अध्याय ३ रा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


किं क्षेमशूरैर्विबुधैरसंयुगविकत्थनैः ।
रहोजुषा किं हरिणा शम्भुना वा वनौकसा ॥
किमिन्द्रेणाल्पवीर्येण ब्रह्मणा वा तूपस्यता ॥३६॥

बैसोनिया निर्भयस्थानीं । शौर्य मिरविजे सुपर्वाणीं । किरीट कवचें सायुधपणीं । वनितानयनीं दाविती ॥३१॥
निर्भयस्थानें बैसूनि शूर । अवघे ऐसेचि निर्जर । त्यांचा कायसा वाहणें घोर । आम्ही महावीर असतां ॥३२॥
संग्रामेंवीण विकत्थना । हा स्वभावोचि सुपर्वांना । त्यांच्या प्रतापाची गणना । मूर्खही मना नाणिती ॥३३॥
ऐशियांहीं करणें काय । कायसा यदर्थीं उपाय । म्हणसी मुखाचें वाटे भय । तरी ऐकें सोय तयांची ॥३४॥
विष्णु जन्मेल देवकीउदरीं । म्हणोनि रक्षितां नानापरीं । धाकें झाला तो कुमारी । होऊनि खेचरी पळाला ॥४३५॥
वाढतो आहे अन्यस्थळीं । ऐशी केली जे वाचाळी । जरी तो असता महाबळी । तरी स्थळोस्थळीं कां लपता ॥३६॥
वसवूनिया हृदयगुहा । लपोनि राहे जेव्हां तेव्हां । तेणें तुजसी युद्धहेवा । हें अघटित केव्हां घडों शके ॥३७॥
विरक्त तापसी वनवासी । पळोनि जाय तयांपाशीं । हृदयीं ठाव मागे त्यांसी । लपावयासी आपणा ॥३८॥
असो सर्वांचे हृदयकोशीं । सर्वदा लपून राहणें ज्यासी । त्या विष्णूचें भय मानसीं । वृथा वाहसी भोजेंद्रा ॥३९॥
विष्णु प्रकट जरी असता । तरी कोणींतरी देखिला असता । अवघे भूमंडळीं पुसतां । न लाभे वार्ता जयाची ॥४४०॥
तेणें असोनि काय करणें । म्हणसी संशय शंभुभेणें । आता तयाचे वर्तणें । श्रवण करणें नृपवर्या ॥४१॥
नग्नचि भ्रमे सर्वकाळीं । स्मशानीं नांदे पिशाचमेळीं । क्षणैक पुरुष क्षणैक बाली । तिहीं ताळीं न थारे ॥४२॥
भयें फिरतां रानोरान । एक लक्षिलें निर्भयस्थान । तेथ घालूनिया आसन । भय सांडूनि राहिला ॥४३॥
इलावृत उमावनीं । पुरुषप्रवेशरहितस्थानीं । भयाची शंका सांडूनि मनीं । निर्भय होऊनि राहिला ॥४४॥
तेणें काय कीजेल युद्ध । जेणें जाळिला कामक्रोध । होऊनि ठेला परम वृद्ध । शुद्धबुद्ध सर्वदा ॥४४५॥
केलें विषभक्षण । तरी त्यासि न येचि मरण । हाडें कातडीं भूषणवसन । आंगीं लेपन चिताभस्म ॥४६॥
इंद्र मशक आम्हांपुढें । अल्पवीर्य तें बापुडें । दैत्यभेणें सदा दडे । त्याचें कोडें कायसें ॥४७॥
बळीच्या यागीं वामनामागें । लपोनि त्रिपाद भूमि मागे । रावणासदनीं दास्यत्वमार्गें करी निजांगें परिचर्या ॥४८॥
तेणें आमुचें काय करणें । जरी ब्रह्म्याचें भय मानणें । त्यासि लंकेमाजीं रावणें । आश्रितपणें रावविलें ॥४९॥
सायंप्रातः शांतिपाठ । श्रवण करवी पंचांगपट । विलंब केलिया बोभाट । पाठीं साट वाजती ॥४५०॥
शंखें भेडसावितां वेडें । होऊनि दीर्घस्वरें रडे । जैशीं अज्ञान झाडें खोडें । तैसें पडे गाढमूढ ॥५१॥
अद्यापि माला कुशासन । पूर्ण कमंडलीं जीवन । तपश्चर्या करितां जाण । देहभान या नाहीं ॥५२॥
तेणें काय कीजे विक्रम । निष्फल निर्जरपराक्रम । नीतिमार्गें राजधर्म । तोही अनुक्रमें अवधारीं ॥५३॥

तथापि देवाः सापत्न्यान्नोपेक्ष्या इति मन्महे । ततस्तन्मूलखनने नियुङ्क्ष्वास्वाननुव्रतान् ॥३७॥

भोजवंशभूषणमणि । सावध विचार ऐकिजे श्रवणीं । शत्रु अल्प म्हणोनि कोणीं । उपेक्षूनि न वचिजे ॥५४॥
अल्प न म्हणिजे अंगार । पेटल्या जाळूं शके पुर । त्यासि साहाय्य झालिया खेचर । जेंवि अनाचर नाटोपे ॥४५५॥
अल्प न म्हणिजे विषोदक । लहान न म्हणिजे तक्षक । वेळे टाकलें कर्म अचूक । मग निष्टंक न लोटे ॥५६॥
म्हणोनि आधींच सावधपणें । मूळ शत्रूचें खंडणें । नीतिशास्त्र याकारणें । पाहोनि शहाणे वर्त्तती ॥५७॥
जरी तृणप्राय हे आमुच्या नयनीं । तथापि सपत्न पीयूषपानी । यांची उपेक्षा करितां हानि । आमुच्या मनीं हें माने ॥५८॥
आम्हांसि मान्य हेचि बुद्धि । देव सपत्न आमुचे द्वंद्वी । उपेक्षा न करितां त्रिशुद्धि । न पवतां युद्धीं निर्दळिजे ॥५९॥
शत्रूचें उन्मळिजे मूळ । ऐशी राजाज्ञा जरी प्रबळ । आम्ही सर्वस्वें अनुकूळ । वीर विशाळ प्रतापी ॥४६०॥
राया स्वामिकार्याकारणें । तृणप्राय मानूनि जिणें । अर्थें प्राणें देहें मनें । ओटंगणें तव दास्य ॥६१॥
ऐसे अनुवृत्त वीर असतां । शत्रुमूलखननचिंता । करणें नलगे जी नृपनाथा । ऐक तत्त्वतां विचार ॥६२॥
आम्हां अनुवृत्तां वीरा सकळां । छेदावया विपक्षमूळां । श्वापदहननीं निषादमेळा । तेंवि नृपाळा नियोजीं ॥६३॥
उपसोनि सांडितां सरोवर । निर्मूळ सहजेंचि जलचर । तैसें निर्मूळ करूं अमर । आज्ञा सत्वर देइजे ॥६४॥
यदर्थीं विलंबन करितां पाहीं । शत्रुप्रलय होती ठायीं । जैसा रोग उदेला देहीं । तो लवलाहीं निरसिजे ॥४६५॥

यथामयोऽङ्गे समुपेक्षितो नृभिर्न शक्यते रूढपदश्चिकित्सितुम् ।
यथेन्द्रियग्राम उपेक्षितस्तथा रिपुर्महान्बद्धबलो न चाल्यते ॥३८॥

अत्यंबुपानें कां विषमाशनें । किंवा मूत्रपुरीषनिरोधनें । निशिजागरें दिवाशयनें । होय उपजणें रोगाचें ॥६६॥
जैसें सृष्टिप्रवर्त्तक त्रिगुण । रोग तैसेचि त्रिविध जाण । वातपित्तकफाभिधान । ऐक लक्षण तिहींचें ॥६७॥
ऐशीं वातरोगाच्या जाती । त्या वेगळ्या अनेकप्रकृति । चाळीस पैत्तरोगसंपत्ति । त्यांच्या विकृति अनेकधा ॥६८॥
महारोग वीस जाणा । तितुकीच कफरोगाची गणना । ऐशा अनेक रोगभावना । तूं सर्वज्ञा जाणसी ॥६९॥
अल्पविषममात्रें रोग । देहामाजीं करी रीग । तेथ न करिताम लागवेग । यथासांग पैसावे ॥४७०॥
देहीं रोगोत्पत्ति झाली । ते जरी मानवीं उपेक्षिली । मूळें घेऊनि पैसावली । चिकित्सा केली मग न वचे ॥७१॥
नातरी आपुलाचि शरीरग्राम । करूनि नावरितां शमदम । विषयासक्तीं खवळे काम । क्षोभती परम षड्वैरी ॥७२॥
रोगें देहाचा विध्वंस । कामें बुडाला योगाभ्यास । दोहीं दृष्टांतीं शत्रुनाश । कीजे निःशेष लौकरी ॥७३॥
तैसाचि शत्रु दळें बळें । प्रबळ झालिया न उन्मळे । यालागीं निर्मूळ शीघ्रकाळें । बुद्धिकुशलें करावें ॥७४॥
जैसा कृषीवळ नांगरी पेडी । शोधशोधूं काशिया काढी । खाणखाणॊनि पालव्या तोडी । शत्रुझाडी तेंवि कीजे ॥४७५॥
म्हणसी वृक्षांचीं प्रकटें मूळें । खणोनि काढिजेती कृषीवळें । निर्जरांचीं अनेक कुळें । केंवि निर्मूळें कीजती ॥७६॥
ऐसा संशय मनीं न धरून । ऐकें शत्रूचें मूळकथन । मग तयाचें करूं खनन । दीर्घ प्रयत्न करूनी ॥७७॥

मूल हि विष्णुर्देवानां यत्र धर्मः सनातनः । तस्य च ब्रह्मगोविप्रास्तपो यज्ञाः सदक्षिणाः ॥३९॥

सकळ देवांचें विष्णु मूळ । त्याचें न सांपडे म्हणसी स्थळ । सनातन धर्म जेथ प्रांजळ । तेथ गोपाळ निरंतर ॥७८॥
धर्माचीं हीं मूळें ऐक । वेद विप्र धेनु प्रमुख । तपो यज्ञ दक्षिणादिक । इये सम्यक हरिमूळें ॥७९॥
शुक म्हणे गा परीक्षिती । हीं कैशीं मूळें म्हणोनि चित्तीं । संशयाची न धरीं गुंती । ऐकें तुजप्रति सांगेन ॥४८०॥
तपादिकें स्वधर्मशीळ । धर्में सत्त्वसंपत्ति होय उजळ । शुद्ध सत्त्व तो विष्णु केवळ । तोचि मूळ करणांचें ॥८१॥
देवता म्हणजे करणगण । विष्णु तत्प्रकाशक अंतःकरण । ऐशा विवेकें सर्वज्ञ । अध्यात्मखूण जाणती ॥८२॥
मंत्री म्हणती भोजराया । देवांचिया निर्मूळकार्या । विलंब न करितां लवलाह्या । आम्हां बळिया आज्ञापीं ॥८३॥
तुझिये आज्ञेचा प्रलयमेघ । वर्षतां आम्ही प्रताप अमोघ । निर्जरविजयाचा निदाघ । भंगूं तो मार्ग अवधारीं ॥८४॥

तस्मात्सर्वात्मना राजन् ब्राह्मणान्ब्रह्मवादिनः । तपस्विनो यज्ञशीलान् गाश्च हन्मो हविर्दुघाः ॥४०॥

मूळें तुटल्या झाडें पडती । देवांचीही हेचि गति । तस्मात् हाचि यत्न नृपति । आमुच्या चित्तीं मानला ॥४८५॥
तरी सर्व प्रकारें नृपनाथा । विप्रां वेदपारंगता । तपस्वियां संशितव्रतां । आम्ही सर्वथा संहारूं ॥८६॥
यज्ञधेनूंचीं हननें करूं । यज्ञ भंगूनि याज्ञिक मारूं । ब्रह्मनिष्ठांतें संहारूं । भंगूं आचार सतींचें ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP