अध्याय १० वा - श्लोक १ ते ३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


राजोवाच - कथ्यतां भगवन्नेतत्तयोः शापस्य कारणम् । यत्तद्विगर्हितं कर्म येन वा देवर्षेस्तमः ॥१॥

मग वैराटीतनय पुसे । स्वामी माझेनि मानसें । इच्छिजे तें सुखसंतोषें । करूणावशें निरूपा ॥३७॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो तूं प्रत्यक्ष श्रीभगवान । भूतभविष्यवर्तमान । त्रिकालज्ञ योगींद्रा ॥३८॥
नलकूबर धनदसुत । ते गुह्यक बुद्धिमंत । त्यांसि नारदशाप प्राप्त । काय निमित्त पै झाला ॥३९॥
त्याच्या शापाचें कारन । जें तिहीं केलें दुष्टाचरण । जेणें देवर्षीलागून । क्रोध गहन उपजला ॥४०॥
ते तों गुह्यक देवयोनि । सहसा अन्याय त्यांपासूनी । न घडावा परी नारदमुनि । काय म्हणोनि क्षोभविला ॥४१॥
नारद लोकत्रयीं ख्यात । ज्ञानी विरक्त आणि भक्त । भूतदयाळु क्षमावंत । वंद्य महंत हरिहरां ॥४२॥
ऐसा कळूनि नलकूबरीं । क्षोभविला तो कवणेपरी । ज्याचा महिमा सुरासुरीं । चराचरीं विख्यात ॥४३॥
काय त्यांचें गर्हित कर्म । जेणें देवर्षीस उपजलें तम । मूर्ख तेही साधुसत्तम - । क्षोभक वर्म नाचरती ॥४४॥
असो तयांची अपराधकथा । नारद वैष्णवां समस्तां । चूडामणि क्षमावंता । विपश्चितां जो पूज्य ॥४५॥
तयासी क्रोधाचा संभव । हेंही वाटतें अपूर्व । त्रिविध प्रश्नाचा अभिप्राव । विवरूनि सर्व कथावा ॥४६॥
कळूनि नारदाचें ज्ञान । काम पां केलें गर्हिताचरण । तें गर्हितही कैसें कोण । हें निरूपण करावें ॥४७॥
आणि नारदासी कैंचा कोप । जेंवि चंद्रबिंबीं न वसे ताप । तेणें कां पां दिधला शाप । केंवि संकल्प हा त्यासी ॥४८॥
हा ऐकोनि नृपाचा प्रश्न । आनंदला शुक भगवान । देवभक्ताचें पुण्याख्यान । तें व्याख्यान आदरिलें ॥४९॥

श्रीशुक उवाच - रुद्रस्यानुचरौ भूत्वा सुदृप्तौ धनदात्मजौ । कैलासोपवने रम्ये मंदाकिन्यां मदोत्कटौ ॥२॥
वारुणीं मदिरां पीत्वा मदाघूर्णितलोचनौ । स्त्रीजनैरनुगायद्भिश्चेरतुः पुष्पिते वने ॥३॥

यादवीपौत्रासि म्हणे शुक । मदमात्र असतां कोणी एक । तेथ प्रकटोनि अविवेक । महानरक भोग्वी ॥५०॥
ते मद अवघेचि साङ्ग जेथें । कायशी अनर्था वाणी तेथें । यास्तव जाणोनि नारदातें । ते अनयातें आचरले ॥५१॥
तरी तो अनय कैसा कोण । कैसें मदाचें लक्षण । तें तें ऐकें सावधान । कुरुभूषणवैदूर्या ॥५२॥
आधींच अंगीं मूर्खपण । त्यावरी केलें मद्यपान । शूककीटाचें संस्पर्शन । पिशाच गहन संचरलें ॥५३॥
तेव्हां विवेक कोण करी । तैशीच एथें झाली परी । ते तूं एकाग्र अवधारीं । कुरुधरित्रीप्राणेशा ॥५४॥
आंगा आलिया राजसत्ता । ते विसरवी पूर्वसौम्यता । लाधल्या शिवाची अनुचरता महादृप्तता गुह्यकां ॥५५॥
होऊनि रुद्राचे अनुचर । विशेष वित्तपाचे ते कुमार । तेणें गुणें चराचर । तृणतुषारसम वाटे ॥५६॥
धनमद आणि सत्तामद । उभय मदें झाले उन्मद । मंदाकिनीमाजीं विशद । क्रीडाविनोद करावया ॥५७॥
कैलासगिरीच्या उपवनीं । परमरमणीय विलासस्थानीं । जेथ गेलिया अंतःकरणीं । काम खवळोनि अवतरे ॥५८॥
पाटली पुन्नाग चंपकजाती । यूथिका मोगरे मालती । बकुल पारिजातक शेवंती । कुंद मंदार फूलले ॥५९॥
आंबे जांभळी आंवळी । केतकी खर्जूरी नारळी केळी । फणस क्रमुक लकुच कर्दळी । आणि विशाळी तिंतिणी ॥६०॥
वड पिंपळ निंब उंबर । कपित्थ बिल्व प्लक्ष अंजिर । चंदन हरिचंदन कृष्णागर । देवदार पतंग ॥६१॥
कुबेराक्षी वल्लवल्ली । इंगुदी करंज शाल्मलि । वेत्र गुल्म वेळूजाळी । सिताफळी दाळिंबी ॥६२॥
ऐशा अनेक वृक्षजाती । शिवलोकींच्या वनस्पति । पुण्यप्रभावें कैलासप्रांतीं । ज्या नेणती सुरनर ॥६३॥
द्राक्षीमंडप ठायींठायीं । वृंदावनें चैत्य पाहीं । कल्पतरूची छाया महीं । वेदी सर्वही रत्नांच्या ॥६४॥
ऐशा दिव्य पादपश्रेणी । विचित्र लागल्या रम्योपवनीं । जेथिंची शोभा शिवभवानी । देखोनि नयनीं तोषती ॥६५॥
स्वयें रिघोनि कुसुमाकर । केला वनलक्ष्मीशृंगार । कोकिलांचे पंचमस्वर । सुमनीं भ्रमर रुंजती ॥६६॥
मयूर सारिका चातक । हंस हंसिणी चक्रवाक । बगळा बलाका कपोतक । शोभती शुक बहु रंगी ॥६७॥
पक्षिविराव विचित्रध्वनि । नाना भ्रमर शोभती सुमनीं । मंद वीजितां सुगंध पवनीं । मनसिज मनीं दुणावे ॥६८॥
तये वनीं ते गुह्यक दोनी । बैसोनि पातले व्योमयानीं । रंभाप्रमुख सुरकामिनी । सवें घेऊनि सुरतार्थ ॥६९॥
स्वामित्वें ते रुद्रानुचर । सधन तरी ते धनदकुमर । त्यावरी तारुण्याचा भर । आणि संचार कामाचा ॥७०॥
विशेष केलें मद्यपान । तेही वारुणी मदिरा जाण । जिचें करितां अवघ्राण । देहभान दुर्लभ ॥७१॥
त्याहीवरी तानमानें । उर्वशीप्रमुख अप्सरागानें । पदविन्यास सुनर्तनें । लास्यें हास्यें मूर्च्छना ॥७२॥
सुपुष्पितें सुमनवनें । सौरभ्य पसरिजे तेणें पवनें । जवादीकस्तूरी सुचंदनें । अंगलेपनें मघमघिती ॥७३॥
उशीरमूळिकानिर्मितव्यजन । मंद वीजिती जल शिंपून । मंद झुळुका सुगंध पवन । वेधी तनु मन संस्पर्शें ॥७४॥
क्षणक्षणा करिती पानें । तदुन्मादासरिसीं गानें । नववधूंचीं आलिंगनें । मुखचुंबनें सविलास ॥७५॥
बिल्वामलककपित्थलकुच । नवीन कठिण लावण्य कुच । करिती तनूचा संकोच । मर्दनकाळीं नववनिता ॥७६॥
मुखें मिळवूनियां मुखा । बाहीं कवळूनि वधूसन्मुखा । नग्न वळंघोनि आंदोलिका । स्वेच्छा झोंका झोंकिती ॥७७॥
तेणें छंदें गाती गाणें । स्वरसंगीत तानमानें । आलिंगनें कुचमर्दनें । देती चुंबनें रतिरंगीं ॥७८॥
पुनःपानें पुन्हा गानें । पुनः पुनः आलिंगनें । कुचमर्दनें सचुंबनें । करिती चर्वणें तदुचित ॥७९॥
चैत्रवेदिका चित्रविचित्र । विश्वकर्म्यानें क्रियासूत्र । पाहतां घूर्णित जडती नेत्र । होती पात्र तच्छोभे ॥८०॥
कांहीं नसेच शासनभय । विशृंखल झाले स्वयें । वनिताकामीं भृंगन्यायें । वदनपद्मीं गुंतले ॥८१॥
ठायीं ठायीं ठाकती उभे । कांतांसहित कांतारशोभे । पाहती आणि मन्मथ शोभे । देती वालभें चुंबनें ॥८२॥
ऐशी क्रीडा पुष्पितवनीं । करितां देखिली मंदाकिनी । सवेग प्रवेशले जीवनीं । सुरकामिनींसमवेत ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP