मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४ था| श्लोक ११ ते १५ अध्याय ४ था आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २८ श्लोक २९ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४७ अध्याय ३ रा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर सिद्धचारणगन्धर्वैरप्सरःकिन्नरोरगैः । उपाहृतोरुबलिभिः स्तूयमानेदमब्रवीत् ॥११॥सिद्धलोकींच्या सिद्धसुमनीं । सिद्धवस्त्रादि अनुलेपनीं । सिद्धोपचारवस्त्राभरणीं । सिद्ध येऊनि अर्चिती ॥९५॥सिद्धकन्यादि सुवासिनी । सिद्धलोकींच्या विधिविधानीं । पूजिती ससिद्ध येऊनि । सिद्धयोगिनी सिद्धिदा ॥९६॥तैशीं चारणीं स्वसूत्रज्ञानें । गंधर्वीं गांधर्वविद्याचरणें । अप्सरादिकांचीं पूजनें । वश्याचरणें सूत्रोक्त ॥९७॥किन्नर किन्नरींसमवेत । करिती सपर्या सूत्रोक्त । स्वाधिकारें यथोचित । अभिवांच्छीतफलदात्री ॥९८॥नानायातीचे दिव्य फणी । सवें घेऊनि सुपद्मिनी । आले विमानीं बैसोनि । बळि श्रीचरणीं अर्पिती ॥९९॥विविध द्रव्यें विविध पात्रें । विविध कुलाचारमंत्रें । विविधाचरणें सकलत्रें । यथासूत्रें अर्चिती ॥१००॥एक पढती नानास्तोत्रें । एक वर्णिती श्रीचरित्रें । नवरसरंगीं एक गात्रें । तानमानें नर्तविती ॥१॥लास्यें हास्यें तौर्यत्रिक । सूक्तपाठ करिती एक । एक कौलाचारविवेक । कौलभार्गें विचरती ॥२॥एक म्हणती समयाष्टक । एक म्हणती मुख्य दौतिक । कामकळेचा विवेक । बिंदु एक शंसिती ॥३॥एक म्हणती कलावती । एक म्हणती लीलावती । एक म्हणती परंज्योति । परा शक्ति श्री षोढा ॥४॥ऐसें आपुलाले भावीं । पूजिली सिद्धादि सकळ देवीं । यथोक्तफळदा शांभवी । नाना स्तवीं स्तवियेली ॥१०५॥गंधर्व सप्तस्वरें गाती । किन्नरी चपळांगें नर्तती । अप्सरा संगीतें नाचती । ताल धरिती किंपुरुष ॥६॥सिद्ध वर्षती दिव्य सुमनीं । स्तवनीं तिष्ठती नाना फणी । ऐशी स्तूयमाना देवी गगनीं । कंसें नयनीं देखिली ॥७॥हें बोलिली तेव्हां वचन । तेंचि पुढील श्लोकीं कथन । निरूपिजेल सावधान । श्रोतीं श्रवण करावें ॥८॥किं मया हतया मन्द जातः खलु तवान्तकृत् । यत्र क्क वा पूर्वशत्रुर्मा हिसीः कृपणान् वृथा ॥१२॥ऐसें देखोनिया नयनीं । साशंकित अंतःकरणीं । तंव ते बोलिली संबोधूनी । विश्वमोहिनी जगदंबा ॥९॥तें कंसें मात्र ऐकिलें श्रवणीं । येरां अश्रुत सर्वकरणीं । पुण्यावीण अभीष्टदानी । श्रीभवानी कें जोडे ॥११०॥कस होता पुण्यशरीरी । तरी कां बाळांतें संहारी । ऐशी आशंका कोणी करी । तेणें सादरीं परिसावें ॥११॥त्याचें विरोधमार्गें भजन । नित्य न खंडे अनुसंधान । कृष्णमयचि सर्वाचरण । कृष्णीं तन मन वेधलें ॥१२॥आसुरी संपत्तीचें ज्ञान । देहलोभें बाळहनन । यश आयुष्य तेणें क्षीण । पावे मरण हरिहस्तें ॥१३॥कंसें मारिले जे बाळक । त्यांचें पूर्वींल पातक । परिसाल तयाचा विवेक । पंचायशावे अध्यायीं ॥१४॥असो कंसातें योगजननी । म्हणे रे मंदा ऐकें वाणी । शत्रु जन्मोनि आणिके स्थानीं । मज मारूनि साध्य काय ॥११५॥तुझा शत्रु जन्मांतरींचा । कोणेके स्थळीं त्याचा । जन्मोनि वास आहे साचा । हे सत्य वाचा पैं माझी ॥१६॥तुझा अंतक त्रिशुद्धि । स्थलांतरीं पावे वृद्धि । अरे मूर्खा मंदबुद्धि । वृथा न वधीं अनाथें ॥१७॥दुर्मंत्रियांचा ऐकोनि मंत्र । बाळें वधील हें चरित्र । जाणोनि भूतभविष्यसूत्र । बोधी विचित्र संकेतें ॥१८॥मंदा मारिसी मातें वृथा । दीना कृपणा अति अनाथा । शत्रु जन्मला या वाक्यार्था । जाणोनि स्वार्था विचारीं ॥१९॥इति प्रभाष्य तं देवी माया भगवती भुवि । बहुनामनिकेतेषु बहुनामा बभूव ह ॥१३॥इतुकें बोलूनि कंसाप्रति । देवी योगमाया भगवती । झाली भूलोकीं अवतरती । नाना व्यक्ति धरूनी ॥१२०॥द्वितीयाध्यायीं आज्ञापन । करूनि दिधलें वरदान । त्या प्रभुवरानुसारें जाण । स्थानाभिधान पावली ॥२१॥बहुत नामें बहुतां व्यक्तीं । बहुतां क्षेत्रीं बहुतां वस्तीं । बहुचरित्रें बहुधा कीर्त्ति । बहुधा गाती बहुलोकीं ॥२२॥तयाभिहितमाकर्ण्य कंसः परमविस्मितः । देवकीं वसुदेवं च विमुच्य प्रश्रितोऽब्रवीत् ॥१४॥ऐशी देवी सुपूजित । गगनीं देखोनि मूर्त्तिमंत । तिच्या वचनेंकरूनि चित्त । झालें विस्मित कंसाचें ॥२३॥देवकीअष्टमगर्भाचा बाळ । तोचि कंसा तुझा काळ । म्हणोनि होतों प्रयत्नशीळ । तोही विफल झाला कीं ॥२४॥देववाणी असत्य झाली । तेथ इतरांची काय चाली । देवकी बहिण म्यां आपुली । वृथा जाचिली बंधनीं ॥१२५॥ऐसा विस्मित झाला मनीं । मग वसुदेवदेवकी इयें दोन्ही । परम कारुण्यें कळवळूनि । बंधनींहूनि सोडिलीं ॥२६॥बेडी पायींची तोडून । मुक्त केलीं बंदीहून । कृपेनें अंतरीं द्रवोन । काय वचन बोलिला ॥२७॥अहो भगिन्यहो भाम मया वां बत पाप्मना । पुरुषाद इवापत्यं बहवो हिंसिताः सुताः ॥१५॥म्हणे भावोजी वसुदेवा । परम विस्मय हा वाटे जीवा । मनुष्याचा काय केवा । मिथ्या देवांमाजीं वर्ते ॥२८॥म्यां ऐकोनि आकाशवाणी । यत्न केला आत्मरक्षणीं । तोही मिथ्या आजपासूनी । कळलें मनीं मजलागीं ॥२९॥अवो बहिणी देवकीये । महादुःख हें सांगों काय । निरपराधें पीडिली गाय । महानिरय भोगीन ॥१३०॥परम कष्ट हे अघोर । म्यां निर्दयें तुमचे कुमार । बहुत मारिले निष्ठुर । केलें अंतर पापिष्ठें ॥३१॥मी पापात्मा पापराशि । पावेन कोण्या दुर्गतीसी । तोंड दाखवितां लोकांसी । लज्जा मानसीं मज वाटे ॥३२॥सर्प मार्जार व्याघ्रादिक । आपुला आपण भक्षिती तोक । किंवा पुरुषाद नरभक्षक । मीही एक तैसाचि ॥३३॥जैसें आपुलें मारिती बाळ । तैसेचि भगिनीगर्भगोळ । निर्दय होऊनि मारिले सकळ । मी केवळ राक्षस ॥३४॥जैसे राक्षस निर्घृण । मीही तैसाचि दयाहीन । बहुत तुमचे पैं नंदन । मारितां मन न द्रवलें ॥१३५॥अग्निसमान तेजःपुंज । दिव्य तुमचे ते आत्मज । मारिले ऐसा मी निर्लज्ज । कोण वोज पैं माझी ॥३६॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP