अध्याय ८ वा - श्लोक ३२ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एकदा क्रीडमानास्ते रामाद्या गोपदारकाः । कृष्णो मृदं भक्षितवानिति मात्रे न्यवेदयन् ॥३२॥

माता कोपोनि धर्षण करी । तेथील ऐश्वर्याची थोरी । नृपा निरोपी आश्चर्य भारी । शुकवैखरी ते ऐका ॥८६॥
कोणे एके अपूर्वकाळीं । बलरामादिगोपाळबाळीं । मृत्तिका भक्षितो वनमाळी । मातेजवळीं हें कथिलें ॥८७॥
अवघे खेळूं एकवट । मृत्तिका भक्षी हा कंबुकंठ । आम्हां वारितां नायके धीट । यालागीं बोभाट तुज कथिला ॥८८॥
ऐसें उत्तर पडतां कानीं । परम स्नेहाळ अंतःकरणीं । बाळकाचे संरक्षणीं । मिथ्या कोपोनि ऊठिली ॥८९॥

सा गृहीत्वा करे कृष्णमुपालभ्य हितैषिणि यशोदा भगसंभ्रांतप्रेक्षणाक्षमभाषत ॥३३॥

मग ते कृष्णातें धरूनि करीं । ताडणा दुसरा कर उगारी । यशोदाताडणभयें हरि । सभय करी निज डोळे ॥३९०॥
मृद्भक्षणें रोगोत्पत्ति । झणें होईल बाळकाप्रति । यालागीं कळवळोनि चित्तीं । धर्षीं हितार्थीं यशोदा ॥९१॥
सभय हालती नेत्रपातीं । ग्लानि दाऊनि नेत्र भ्रमती । वामहस्त प्रतिकारार्थीं । आड श्रीपति वोडवी ॥९२॥
सात्वतनिर्जरपरित्राणा । जो हस्त वोडवी वैकुंठराणा । तो यशोदाभयत्रासहरणा । निजरक्षणा वोडवी ॥९३॥
सभय पाहे यशोदेकडे । कांहीं स्फुंदे कांहीं रडे । तनु संकोचें कांहीं दडे । मुखापुढें कर धरी ॥९४॥
देखोनि भयभीत कुमार । पोटीं मृदु वरी निष्ठुर । यशोदा बोलिली उत्तर । जैसें हितकर भेषज ॥३९५॥
कीं निगमोत्तमांगप्रबोध । करी विषयप्रवृत्तिबोध । कीं काम्यकर्मांचा निषेध । करी प्रसिद्ध सद्गुरु ॥९६॥
मृषा सकोप प्रश्नोक्ति । धर्षण करी कुमराप्रति । निर्भर्त्सूनि यशोदा सती । बोले हितीं तें ऐका ॥९७॥

यशोदा उवाच - कस्मान्मृदमदांतात्मन्भवान्भक्षितवान् रहः ।
वदन्ति तावका ह्येते कुमारास्तेऽग्रजोऽप्ययम् ॥३४॥

दमन नाहीं इंद्रियग्रामा । ज्याचिया तो अदांतात्मा । पात्र करूनि ऐसिया नामा । तो परमात्मा संबोधी ॥९८॥
यशोदा म्हणे रे अनावरा । किमर्थ मृत्तिका भक्षिसी कुमारा । कांहीं न्यून झालें उदरा । कीं होणारा सूचिसी ॥९९॥
कीं पूर्वजन्मीं होतासि कमठ । म्हणोनि मृत्तिका लागे मिष्ट । कां हें आठवलें अरिष्ट । ताडणें कष्ट पावसी ॥४००॥
कोणा नकळत एकांतीं । कां रे कृष्णा खादली माती । तुझे संवगडे वर्जिती । त्यांची उक्ति न मानिसी ॥१॥
जरे तूं म्हणसी भक्षिली नाहीं । संवगडे तुझेचि सांगती पाहीं । तुझ अग्रज स्नेहाळ तोही । देतो ग्वाही प्रत्यक्ष ॥२॥
ऐकोनि जननीचें भाषण । काय बोले करुणापूर्ण । आश्वासावया तिचें मन । करी विंदान तें ऐका ॥३॥

नाहं भक्षितवानंब सर्वे मिथ्याऽभिशंसिनः । यसि सत्यगिरस्तर्हि समक्षं पश्य मे मुखम् ॥३५॥

कृष्ण म्हणे वो जननीये । नाहीं मृत्तिका भक्षिली माये । यशोदा म्हणे लटिकें काय । सांगती जिये लेंकुरें ॥४॥
कृष्ण म्हणे लटिकाचि आळ । मजवरी घालिती हे गोपाळ । तैसाचि मिथ्या बोले बळ । मी केवळ सत्यवादी ॥४०५॥
अवघें ब्रह्मांड माझिये उदरीं । माती नुरेचि मज बाहेरि । ऐसिया अभिप्रायें श्रीहरी । सत्य वैखरी प्रतिपादी ॥६॥
ज्याचें ऐश्वर्य अव्याहत । तो प्रतिपादी आपुलें सत्य । असंभावनापरिहारार्थ । निज सामर्थ्य प्रकटवी ॥७॥
मातेसि म्हणे हीं लेंकुरें । बोलती तें जरी मानिसी खरें । तरी माझे मुखीं पाहे बरें । चित्तैकाग्रें सादर ॥८॥
प्रत्यक्ष वदनीं पाहें दृष्टीं । मग तूं मजला ताडीं यष्टीं । मिथ्या अवघींच कारटीं । यांचे गोष्टीं न लागें ॥९॥
ऐसें ऐकोनि बोलणें । यशोदा श्रीकृष्णातें म्हणे । माती खाऊनि नाहीं म्हणणें । धीटपणें कोठवरी ॥४१०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP