मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २३ वा| आरंभ अध्याय २३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय २३ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरमात्मने नमः । अनुपमा जी गरिष्ठतमा । परमलाघवें सर्वीं समा । द्वैताद्वैतनिक्षेपधामा । पूर्णकामा गोविंदा ॥१॥पिंजूनि मोकळा केला तूळ । तो विशाळ भासे परंतु हळु । तैसाचि पुरुष क्षमादिशीळ । लघुत्वें केवळ गुरुतर ॥२॥मेरुसागरकुळाचळ - । सहित सगळा ब्रह्मांडगोळ । तवानुग्रहलेशें व्याळ । वाहे केवळ तिलप्राय ॥३॥ब्रह्मांडाहूनि गरिष्ठसार । तरीच वाहे ब्रह्मांडभार । तेथ वसिष्ठाचा दर्भांकुर । झाला पटुतर तत्कर्मीं ॥४॥ज्याचेनि चिंतनें वशिष्ठासी । तपऐश्वर्यें शक्ति ऐसी । तोचि तूं अनंतब्रह्मांडांसी । न धरूनि वाहसी ऐश्वर्यें ॥५॥अनंतब्रह्मांडांचिया श्रेणी । निमेषाचिया मीलनोन्मीलनीं । एवढी गरिष्ठता कोणीं । केंवि उपमानीं उपमिजे ॥६॥न पुरे उपमेसी ईश्वर । कीं त्याचा ही ऐश्वर्यभार । उतरोनि वोपिसी निजशेजार । अक्षय सन्मात्र कृपेनें ॥७॥म्हणाल ईश्वरें आदिशक्ति । प्रबोधिली पूर्णस्थिती । तेचि सद्गुरुभजनोपलब्ध युक्ति । निजात्मस्थितिप्रापक ॥८॥काष्ठापोटीं प्रकटे वह्नि । तो काय गणिजे काष्ठपणीं । प्रकटे भजनसंवादमथनीं । तेंवि ज्ञानाग्नि ईशत्वीं ॥९॥एकाकी न रमे या कषायें । इच्छाशक्तीच्या उपायें । अभीष्ट बहुत्व जें कां होये । तज्ज्ञातृत्वकर्तृत्व ॥१०॥त्यासीच बोलिजे सर्वशब्दें । तन्नियंतृत्वें ईशत्व नांदे । विक्षेपजनकें ईश्वरपदें । केंवि स्वबोधें जागिजे ॥११॥निकटवासियां सुलभ जल । येरां दुर्लभ प्रयत्नबहळ । परंतु उभयत्र केवळ । स्थितिवेगळ जळेंशीं ॥१२॥गगनचुंबित विशाळ मठ । त्यामाजि सर्षपमात्र एक घट । तारतम्येंचि लघु वरिष्ठ । ऐक्यीं विपट सम व्योमीं ॥१३॥म्हणाल ईश्वरावांचुनि कोण्हीं । नाहीं ऐकिला प्रथमस्फुरणीं । तरी तें वामांग ईश्वरपणीं । आंगीं दक्षिणीं गुरुत्व ॥१४॥जेंवि रसना आणि वाणी । दोन्ही असती एकेचि लपनीं । वागिंद्रिय संभाषणीं । रसास्वादनीं रसज्ञा ॥१५॥तेथ वाक्शून्याची गिरा । समर्थ नोहे वाग्व्यापारा । परी रसास्वादनविचारा । जेंवि पटुतरा देखिजे ॥१६॥तैसा सर्वज्ञ कर्ता ईश्वर । परी उतरूं न शकेचि स्वोपाधिभार । यालागिं तोही तव किंकर । नोहे सधर उपमेतें ॥१७॥ऐसा अनुपम गरिष्ठतम । परंतु लाघवें सर्वीं सम । ईश्वरमौळीं पूर्णकाम । सहस्रदळीं नांदसी ॥१८॥जो तूं ईश्वराचिये शिरसीं । तो तूं सामान्या उपेक्षिसी । प्राणिमात्रीं स्वप्रकाशीं । वसति करिशी सहस्रदळीं ॥१९॥यालागिं गुरुत्वें लाघवें । तूं अनुपमचि निजवैभवें । यास्तव द्वैताद्वैत आघवें । सम्यक् सांठवे तुजमाजीं ॥२०॥तुझ्या ठायीं कामना नसे । याचि लागिं अभेददशे । द्वैताद्वैत समूळ रुसे । सहजप्रकाशें पूर्णता ॥२१॥त्या तुज नमो पूर्णकामा । वेदांतवेद्या परब्रह्मा । गोगोपका गोविंदनामा । श्रीपरमात्मा सर्वगा ॥२२॥तंव सद्गुरु म्हणती स्तवन पुरे । कात्यायनीव्रतानंतरें । तेविसाव्या अध्यायीं व्यासकुमरें । कथिलें तें तूं निरूपीं ॥२३॥एवं आज्ञाश्रीपादगांगें । पावन करितां त्रिविध जगें । रिक्तदयार्णव तत्प्रसंगें । निदाघभंगें भरियेला ॥२४॥तेथ जलशायी भगवान् । प्रश्नावधानें श्रोते जन । संवादसुमनीं अभ्यर्चून । होती संपन्न प्रसादें ॥२५॥आता तृतीय एकादशिनी । उपाइली जे निरूपणीं । ते प्रभूचिये आज्ञेवरूनी । वाखाणिजेल तत्सत्ता ॥२६॥तेथ तेविसामाजि गडी । क्षुधित कृष्णा घालूनि कोडीं । प्रार्थितां यज्ञमंडपा धाडी । तिहीं ते बराडी दवडिले ॥२७॥तया कर्मठांचा गर्व । हरूनियां वासुदेव । तत्पत्न्यांचा प्रेमभाव । देखोनि अपूर्व तुष्टला ॥२८॥चोव्विसामाजीं इंद्रमख । निषेधूनि मन्मथजनक । गोवर्धनाध्वर मुख्य । प्रवर्तक हेतुवादीं ॥२९॥ पंचविसाव्या अध्यायीं शक्र । क्षोभें प्रेरितां मेघचक्र । गिरी उचलूनियां अवक्र । व्रज समग्र हरि रक्षी ॥३०॥सव्विसाव्या अध्यायीं गोप । विस्मित देखूनि हरिप्रताप । नंदें लावूनि गर्गोक्तिदीप । केला लोप भ्रमतमा ॥३१॥श्रीकृष्णाची अद्भुत शक्ति । देखोनि सुरभि आणि सुरपति । गवेंद्रपदीं अभिषेकिती । हे उत्साहकीर्ति सत्ताविशीं ॥३२॥अठ्ठाविसामाजीं वरुण । करी नंदाचें कर्षण । कृष्ण करी तन्मोक्षण । वैकुंठदर्शन गोपां दे ॥३३॥एकुणतिशीं गोपिकाहरि । व्यंग्योत्तरें परस्परें । वदोनि रासक्रीडा आदरी । गुप्तकांतारीं तद्व्याजें ॥३४॥तिसाव्यामाजि विरहतप्ता । गोपी हुडकिती कृष्णनाथा । वनोपवनीं शंकारहिता । भ्रमती उन्मत्ता सारिख्या ॥३५॥एकतिसाव्यामाजीं पुन्हा । पुलिना आल्या व्रजांगना । विरहप्रेमें करिती गायना । कृष्णागमना प्रार्थिती ॥३६॥बत्तिसाव्यांत गोपीगीतीं । कृष्ण कळवळूनियां चित्तीं । प्रकट होऊनि तयांप्रति । सांत्वनोक्ती सन्मानी ॥३७॥तेहतिसाव्यांत यदुनायक । रासक्रीडा सकौतुक । गोपी रमवी एकानेक । अलौकिक वनकेलि ॥३८॥इत्यादि कथानिरूपणीं । रसाळ तृतीयएकादशिनी । श्रीप्रभूचिये आज्ञेवरूनी । ताद्व्याख्यानीं प्रवृत्ति ॥३९॥रासक्रीडा सप्रेमरस । कल्पूं न शके धीमानस । सद्गुरुकृपावरदलेश । देह व्यास तत्कथनीं ॥४०॥तुम्हीं सज्जनीं तदनुसार । देतां पूर्ण कृपेचा नीहार । मादृश बुद्धिमंद पामर । होईल सधर व्याख्यानीं ॥४१॥संतकृपेच्या अनुमोदनें । वाड्मयप्रवाह प्रकते वदनें । ज्यामाजि निगमागमार्थसदनें । करिती कदनें कलिमला ॥४२॥हें ऐकोनि संतसदय । म्हणती अभेदीं स्तवन काय । आम्ही अधिष्ठूनि तुझें हृदय । निखिल वाड्मय प्रकाशूं ॥४३॥ऐसे सज्जनसद्गुरुवरद । लाहूनि तत्कृपेचा प्रसाद । म्हणें ऐका कथा विशद । गोपगोविंदचरित्र ॥४४॥गोपिकांचीं देऊनि चीरें । वनीं चारितां गाई गुरें । क्षुधाक्रांत झालीं पोरें । करुणोत्तरें विनविती ॥४५॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP