अध्याय १० वा - श्लोक ४१ ते ४३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


साधूनां समचित्तानां सुतरां मत्कृतात्मनाम् । दर्शनान्नो भवेद्बंधः पुंसोऽक्ष्णोः सवितुर्यथा ॥४१॥

जेव्हां सोज्वळ साधुतरणि । प्रकाश करिती स्वबोधकिरणीं । अविद्याभ्रांतितमोऽपहरणीं । सन्मार्ग धरणीं प्रकटती ॥५१॥
तैं त्रिगुणात्मक तिमिर नासे । नेत्रीं सन्मात्र प्रकाशे । ज्यांच्या दर्शनें त्यांचें कैसें । रूपविशेषें अवधारा ॥५२॥
साधु ते ज्यां स्वधर्मीं रति । समचित्ताची विश्वात्मप्रतीति । मत्कृतात्मे या सुखविश्रांति । अभेदभक्ति सप्रेमें ॥५३॥
ओतप्रोत जगदाकार । जगीं जगदात्मा अविकार । त्यातें जानोनि सारासार । झाले साचार समचित्त ॥५४॥
कल्पनामात्र मनाचें रूप । ज्यांचे मत्परचि सर्व संकल्प । निर्विकल्प जे आपेंआप । चिन्मात्ररूप ऐक्यत्वें ॥४५५॥
ऐसे अर्पिले मनोधर्म । ते म्हणिजती मत्कृतात्मे । त्यांच्या दर्शनें हरिजे भ्रमें । जैसें तमें रवि उदयीं ॥५६॥
तो हा मत्कृतात्मा समचित्त । साधु महर्षि विख्यात । त्याच्या दर्शनानुग्रहें प्राप्त । सम्रेपभरित सद्भजन ॥५७॥

तद्गच्छतं मत्परमौ नलकूबर सादनम् । संजातो मयि भावो वामीप्सितः परमोऽभवः ॥४२॥

भो नलकूबर म्हणोनि । प्राधान्यत्वें संबोधनीं । संबोधिले गुह्यक दोन्ही । हे जाणवणी सर्वत्र ॥५८॥
जेथ एकाचा नामोच्चार । तोचि जाणिजे उभयपर । निरूपणाचें अभ्यंतर । श्रोते चतुर समजती ॥५९॥
हरि म्हणे रे नलकूबरा । लाहोनि माझिया वरोत्तरा । तुम्हीं जावें पूर्वाधिकारा । निजमंदिरा धनदाच्या ॥४६०॥
आजिवरी होतेती तरुवर । पूर्वीं होतेती विषयचर । एथूनि झालेती मत्पर । लाहोनि वर मुनिकृपें ॥६१॥
मदाराधनीं प्रेमोत्कर्ष । तुम्हीं याचिला जो विशेष । तो सप्रेमभजनतोष । तुम्हां निर्दोष ओपिला ॥६२॥
जैसा याचिला तुम्हीं प्रेमा । तैसाचि प्राप्त झाला तुम्हां । ज्याची परमोत्कर्षगरिमा । नेणती सीमा शिवविधि ॥६३॥
जेव्हां पावलां सप्रेमभाव । तेव्हांचि बुडाळें भवाचें नांव । माझ्या ऐश्वर्याचा ठाव । तुम्ही स्वयमेव लाधलां ॥६४॥
सायुज्याचें शिरोभूषण । तें हें माझें सप्रेमभजन । कल्पकोटि तपःसाधन । करितां सुरगण न पवती ॥४६५॥
आम्हां देवां योग्य नोहे । परंतु ऋषीच्या अनुग्रहें । दुर्लभ लाहोनि दिव्य देहे । न वचां मोहें कवळिलां ॥६६॥
सायुज्याहूनि दुर्लभ गहन । माझें सप्रेम अभेद भजन । सद्भक्ताचे कृपेंकरून । तुम्ही संपूर्ण पावलां ॥६७॥
तुम्ही माझे भक्तराज । धनदसभेमाजीं पूज्य । गुह्यकलोकीं लावोनि वोज । तेजःपुंज मिरवाल ॥६८॥
नारद संप्रदायगुरु । उपास्य तो मी दामोदरु । अभेदभजनीं प्रेमादरु । उत्तरोत्तर गुह्यकां ॥६९॥
तुम्हांपासूनि गुह्यकांसी । भजनीं प्रवृत्ति वाढेल ऐशी । तेणें पावती मदैक्यासी । या वरासी ओपिलें ॥४७०॥

श्रीशुक उवाच - इत्युक्तौ तौ परिक्रम्य प्रणम्य च पुनः पुनः । बद्धोलूखलमांत्र्य जग्मतुर्दिशमुत्तराम् ॥४३॥

कुरुवर्यासि म्हणे शुक । वरें गौरविले गुह्यक । सादर पाहती श्रीमुख । प्रेमोत्सुक हृतकमळीं ॥७१॥
वारंवार प्रदक्षिणा । करूनि साष्टांग नमिती चरणा । श्रीकृष्णाच्या सगुणध्याना । पाहतां नयनां अनिमेष ॥७२॥
पुन्हां सगुणाचें दर्शन । दुर्लभ म्हणोनि गुंते मन । जाऊं न शकती सोडूनि चरण । परी आज्ञाशासन अनुल्लंघ्य ॥७३॥
सप्रेम बाणला भक्तियोग । तेणें न सहावे वियोग । श्वासरोधें शब्दभंग । नेत्रीं ओघ अश्रूंचा ॥७४॥
शरीरें कांपती थरथर । वरी थरकले रोमांकुर । माजीं स्वेदाचे पाझर । पुलक प्रचुर जाहले ॥४७५॥
सद्गदित दाटले कंठ । खुंटली देहस्मृतीची वाट । सबाह्य कोंदला वैकुंठ । भाव अष्ट प्रकटले ॥७६॥
प्रेमतंतु श्रीकृष्णचरणीं । स्मृतिवावडी समाधिगगनीं । सात्त्विकवातें नेली उडवूनि । ते परतोनि उतरली ॥७७॥
मग परिमार्जूनि नेत्रोदक । धैर्य धरूनियां सम्यक । पाहती श्रीकृष्णाचें मुख । जें चित्सुख साकार ॥७८॥
तेणें विटले समाधिलाभा । करणीं कोंदली श्रीकृष्णप्रभा । आनंद न सांठवे नभा । पद्मनाभा वालभें ॥७९॥
विषयकर्दमीं बुडाले भोगी । समाधिभ्रमें कथले योगी । भगवत्प्रेमा भक्तांजोगी । ते गुह्यकीं दोघीं अनुभविली ॥४८०॥
पुनः पुनः करती नमना । वारंवार प्रदक्षिणा । पाहतां श्रीकृष्णाच्या वदना । कांहीं वचना न वदवे ॥८१॥
अनंत जन्म भोगिले मागें । दैवें ऋषीच्या कृपापांगें । कृष्णकैवल्य पावले भाग्यें । पुन्हा वियोगें श्रम होती ॥८२॥
गुह्यकांचें अभ्यंतर । होऊनि कृष्णाचे अनुचर । एथेंचि रहावें निरंतर । दामोदरप्रसादें ॥८३॥
याचिसाठीं पुनः पुनः । करिती नमन प्रदक्षिणा । जे दामोदरासी यावया करुणा । अभयआज्ञा ओपावी ॥८४॥
तंव न बोलेचि वचन । तेणें दचकलें त्याचें मन । तेचि आज्ञा अभिवंदून । मग पुसोनि निघाले ॥४८५॥
उलूखलरज्जुनिबद्धउदरा । पुसोनि त्या श्रीदामोदरा । उत्तरदिशेचिये माहेरा । धनदनगरा चालिले ॥८६॥
ऊर्ध्वगति क्रमिती गगन । सूर्यासारिखे देदीप्यमान । अजस्र करिती कृष्णस्मरण । कृष्णीं तनमन गुंतलें ॥८७॥
उदया येतां अंशुमाळी । रश्मि पसरती अस्ताचळीं । परी ते संलग्न रविमंडळीं । हे वनमाळी तैसेचि ॥८८॥
कृष्णचरणीं प्रेमदोरा । गुंततां आज्ञेचा उडवितां वारा । शरीरें गेलें धनदपुरा । जेवीं अंबरा वावडिया ॥८९॥
जाऊनियां अलकावती । कृष्णीं रंगले सप्रेमभक्ती । कृष्णवेधें वेधल्या वृत्ति । पूर्णस्थिति बाणलिया ॥४९०॥
कृष्णीं विगुंतलीं मनें । कृष्णमयचि झालीं करणें । कृष्णप्रेमाचीं आचरणें । जीवें प्राणें आवडती ॥९१॥
मेळवूनि गुह्यकगण । करिती कृष्णगुणांचें कथन । महर्षिमुखें कृष्णकीर्तन । स्वयें आपण परिसती ॥९२॥
कृष्णस्मरणीं रंगल्या वाणी । कृष्णार्चनीं शोभती पाणि । कृष्णप्रेमें पादसेवनीं । गुह्यकां मनीं उत्साह ॥९३॥
कृष्णसद्भावें नमिती जगा । सर्वदा सादर दास्यप्रसंगा । कृष्णात्मकत्वें अभेदमार्गा । सौजन्य ओघा चालती ॥९४॥
अवंचकत्वें सर्वांपरी । मनें वाचा आणि शरीरीं । आत्मनिवेदनाचिये परी । चराचरीं समदर्शी ॥४९५॥
नलकूबर मणिग्रीव । कृष्णीं जडला त्यांचा भाव । त्यांच्या संगें गुह्यक सर्व । झाले वैष्णव सप्रेमें ॥९६॥
दीप प्रबोधीं दीप आन । कीं काष्ठें वेधी हरिचंदन । तैसें जेथ भगवद्भजन । वेधिती जन तत्संगें ॥९७॥
होते गुह्यक मदोन्मत्त । म्हणोनि पावले अधःपात । झाला नारद कृपावंत । भजन एकांत लाधले ॥९८॥
ऐशी ऐकांतिकी भक्ति । दुर्लभ लाभली गुह्यकांप्रति । ते तुज कथिली परीक्षिती । जे श्रवणें मुक्तिदायक ॥९९॥
ऐसें कथिलें गुह्यकाख्यान । ते उन्मळिले यमलार्जुन । त्यांची गर्जना ऐकोनि जन । विद्युत्पतन भाविती ॥५००॥
उत्पातभयें बृहद्वन । त्यजूनि वसविती वृंदावन । तेथ वत्सांचें पालन । करील श्रीकृष्ण गडियांशीं ॥१॥
गोकुळीं कैशी केली लीळा । म्हणोनि पुसिलें त्वां भूपाळा । ते हे ऐशी धरित्रीपाळा । नरशार्दूळा तुज कथिली ॥२॥
वत्सपालना करितां हरि । वत्सासुरातें संहारी । बकासुरालागीं चिरी । कथा पुढारीं ते ऐका ॥३॥
श्रीएकनाथ ऐश्वर्यसदनीं । भागवताख्य मंदाकिनी । गोविंददयार्णव - वदनीं । हरिद्वारीं प्रकटली ॥४॥
सभाग्य सुस्नात होती एथ । श्रवणपानें ते कृतार्थ । वरिती चार्‍ही पुरुषार्थ । एकनाथप्रसादें ॥५०५॥
श्रीमद्भागवत हें जाणा । अठरा सहस्र याची गणना । पारमहंसी संहिता म्हणा । दशम संज्ञा स्कंधाची ॥६॥
शुकपरीक्षितिसंवाद । गुह्यकां उद्धरी गोविंद । दयार्णवोक्त श्रीहरिवरद - । टीका दशमाध्यायाची ॥७॥
दयार्णवानुचर विनवणी । करी श्रोतयां संतां चरणीं । सप्रेमभक्ति अंतःकरणीं । भवब्धितरणीं आश्रयिजे ॥८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां यमलार्जुनोन्मूलनं नाम दशमोऽध्यायः ॥
॥ श्लोक ॥४३॥ टीकाओंव्या ॥५०८॥ एवं संख्या ॥५५१॥ ( दहा अध्याय मिळून ओवीसंख्या ५९३८ )

दहावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP