अध्याय ४ था - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीकृष्णपरब्रह्मणे नमः । गोविंदसद्गुरु आनंदकंद । गोविंद परमामृताचा र्‍हद । गोविंद अद्वयसुखाचा स्वाद । सच्चिदानंद विग्रही ॥१॥
गोविंद गूढ हृदयसाक्षी । असन्मिथ्यात्वें उपेक्षी । सर्वगतत्वें सत्ता लक्षी । अभिन्नपक्षीं स्वतःसिद्ध ॥२॥
गुरुत्वें गुणीं न सांठवे । गुरुत्वें काळा नाकळवे । गुरुत्वें मायेसि नागवे । निजगौरवें गुरुवर्य ॥३॥
सच्चिदानंद पदत्रय । यासि जयाचा आश्रय । तो आनंदकंद अद्वय । श्रीगुरुराय सन्मात्र ॥४॥
मृत्यु म्हणजे भवार्णव । त्याच्या निरासे अमृतोद्भव । दोन्ही उपजतां जो ठाव । तो गुरुराव परब्रह्म ॥५॥
सुख भोगिजे विषयसंगें । परी तें इद्रियांचेनि पागें । अद्वय सद्गुरुबोधप्रसंगें । निजांतरंगें स्वादिजे ॥६॥
तें अद्वयसुख आस्वादिजे । कीं स्वादचि होऊनि स्वादीं मिळेजे । ऐसें माझेनि स्वामिराजें । येणें निजगुजें निवविलें ॥७॥
गार होय गोठूनि नीर । तेंवी सच्चिदानंदमयशरीर । निर्गुण निर्विकार निराकार । सगुण साकार भक्तभाग्यें ॥८॥
सन्मात्र जें सर्वगत । तेंचि होऊनि मूर्तिमंत । उपास्तीचें पूर्ण आर्त्त । जो पुरवीत सत्पदें ॥९॥
ज्याच्या चरणाचेनि स्मरणें । भजनीं प्रवर्तती सर्वही करणें । चिन्मयप्रकाशें अंतःकरणें । प्रकाशणें चित्पदें ॥१०॥
जया देखतांचि पुढें । सुख अवतरे आंतुलीकडे । तेंचि सबाह्य ओसंडे । पेवं जो उघडें परब्रह्म ॥११॥
माझें अनंतकल्पींचें तप । भाग्यें झालें फलद्रूप । जें सद्गुरुवरकृपादीप । आपेंआप उजळला ॥१२॥
पाषाण फोडिती लोहघणें । आकल्प उभयतां ऐसेंचि जिणें । भाग्यें परिसेशीं साजणें । तैं घणें सुवर्णें पालटिजे ॥१३॥
तैसें एके दिवशीं अनेकगुरु । त्यांचा निरोपितां विचारु । ग्रंथ वाधेल अपारु । तरी हा विस्तारु किमर्थ ॥१४॥
गुरूचा करूनि हृदयस्फोट । शिष्य होती धीटपाठ । तेणें भरिती कुटुंबपोट । परी मोक्षवाट अनोळख ॥१५॥
तैसा नोहे माझा स्वामी । स्मरणें नांदवी आनंदधामीं । भाळ स्पर्शतां पादपद्मीं । सायुज्यसदनीं समरसता ॥१६॥
स्वानंदबोध पाजूनि पान्हा । वाढलों मी अपत्य तान्हा । देऊनि वांच्छिता स्वपादभजना । केलें सज्जनां आवडता ॥१७॥
संतीं मानूनि लडिवाळ । केला कृपेनें सांभाळ । म्हणती रसाळ तुझे बोल । अतिसखोल सुखकर ॥१८॥
बोलक्या लोकीं भरली सृष्टि । माउली बाळका देखोनि दृष्टि । त्याच्या बोबद्या ऐकोनि गोष्टी । उल्हास पोटीं न समाये ॥१९॥
तेचि संतसभा हे माउली । बाळभाषणें सुखावली । म्हणे तुझियां बोबड्या बोलीं । कथा कथिली पाहिजे ॥२०॥
हरिजन्म कथिला तृतीयाध्यायीं । पुढें चतुर्थामाजीं कायी । अपूर्व कथेची नवाई । ते श्रवणालायीं निवेदीं ॥२१॥
सद्गुरुकृपेचें अंजन । मम नयनीं लेववून । संतीं केलें सुलोचन । अर्थनिधान काढावया ॥२२॥
व्यासटंकशाळेचें धन । शुकमुखें जें परीक्षून । परीक्षितीनें संग्रहण । निक्षेपून ठेविलें ॥२३॥
तो काढूनि जुनाट ठेवा । ओपिजे श्रोतयां सदैवा । पारखीचा न पडे गोवा । जो मान्य सर्वां गौरवें ॥२४॥
तेथ सायखडियाचें बाहुलें । राहे जैसें उभें केलें । तेंवि श्रीआज्ञेच्या सूत्रबळें । कथा चाले ते ऐका ॥२५॥
दशमस्कंधींचा चतुर्थ - । अध्यायगर्भींचा इत्यर्थ । श्रोतयां चतुर्विध पुरुषार्थ । ओपी समर्थ प्रेमळां ॥२६॥
देवकीच्या अष्टम गर्भा । अकोनि कंस दचकला क्षोभा । तों योगमाया जे विद्युत्प्रभा । गेली नभा आपटितां ॥२७॥
बाळालागीं वधिसी काय । तुझा मृत्यु जन्मला आहे । ऐसा लागतां वर्मीं घाय । कंसा भयें व्यापिलें ॥२८॥
मग दुर्मंत्री मेळवून । हित मानिलें साधुच्छळण । हें अध्यायांत निरूपण । कीजे श्रवण त्यागार्थ ॥२९॥
पूर्वाध्यायींची गतकथा । गोकुळीं ठेवूनि कृष्णनाथा । देवकीपुढें ठेवूनि सुता । पावे बद्धता वसुदेव ॥३०॥
शुक म्हणे परीक्षिति क्षितिवरा । भगवद्भाग्यरत्नाकरा । भगवत्कथाप्रेमादरा - । माजील सारा तूं भोक्ता ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP