये संसारीं । ज्या आमुच्या ऐशिया नारी । ज्यांच्या भजनप्रेमावरी । आमुच्या अंतरीं सद्बोध ॥८३॥
कृष्णीं भजल्या सप्रेमभावें । पूर्णकृपेनें वासुदेवें । अनुग्रहिल्या म्हणूनि भावे - । पासूनि दैवें सांडवल्या ॥८४॥
स्त्रियांची देखूनि एकांतभक्ति । आमुची विराली कार्मठ्यभ्रांति । श्रीकृष्णचरणीं निश्चळ मति । प्रेमप्रवृत्ति पैं झाली ॥४८५॥
ऐसें ज्याचें कृपेचें करणें । नमो त्या भगवंता तुजकारणें । तुझिये पूर्ण कृपेविणें । माया निस्तरणें घडेना ॥८६॥

नमस्तुभ्यं भगवते कृष्णायाऽकुंठमेधसे । यन्मायामोहितधियो भ्रमामः कर्मवर्त्मसु ॥५१॥

नमो श्रीकृष्णा भगवंता । परमानंदसुखैकभरिता । अचिंत्यानंतगुणपूर्णता । शोभे तत्त्वता तुज तुझी ॥८७॥
तुझी मेधा अकुंठित । तूं सत्यसंकल्पभगवंत । लीलाविग्रह अव्याहत । करुणावंत शरण्यां ॥८८॥
तुझिया मायेचेनि भ्रमें । बुद्धि झांकोळली तमें । मार्ग चुकोनि करितां कर्में । संसारश्रमें श्रांतलों ॥८९॥
मायामोहित झाली बुद्धि । म्हणोनि विसरलों आत्मशुद्धि । अनेककर्ममार्गीं विविधीं । धावों पाणधी भ्रमभरें ॥४९०॥

स वै न आद्यः पुरुषः स्वमायामोहितात्मनाम् । अविज्ञातानुभावानां क्षंतुमर्हत्यतिक्रमम् ॥५२॥

ज्याची माया मोहक ऐशी । मोही हरिहरब्रह्मादिकांसी । तो तूं श्रीकृष्ण निश्चयेंशीं । आदिपुरुष परमात्मा ॥९१॥
अज्ञानासी कनकबीज । चारूनि भुलविलिया मग सहज । मर्यादेची सांडूनि वोज । पूज्यापूज्य नाठवी ॥९२॥
तेंवि तां स्वमाया मोहिलें आम्हां । तैंहूनि नेणोंचि तुझा महिमा । भ्रांतिगर्भितअवज्ञाक्षमा । पुरूषोत्तमा त्वां कीजे ॥९३॥
अपराधक्षमा करावया । तूंचि स्मार्थ जगदात्मया । कीं हे अवघी तुझी माया । मोहकार्या प्रकाशी ॥९४॥
ऐसे अनुतापें ब्राह्मण । वारंवार जनार्दन । स्मरोनि करिती स्वदोषकथन । स्तुतिस्तवनपूर्वक ॥४९५॥

इति स्वाधमनुस्मृत्य कृष्णे ते कृतहेलनाः । दिदृक्षवोऽप्यच्युतयोः कंसाद्भीता न चाचलन् ॥५३॥

ते ब्राह्मण ऐशिया परी । कृष्ण उपेक्षिल्या हेलनेवारी । तें अध स्मरोनि अभ्यंतरीं । नमस्कारीं उद्युक्त ॥९६॥
एकमेकां म्हणती द्विज । राम आणि अधोक्षज । पाहूं चला सहजीं सहज । सांगों गुज अंतरींचें ॥९७॥
हेलनारूप घडलीं पापें । तितुकीं जळालीं पश्चात्तापें । आतां संपादूं त्याचिये कृपें । चरणां समीप जाऊनी ॥९८॥
परब्रह्म मूर्तिमंत । सगुण सुंदर रामाच्युत । नयन भरूनि पाहतां तृप्त । होऊं सनाथ सर्वस्वें ॥९९॥
ऐसे उद्यत दर्शनालागीं । तंव एक म्हणती न कीजे सलगी । दुराचारी कंस जगीं । अनयमार्गीं प्रवृत्त ॥५००॥
राजशासन त्याचें दुष्ट । विवेकहीन तो पापिष्ठ । ऐकोनि मानील परमानिष्ट । तेव्हां कष्ट भोगावे ॥१॥
यालागीं असो मनींच्या मनीं । नित्य यज्ञाचरणें सदनीं । प्रेमा ठेवूनि कृष्णभजनीं । चक्रपाणि तोषवा ॥२॥
ऐसें कंसरायाभेणें । चंचल न होतां ब्राह्मणें । गृहींच राहिलीं समाधानें । दर्शनाकारणें न वचोनी ॥३॥
इतुकी कथा मात्स्यीसुता । बादरायणि झाला कथिता । तें व्याख्यान ऐकोनि श्रोतां । वोपिजे चित्ता हरिप्रेमा ॥४॥
पुढिले अध्यायीं श्रीरंग । निवारूनियां इंद्रयाग । गोवर्धनाख्य यज्ञ सांग । प्रवर्तवील निजसत्ता ॥५०५॥
तये कथेच्या श्रवणसुखा । आमंत्रण हें पुण्यश्लोकां । कृष्णीं प्रेमा धरितां निका । नोहे ठावुका कळिकाळ ॥६॥
आदिगुरु ईश्वरमूर्ति । मनीषा दत्तात्रेय सुमति । जनार्दन उदानवृत्ति । एकनाथ तच्चक्षु ॥७॥
चिदानंदा चक्षुसूर्या । स्वानंदरूपा किरणनिचया - । पासूनि गोविंदा जलदमया । ग्रंथप्रमेया वर्षला ॥८॥
तेणें भरला दयार्णव । श्रवणें सुस्नात होती जीव । पावती कैवल्यसाम्राज्यविभव । सांडूनि दुर्भवदारिद्र्या ॥९॥
ऐसें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र श्लोकीं गणित । संहिता परमहंसाभिमत । स्कंध त्यांत दशम हा ॥५१०॥
यज्ञपत्न्यांचें आख्यान । परम पावनां पावन । श्रवणें निरसी कर्माभिमान । अध्याय पूर्ण तेविसावा ॥११॥
श्रीमद्भागवत दशमस्कंध । टीका हरिवरदं अगाध । दयार्णवकृत परम विशुद्ध । अध्याय प्रसिद्ध तेविसावा ॥१२॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे‍ष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरिक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां यज्ञपत्न्याख्यानं नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥२३॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५३॥ टीका ओव्या ॥५१२॥ एवं संख्या ॥५६५॥ ( तेविसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १२२१५ )

तेविसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP