अध्याय ३ रा - श्लोक २६ ते २८

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एवमेतन्महाभाग यथा वदसि देहिनाम् । अज्ञानप्रभवाऽहंधीः स्वपरेति भिदा यतः ॥२६॥

अगा भोजचूडामणि । जैशी वदे तुझी वाणी । तैसे तैसे भ्रमती प्राणी । अहंभ्रमणीं भ्रमचक्रीं ॥३१५॥
तुझिये मधुरोक्तीचा तरणि । प्रकाशतां अंतःकरणीं । दुःखशोकांची मोहरजनी । गेली निरसोनि तत्काळ ॥१६॥
अज्ञानजनित अहंबुद्धि । जयेपासूनि भेदविधि । अपर मित्र विरोधी । स्नेहवादी उदास ॥१७॥
तूं महाभाग समर्थ । बोलसी तितुकेंही यथार्थ । देहबुद्धीचा अनर्थ । विनापरमार्थ निरसेना ॥१८॥
अहंबुद्धी वाढे भेद । तो आत्मविचारीं करी अंध । तेणें परस्परें विरुद्ध । वाढे द्वंद्व तें ऐका ॥१९॥

शोकहर्षभयद्वेषलोभमोहनदान्विताः । मिथो घ्नन्तं न पश्यन्ति भावैर्भावं पृथग्दृशः ॥२७॥

ममतास्नेहें पाळिले । त्यांच्या नाशें शोक खवळे । अभीष्टलाभें उचंबळे । महत्त्वमेळें तो हर्ष ॥३२०॥
अहंमाममता कौटाळिलें । तयांसि ऐकतां विघ्न उदेलें । अंगीं थरथरूनि संचरलें भय बोलिलें त्या नांव ॥२१॥
आपुलें महत्त्व लाभ रोघी । अथवा अवगुणा निषेधी । तेथ खवळे विरुद्ध बुद्धि । द्वेष त्रिशुद्ध या नांव ॥२२॥
आपणासि उपेगा जाय । ऐसा पदार्थमात्र जो होय । त्याच्या ठायीं वाढें स्नेह । लोभ होय या नांव ॥२३॥
नेदूनि सत्याचा आठवो । असत्याचा करी रोहो । आत्मबुद्धि कवळी देहो । महामोहो नाथिला ॥२४॥
आपुलेनि संपत्तिगुणें । नाणिजे कोणासही गणने । रूपें वयें साधनें मानें । मद जाणणें या नांव ॥३२५॥
ऐसा अनेक द्वंद्वसमूह । पाठी लागे होतां देह । भेदबुद्धि महामोह । दुःखडोहो प्राजवी ॥२६॥
इहीं द्वंद्वभावीं युक्त होती । ते ईश्वरातेंचि नोळखती । देहअंहंतेचिये भ्रांतीं । आपणा मानिती स्वतंत्र ॥२७॥
म्हणती आपुलेनि अंगबळें । छेदूनि सांडूं शत्रुमूळें । आमुचें काय कीजेल काळें । आम्हीं आगळे प्रतापी ॥२८॥
आम्ही काळासि सिंतरूं । बळें मृत्यूसि जिवें मारूं । सर्व द्वेषियें संहारूं । कैंचा ईश्वरू आम्हांपुढें ॥२९॥
ऐशिया देहअहंतावंतां । त्रिभुवनामाजीं न दिसे ज्ञाता । विश्वाचिया आदिअंता । आपुल्या सत्ता करूं पाहती ॥३३०॥
विरक्तांसि म्हणती भोग । निष्ठां म्हणती निसुग । कर्मनिष्ठांचा घेऊनि अवग । करिती साङ्ग उपहास ॥३१॥
समान प्रतिपत्ति अभिमानी । देखतां द्वेषें वाचटोनि । एकमेकांचिये हननीं । परस्परें प्रवर्त्तती ॥३२॥
तेथें घातपातादि हिंसादोष । न विचारिती रागद्वेष । निकृष्ट कर्मेंजीं अशेष । तीं तें विशेष आचरती ॥३३॥
पृथग्बोधें सचराचर । दृश्य मानूनि साचार । भेदबुद्धि भवसागर । प्राणी असुर भोगिती ॥३४॥
मी मारिलों येणें दुष्टें । याचें उसनें घेईन हट्टें । ऐसें स्मरोनि कर्म खोटें । करूनि दुर्घटें आचरती ॥३३५॥
आजि मारिले शत्रुभार । सूड घेतला साचार । केवळ होऊनि देहपर । घोरें घोर प्रसवती ॥३६॥
ऐशी जनाची रहाटी । केवळ अज्ञान अहंतादृष्टि । राया बोधिल्या ज्या विवेकगोष्टी । तेणें झालों पोटीं विशोक ॥३७॥
एथ तुझा अपराध काय । जें जें होणार तें तें होय । आता एथूनि विवेक स्नेह । जेणें राहे तें करीं ॥३८॥
तुझी वांचवावया वपु । पूर्वींच आमुचा कृतसंकल्पु । अष्टही गर्भ तुजला अर्पूं । अतिसकृप होऊनी ॥३९॥
परि तुज सत्य न वाटे वचन । म्हणूनि आम्हां केलें बंधन । ऐसें आमुचें कर्म गहन । तुजलागून प्रेरक ॥३४०॥
तुवां जीं जीं बाळें वधिलीं । तिहीं आपुलीं कर्में भोगिलीं । आतां एथूनि भ्रांति खंडली । अष्टमगर्भभयाची ॥४१॥
आठवा पाहतां आठवी झाली । म्हणोनि तुजसी ग्लानि केली । परी त्वां ती नाहीं ऐकिली । शेखीं गेली नभापर्थे ॥४२॥
तुझी हरली मृत्युशंका । आम्ही ऐकोनि तव विवेका । सांडूनि हृदयींच्या दुःखशोका । स्नेहपीयूषा अनुभवलों ॥४३॥
तुझिया स्नेहाचिये सलिलीं । आमुची मानसकमळवल्ली । दुर्दैवें अवर्षणें वाळली । ते पाल्हाइली तव स्नेहें ॥४४॥
शुक म्हणे गा कुरुभूषणा । नृपाग्रणी विचक्षणा । कंस पावला समाधाना । दंपतीवचना परिसोनि ॥३४५॥

श्रीशुक उवाच - कंस एवं प्रसन्नाभ्यां विशुद्धं प्रतिभाषितः । देवकीवसुदेवाभ्यामनुज्ञातोविशद्गृहम् ॥२८॥

वसुदेव देवकी दोघीं जणीं । सुप्रसन्न अंतःकरणीं । परम विशुद्ध प्रतिभाषणीं । कंस तेथूनि वोळविला ॥४६॥
घेऊनि उभयतांची अनुज्ञा । कंस प्रवेशला राजसदना । विसर्जूनि सेवकगणा । करी शयना पर्यंकीं ॥४७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP