अध्याय ३ रा - श्लोक ४१ ते ४७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


विप्रा गावश्च वेदाश्च तपः सत्यं दमः शमः । श्रद्धा दया तितिक्षा च क्रतवश्च हरेस्तनूः ॥४१॥

विप्र आणि यज्ञधेनु । साङ्ग आम्नाय हरीच्या तनु । यज्ञ याज्ञिक जे सहिष्णु । शरीरें जाण विष्णूचीं ॥८८॥
श्रद्धा तितिक्षा शम दम । दयातपादि सत्य नेम । हेंचि विष्णूचें मुख्य वर्म । जेणें विक्रम देवांचा ॥८९॥

स हि सर्वसुराध्यक्षो ह्यसुरद्विड् गुहाशयः । तन्मूला देवताः सर्वाः सेश्वराः सचतुर्मुखाः ॥४२॥

सर्वदेवांआ अध्यक्ष । तो हा विष्णुचि एक प्रत्यक्ष । असुरद्वेष्टा परी अलक्ष । परम दक्ष कूटस्थ ॥४९०॥
हृदयगुहेमाजीं शयन । करूनि सर्वांतरीं लीन । यालागीं असाध्य दैत्यांलागून । निगूढ स्थान लक्षेना ॥९१॥
भवाब्जभवादि देवता सकळ । एक विष्णुचि सर्वांचें मूळ । तो सर्वांतरीं करूनि स्थळ । प्रबळ झाला अजिंक्य ॥९२॥
विष्णूसि यत्नीं वधूं जातां । आपण मरिजे हृदय खोंचितां । विष्णुहननीं दैत्यां गुंता । बलिष्ठ देवता तन्मूळें ॥९३॥

अयं वै तद्वधोपायो यदृषीणां विहिंसनम् ॥४३॥

हाचि विष्णूचा वधोपाय । सर्व ऋषींचा कीजे क्षय । धर्ममार्गाची भंगितां त्राय । निर्मूळ होय तयाचें ॥९४॥
शुक म्हणे गा धरित्रीकांता । ऐकें परीक्षिती विष्णुभक्ता । परिसोनि दुर्मंत्रियांच्या वृत्तांता । कंस चित्तामाजीं तोषे ॥४९५॥

श्रीशुक उवाच - एवं दुर्मन्त्रिभिः कंसः सह संमन्त्र्य दुर्मतिः । ब्रह्महिंसां हितं मेने कालपाशावृतोऽसुरः ॥४४॥

कंस आकर्षिला काळपाशें । म्हणोनि कवळिला बुद्धिभ्रंशें । दुर्निमित्तें मंत्रिवेषें । दुर्मंत्रविषें निवविती ॥९६॥
आधींच दुर्मति कंसासुर । विशेष दुर्मंत्रियांचा हा विचार । ब्रह्महनन मानूनि सार । तोषें अंतर उचंबळे ॥९७॥
ब्रह्महत्त्या मानूनि हित । दुर्मंत्रियांचा मंत्र संमत । करूनि त्यांसि आज्ञापित । तत्प्रणीत कार्यार्था ॥९८॥

संदिश्य साधुलोकस्य कदने कदनप्रियान् । कामरूपधरान् दिक्षु दानवान् गृहमाविशत् ॥४५॥

जैसा प्रधानीं मंत्र कथिला । ऐकोनि कंस आनंदला । तेणें प्रमाणें आज्ञापिला । दैत्यमेळा तत्कार्या ॥९९॥
साधुलोकांच्या कदनाप्रति । परम उल्हास ज्यांचे चित्तीं । ऐसे निवडुनि दैत्यजाति । तत्कार्यार्थें नियोजी ॥५००॥
दाही दिशा संचरोन । विप्रधेनुसाधुहनन । कीजे ऐसें आज्ञापन । ओपी सन्मानपुरस्सर ॥१॥
जेथ जैसा प्रसंग पडे । तैसींच रूपें धरिती कोडें । ते कामरूपी दानव गाढे । निजनिवाडें आज्ञापी ॥२॥
गूढ मंत्र न कीजे प्रकट । कार्य साधिजे अचाट । वेदविधींची भंगिजे वाट । कीजे तळपट धर्माचें ॥३॥
वेदविप्रादि धर्ममूळें । प्रयत्नें खाणोनि सांडिजे सकळें । विष्णुशरीरें जीं अमळें । तीं निर्मूळ करावीं ॥४॥
आज्ञा देऊनि दानवगणा । कंस प्रवेशता झाला सदना । मग ते रूपें धरूनि नाना । करिती छळणा साधूंच्या ॥५०५॥

ते वै रजःप्रकृतयस्तमसा मूढचेतसः । सतां विद्वेषमाचेरुरारादागतमृत्यवः ॥४६॥

जैशीं श्वानें पिसाळलीं । तीं काळमृत्यूनें आवंतिलीं । आणिकां डसोनि ओपिती भुली । तैशीच चाली दैत्यांची ॥६॥
मृत्यु समीप पातला त्यांसी । म्हणोनि प्रवर्तले साधुद्वेषीं । जातिस्वभावें तामसी । पापराशि दुर्जन ॥७॥
रजोगुणें चेष्टाविकार । तमोगुणें निर्दय क्रूर । करिती साधूंचा संहार । व्याघ्र विखार होऊनि ॥८॥
स्वधर्म भंगावयासाठीं । वदती पाखंडज्ञानगोष्टी । मोडूनि वेदोक्त रहाटी । स्वैर परिपाटीं प्रवर्त्तती ॥९॥
घेऊनि सत्पुरुषांचीं सोंगें । आगमाभास जे वाउगे । विधि म्हणोनि अविधिमार्गें । सर्वही जग भ्रष्टविती ॥५१०॥
अष्टादश मिळोनि जाति । एके पात्रीं कवळ घेती । कौल धर्माच्या प्रख्याति । प्रशंसिती ते स्थानीं ॥११॥
मद्यमांसादि मैथुन । मोक्षदायक हेंचि भजन । ऐसें बोधूनियां ज्ञान । विहिताचरण सांडविती ॥१२॥
पतिव्रता ज्या महासती । यथेष्टाचरणीं प्रबोधिती । पुंश्चळीमार्गें व्यभिचारिती । नानायुक्तीं दुरात्मे ॥१३॥
राक्षसवेषें भक्षिती एका । पिशाचरूपें घर्षिती देखा । कोठें चेतवूनि पावका । निद्रित लोकां जाळिती ॥१४॥
जैसे सुरकायार्थ क्षपणक । बौद्धावतारें नावेक । केलें तोचि मतविवेक । अद्यापि चार्वाक आचरती ॥५१५॥
तैसे कंस आणि कंसमंत्री । क्षय पावले सहित गोत्रीं । परी दुष्टमार्गाची कुपात्री । केली धरित्रीं परंपरा ॥१६॥
दीप यत्नें लावितां न लगे । ग्रामदहनीं अग्नि लागे । तेंवि अधर्म केलिप्रसंगें । धर्मभंगें पाल्हाळे ॥१७॥
तुलसीमाहात्म्य वेदशास्त्रीं । ऐकोनि कोणी न पाहती नेत्रीं । तमालपत्र अपवित्र श्रोत्रीं । परिसोनि वक्त्रीं घालिती ॥१८॥
शुक म्हणे गा परीक्षिति । कंसमंत्रियांच्या युक्ति । आणि प्रयत्नांची ही प्रवृत्ति । सर्व तुजप्रति निवेदिली ॥१९॥
वांचावया विषभक्षण । कीं निवावया पावकीं शयन । तैसें मानिलें कल्याण । ब्रह्महननेंकरूनि ॥५२०॥
कालमृत्यु समीप आला । म्हणोनि विचार हरपला । जेंवि सर्पा कर घातला माळा मानूनि बालकें ॥२१॥
करितां संतांची अवज्ञा । अपत्र होईजे सर्व विघ्नां दोषा आणि अशुभ चिन्हां । त्याचि स्थाना प्रयाण ॥२२॥
करितां संतांचें हेलन होय मृत्यूचें कारण । ऐसें राया सहसा न म्हण । ऐक लक्षण तयांचें ॥२३॥

आयुः श्रियं यशो धर्मं लोकानाशिष एव च । हन्ति श्रेयांसि सर्वाणि पुंसो महदतिक्रमः ॥४७॥

अल्प हेळितांचि संतांस । आयुष्याचा होय नाश । लक्ष्मी पळे मानूनि त्रास । अवलक्ष्मीस सुखवसति ॥२४॥
ब्रह्मांडींहीं न लभे यश । जाय तेथ ये अपयश । धर्म लोपोनि अधर्मास । सावकाश विढार ॥५२५॥
परलोकही होती शून्य । निरयलोकीं वृत्तिस्थान । कोटिकल्पांचें भरतां मान । नोहे न्यून यातना ॥२६॥
पूर्वसत्कर्माचीं फळें । होऊनि ठातीं तीं निष्फळें । आशीर्वाद पदरीं पडिले । ते विघडले नासती ॥२७॥
निष्फळ होती मनोरथ । बुडे अर्थ स्वार्थ परमार्थ । अनेकसुकृतसंचितार्थ । होय व्यर्थ तत्काळ ॥२८॥
महापुरुषांचा अतिक्रम करितां । एवध्या पाविजे दुष्कृता । बुद्धिपूर्वक उच्छेदितां । मग अनर्था कोण गणी ॥२९॥
असो हें दुर्मंत्रियांचें मत । जाहलें कंसासि संमत । मग साधुहननीं आप्त दूत। असंख्यात प्रेरिले ॥५३०॥
तरी हें श्रीमद्भागवत । ज्याचे श्वासीं वेदवेदांत । जन्मले तेणें आत्मभूसुत - । प्रबोधार्थ हें कथिलें ॥३१॥
वेदोत्तमांग सकळां न कळे । म्हणोनि महापुराण मोकळें । करोनि प्रबोधिलीं पैं अबळें । व्यासदयाळें हरीच्छा ॥३२॥
संख्या अष्टादशसहस्र । पारमहंसी संहितासार । त्यामाजीं दशमस्कंध थोर । कृष्णावतार ज्यामाजीं ॥३३॥
खेचरी आपटितां गगना केली । कंसा धाकें धडकी भरली । दुर्मंत्रियांहीं बुद्धि कथिली । ते हे बोलिली चतुर्थीं ॥३४॥
चतुर्थाध्यायीं इतुकी कथा । शुक निवेदी जगतीनाथा । पुढील कथेच्या वृत्तांता । सावध श्रोतीं परिसिजे ॥५३५॥
पंचमाध्यायीं हरीचा जन्म । गोकुळीं अवतरेल मेघश्याम । लोकत्रयाचा विश्रामधाम । कमलाकाम जगदात्मा ॥३६॥
ते कथेच्या अमृतपानीं । सावध श्रोत्रीं निर्जरगणीं । दयार्णवाची वाग्मोहिनी । सर्वां श्रवणीं वाढील ॥३७॥
राहुकुतर्कियाचें तोंड । करूनि श्रद्धास्त्रें दुखंड । सुकृतविजयश्री ब्रह्मांड । भरिलें अखंड स्वतेजें ॥३८॥
एकाजनार्दनार्ककिरणीं । बोधिल्या भूतळीं विरक्तनलिनी । तेथ चिदानंदमानसवनीं । स्वानंदपद्मिनी विकासली ॥३९॥
तेथ मघमघीत अनुभवामोद । तो हा सद्गुरु गोविंद । गंधवाह दयार्णव विशद । भोक्ते षट्पद आमंत्री ॥५४०॥
म्हणॊनि सद्भावें माझी विनति । सर्वां सर्वत्र संतांप्रति । आपुलें म्हणोनि दूषणा हातीं । देतां ठेविती ठीकोणा ॥४१॥
कृष्णदयार्णव विनवणी । करी स्वमौळें संतांचरणीं । न्यून पूर्ण म्हणती कोणी । मज लागुनी तें न लावा ॥४२॥
मी रावता म्हणियारा । शब्द लागे राबवणारा । यालागीं प्रभुत्वें स्वीकारा । न्यून पूर्ण एथींचें ॥४३॥
हे न म्हणावी अजागळी । मी पायीक पायांजवळी । दंड कीजे चुकले काळीं । तो मम मौळीं भूषण ॥४४॥
संता श्रोतयां लोटांगण । घालूनि हेंचि मागतों दान । निंदाद्वेष विसर्जून । कृष्णकीर्तन परिसावें ॥५४५॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां दुर्मंत्रकथनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४७॥ टीका ओव्या ॥५४५॥ एवं संख्या ॥५९२॥ शुभं भवतु ॥ निर्विग्नमस्तु ॥ ( चार अध्याय मिळून ओवीसंख्या ३२६० )

चवथा अध्याय समाप्त.


N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP