अध्याय २३ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


भगवानपि गोविंदस्तेनैवान्नैन गोपकान् । चतुरिव्धेनाशयित्वा स्वयं च बुभुजे प्रभुः ॥३६॥

तवे येरीकडे मेघश्याम । नीपकदंब कल्पद्रुम । छाया पाहोनि परम रम्य । अनिम्न सम भूभाग ॥६९॥
तेथ बैसोनि गोपपंक्ति । मध्यें बळराम श्रीपति । पात्रें मांडूनियां निगुतीं । परिवेषिती संवगडे ॥३७०॥
आणूनिया यमुनाजळ । पात्रें प्रोक्षिलीं निर्मळ । प्रतिचक्षूंत शशिमंडळ । तेंवि निर्मळ चरु पात्रीं ॥७१॥
सोलीव मुगांचें त्यावरी सूप । भोंवतीं व्यंजनें समीप । लेह्यचोष्यादिकें अमूप । कोशिंबिरी चटणिया ॥७२॥
कूष्माण्डवटकलवणशाका । तीळ अजाजी मरीचवटिका । पर्पट शुष्क काचर्‍या पाचका । घृतपाचिता कुरवडिया ॥७३॥
येरीं भागीं बारा क्षिरी । सदुग्धा गोधूमविकारी । नीवारगर्भ सशर्करीं । नानापरी पायसें ॥७४॥
महाराष्ट्रपूरणाचिया पोळ्या । सर्वी प्रियकर भाळ्याभोळ्यां । तैलाज्यपाचिता वेगळ्या । तेलवरिया सगर्भा ॥३७५॥
गुर्जरदेशींचा लाडू चुरमा । गडी वाढिती मेघश्यामा । मांढे पुरिया अतिउत्तमा । साकरफेण्या अनारसे ॥७६॥
घार्‍या घारगे गुळवरिया । वाराणसीचिया लुचुया । विचित्र गयेच्या साखरओळिया । शुभ्र पोळिया प्रयागींच्या ॥७७॥
रुमीवा दाळीचे दहिंवडे । अंबवडे चिंबवडे । विचित्र मिरियांचे मिरवडे । कोरवडे क्कथिकाक्त ॥७८॥
बहुप्रकारीं शष्कुलिया । विचित्रसुद्रव्यें भरिलिया । गुडशर्करा पूर्णाथिलिया । परिवेषिलिया समपात्रीं ॥७९॥
लाडुवांचिया अनेक परी । शर्करागोधूमाज्यविकारीं । चणकमिश्रित परोपरी । नानाबीजें फळगर्भ ॥३८०॥
कदळीआम्रपनसफळें । आर्द्रें फोडूनि नारिकेळें । मधुपाचितें अतिरसाळें । चूतद्राक्षें तिंतिणी ॥८१॥
सद्यस्तप्तें एके थिजलीं । साजूक नवनीतें गोठलीं । एकें अर्ध वोथिजलीं । संस्कारिलीं कर्पूरें ॥८२॥
ऐशिया घृतीं भरले द्रोण । कर्दळीचे चतुष्कोण । साय शर्करा संपूर्ण । सर्वां समान वाढिल्या ॥८३॥
मग म्हणोनि कृष्णार्पण । यज्ञभोक्ता जनार्दन । ऋषिपत्न्यांचें भाग्य धन्य । सप्रेम अन्न हरि जेवी ॥८४॥
ग्रासोग्रासीं भोक्ता हरि । संवगडे म्हणती जयजयकारीं । ग्रास घेती परस्परीं । आनंदगजरीं जेविती ॥३८५॥
अन्नें रुचविती मानवती । जें जें लागेल तें तें घेती । पुनः पुनः परिवेषिती । साद सांगती येरयेरां ॥८६॥
साजुकतक्राची स्वादिष्ट क्कथिका । जीरक मरीच रामठ भुरका । लवणशुंठीसहित धनिका । चणकपिष्टसंयुक्ता ॥८७॥
मध्यें मध्यें उष्णोष्ण । गडी वाढिती करूनि प्रश्न । सर्वांमाजि भोक्ता कृष्ण । न्यून कोणा होंनेदी ॥८८॥
रामेश्वरींचें तिंतिणीसार । चिरकाळ क्कथित भेषजाकार । भोजनीं प्राशितां सर्व शरीर । घामें झरझर पाझरे ॥८९॥
दधि स्वादिष्ठ यशोदाकरींचें । तक्र साजुक गौळणीघरींचें । गडी वाढिती तैशिये परीचें । मुनिअध्वरींचें वधूदत्त ॥३९०॥
अग्नि वरुण कां गृहपति । सूर्यसोमादि सुरपति । मनसोद्दिष्ट प्रजापति । पावले तृप्ति हरिवदनें ॥९१॥
ऋषिपत्न्यांचा प्रेमा धन्य । ज्यांचेनि अन्नें जनार्दन । तृप्ति पावतां अनंत यज्ञ । सांग संपूर्ण साधले ॥९२॥
मग प्राशूनि यमुनाजळें । हस्तपादवदनकमळें । प्रक्षाळूनि गोपमेळें । घेती तांबूल मुखशुद्धि ॥९३॥
अवादीकस्तूरी सुपरिमळा । केशरचंदन चर्चिती भाळां । कंठीं सुगंध सुमनमाळा । परिमळ द्रव्यें उधळिती ॥९४॥
ऐशी विचित्र भोजनकेलि । करिता झाला श्रीवनमाळी । व्यासऔरसें नृपाजवळी । गोष्टी मोकळी हे कथिली ॥३९५॥
म्हणाल विस्तार नाहीं मूळीं । तरी ऋषिपत्न्यांहीं अन्नें आणिलीं । तीं काय पात्रेंचि तिहीं भक्षिलीं । कीं वाढिलीं विस्तारें ॥९६॥
त्यांचा विनियोग पाहिजे केला । म्हणोनि प्रकट निरूपिला । संत जाणती प्रेमकळा । मूर्खा अवळां उमजेना ॥९७॥
पूर्णतृप्त श्रीभगवान । तोही होऊनि क्षुधावान । संकर्षणेंशीं गोपगण । जेववी पूर्ण तदन्नें ॥९८॥
जो कां प्रभुत्वें संपन्न । ऋद्धिसिद्धि ज्या अधीन । तोही यज्ञपत्न्यांचें अन्न । प्रीतीकरून जेविला ॥९९॥

एवं लीलानरवपुर्नृलोकमनुशीलयन् । रेमे गोगोपगोपीनां रमयन् रूपवाक्कृतैः ॥३७॥

लीलेंकरूनि मनुष्यतनु । धरूनियां श्रीजनार्दनु । अनंत अचिंत्य गुणपरिपूर्ण । ऐसा भगवान् क्रीडतसे ॥४००॥
मनुष्यलोकींचे अनुकार । त्यामाजिं लौकिकप्रकार । क्रीडामिसें जगदुद्धार । आणि संहार दुष्टांचा ॥१॥
गाई गोपाळ गोपिकांसी । रंजवी पुण्याच्या उत्कर्षीं । मनुष्यलीलानाट्यविशेषीं । रमवी स्वजनांसी क्रीडोनी ॥२॥
स्वयें अवाप्तपूर्णकाम । परंतु गोगोपगोपीप्रेम । जाणूनि क्रीडे आत्माराम । जेंवि सकाम लालस ॥३॥
ब्राह्मांडगर्भींचा लावण्यरस । एकवटोनि वोतिली मूस । त्याहूनि सौंदर्य विशेष । दाऊनि स्वजनांस रंजवी ॥४॥
गोपी रंजवी लावण्यगुणें । गोप रंजवी लीलाचरणें । गाई रंजवी संबोधनें । मंजुळवचनें बाहोनी ॥४०५॥
नित्य नूतन दावी खेळ । विस्मित अवघा ब्रह्माडंगोळ । कोणा नुमजे काळवेळ । श्रीगोपाळसान्निध्यें ।६॥
ऐशी क्रीडा करूनि हरि । साग्रज गाई गोपभारीं । विचित्र वेणु श्रृंग मोहरी । वाद्यगजरीं परतला ॥७॥
एक मांदी वारिती वेत्रीं । एक वीजिती चामरें वस्त्रीं । गोपी प्राशिती तृषिता नेत्रीं । व्रजाभीतरीं प्रवेशतां ॥८॥
कृष्ण गेलियानंतरें । येरीकडे विप्रांतरें । तप्त झालीं अनुतापभरें । तें नृपवरें परिसावें ॥९॥

अथानुस्मृत्य विप्रास्ते अन्वतप्यन् कृतागसः । यद्विश्वेश्वरयोर्याच्ञामहन्म नृविडंबयोः ॥३८॥

संपवोनि तो अध्वर । स्वस्थ बैसोनि ऋषीश्वर । करिती परस्परें विचार । म्हणती थोर अपराध ॥४१०॥
सामान्यनृपाची आज्ञामात्र । भंगितां होइजे दंडासि पात्र । मनुष्यनाट्यें विश्वेश्वर । हे साचार रामकृष्ण ॥११॥
यांची याच्ञा भंगिली आम्हीं । दीक्षित अल्पज्ञ स्वर्गकामी । ऐसे भ्रमलों मायाभ्रमीं । पूर्णब्रह्मीं वंचलों ॥१२॥
ऐसे आम्ही कृतागस । दुष्ट दुरात्मे सदोष । भक्तिविहीन दुर्गतीस । झाली आम्हांस पात्रता ॥१३॥

दृष्ट्वा स्त्रीणां भगवति कृष्णे भक्तिमलौकिकीम् । आत्मानं च तया हीनमनुतप्ता व्यगर्हयन् ॥३९॥

चिंतामणि चढला करीं । निर्दैव जैसा परता करी । त्याचा उपयोग इतरां घरीं । देखोनि चुरमुरी मग जैसा ॥१४॥
तैसे आपण कृतागस । देखोनि स्त्रियांचा भक्तिविशेष । पश्चात्तापें अंतरास । वारंवार धिक्कारिती ॥४१५॥
कृष्ण प्रत्यक्ष कैवल्यदानी । स्त्रिया केवळ गृहमेधिनी । निर्वाणभक्ति त्यांलागुनी । देखूनि मनीं अनुतप्त ॥१६॥
मग आपणां धिक्कारिती । व्रतें साधनें हेळसिती । कृतकर्मांतें उच्चारिती । आणि निंदिती अभिजात्या ॥१७॥

धिग्जन्म नस्त्रिवृद्विद्यां धिग्व्रतं धिग्बहुज्ञताम् । धिक्कुलं धिक् क्रियादाक्ष्यं विमुखा ये त्वधोक्षजे ॥४०॥

मातृगर्भीं कृतसंस्कार । जातकर्मादि जे जे अपर । जेणें पवित्र हें शरीर । त्या धिक्कार शौक्लजन्मा ॥१८॥
पितृवीर्यें करूनि जन्म । त्या जन्मासि शौक्ल नाम । सुसंस्कृत उत्तमोत्तम । तोही अधम भक्तिविण ॥१९॥
पुन्हा द्विजातिसंस्कार । सबीजगायत्र्युच्चार । ज्या उपदेशें वेदाधिकार । त्यासि धिक्कार भक्तीविण ॥४२०॥
पठन करूनि वेद चारी । गृहस्थधर्में यज्ञाधिकारी । दैक्ष जन्म जें अध्वरीं । धिक् धिक् हरिविमुखांतें ॥२१॥
ऐसे त्रिजन्मीं दीक्षित श्रेष्ठ । परंतु नादरितां वैकुंठ । झालों सर्वांहूनि कनिष्ठ । धिक् पापिष्ठ पैं आम्ही ॥२२॥
ब्रह्मच्चर्यादि करूनि व्रतें । संपादूनि त्रैविद्येतें । जीं जीं जोडिलीं सुकृतें । धिक् समस्तें तीं आमुचीं ॥२३॥
ऋग्यजुःसामादि वेद । धनुर्वेद आयुर्वेद । ज्योतिर्वेद गांधर्ववेद । पढलों विशद पढविलें ॥२४॥
न्याय वैशिषिक परिभाषा । सांख्य पातंजल मीमांसा । वेदांतोक्ति उपन्यासा । करूनि ज्ञाते म्हणवीतसों ॥४२५॥
धिक्कार आमुचे सर्वज्ञतें । विमुख झालों भगवंतातें । कांहीं नेणोनि हरिप्रेमातें । रतल्या चित्तें त्या धन्य ॥२६॥
धिक्कार तयां मातापितरां । जे न लाविती भजनादरा । धिक्कार तयां सहोदरां । जे श्रीधरा नेणती ॥२७॥
धिक्कार तया पवित्र कुळा । जें कां विमुख हरिपदकमळा । धिक्कार तयां क्रियां सकळां । ज्या गोपाळा नादरिती ॥२८॥
धिक्कार तयां देशिकांप्रति । इहामुष्मिकीं जे गोविती । कृष्णभजनीं विमुखवृत्ति । प्रबोधिती भव रम्य ॥२९॥
एवं धिक्कार जन्मकर्मा । कुलशीलरूपनामा । एक न भजती परमात्मा । सर्व कर्मां धिक्कार ॥४३०॥
अग्नि वरुण सोरोय सोम । इंद्रविरिंचिलोकोत्तम । तत्प्राप्तीचा वृथा काम । पुरुषोत्तमवैमुख्यें ॥३१॥
ब्रह्मादि करणदेवता सहज । त्यांचें ज्ञान तें अक्षज । ज्याहूनि अध तो अधोक्षज । जगत्पूज्य जगदात्मा ॥३२॥
विमुख असतां त्याचिये भजनीं । जरी जोडल्या वैभश्रेणी । ते जाणावी भवजाचणी । निरयखाणीयातना ॥३३॥
ऐसें आपणां धिक्कारूनी । पश्चात्तापें तापले मनीं । पुन्हा म्हणती विचारूनी । विश्वमोहिनी हरिमाया ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP