मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८ वा| श्लोक ३६ ते ३९ अध्याय ८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३९ श्लोक ४० ते ५२ अध्याय ८ वा - श्लोक ३६ ते ३९ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ३९ Translation - भाषांतर यद्येवं तर्हि व्यादेहीत्युक्तः स भगवान् हरिः । व्यादत्ताव्याहतैश्वर्यः क्रीडामनुजबालकः ॥३६॥प्रत्यक्ष पाहें म्हणसी वदनीं । तरी मग दावीं मुख पसरोनी । ऐसें ऐकोनि चक्रपाणि । दावी पसरूनि वदनातें ॥११॥पूर्णप्रतापें विजयवंत । विश्वश्रियेशीं श्रीमंत । चित्प्रकाशें सदोदित । सर्वस्व देत औदार्यं ॥१२॥ज्याचेनि ज्ञानें इंद्रियवृत्ति । स्वस्वविषयीं सज्ञान होती । ऐशी जयाची ज्ञानशक्ति । आब्रह्मभूतीं भौतिकीं ॥१३॥अनंतब्रह्मांडविभववंत । ते मायेसी जो अनासक्त । निःसंग निस्पृह विरक्त । जो अनंत अपार ॥१४॥ज्याच्या ऐश्वर्याची थोरी । सत्ता जागे चराचरीं । तो हा प्रत्यक्ष श्रीहरि । बाळकापरी क्रीडतो ॥४१५॥घेऊनि मानवी बाळनट । करी मनुष्यनोकींचें नाट्य । तरी विरिंचिश्रीकंठ । नेणती प्रकट ऐश्वर्य ॥१६॥अव्याहत ऐश्वर्यसिंधु । भक्तवत्सल दीनबंधु । क्रीडामिसें आनंदकंदु । लीलाविनोद प्रकटवी ॥१७॥सा तत्र ददृशे विश्वं जगत्स्थास्नु च खं दिशः । साद्रिद्वीपाब्धिभूगोलं सवाय्वग्नींदुतारकम् ॥३७॥मुख पसरोनि दावितां हरि । यशोदा पाहे जंव अंतरीं । ब्रह्मांड देखे वदनकुहरीं । तें अवधारीं नृपनाथा ॥१८॥तंव ते यशोदा तये वदनीं । देखती झाली विश्व नयनीं । स्थावर जंगम गगन धरणी । दिशाकंकणी अंतरिक्ष ॥१९॥देखे अवघेचि सागर । माजी द्वीपें सविस्तर । सहित अटव्य गिरिवर । लहान थोर अवघेचि ॥४२०॥वृक्ष वल्ली गुल्मलता । श्वापदजाति ही समस्ता । जलां जलचरां भौतिकां भूतां । सहित पर्वता देखिलें ॥२१॥समुद्र द्वीपें सपर्वत । भूगोल देखोनि वदनाआंत । झाली यशोदा विस्मित । देखे वदनांत भूर्लोक ॥२२॥आणि वायूचा प्रवाह । मेघज्योति हव्यवाह । तारापतीशीं तारकासमूह । ज्योतिश्चक्र स्वर्लोक ॥२३॥ ज्योतिश्चक्रं जलं तेजो नभस्वान्वियदेव च । वैकारिकाणींद्रियाणि मनो मात्रागुणास्त्रयः ॥३८॥भूगोल म्हणोनि कथिली धरा । आप तेज आणि वारा । व्योमादि महाभूतपसारा । देखे सुंदरा सुतवदनीं ॥२४॥वैकारिक तो देवतागण । विष्णु चंद्रमा चतुरानन । श्रीनारायण गौरीरमण । नभस्वान् बहुविध ॥४२५॥मरुत्समूह प्राणस्थानीं । दिशा पवन आणि तरणि । वरुण अश्विनीकुमार दोन्ही । देखे वदनीं कुमाराचे ॥२६॥पावक आणि निर्जरपति । उपेंद्रसहित प्रजापति । कोणपही त्यांचे पंक्ती । देखे सुमति यशोदा ॥२७॥वैकारिकांमाजीं मन । ग्राह्य असतां कथिलें भिन्न । तरी हें दुरुक्तीचें कारण । सावधान परियेसा ॥२८॥तीन्ही अवस्था प्रकाशी मन । प्रकट दोन्ही एकीं लपोन । यालागीं केलें विलक्षण । द्विरुक्तिकथन या हेतू ॥२९॥इत्यादि स्पष्ट सत्त्वगुण । रजें तैजस इंद्रियगुण । तमें तामस विषय जाण । मात्रा अभिधान तयासी ॥४३०॥मना आणि वैकारिकां । इंद्रियां आणि तन्मातृकां । गुणत्रयासि देखोनि शंका । पावे गोपिका हृतकमळीं ॥३१॥म्हणे हें केवढें विचित्र । बाळकाचें कोमळ वक्त्र । त्यामाजीं अवघें चराचर । सविस्तर मी देखें ॥३२॥एतद्विचित्रं सह जीवकालस्वहावकर्माशयलिंगभेदम् ।सूनोस्तनौ वीक्ष्य विदारितास्ये व्रजं सहात्मानमवाप शंकाम् ॥३९॥एकेचि समयीं अवघें विश्व । मुखीं देखोनि सावयव । तेणें निर्बुजोनियां जीव । अष्टभाव उपजले ॥३३॥तेंचि सावयव विश्व कैसें । लिंगशरीर भेदवशें । चराचरात्मक आभासे । जैसें तैसें अवधारा ॥३४॥जीव काल आणि स्वभाव । कर्म आणि आशय सर्व । लिंगभेदेशीं सावयव । देखे स्वयमेव यशोदा ॥४३५॥जीव म्हणिजे गुणक्षोभक । कैसा तयाचा विवेक । हें पुसाल तरी नावेक । श्रवणोन्मुख मन करा ॥३६॥त्रिगुण पाहतां मायाजनित । माया मिथ्या जड अचेत । तिसी चेतवी जो अनंत । अनुस्यूत चिन्मात्र ॥३७॥अविद्याबिंबित जें चैतन्य । जीव ऐसें त्या अभिधान । तेणें प्रकाशितां गुण । काळ क्षोभोन प्रकटवी ॥३८॥कनकबीजीं असे भ्रांति । परी ते जडत्वें नये व्यक्ती । सचेतन मानव जें भक्षिती । तैं प्रकटवी विकार ॥३९॥नातरी पत्रीं लिहिले मंत्र । परी तें अचेतन पुस्तकमात्र । सचेतन पुरुषें प्रेरितां अस्त्र । दावी विचित्र सामर्थ्य ॥४४०॥तेंवि जीवचैतन्य प्रकाशी गुणा । ते काळें क्षोभोनि दाविती । खुणा । प्रकाश प्रवृत्ति मोह जाणा । व्यक्ति त्रिगुणा पैं ऐशीं ॥४१॥गुणक्षोभक जीव तो ऐसा । परिणामहेतु काळ तो कैसा । तोहीं सांगों उमजे तैसा । सावध परिसा क्षण एक ॥४२॥भूमिगर्भीं धान्य पडे । कालमात्रेंचि तें विरूढे । काळें परिणाम त्याचा घडे । पुढें निवडे धान्यत्वें ॥४३॥व्यवायें ऐक्य शुक्रशोणिता । काळ परिणमे गर्भ पुरता । साङ्ग बालक प्रसवे माता । हा परिणामकर्ता काळची ॥४४॥मातृजठरीं शरीर जन्मे । यथाकाळें तें परिणमे । बाल तरुण वृद्ध निमे । यें परिणामकर्में काळाचीं ॥४४५॥तेथ पिता अथवा माता । अथवा बहुतां बुद्धिमंतां । द्रव्य वेंचूनि यत्न करितां । अकाळीं वृद्धता नाणवे ॥४६॥मातृयोनीपासून जनन । नग्न पुत्रेंशीं करी शयन । बळेंचि मुखीं घाली स्तन । स्नानभोजन एकत्र ॥४७॥काळें पुत्रासी प्रौढता । देऊनि लाजविली माता । ऐशी काळाची परिणामकथा । जाणिजे श्रोतां तो काळ ॥४८॥आतां स्वभाव म्हणिजे कोण । जो या जन्माचें कारण । देहात्मभावें आविष्करण । अहंस्फुरण स्वीकरी ॥४९॥अहं देह ऐसें जाण । तें जाणणेंचि व्यापिलें गुणें । गुणानुसार क्रियाचरणें । जन्ममरण तन्मूल ॥४५०॥नास्तिक्यशून्यता तो अभाव । वास्तव आस्तिक्य तो सद्भाव । देहात्मकत्व तो स्वभाव । योनिसंभव अध्यात्म ॥५१॥आत्मत्वें अधिकारूनि वर्ते । म्हणोनि अध्यात्मा बोलिजे त्यातें । स्वभावोऽध्यात्म हें रमाकांतें । भगवद्गीते बोलिलें ॥५२॥जितुके देह देह तितुके स्वभाव । अविद्यागुणकर्मधर्मसंभव । जन्महेतु सप्रभव । यथासावेव निरूपिला ॥५३॥कर्म म्हणिजे संस्कारजनित । त्या संस्काराचा जो वृत्तांत । तो परिसावा दत्तचित्त । सदृष्टांत विवरितां ॥५४॥हिंग वेचलिया वास । शत्रु जिंकिलिया यश । भोजन सरलिया संतोष । उरे दोष जारत्वें ॥४५५॥तेंवि पूर्वकर्म भोगें सरे । तज्जनित जो संस्कार उरे । तदनुसार जन्मांतरें । क्रियाविस्तारें तें कर्म ॥५६॥संस्काराचे वसते ठाय । तयासीच बोलिजे आशय । अंतःकरणचतुष्टय । गुणत्रयप्रभेदीं ॥५७॥मनादि तुल्य सर्व शरीरीं । परी संस्काराची अनेक परी । यालागीं भेद लिंगशरीरीं । पृथगाकारीं अनेक ॥५८॥लिंग म्हणिजे खुणेचें चिन्ह । तें देहमात्रीं भिन्नभिन्न । ऐसें लिंगभेदलक्षण । विचक्षण जाणती ॥५९॥गोगजउष्ट्रवानरनर । व्याघ्रसर्पश्वानसूकर । अनेक योनि सविस्तर । भेदप्रकार परियेसा ॥४६०॥सर्वां एक रसनेंद्रि । परंतु धेनु तृणातें खाय । वटपिंपळें हस्ती धाय । उष्ट्रा प्रिय कंटकी ॥६१॥सदा मस्त वज्रार्क । इत्यादि क्रूरफळविशेष । वानर भक्षूनि पावे सुख । येरां विष तें होय ॥६२॥लिंगशरीर सर्वत्र एक । परी लिंगभेद ऐसे अनेक । सर्वेंद्रियांचा विवेक । पृथक् पृथक् ऐसाची ॥६३॥जीव काळ स्वभावेंशीं । कर्म आशय लिंगभेदेंशीं । बाळशरीरीं मुखावकाशीं । आश्चर्यासि या देखे ॥६४॥बाळकाचें शरीर अल्प । विकसितवदनीं अवकाश स्वल्प । तेथ देखोनि ब्रह्मांडकल्प । धरी विकल्प साशंक ॥४६५॥ब्रह्मांड सगळें देखे वदनीं । सहित व्रज गोपगौळणी । आपणा देखे नंदपत्री । उभी धरूनि हरि करीं ॥६६॥तदात्मदृष्टि करूनि तेथें । पाहे यशोदा जंव निरुतें । तंव तेथहि कृष्णामुखा आतौतें । ब्रह्मांडांतें दाखवी ॥६७॥त्याही माजीं चराचर । आणि आपणेंशीं ब्रह्मपुर । करीं धरिला तैसाचि कुमार । देखे सुंदर तद्वदनीं ॥६८॥पुन्हा तादात्म्य तेही ठायीं । करूनि पाहातां वदनडोहीं । ब्रह्मांड सपुत्र आपणाही । देखोनि देहीं सकंप ॥६९॥तदंतरीं तदंतरीं । ऐशीं देखोनि सहस्रवरी । झाली अत्यंत घाबिरी । शंका अंतरीं उपजली ॥४७०॥ऐसें ऐकोनि निरूपण । दूषिती अनवस्था म्हणून । शास्त्रयुक्तीचे अल्पज्ञ । ते सर्वज्ञ नादरिती ॥७१॥तरी अघटितघटनापटीं माया । ऐशीच दाविली मार्कंडेया । पुरजनादि परिसोनियां । कोणी संशया न धरिजे ॥७२॥तथापि प्रचित पाहणें जरी । तरी दोन्ही दर्पणें परस्परीं । धरूनि पाहतां त्यामाझारीं । गणना चतुरीं करावी ॥७३॥असो थरथरां कांपे शरीर । नेत्रीं जळाचे पाझर कंठ दाटूनि रोमांकुर । अतिसत्वर थरकले ॥७४॥आंगीं डवडवी स्वेदोदक । तेणें टवटवीत दिसती पुलक । झालें शब्दासी अटक । श्वास क्षणैक वितुळला ॥४७५॥मावळली देहस्मृति । लाधली स्वसुखाची विश्रांति । जे कां दुर्लभ योगस्थिति । ते संप्राप्त अनायासें ॥७६॥लवण वितुळे जळसन्निधि । तैसी विराली देहबुद्धि । नाठवे मीतूंपणाची शुद्धि । सुखसमाधि लागली ॥७७॥परी ते यशोदा साबडी । नेणे स्वात्मप्रत्यय गोडी । म्हणोनि वळली मुरकुंडी । मूर्च्छा गाढी मानिली ॥७८॥ब्रह्मसुखाची अनुभूति । सद्गुरुवरें संपादिती । अपूर्व सच्छिष्यासि प्राप्ति । त्यासी म्हणती शक्तिपात ॥७९॥देहात्मजीवात्मभाव विरे । विपरीत बोधाचें आयुष्य पुरे । अपरोक्षचिन्मात्र केवळ उरें । तो जाणिजे चतुरें शक्तिपात ॥४८०॥अविद्याशक्तीचा निपात । पहिली स्वात्मस्थिति संप्राप्त । अपूर्व म्हणोनि साशंकित । शक्तिपात या नांव ॥८१॥यशोदेसी ते अवस्था । झाली विश्वरूप पाहतां । पुन्हा देहस्मृति लाहतां । पडिला चित्ता चाकाट ॥८२॥मग विस्मयें भोंवतें पाहे । म्हणें मजला झालें काय । जागृतीं किंवा स्वप्नीं आहें । ऐसें मोहें न लक्षे ॥८३॥ N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP