अध्याय २३ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नूनं भगवतो माया योगिनामपि मोहिनी । यद्वयं गुरवो नॄणां स्वार्थे मुह्यामहे द्विजाः ॥४१॥

निश्चयेंशीं हे हरीची माया । योगियांसिही भुलवावया । समर्थ तेथ आमुचा वायां । ज्ञानचातुर्यादिकवर्ग ॥४३५॥
वशिष्ठासी पुत्रशोक । नारदासि अंगनावेख । साठी पुत्रेंशीं पतीचें दुःख । इत्यादिजनक हरिमाया ॥३६॥
येरवीं मनुष्यामाजीं थोर । आम्ही गुरुत्वें भूनिर्जर । केवढा पडला अंधकार । स्वार्थ साचार विसर्लों ॥३७॥
हितोपदेशें मनुष्यांसी । पात्र झालों गुरुत्वासी । ते अंतरलों निजहितासी । दैवी मायेसी वश्य झालों ॥३८॥
आम्हांहूनि धन्य नारी । श्रुताधीतें रहिता घरीं । सप्रेमभक्ति अभ्यंतरीं । जगदीश्वरीं निष्काम ॥३९॥

अहो पश्यत नारीणामपि कृष्णे जगद्गुरौ । दुरंतभावं योऽ‍विध्यन् मृत्युपाशान् गृहाभिधान् ॥४२॥

अहो आश्चर्य पहा कैसें । भोळीं स्त्रियांचीं मानसें । भगवत्प्रेम तेथ ऐसें । अप्रायासें अवतरलें ॥४४०॥
अखिलब्रह्मांडाचा जनक । तो हा प्रत्यक्ष यदुनायक । त्याचे चरणीं आत्यंतिक । प्रेमा निष्टंक स्त्रियांचा ॥४१॥
दुर्लभ सायुज्याचिये माथां । भक्ति आत्यंतिकी तत्त्वता । जिणें कवळिलिया भगवंता । मग भगवत्कथा ते कैंची ॥४२॥
ते भक्तीचा प्रादुर्भाव । स्त्रियांचे ठायीं हेंचि अपूर्व । जेणें तोडिला पाश सर्व । संसारसंभवबंधाचा ॥४३॥
लोहादिनिगडही तोडिती । ते गृहबंधनीं बळेंचि पडती । ममतापाशीं सांपडती । मोहभ्रांति सर्वज्ञ ॥४४॥
ऐसे संसारमोहपाश । पुत्र वित्त आप्त अशेष । इत्यादिनामीं बांधोनि भ्रंश । करूनि दुःखास भेटविती ॥४४५॥
सप्रेमकृष्णभक्तीच्या मुळें । स्त्रियांहीं तोडिले ते एकेचि वेळे । नसतां साधनांची आंगीं बळें । केंवि हें न कळे आम्हांसी ॥४६॥

नासां द्विजातिसंस्कारो न निवासो गुरावपि । न तपो नात्ममीमांसा न शौचं न क्रियाः शुभाः ॥४३॥

चौलोपनयनादि संस्कार । स्त्रियांसी नाहींत कीं साचार । संध्यावंदन क्रियाधार । शौचाचार पैं नाहीं ॥४७॥
गुरुप्रसादन शांतिपाठ । नाहीं निवास गुरुनिकट । गुरुपरिचर्येची कटकट । स्त्रिया स्पष्ट नेणती ॥४८॥
अथवा इष्टपूर्त करणें । ज्यांसि नाह्नीं स्वतंत्रपणें । वेदांतशारीर विचारणें । पाञ्चीकरणवाक्यादि ॥४९॥
ध्यान धारणा आसन मुद्रा । प्राणरोधणें प्राशणें चंद्रा । इत्यादि साधनें जीं योगींद्रा । तीं या सुंदरा नेणती ॥४५०॥
ऐशिया विकट कामिनी । कृष्णीं मीनल्या एकांतभजनीं । हें आश्चर्य अंतःकरणीं । बहुतां गुणीं वाटतसे ॥५१॥

अथापि ह्युत्तमश्लोके कृष्णे योगेश्वरेश्वरे । भक्तिर्दृढा न चास्माकं संस्कारादिमतामपि ॥४४॥

आम्ही सर्वसंस्कारवंत । वेदशास्त्रपारंगत । त्यां आम्हांसि प्रेमतंतु । नाहीं संतत भक्तीचा ॥५२॥
योगेश्वरांचा ईश्वर । उत्तमश्लोक निर्विकार । कृष्ण परब्रह्म साचार । नेणती पार शिवविधि ॥५३॥
तथापि आमुची त्याच्या ठायीं । दृढविश्वासें भक्ति नाहीं । जैसा प्रेमा स्त्रियांचे ठायीं । उपलब्ध पाहीं पूर्णत्वें ॥५४॥

ननु स्वार्थविमूढानां प्रमत्तानां गृहेहया । अहो नः स्मारयामास गोपवावयैः सतां गतिः ॥४५॥

अहो हेंचि आश्चर्य मोठें । निश्चयेंशीं आम्हांसि वाटे । स्वार्थीं विमुख धाटेमोठे । अम्ही करंटे कर्मठ ॥४५५॥
घोकिंवा विद्येचा गर्व बहुत । तेणें अभिमानें मूढप्रमत्त । गृहचेष्टांचें कौशल्यकृत्य । दावूं समस्त लौकिकीं ॥५६॥
टिळे माळा खटाटोप । नानाक्रियांचे आटोप । तपश्चर्यांचे प्रताप । दावूं समीप येती तयां ॥५७॥
ऐकांतिकी भगवद्भक्ति । नसतां अवघे अधःपाती । ऐशिया आम्हा सतांगति । करुणामूर्ति कळवळिला ॥५८॥
गोपां हातीं याच्ञावचन । पाठवूनियां दिधलें स्मरण । परंतु आम्ही दैवहीन । नाहीं पूर्ण समजलों ॥५९॥
आमुच्या उद्धाराकारणें । याच्ञामिसें स्मरण देणें । येर्‍हवी त्या कारुण्यपूर्णें । याच्ञा करणें किमर्थ ॥४६०॥
समुद्र तान्हेला मृगजळा । धुंधुरेंवीण रवि आंधळा । तैसें तया त्रैलोक्यपाळा । याच्ञाछळा अनुसरणें ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP