अध्याय २३ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


गोपा ऊचु :- राम राम महावीर्य कृष्ण दुष्टनिबर्हण । एषा वै बाधते क्षुन्नस्तच्छान्तिं कर्तुमर्हथः ॥१॥

अखिलचराचराभिरामा । संवगडी म्हणती भो बळरामा । तुझा अगाध वीर्यमहिमा । तरी कां आम्हां ही दशा ॥४६॥
कृष्ण दुष्टनिर्दलना । क्षुधा आमुच्या जाकली प्राणा । तुम्ही समर्थ क्षुधोपशमना । आमुची करुणा परिसावी ॥४७॥
अघबकादि अनेक दुष्ट । तुम्हीं प्रतापें मारिले श्रेष्ठ । परी हे क्षुद्बाधेचे कष्ट । कां पापिष्ट ठेविले ॥४८॥
आमुचे क्षुद्बाधेची शांति । करावयाची सामर्थ्यशक्ति । तुमच्या आंगीं आहे पुरती । म्हणोनि विनति करीतसों ॥४९॥

श्रीशुक उवाच - इति विज्ञापितो गोपैर्भगवान् देवकीसुतः ।
भक्ताया विप्रभार्यायाः प्रसीदन्निदमब्रवीत् ॥२॥

ऐशिया प्रकारें गोरक्षगणीं । देवकीतनय जो वंशपाणि । षड्गुणैश्वर्याचा दानी । विनीतवचनीं विनविला ॥५०॥
मग सद्भक्त विप्रांगणा । जाणोनि अंतरीं हरीशी करुणा । उपजली तत्संरक्षणा । करित होत्साता हे बोले ॥५१॥
राशी म्हणिजे एक वचन । परी साळीचे बहुत कण । कीं सहस्र पात्र म्हणतां जान । पात्रें भिन्न द्विजपंक्ति ॥५२॥
तेवी श्रद्धाळूवें विप्रभार्येसी । कृपें वोळला हृषीकेशी । हें एक वचन समुदायेशीं । विप्रांगनांशीं जाणावें ॥५३॥
असो हे पदार्थ घडमोडी । क्षुधेनें जाकळिली सौंगडी । जाणोनी याज्ञिकापाशीं धाडी । गोष्टी उघडी ते ऐका ॥५४॥

श्रीभगवान् उवाच - प्रयात देव यजनं ब्राह्मणा ब्रह्मवादिनः ।
सत्रमांगीरसं नाम ह्यासते स्वर्गकाम्यया ॥३॥

कृष्ण आज्ञापी संवगडियांसीं । ब्राह्मण करिती अध्वरासीं । वेदविद्या विदित ज्यासी । ते तपोराशी कर्मठ ॥५५॥
वेदवचनीं विश्वास दृढ । धरोनी झाले कर्मारूढ । स्वर्गभोगाची मनीं चाढ । कामना वाढ वाढविती ॥५६॥
तीहीं आंगीरसनाम सत्र । मांडिलें आहे यथासूत्र । स्वर्गभोगकामनामात्र । क्रिया पवित्र मानूनी ॥५७॥

तत्र गत्वौदनं गोपा याचतास्मद्विसर्जिताः । कीर्तयंतो भगवत आर्यस्य मम चाभिधाम् ॥४॥

आम्हीं पाठविली यावरून । तुम्हीं टाकावें सत्र सदन । करोनी ऋषींचें प्रार्थन । मागा ओदन ममज्ञा ॥५८॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । श्रीभगवान संकर्षण । जगद्वंद्य पूज्य पावन । सांगा अभिधान तयाचें ॥५९॥
आणि तयाचा अनुज बंधु । निगमाअमीं जो प्रसिद्धु । आम्ही उभयतां रामगोविंदु । करा अनुवाद नामाचा ॥६०॥
ऐसीं आमुचीं सांगूनी नामें । समर्यादविनयधर्में । अन्न मागोनी घ्या सप्रेमें । आज्ञानियमें गोप हो ॥६१॥
म्हणाल आम्ही कां मागो भीक । तरि आमुचे म्हणवितां सेवक । तुम्हांसी याच्ञेचा कळंक । न शिवे निष्टंक गडि हो ॥६२॥
अपात्र मानूनि गोपगणा । म्हणाल नेदीती यज्ञौदना । सांगतां आमुचिया अभिधाना । तुम्ही कल्पना हे न धरा ॥६३॥
षड्गुणांचा ऐश्वर्यराशी । तेणें आज्ञा करोनी ऐशी । धाडिले यज्ञमंडपाशीं । साक्षेपेशीं संवगडे ॥६४॥

इत्यादिष्टा भगवता गत्वाऽयाचन्त ते तथा । कृतांजलिपुटा विप्रान् दंडवत् पतिता भुवि ॥५॥

आज्ञा वंदोनी ते गोपाळ । यज्ञमंडपा जावोनि सकळ । वंदिते झाले क्रियाकुशळ । विप्र सुशीळ त्रैविद्य ॥६५॥
ऊर्ध्वहस्तें बद्धांजली । दंडप्राय भूमंडळीं । नमस्कारोनी तये काळीं । वदती मोकळीं मृदु वाक्यें ॥६६॥
कृष्णें आज्ञा केली जैशी । गोपाळ याच्ञा करिती तैसी । त्या गोपोक्ति नृपासी । आश्चर्येंशीं शुक सांगे ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP