मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २३ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय २३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय २३ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर नन्वद्धा मयि कुर्वन्ति कुशलाः स्वार्थदर्शनाः । अहैतुक्यव्यवहितां भक्तिमात्मप्रिये यथा ॥२६॥इंद्रियांवांचूनि विषयग्रहण । करूं न शकेचि अंतःकरण । यालागीं विषयांचें प्रियपण । करणालागूनि बोलिजे ॥७२॥प्राणवाहेंकरण पुष्ट । प्राणप्रवाह संकल्पनिष्ठ । तो संकल्पही होय प्रविष्ठ । लक्षूनि स्पष्ट स्वसाक्षी ॥७३॥तो प्राज्ञही करणनाशें । वेठे प्रत्यगात्मत्ववेशें । आप्तप्रियत्वें स्वलक्षांशें । प्रेमें भजितसे निष्काम ॥७४॥तो आत्मा मी गोपवेशें । नटलों अस्पष्टभूतलेशें । विशुद्धविज्ञानप्रकाशें । कळलें ऐसें ज्यांलागीं ॥२७५॥ते विवेक माझ्या ठायीं । विचारें विवरूनि स्वप्रत्ययीं । आत्मप्रियत्वें भजती पाहीं । दृढनिश्चयीं स्वस्वार्थें ॥७६॥ईश्वरपर्यंत शुद्ध सत्त्व । उभवी मायेचें लाघव । तिचा जेथें अनुद्भव । तोचि स्वयमेव श्रीकृष्ण ॥७७॥ऐशिया अपरोक्षबोधें दृष्टि । यथार्थभक्ति त्यांचे गांठीं । येर भजणें जें विषयासाठीं । ते उफराटी भववेली ॥७८॥वृत्तिक्षेत्रार्थसंपन्न । वृद्धवंध्यापुत्ररत्न । जोडल्या करी त्याचें भजन । तत्कल्याण फळलाभा ॥७९॥आपुलें वेंचूनि तनु मन धन । इच्छी तयासीच कल्याण । तयावरूनि आपुला प्राण । कुरवंडूनि सांडीतसे ॥२८०॥आत्मा वै पुत्रनामासि । त्या आत्मत्वीं प्रेमा ऐशी । मां जे अपरोक्ष कांतदर्शी । यथार्थतैशीं न भजती कां ॥८१॥फलाभिलापरहित भक्ति । अवंचकत्वें संतत गति । हे आत्मत्वींच घडे प्रतीति । अभेद स्थिति अपरोक्ष ॥८२॥तरी आत्मत्वींच अभेदभजन । म्हणाल घडेल काय म्हणून । त्या आत्म्याचें श्रेष्ठपण । सर्वांहून तें ऐका ॥८३॥प्राणबुद्धिमनःस्वात्मदारापत्यधनादयः । यत्संपर्कात्प्रिया आसंस्ततः को न्वपरः प्रियः ॥२७॥देहात्मता अधिकरून । वर्ततां घडे जें कर्माचरण । प्रारब्ध होय तें परिणमोन । तेथ चैतन्य अनुकरे ॥८४॥तया चैतन्याचेनि संपर्कें । प्रारब्धजनकें उपकारकें । दारापत्यधनादिकें । प्राप्तिविशेषें प्रिय होती ॥२८५॥ज्या चैतन्याचेनि सन्निधानें । नाना संकल्प करिजती मनें । त्या मनाच्या अभिरंजनें । कवळी प्रियपणें पदार्थ ॥८६॥ज्याच्या संपर्कें बुद्धि शाहणी । विविधां विषयां पारखिणी । प्राणप्रवाह तनुधारिणी । निजाधिकरणीं पटुतर ॥८७॥देह आत्मत्वें कवळून । करिती तयाचें अभिमंडन । अनेकपदार्थसंग्रहण । हें बाह्य प्रियपण ज्याचेनी ॥८८॥तया प्रारब्धाचिये क्षयीं । चैतन्यसंपर्क उपलयीं । दारापत्यादिप्रियत्वें पाहीं । कोण ते ठायीं कवळिता ॥८९॥शरीरपरत्वें दारादिभरण । त्या देहासी उबगती स्वजन । एवं आत्मत्वें चैतन्य । त्याहूनि कोण प्रिय सांगा ॥२९०॥तो मी परमात्मा श्रीकृष्ण । लीलाविग्रही चैतन्यघन । वैराग्यभाग्यें सुसंपन्न । कृतार्था म्हणोन पावलां ॥९१॥एथूनि तुमचिये प्राप्तदशे । कर्मबाधेचें नातळे पिसें । मदैकशरणा मत्समरसें । अविनाशतोषें आथिलां ॥९२॥तस्मात् तुम्ही पूर्ण कामा । सती साध्वी यज्ववामा । मदाज्ञेनें निजाश्रमा । निष्कामकर्मा साधा जा ॥९३॥तद्यात साध्व्यो यजनं पतयो वो द्विजातयः । स्वसत्रं पारयिष्यंति युष्माभिर्गृहमेधिनः ॥२८॥जाऊनि यज्ञमंडपासी । समाप्ति पावविजे यज्ञासी । तुमच्या योगें भर्तारांसी । सर्वकर्मांसी अधिकार ॥९४॥यज्ञभोक्ता तूं पूर्णपणें । आम्ही कृतार्थ तव दर्शनें । आतां किमर्थ परतोनि जाणें । कर्माचरण किमर्थ ॥२९५॥ऐसें न मना वो सुंदरी । ब्राह्मण केवळ कर्माधिकारी । तदनुग्रहार्थ संसारीं । श्रुतिनिर्धारीं वर्तावें ॥९६॥तुमच्या परिग्रहें करून । झाले गृहमेधी ब्राह्मण । यालागीं वेदाज्ञे प्रमाण । कर्माचरण संपादा ॥९७॥ऐसें ऐकोनि हरीचें वचन । सप्रेम यज्वपत्न्यांचें मन । अवियोगाचें प्रतिपादन । करिती पूर्ण विधिवाक्यें ॥९८॥स्त्रिय ऊचु :- मैवं वचोऽर्हति भवान्गदितुं नृशंसं सत्यं कुरुष्व निगमं तव पादमूलम् ।प्राप्ता वयं तुलसिदाम पदावसृष्टं केशैर्निवोढुमतिलंघ्य समस्तबंधून् ॥२९॥श्रीकृष्णातें यज्वजाया । म्हणती निष्ठुर बोलावया । योग्य नव्हेसि यादवराया । शरण आलिया आमुतें ॥९९॥निष्ठुरवाक्यें मेघश्यामा । शरणागतांचा भंगे प्रेमा । कोणें शिकविजे हें तुम्हां । तूं जगदात्मा सर्वज्ञ ॥३००॥आणि प्रतिज्ञापूर्वक तुझें वचन । जें श्रुतिस्मृतिरूपें प्रमाण । कीं निर्वाणभक्त मदेकशरण । पुनरावर्तन त्या नाहीं ॥१॥न मे भक्तः प्रणश्यति । ऐशिया तुझ्या अनेकोक्ति । पादप्रपन्ना पुनरावृत्ति । निषेधस्थिति बोलिल्या ॥२॥यद्गत्वा न निवर्तन्ते । इत्यादि पुनरावृत्तिवर्जितें । अभयवाक्यें श्रीअनंतें । वृथा कैशीं करिजती ॥३॥दासी हुआवया आवडी । सांडूनि बंधुवर्गाची गोडी । करूनि तदवज्ञा रोकडी । घातली उडी पदपंकीं ॥४॥जेथ रुळती तुलसीदाम । तें दुर्लभ श्रीपाद्पद्म । केशीं झाडावयाचें प्रेम । तें दास्यकर्म वांछितसों ॥३०५॥पायें लोटूनि अवज्ञेवारी । तुलसीदाम तां दिधलें हरि । तें सद्भावें वाहों शिरीं । आम्ही किंकरी होआवया ॥६॥करूनि बंधुवर्गाची अवज्ञा । मोडूनि विध्युक्त वेदाज्ञा । प्राप्त झालों तुझिया चरणां । केंवि शरणां उपेक्षिसी ॥७॥गृह्णन्ति नो न पतयः पितरौ सुता वा न भ्रातृबंधुसुहृदः कुत एव चान्ये ।तस्माद्भवत्प्रपदयोः पतितात्मनां नो नान्या भवेद्गतिररिंदम तद्विधेहि ॥३०॥आतां ऐकें मेघश्यामा । ज्यांची अवज्ञा करूनि आम्हां । शरण आलिया त्वत्पदपद्मा । पुन्हा का मा उपेक्षिसी ॥८॥अवज्ञा करूनि बंधुवर्गाची । जोडी केली श्रीचरणांची । तेथ गेलिया पुन्हा आमुची । सांगा कैशी प्रतिष्ठा ॥९॥विप्रवेदाग्निभगवान् । माता पिता सुहृत्स्वजन । साक्षी करूनि पाणिग्रहण । केलें जाण पतीनें ॥३१०॥काया वाचा आणि मनें । अर्थें स्वार्थें जीवें प्राणें । भर्त्राज्ञेतें नुलंघणें । ऐसें श्रुतिवचन नेमिलें ॥११॥त्या पतीसी तृणावरी । न लेखूनि श्रीमुरारि । आम्ही धांविलों वनांतरीं । घेऊनि शिरीं यज्ञान्नें ॥१२॥आज्ञाभंग यज्ञभंग । लौकिकमर्यादेचा भंग । करूनि पावलों श्रीरंग । पुढती पांग जरी त्यांचा ॥१३॥आतां आमुच्या दर्शनें । क्षुब्ध होती त्यांचीं मनें । आमुचीं देखूनियां वदनें । करिती स्नानें सचैल ॥१४॥असो भर्ताराची कथा । जन्मकारणें माता पिता । आम्हां देखोनि कांतत्यक्तां । मानिती वांतासारिखें ॥३१५॥पोटीं जन्मले जे कुमर । आम्हां मानूनि त्यक्ताचार । आमुच्या मृत्यूचे विचार । निरंतर विवरिती ॥१६॥पोटीं जन्मलीं कन्यारत्नें । निर्भर्त्सिती तीं प्रयत्नें । बंधुवर्ग मानिती उणें । गोत्रज जिणें धिक्कारिती ॥१७॥आप्तवर्गाची ऐशी परी । पिशुन सोयिरे संसारी । यांवेगळा अंगीकारी । कोण धरित्रीवरि सांगा ॥१८॥ज्यांचें त्यांहीं उपेक्षिलें । न वचे कोणीं संरक्षिलें । पत्र वृक्षाचें तूटलें । न वचे जडलें अन्य द्रुमीं ॥१९॥काम क्रोध लोभ मोहो । मदमत्सरादि शत्रुसमूहो । दमितां अरिंदम महाबाहो । तो तूं नाहो कमलेचा ॥३२०॥अरिंदम हें संबोधन । तुज एकातें शोभायमान । येरां प्रतिष्ठाविशेषण । नोहेचि जाण अन्वर्थ ॥२१॥अरिदमा श्रीअनंता । आदिपश्चात्सर्ववेत्ता । याकारणें आमुची कथा । विवरीं चित्तामाजिवडी ॥२२॥मागें उरला नाहीं थार । पुढें नेदिसी तूं आधार । वाक्यें बोलसी निष्ठुर । कोण विचार तैं आमुचा ॥२३॥तुझिया पदकमलाचीं अग्रें । तेथें आमुचीं शरीरें । पडलीं असतां दंडाकारें । गत्यंतरें न चिंतूं ॥२४॥जेव्हां भर्तार टाकिले । तेव्हांचि इहसुख अंतरलें । यज्ञविधीतें उल्लंघिलें । तेव्हां गेलें आमुष्मिक ॥३२५॥आतां स्वपादशरणां आम्हां । न लवीं इहामुष्मिककामा । निजचरणांचा देऊनि प्रेमा । दास्यकर्मा अनुमोदीं ॥२६॥आम्ही त्वच्चरणाच्या दासी । होऊनि रंगों सप्रेमेंशीं । ऐसें करावें हृषीकेशी । अन्यगतीसि नेदूनी ॥२७॥ऐसें ऐकोनि श्रीभगवान । षड्गुणैश्वर्यसंपन्न । अशेष अभिप्राय लक्षून । बोले वचन तयांसी ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : May 02, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP