अध्याय ३ रा - श्लोक ३२ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


किमुद्यमैः करिष्यन्ति देवा समरभीरवः । नित्यमुद्विग्नमनसो ज्योघोषैर्धनुषस्तव ॥३२॥

मंत्री म्हणती भोजपति । तूं सांगसी आंगींच्या गति । ते तव शौर्याची प्रतापकीर्ति । वीरश्रीप्रति उपजवी ॥८॥
आंगीं म्हणसी ताप आला । तो शक्रावरी क्षोभ उदेला । सकंप फिरविसी नेत्रकमळा । क्रोध आगळा रिपुदळणीं ॥९॥
देव आपुले विपक्ष सत्य । परी तयांची ऐक मात । तुझा प्रतापप्रलयादित्य । सभास्थानीं झळकतां ॥४१०॥
खद्योतप्राय लपोनि जाती । ठाव न मिळे त्यां दिगंतीं । काय उद्योग करिती माती । त्याची खती कायसी ॥११॥  
गोवळ आणि वृष्णिकुळ । वसवूनिदेव करिती बळ । ऐसे अनेक उद्यमशीळ । परी ते निष्फळ तुजपुढें ॥१२॥
त्यांच्या उद्यमीं साध्य काय । जे संग्रामीं वाहती भय । कोण आम्हां वांचवी माय । म्हणूनि ठाय धुंडिती ॥१३॥
तुझी चापज्यादीर्घध्वनी । पडतां देवांगनांच्या कानीं । गर्भ टाकिती त्या दचकोनी । देवां पळणी अद्भुत ॥१४॥
तुझिये चापध्वनिभेणें । देव उद्विग्न अंतःकरणें । जैसें मृगेंद्राच्या गर्जनें । लंघिती रानें गजथाटें ॥४१५॥

अस्यतस्ते शरव्रातैर्हन्यमानाः समन्ततः । जिजीविषव उत्सृज्य पलायनपरा ययुः ॥३३॥

तुझिया बाणांच्या धूमयोनि । प्रलयतुल्य समरांगणीं । वर्षतां देव जीव घेऊनि । जाती पळोनि दशदिशां ॥१६॥
तूं विंधिसी तीव्रशर । पर्वतभेदनीं जैसें वज्र । निर्जर सबोंवते जर्जर । समरीं समोर न ठरती ॥१७॥
ऐसें मारितां चहूंकडे । देव पळती झांकूनि तोंडें । न पाहती मागें पुढें । प्राणचाडें निर्लज्ज ॥१८॥
सांडूनिया समरमही । जीव वांचवावया पाहीं । कित्येक पळती दिशा दाही । एक देहीं अचेतन ॥१९॥

केचित्प्राञ्जलयो दीना न्यस्तशस्त्रा दिवौकसः । मुक्तकच्छशिखाः केचिद्भीताः स्म इति वादिनः ॥३४॥

एक पळतां पळों न शकती । धाकें पायां वेंगड्या वळती । शत्रें सांडूनि वांचवीं म्हणती । तृणें दातीं धरूनिया ॥४२०॥
एक जोडूनि अंजलिपुट । त्रिदश म्हणविती तुझे भाट । एक दाविती पाठी पोट । सांगती कष्ट दीनत्वें ॥२१॥
एकांचीं फिटोनि नेसणीं । अमर लोळती रणांगणीं । एक मुकुटेंवीण धरणी । शिखा लोळणीं लागल्या ॥२२॥
मुक्त शेंडिया मोकळीं डेगें । हात लावूनि पुढें मागें । त्राहें त्राहें म्हणती वेगें । आम्ही भनगें अनाथें ॥२३॥
एक म्हणती पळालों भयें । प्रतापरुद्रा ओपीं अभय । ऐसे विबुधांचे समुदाय । तुझा घाय न सहाती ॥२४॥
ऐशिया समरंगीं निर्जरां । अभय ओपिसी तूं भोजेंद्रा । न मारिसी शत्रुपामरां । नीतिशास्त्रा नोल्लंघिसी ॥४२५॥

न त्वं विस्मृतशास्त्रास्त्रान्विरथान्भयसंवृतान् । हंस्यन्यासक्तविमुखान् भग्नचापानयुध्यतः ॥३५॥

समरीं अमरें जर्जर होतीं । शस्त्रास्त्रांची पडतां भ्रांति । रथावरूनि उलंडती । तूं त्यांप्रति न मारिसी ॥२६॥
गीर्वाण कारुण्या भाकिती । भयें लज्जीत पहाती क्षितीं । निःशस्त्री धरिती तृणें दांतीं । देसी त्यांप्रति जीवदान ॥२७॥
एकीं समरीं दिधल्या पाठी । विन्मुखपणें पळती सृष्टी । ऐसें पडतां तुझिये दृष्टी । त्यां तूं कष्टी न करिसी ॥२८॥
भग्नशस्त्र भग्नयान । भग्नचाप रहितबाण । ऐशियां समरांगणीं देखोन । प्राणदान तूं देशी ॥२९॥
ऐशी निर्जरांची कथा । असतां कायशी शत्रुव्यथा । समरीं सज्ज होतां पंथा । मृत्युपुरीच्या दाविसी ॥४३०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP