मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८ वा| श्लोक ३१ अध्याय ८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३९ श्लोक ४० ते ५२ अध्याय ८ वा - श्लोक ३१ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ Translation - भाषांतर एवं धार्ष्ट्यान्युशति कुरुते मेहनादीनि वास्तौ स्तेयोपायैर्विरचितकृतिः सुप्रतीतो यथाऽऽस्ते ।इत्थं स्त्रीभिस्सभयनयनश्रीमुखालोकिनीभिर्व्याख्यातार्था प्रहसितमुखी नह्युपालब्धुमैच्छत् ॥३१॥चोर म्हणूनि धरितां धीट । फिरोनि उभा ठाके नीट । म्हणे लटकीच कटकट । कां गे बोभाट करितसां ॥४३॥चोर ऐसें म्हणो जातां । म्हणे मी गृहस्वामी तत्त्वतां । तुम्ही चोरटीं विचारें पाहतां । फिरोनि म्हणतां मज चोर ॥४४॥प्रत्यक्ष्य घरींचा मी घरधणी । चोरट्या मिळाल्या गौळणी । पुसतां नाहीं यांसी कोणी । झालां म्हणोनि चावटा ॥३४५॥घरधणी म्हणविसी आपणा । तरी तूं सांग घरींच्या खुणा । ऐसें म्हणतां करी वल्गना । त्या तुझियां मना येऊं दे ॥४६॥म्हणे मीं आधारी केली मही । रस ठेविला जळाच्या ठायीं । गृहाभोंवत्या दिशा दाही । नभ सबाह्य म्यां भरिलें ॥४७॥गृहा सबाह्य खेळे वारें । रहाटीं ठेविलीं नवही द्वारें । दहावें गुप्त केलें धारें । तेणें अंधारें कोंदलें ॥४८॥ गृहीं बुद्धि लावूनि दीप । तेजीं प्रकट केलें रूप । खुणा माझिया अमूप । लटिका जल्प तूमचा ॥४९॥चुलीमाजी आहे वन्हि । माथणीमाजी आहे पाणी । ऐशा खुणा सांगेल कोणी । जाणें धणी मी एक ॥३५०॥पाणि ठेविलें पृथ्वीपोटीं । अग्नि सांठविला म्यां काष्ठीं । खणोनि मथोनि पहा दृष्टी । माना गोष्टी मग साच ॥५१॥नेत्रामाजील देखणेपण । काळें काजळ माझी खूण । मी सर्वस्वीं अधिष्ठान । रूपलावण्यगुणांचें ॥५२॥कांहीं खुणा वदलों अल्प । मी एकचि सत्यसंकल्प । लटिका गोपिकांचा जल्प । नाना विकल्प कल्पना ॥५३॥अवो सुंदरि यशोदे सति । ऐशी कुमाराची वदंती । आणिक आश्चर्यें सांगों किती । लिहितां क्षिति पुरेना ॥५४॥रंगवल्ली संमार्जनें । अभ्यर्चित निर्मळ सदनें । तेथ मलोत्सर्ग करणें । हें तुज माने यशोदे ॥३५५॥आमुचिये स्वर्चित सदनीं । रागें हागे चक्रपाणि । ऐशी याची विचित्र करणी । किती म्हणोनि सांगावी ॥५६॥ऐसे अनेक स्तेयोपाय । करूनि गोरस चोरूनि खाय । तुज समीप यशोदे माय । साधुप्राय दीसतो ॥५७॥सभय हालती नेत्रपातीं । ऐसें श्रीमुख गोपी पाहती । तिहीं वाखाणिल्या रचना युक्ति । ते क्रिया कथिती कृष्णाची ॥५८॥ऐशीं ऐकोनि गार्हाणीं । क्षोभ नुपजे यशोदे मनीं । हास्य करूनि पाहे नयनीं । अंतःकरणीं सुखावे ॥५९॥हर्षयुक्त अंतःकरण । न करी कुमरासी घर्षण । करोनि गोपींचें समाधान । दिधलें चुंबन कृष्णातें ॥३६०॥जारकर्मांचीं गार्हाणीं । कित्येक वर्णिती गोरसहरणीं । परी हे नाहीं व्यासवाणी । कोणे पुराणीं बोलिली ॥६१॥शुक नारद पराशर । वैखानसादि पंचरात्र । विष्णुरहस्य सनत्कुमार । हा प्रकार न वदले ॥६२॥अथवा गोपाळतापिनी । उपनिष द्भागीं अथर्वणीं । नाहीं दीपिकाव्याख्यानीं । केली कथनीं भाष्यकारीं ॥६३॥कात्यायनीव्रता पूर्वीं । जारलांछन कोणी न लावी । देशभाषा वदले कवि । भक्तिभावीं गौरवतो ॥६४॥कात्यायनीव्रताचरणीं । तोषविला जो चक्रपाणि । रासक्रीडा तद्वरदानीं । उत्तीर्ण ऋणी जाहला ॥३६५॥सुतपापृश्नितपोभारें । त्रिजन्म घेतले विर्विकारें । विरहें ध्यानें चमत्कारें । करी उद्धार गोपींचा ॥६६॥सैरंध्री जे कंसदासी । गंधलेपनें ऋषीकेशी । तोषोनि मागे अंगसंगासी । झाला तयेसी वरदानी ॥६७॥तियेचे प्रेमभक्तीस्तव । अंगसंगाचा गौरव । देऊनि अलिप्त वासुदेव । भक्तिलाघव संपादी ॥६८॥मागें पुढें निर्विकार । म्हणाल गोपींशीं सविकार । तरी ते त्याचे प्रेमविकार । ते अनुकार दाविले ॥६९॥जळीं जंतु कीं पाहती मुखें । तितुकीं सालंकृतें त्या सन्मुखें । जल नवटे एकही वेखें । कर्में अशेखें हीं तैशीं ॥३७०॥करितां धर्मसंस्थापन । अविधिमार्गाचें लांछन । लागों नेदी आचरोन । श्रीभगवान् सर्वथा ॥७१॥याचि लागीं वैश्यसदनीं । व्रतापूर्वीं शुद्धपणीं । जारचौर्यादि अश्लाघ्यकरणी । दावी करूनि कलिरूप ॥७२॥म्हणाल जन्मला क्षात्रवर्णीं । लपोनि राहिल वैश्यसदनीं । तरी तो अजन्मा वसुदेवभुवनीं । नाहीं योनि स्पर्शला ॥७३॥रासक्रीडे पुढें आधीं । जारक्रीडा न शिवे कधीं । संस्कारिलिया जो व्रतबंधीं । दावी विधि अनुल्लंघ्य ॥७४॥कुमारपणीं कुब्जेसि वर । देऊनि वधिला कंसासुर । तो मग व्रतबंधनानंतर । केला साचार पूर्वोक्त ॥३७५॥पूर्वींल फेडिलें वरऋण । तें न म्हणावें विधिलंघन । भक्तिप्रेमें श्रीजनार्दन । भक्ताधीन सर्वस्वें ॥७६॥जारचौर्यादि अनुकरन । धर्मासि अनृत प्रमोदन । म्लेच्छयुद्धीं पलायन । हें विधिलंघन म्हणावें ॥७७॥पुढील कळीचे अनुकार । स्वयें दावी जगदीश्वर । या आचरणीं कुळसंहार । फळप्रकार सूचिला ॥७८॥यालागीं विषमक्रियाचरणीं । कलिविडंब संपादणी । घेऊनि कृष्णत्वअवगणी । चक्रपाणि संपादी ॥७९॥पूतनाशोषणादि अत्यद्भुत । अमानुषकर्में समस्त । दावी पूर्णत्व संकेत । बाळक्रीडेंत श्रीपति ॥३८०॥ते हे अपार कृष्णलीला । लिहितां न समाये भूगोळा । परंतु धर्माचा कळवळा । स्वधर्मशीळा संरक्षी ॥८१॥संहारूनि अधर्मकर । करणें धर्माचा जीर्णोद्धार । त्याचि साठीं घे अवतार । निर्विकार युगींयुगीं ॥८२॥ऐशी गार्हाणियांची कथा । शुकें निवेदिली भारता । त्यामाजी एकी अपूर्वता । जगतीनाथा निवेदी ॥८३॥उदंड कुमाराचे अन्याय । देखतां ऐकतां कोपे माय । ते यशोदा सकोप होय । कोणी समय ऐसाही ॥८४॥तंव परीक्षिती म्हणे मुनि । जेणें कोपली सदय जननी । ऐशी काय केली करणी । माझें कर्णीं ते घालीं ॥३८५॥ N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP