अध्याय ३ रा - श्लोक २८ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स त्वं घोरादुग्रसेनात्मजान्नस्नाहि त्रस्तान्भ्रुत्यवित्त्रासहाऽसि ।
रूपं चेदं पौरुषं ध्यानधिष्ण्यं मा प्रत्यक्षं मांसदृशां कृषीष्ठाः ॥२८॥

तो तूं आम्हांसी त्राहें त्राहें । पूर्णकृपादृष्टीं पाहें । तुज सर्वज्ञा विनवूं काय । विदित आहे तुज सर्व ॥४७॥
औट कोटी रोम अंगीं । एका रोमासि झोंबतां मुंगी । तेथींची जाणीव त्वचे जोगी । येरें वाउगी इंद्रियें ॥४८॥
तिया धांवणिया हस्तचि धांवे । इतरांसि तें नाहीं ठावें । एवं इंद्रियांचें ज्ञान आघवें । तूं मायालाघवें प्रकाशिसी ॥४९॥
रानीं वनीं गिरिदरां । जानसी भक्तांचिया अंतरा । धांवसी भक्तकाजकैवारा । तूं सोयरा भक्तांचा ॥५५०॥
सासुरवासिये मनींचे मनीं । धरिती अनुराग तुझे भजनीं । त्यांच्या प्रेमाची पुरवणी । अंतर जाणोनि तूं करिसी ॥५१॥
प्रर्‍हाद असतां गर्भवासीं । भावें अनुसरला भजनासी । जाणोनि त्याचिया प्रेमासी । तूं त्यापाशीं तिष्ठसी ॥५२॥
तूं भक्तांचा कल्पतरु । पूर्णकृपेचा सागरु । विघ्नतमातें भास्करु । करुणाकरु जगदात्मा ॥५३॥
तूं भक्तप्रेमाचा अभिज्ञ । म्हणोनि भक्तवित् ऐसें संबोधन । करिसी विघ्नांचें भंजन । म्हणोनि अभिधान त्रासहा ॥५४॥
त्रैलोक्य त्रासिलें रावणें । तो त्वां वधिला रघुनंदनें । वित्रासहा या अभिधानें । तुज प्रार्थणें या हेतु ॥५५५॥
आणीक एक ऐकें युक्ति । जेथ प्राण्याची अधिक प्रीति । तेथेंचि झालिया विकृति । त्रास चित्तीं उपजतो ॥५६॥
प्रीति षड्रसभोजन । ग्रासोग्रासीं रुचिकर अन्न । तेथचि झालिया तें वमन । त्रासें मन कंटाळे ॥५७॥
सत्वर वाटे वियोग व्हावा । त्रासें विटे सन्निधिभावा । तैसा विरक्तां आघxx । र्पपंचxxवा त्रासद ॥५८॥
जे त्रासले प्रपंचासी । शरण आले तव चरणासी । त्यांच्या त्रासातें संहारिसी । त्रासहासि तुज म्हणती ॥५९॥
अनंत भक्तांचें ऐकोनि कथन । त्रासहरणार्थ मीही शरण । म्हणसी तुजला त्रास कोण । तरी तो श्रवण करावा ॥५६०॥
माझा भाऊ कंसासुर । जो उग्रसेनाचा कुमार । तेणें साधितां वैराकार । त्रासकर मज झाला ॥६१॥
अत्यंत प्रियतम माझा भाऊ । तेणें त्रास दिला बहु । जेंवि शशांक त्रासे देखोनि राहु । तैसा जीव त्या धाके ॥६२॥
घोरकर्मीं केवळ खळ । निर्दयें मारिले साही बाळ । त्याच्या त्रासें मी व्याकुळ । करीं तळमळ भयभीत ॥६३॥
कंसापासून पावलें त्रास । त्राहें आम्हां त्रस्तांस । आणीक प्रार्थितें एक स्वामीस । ते विनति परिसें परमात्मा ॥६४॥
तुझें रूप हें पुरुषोत्तमा । पाहों न शकेचि सुरेंद्र ब्रह्मा । तेथ शिवादिकांचा प्रेमा । ध्यानसंभ्रमा आस्पद ॥५६५॥
तुझें हें आदिपुरुषरूप । ईश्वरध्येय ऐश्वर्यदीप । मांसदृष्टिविषयरूप । नव्हे चिद्रूप त्या योग्य ॥६६॥
विषयस्वादें ज्या बाटल्या । दृष्टि विवर्त्तीच लिगटल्या । तया दिव्य रूपा आपुल्या । झणें आंधळ्या दाविशी ॥६७॥
जयां बाह्यविषय दृश्य केले । ऐसे मांसमय जे मानवी डोळे । तयां दिव्य रूपाचे सोहळे । प्रत्यक्ष गोपाळें न करावे ॥६८॥

जन्म ते मय्यसौ पापो मा विद्यान्मधुसूदन । समुद्विजे भवद्धेतोः कंसादहमधीरधीः ॥२९॥

कां प्रार्थितेसि म्हणसी ऐसें । तरी ऐकावें हृषीकेशें । पूर्वबाळांच्या हननत्रासें । मानस पिसें कंसभयें ॥६९॥
तरी माझी इतुकी विज्ञापना । अवश्य ऐकावी मधुसूदना । जे माझिये पोटीं तुझ्या जनना । या दुर्जना न कळों दे ॥५७०॥
तुज निमित्तचि श्रीमुरारि । जातमात्रचि बाळकें मारी । तो तुझें जन्म कळल्यावरी । दुराचारी क्षोभेल ॥७१॥
तुझें देखोनिया वदन । विसरलें पूर्वील दुःख गहन । आतां कंसभयास्तव उद्विग्न । तुजलागीं जाण होतसें ॥७२॥
मी निर्गुण निर्विकारी । ऐसें तुज कळलियावरी । कां भयभीत अंतरीं । ऐसें श्रीहरि जरि म्हणसी ॥७३॥
तरी मी अधीरधी मुरारि । सप्रेममयतेचिये भरीं । तुजलागीं सबाह्य घाबरी । भय शरीरीं उदेलें ॥७४॥

उपसंहर विश्वात्मन्नदो रूपमलौकिकम् । शङ्खचक्रगदापद्मश्रिया जुष्टं चतुर्भुजम् ॥३०॥

तरी माझिया भयाचिये निवृत्ति । इतुकी ऐसें माझी विनति । विश्वात्मका विश्वमूर्ति । परंज्योति परब्रह्मा ॥५७५॥
तुझें रूप हें अलौकिक । जें नेणती ब्रह्मादिक । शंखचक्रगदाब्जक । सायुध सम्यक् चतुर्भुज ॥७६॥
दिव्यालंकारांची शोभा । सायुधें वीरश्रीची प्रभा । मुखश्रीच्या लावण्यलाभा । कोटि मन्मथ सांडणें ॥७७॥
श्रिया जुष्ट लावण्यराशि । सालंकार सायुधेंशीं । चतुर्भुज आदिरूपासी । अंतर्धानासी पाववीं ॥७८॥
म्हणसी माझिया दिव्य रूपा । पहावया शिवादि करती तपा । तो तुज पुत्रत्वें झालिया सोपा । गोप्य कां पां करविसी ॥७९॥
एणें रूपें मी पुत्र होतां । पावसी लोकत्रयीं श्लाघ्यता । झणें म्हणसी हे अनंता । ऐक तत्त्वता यदर्थीं ॥५८०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP