अध्याय ८ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


त्वं हि ब्रह्मविदां श्रेष्ठः संस्कारान् कर्तुमर्हसि । बालयोरनयोर्नॄणां जन्मना ब्राह्मणो गुरुः ॥६॥

वेदविहित जें धर्माचरण । षोडश कर्में मीमांसज्ञ । समाधीपर्यंत ब्रह्मज्ञान । तूं श्रेष्ठ तपोधन ब्रह्मवेत्ता ॥९२॥
ज्योतिःशास्त्राचा तूं ब्रह्मा । भाग्यें जोडलासि कल्पद्रुमा । उभयकुमारांच्या संस्कारकर्मा । द्विजसत्तमा संपादीं ॥९३॥
उभयकुमारांचें नामकरण । करावयासि समर्थ पूर्ण । आहेसि म्हणोनि हें कारण । अंतःकरण सूचवी ॥९४॥
जरी तूं म्हणसी गुरूचें कृत्य । यदर्थीं ऐकें गा निवांत । मनुष्यमात्रांचा श्रीगुरु सत्य । श्रुतिसंमत ब्राह्मण ॥९५॥
ऐकोनि व्रजपतीची वाणी । गर्ग तोषला अंतःकरणीं । आतां तत्कार्य आचरणीं । रहस्यकरणी बोधितों ॥९६॥

गर्ग उवाच - यदूनामहमाचार्यः ख्यातश्च भुवि सर्वदा । सुतं मया संस्कृतं ते मन्यते देवकीसुतम् ॥७॥

पाया शोधूनि घालिजे भिंती । साक्षमुद्रापत्रें वृत्ति । श्रुतिप्रणीतकर्मप्रवृत्ति । शोधूनि करी सर्वज्ञ ॥९७॥
प्रवर शोधूनि कीजे लग्न । कीं भूमि शोधूनि कीजे यज्ञ । तेंवि नंदाचें अंतःकरण । शोधी दाऊनि बिभीषा ॥९८॥
न शोधितां अंतःकरण । उपदेशिलें ब्रह्मज्ञान । तें अवघेंचि वृथा जाण । जेंवि गुळें पाषाण माखिला ॥९९॥
ब्रह्मज्ञान तो दुर्लभ सत्य । परी सामान्यही जे जे वस्त । शुद्धतेवीण होय व्यर्थ । सर्व कार्यार्थ सर्वदा ॥१००॥
पात्र न शोधितां पय । सांठविलें तें नासोनि जाय । क्षेत्रशुद्धीवीण काय । बीज होय सफळित ॥१॥
एथ नंदाचें अंतःकरण । दृढाविजे हेंचि शोधन । यदर्थीं गर्ग विचक्षण । बोले वचन तें ऐका ॥२॥
गर्ग म्हणे व्रजनायका । संस्कार करविसी निजबाळकां । एथें असे एक आशंका । ते करीं विवेका माजिवडी ॥३॥
मी यदुकुळींचा पुरोहित । संस्कारितां तुझा सुत । कंसें ऐकिल्या हा वृत्तांत । महा अनर्थ होईल ॥४॥
कोण सांगेल कंसापाशीं । ऐसें प्रत्युत्तर जरी देसी । तरी मी विख्यात त्रिजगासी । गोष्टी ऐसी लोपेना ॥१०५॥
संस्कारकर्मोत्सवाच्या ठायीं । याचकवर्ग मिळेल पाहीं । सूत मागध ठायीं ठायीं । गोष्टी कांहीं फांकविती ॥६॥
वाद्यगीतनृत्यकारें । गोष्टी फांके येणें द्वारें । भूरि संभावना आदरें । येती सत्पात्रें तव गृहा ॥७॥
त्यांसि विदित माझें ज्ञान । सर्वत्र करिती ते प्रशंसन । गर्गें संस्कृत नंदन । म्हणती धन्य व्रजपति ॥८॥
ऐशिया द्वारें फांकेल गोष्टी । झणीं ऐकेल दुष्ट कपटी । तेव्हां वितर्क करील पोटीं । क्रूर रहाटी तयाची ॥९॥
म्हणसी कंसासी कळोनि काय । त्याचा ऐसा अभिप्राय । मी यादवांचा आचार्य । मोथें भय इतुकेंचि ॥११०॥
म्यां संस्कारिल्या बाळक । मानील वसुदेवाचें तोक । एथ तूं जरी करिसी तर्क । रोहिणी अर्भक म्हणूनि ॥११॥
रोहिण्यादि अनेक प्रमदा । वसुदेवासि म्हणसी नंदा । एक देवकीतनय कैंचा कदा । तरी ऐक भेदा येथींच्या ॥१२॥

कंसः पापमतिः सख्यं तव चानकदुंदुभेः । देवक्या अष्टमो गर्भो न स्त्री भवितुमर्हति ॥८॥

पापमति हा कंसासुर । केवळ विकल्पांचा सागर । म्हणे देवकीचा अष्टम कुमार । स्त्री होणार न कदा तो ॥१३॥
याचि कार्यासी अनेक चार । प्रेरूनि सूक्ष्म समाचार । करी गवेषणा विचार । चिंतातुर सर्वदा ॥१४॥
तुजशीं वसुदेवाशीं सख्य । तो हें रहस्य जाणे मुख्य । हे गोष्टी कथितांचि वार्तिक । करील तर्क दुष्टात्मा ॥१५॥
कंस निर्मथना प्रेरी चार । ऐक तयाचा विचार । देवकीकुमारीचा संहार । करूं असुर प्रवर्तला ॥१६॥
तंव गगना गेली ते खेचरी । कंस खोंचला अंतरीं । त्यातें म्हणे तुझा वैरी । स्थळांतरीं वाढतसे ॥१७॥
तिचें वचन मानूनि सत्य । चार हरे लावूनि गुप्त । शोध करी अतंद्रित । तो हे मात ऐकतां ॥१८॥

इति संचिंतयन्श्रुत्वा देवक्या दारिकावचः । अपि हंतागताशंकस्तर्हि तन्नोऽनयो भवेत् ॥९॥

म्हणेल देवकीचा अष्टम सुत । नंदसदनीं वाढे गुप्त । तरीच गर्गें संसारकृत्य । जाऊनि तेथ सारिलें ॥१९॥
ऐशी शंका गेलिया मनीं । जरी तो प्रवर्तला बालहननीं । तैं एवढी अन्यायकरणी । आम्हांपासूनि घडली कीं ॥१२०॥
जाणोनि एवढा अन्याय । आम्हीं करणें हें उचित काय । ऐसें म्हणतां मुनीचे पाय । बल्लवरायें वंदिलें ॥२१॥

नंद उवाच - अलक्षितोऽस्मिन् रहसि मामकैरपि गोव्रजे । कुरु द्विजातिसंस्कारं स्वस्तिवाचनपूर्वकम् ॥१०॥

नंद म्हणे गा द्विजोत्तमा । विश्वप्रिया अमृतोपमा । मम कल्याणीं विशेष प्रेमा । ऐसें आम्हां जाणवलें ॥२२॥
जितुका केला हितोपदेश । तो मज अमृताहूनि विशेष । तथापि मानसीं एक आस । ते निराश न करावी ॥२३॥
संशय कथिला यथार्थ । परंतु माझा मनोरथ । तो प्रूण केलिया कृतार्थ । झालों सत्य मुनिवर्या ॥२४॥
तुजसारिखा महानुभाव । भेटला म्हणूनि सफळ दैव । पूर्ण करोनि मनोभाव । करीं सदैव मजलागीं ॥१२५॥
अवश्य संस्कार द्विजातीसी । मूर्ति जोडिली तुम्हां ऐशी । स्वमंत्रें माझिया कुमारांसी । गुप्तत्वेंसि संस्करीं ॥२६॥
स्वस्तिवाचनपूर्वक । विधि संपादीं सम्यक । बाह्य लौकिक तौर्यत्रिक । सहसा दांभिक नकरीं मी ॥२७॥
मामकांसी न पडे ठावें । जेथ वायूचा प्रवेश नव्हे । ऐशिये एकांतीं भूदेवें । संस्कारावें मम कुमारां ॥२८॥
जाणों न शकती पंच भूतें । चार वार्तिक कैंचा तेथें । परम गूढ एकांत जेथें । कृत्य समर्थें हें कीजे ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP