अध्याय १० वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


देहः किमनदातुर्वा निषेक्तुर्मातुरेव वा । मातुः पितुर्वा बलिनः क्रेतुरग्नेः शुनोऽपि वा ॥११॥

करितां देहाचा विचार । देह कोणाचा साचार । मी मी म्हणती मूख नर । देहप्रकार तो ऐका ॥७४॥
गर्भकोशीं जो जननीच्या । वीर्यनिक्षेप करी साचा । तरी हा देह त्यापित्याचा । ठाव कैंचा अहंते ॥१७५॥
परावियाचा कळल्यावरी । तादात्म्य मानूनि स्वैराचारी । भरोनि स्वहिता जो न विचारी । मूढ संसारीं तो प्राणी ॥७६॥
नऊ मास वाढवूनियां जठरीं । जे स्तनरसें पोषण करी । पाहतां ऐशिये विचारीं । देह निर्धारीं मातेचा ॥७७॥
जेणेंकरूनि कन्यादान । वृद्धि पावविले संतान । तरी तो मातामह कारण । देह म्हणून तयाचा ॥७८॥
जेणें देऊनि अन्नदान । केलें देहाचें पोषण । तेव्हां त्याचाचि देह जाण । अन्नेंवीण तो कैंचा ॥७९॥
अथवा बलिष्ठ धरूनि नेती । दास्यकर्मी विनियोजिती । देह पडला ज्यांचे हातीं । तो निश्चिती तयांचा ॥१८०॥
देहमूल्यें जी विक्रीत घेतां । तेव्हां त्याचाचि तो तत्त्वतां । आणिकाची न चले सत्ता । वर्ते सर्वदा तदाज्ञा ॥८१॥
अथवा पडे अग्निमुखीं । तरी हा अग्नीचा होय शेखीं । भक्षिजे श्वानशृगालादिकीं । म्हणती विवेकी त्यांचाही ॥८२॥
एवं सर्वीं परी जाणिजे । देह काळानळाचें खाजें । श्रीमदांधा प्रकट नुमजे । विशयीं रंजे सुखलोभें ॥८३॥

एवं साधारणं देहमव्यक्तप्रभावाप्ययम् । को विद्वानात्मसात्कृत्वा हन्ति जंतूनृतेऽ‍सतः ॥१२॥

अव्यक्त म्हणिजे अव्याकृत । तेथूनि देहाचा उद्भव अंत । त्या देहातें आत्मा म्हणत जंतु वधीत तल्लोभें ॥८४॥
ऐसें नश्वर साधारण । देह आत्मत्वें मानून । कोण ज्ञानी जंतुहनन । मूर्खावांचून पैं करिती ॥१८५॥
असत् म्हणिजे अनित्य देहे । तो मी म्हणोनि कवळी मोहें । ऐसा असज्जन जो आहे । आचरे तो हें दुष्कृत ॥८६॥
एवं कथिला जो हा श्रीमद । त्याचा तरणोपाय विशद । स्वयें विचारी नारद । तो विनोद अवधारा ॥८७॥

असतः श्रीमदांधस्य दारिद्र्यं परमांजनम् । आत्मौपम्येन भूतानि दरिद्रः परमीक्षते ॥१३॥

असत् म्हणिजे देहात्ममानी । उन्मत्त श्रीमदें करूनी । झांपडी पडिलीसे लोचनीं । सन्मार्ग नयनीं दिसेना ॥८८॥
तरी त्या श्रीमदाचीं तुटती मूळें । आणि सन्मार्गीं दृष्टि जेणें उजळे । स्वहितविचारीं उघडती डोळे । आत्मत्व कळे सर्वभूतीं ॥८९॥
तें एक दारिद्र्य दिव्यांजन । जेणें सोज्वळ होती नयन । तया दिव्यौषधाचे गुण । विधिनंदन स्वयें वर्णी ॥१९०॥
दिव्यांजन म्हणाल कैसें । पूर्वदैवेंचि प्राप्त असे । यत्नें धुतल्याही जें न नासे । गुणीं प्रकाशे बहुविधीं ॥९१॥
त्या गुणाचें ऐका कथन । श्रीमद मुख्य जाय झडोन । आपणासमान प्राणि दीन । दरिद्री द्रवोन अवलोकी ॥९२॥
म्हणाल दरिद्रियांच्या चित्ता । भूतमात्रीं आत्मसमता । कैसी बाणली सदयता । ते दृष्टांतामाजीं कळे ॥९३॥

यथा कंटकविद्धांगो जंतोर्नेच्छति तां व्यथाम् । जीवसाम्यं गतो निंगैर्न तथाऽविद्धकंटकः ॥१४॥

मार्गीं चालतां दरिद्री प्राणी । कांटा मोडला सवर्म चरणीं । तेणें दुःखीं म्लानता वदनीं । आली कणकणी सर्वांगा ॥९४॥
लंगडा पायीं चालतां अटक । मुख वाळूनि कडू विख । तेणें मागों न शके भीक । जाकली भूक उपवासें ॥१९५॥
ऐसा व्याकूळ जो कंटकें । लंगडितां तो इतरां देखे । आपण अनुभविल्यासारिखें । तो ओळखे परदुःख ॥९६॥
कांटा देखोनि वांटेवरी । बुद्धिपूर्वक परता करी । म्हणे प्राणी कोणी तरी । व्यथा शरीरीं हे नपवो ॥९७॥
अविद्धकंटक तैसा न म्हणे । चाले घालूनि पादत्राणें । कुंप झाडितां पोटीं न शिणे । कंटकाभेणें परदुःखें ॥९८॥
जीव आपुला परावा । समान द्ररिद्रियासि होय ठावा । कंटकदृष्टांतें आघवा । बोध जाणावा दःखाचा ॥९९॥
क्षुधेतृषेनें पीडितां प्राणी । दरिद्री द्रवे अंतःकरणीं । लज्जाशीतोष्णाची ग्लानि । वस्त्रावांचोनि ओळखे ॥२००॥
पूर्वकर्माचा परिपाक । तेणें भोगितो एथ दुःख । पुन्हा नाचरे पातक । हा विवेक ते काळीं ॥१॥
आपण दुःख नेदी कोणा । परांचें देखोनि जाकळी करुणा । द्रवोनि म्हणे नारायणा । हे यातना निवारीं ॥२॥
ऐशी भूतमात्रीं आत्मोपमा दारिद्र्यांजनें हा प्रकटे महिमा । येणेंचि पावे मोक्षधामा । तोही गरिमा अवधारा ॥३॥
चौं श्लोकीं तीं लक्षणें । नारद विवरी अंतःकरणें । भक्तीं विरक्तीं यांच्या श्रवणें । उमज धरणें स्वहिताचा ॥४॥

दरिद्रो निरहंस्तंभो मुक्तः सर्वमदैरिह । कृच्छ्रं यदृच्छयाऽऽप्नोति तद्धि तस्य परं तपः ॥१५॥

दारिद्र्यांजनें उतरे ताठा । अंगींचा अभिमान पळे मोठा । गर्व धरी जरी करंटा । तरी कोण पोटा मग घाली ॥२०५॥
दरिद्रियासि गालिप्रदानें । देतां लागे क्षमा करणें । सहनशीलता येणें गुणें । आंगीं बाणे न साधितां ॥६॥
दरिद्रियाची भिक्षाटणीं । नामस्मरणीं रंगे वाणी । न करितां प्रायश्चित्तश्रेणी । पापहानि सहजेंची ॥७॥
निज घरीं मागतां भीक । आभिजात्यादि उतरे तुक । विपत्ति भोगितां निःशंक । शीलविवेक वसेना ॥८॥
पात्रें वस्त्रें अन्नें सदनें । आचार चाले शीलाभिमानें । तें संभवे दारिद्र्यगुणें । उतरे तेणें शीलमद ॥९॥
यथाकाळीं न मिळे अन्न । कधीं पूर्ण कधीं न्यून । कोरडें ओलें शिळें कदन्न । निर्बळ म्हणून निर्मद ॥२१०॥
जरी देह झालें तरुणें । दरिद्री जर्जर अन्नाविणें । वयसा मद कैंचा तेणें । रूपें लावण्यें न शोभे ॥११॥
दरिद्रियाच्या चौदा विद्या । सर्वांसि भासती अविद्या । कोणासी बोलतां स्वसंपदा । म्हणती मंदा न ओपीं ॥१२॥
विद्या शिकोनि सभाग्य झाला । तेचि आणिकां बोधूं आला । ऐसा निंदितां मनीं खिजला । मद गळाला विद्येचा ॥१३॥
दरिद्रियासि अवघेचि आप्त । होऊनि ठाकती अनाप्त । गोत्रज मुखातें न पाहत । संगातीत सहजेंची ॥१४॥
सत्ता नाहीं दरिद्रिया । येणें ऐश्वर्यमदही गेला लया । एक्या श्रीमदेंचि हे प्राया । येती आया अष्टही ॥२१५॥
ऐसा सर्वमदातीत । अनायासेंचि दरिद्री होत । कदापि नाचरे दुष्कृत । जोडे सुकृत सहजेंचि ॥१६॥
पोटभरी न मिळे अन्न । तेंचि त्याचें चांद्रायण । कैं भोजन कैं लंघन । धारण पारण हें त्याचें ॥१७॥
वस्त्रावीण सक्लेश काया । शीतोष्णपर्जन्य । साहणें तया । हेचि त्याची तपश्चर्या । अन्य कार्या मुनि बोले ॥१८॥
नेणे अभ्यंग उद्वर्तन । सुमनें सुगंध अनुलेपन । कैंचें तांबूलादि चर्वण । व्रतधारण हें त्याचें ॥१९॥
प्राणि झालिया निर्धन । तो न करितां इंद्रियदमन । आपेंआपचि होय जाण । विषयसेवन न घडतां ॥२२०॥
थुंके निर्धना देखोनि वनिता । तेथ कैंची परावी कांता । दीनवदनें कारुण्य करितां । माता ताता जग मानी ॥२१॥
सर्वां आळवी मंजुळ शब्दीं । द्वेष कोणाशीं न धरीं कधीं । दारिद्र्यांजनें विशुद्ध बुद्धि । साधनसिद्धि पाववी ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP