अध्याय ३ रा - श्लोक १ ते ३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - अथ सर्वगुणोपेतः कालः परमशोभनः । यह्येवाजनजन्मर्क्षं शान्तर्क्षग्रहतारकम् ॥१॥

गर्भी स्तवूनि श्रीभगवान । स्वधामा गेलिया सुरगण । तेव्हां सकलमंगलायतन । काल शोभन सुखतर ॥४४॥
त्या काळाचें विशेषण । आठां श्लोकीं शुक भगवान । वाखाणील तें निरूपण । श्रोते सज्जन परिसोत ॥४५॥
सर्वसद्गुणीं सालंकृत । शोभनकाळ जेव्हां प्राप्त । देवकीगर्भी रमाकांत । आविरासीत् तत्समयीं ॥४६॥
अजन म्हणजे विष्णु जाण । त्यापासून याचें जनन । अजनजन्मा हें अभिधान । यालागून विधीचें ॥४७॥
तें ब्राह्मर्क्ष रोहिणी । परमशोभन सकळ गुणीं । निर्वेध सकळ तारकागणीं । शुभग्रहगणीं वीक्षित ॥४८॥
विराजपुरुष नारायण । तो सृष्टीचा सृजनाभिमान । तयापासोनि ज्याचें जनन । तो प्रजापति जाण अजानजन्मा ॥४९॥
तो नक्षत्रदेवता प्रजापति । म्हणोनि प्राजापत्य ऐसें म्हणती । एवं रोहिणीची व्युत्पत्ति । दोहीं रीतीं उपजविली ॥५०॥
अजनशब्दें आदिपुरुष । विराज तयाचा अंशविशेष । हें कळावें श्रोतयांस । द्विरुक्तीस हें मूळ ॥५१॥
वर्त्तमानयुग द्वापर । विरोधीनामसंवत्सर । वर्षाऋतु अयन अपर । दक्षिणायन ज्या नाम ॥५२॥
श्रावणमास पक्ष बहुल । जयाष्टमी जयदशीळ । वंशाभिमानी वासरमेळ । बुध निर्मळ चंद्रज ॥५३॥
रोहिणी नक्षत्र वज्र योग । कौलवकरणाचा संयोग । उत्तम लग्न उत्तमांग । सिंहीं भग शशी उक्षीं ॥५४॥
जेव्हां हरीचा जन्मकाल । काळासी सुखाचा सुकाळ । होऊनि सर्वांगें अनुकूळ । जन्मकाळ तो साधी ॥५५॥
कोण्ही अतिचार कोण्ही वक्र । शुभग्रहीं पातले खेचर । उच्चासनीं बैसोनि चंद्र । घे जुहार सर्वांचा ॥५६॥
गुरुतल्पकें सलांछन । वंशीं जन्मतां त्रीभगवान । होऊनि जगत्पूज्यपावन । उच्चासन स्वीकारी ॥५७॥
केंद्रीं आणि उच्चस्थानीं । राज्यभुवनीं कां स्वसदनीं । होऊनि शुभ फळाचे दानी । केला ग्रहगणीं उत्साह ॥५८॥
लग्नीं ग्रह अनुकूळ सकळ । होरा द्रेष्काण निर्मळ । सप्तांश नवांश द्वादशांश अमळ । शुद्ध सफळ त्रिंशांश ॥५९॥
सिद्धा दशा सिद्धिदा पूर्ण । शुभग्रहांचें लग्नेक्षण । बळें उपबळें भावसाधन । जातकाभरण हरिजन्म ॥६०॥
अब्दादिक पाहतां मुळीं । वृथा न म्हणावी वाचाळी । शंका जालिया हृदयकमळीं । भविष्योत्तरीं पाहिजे ॥६१॥
काळें आपुलिया कल्याणकार्या । श्रीकृष्णाच्या जन्मसमया । अलंकारिलें तें कुरुवर्या । सौभद्रतनया परियेसीं ॥६२॥

दिशः प्रसेदुर्गगनं निर्मलोडुगणोदयम् । मही मङ्गलभूयिष्ठपुरग्रामव्रजाकरा ॥२॥

दिशा सुप्रसन सकळ । गगन निरभ्र निर्मळ । उदय पावला तारकामेळ । वर्षाकाळ असतांही ॥६३॥
मंगलभूयिष्ठ जाली धरा । खेटखर्वटपत्तनपुरां । घोषग्रामव्रजा आकरा । बळेंचि घरा श्री आली ॥६४॥
मंगलोत्साह घरोघरीं । शोभनानंद नगरोनगरीं । दुःख शोक दोष दरिद्री । सुखसागरीं बुडाले ॥६५॥
हृदयशल्यें विरोनी गेलीं । ब्रह्मानंदें मनें निवालीं । सहृद्भावें प्रेमाथिलीं । भूतें भूतळीं परस्परें ॥६६॥
अद्यापिही भक्तांहृदयीं । आविर्भवतां शेषशायी । ऐशा चिन्हांची नवाई । सर्वां ठायीं उमटते ॥६७॥
मुखीं स्वयंभ नामावळि । हृदयीं ध्यानें ठसावलीं । दृष्टि हरिरंगें रंगली । वोरंगली भवभानीं ॥६८॥
आंगीं क्षमेचीं बाणलीं त्राणें । माजी दयेचें बैसलें ठाणें । स्वधर्माचरण अलंकरणें । सर्वही करणीं लेइलीं ॥६९॥
नगरोनगरीं घरोघरीं । प्रतिशरीरीं सर्वांतरीं । ब्रह्मानंदाचिये गजरीं । गोष्टी दुसरी हारपली ॥७०॥
आला जाणोनि प्राणवल्लभ । आलिंगनाचा लक्षूनि लाभ । पतिव्रतेचा विरहक्षोभ । समारंभ जेवीं करी ॥७१॥
तैसें भूयिष्ठ सर्वत्र सर्वीं । सालंकृत धरादेवी । निजनाथाची प्रेमपदवी । कोण्हा न वदवी प्रकटत्वें ॥७२॥
श्रीकृष्णाचा जन्मकाळ । तेणें आनंदभरित जळ । सर्वभूतात्मा गोपाळ । सुखसुकाळ सर्वांसी ॥७३॥

नद्य प्रसन्नसलिला ह्रदा जलरुहश्रियः । द्विजालिकुलसंनादस्तबका वनराजयः ॥३॥

नद्या वाहति प्रसन्नजळें । शुद्धसत्त्वात्मकें सुविमळें । त्यजिलीं रजतमाचीं डहुळें । शुद्धमेळें ज्याचेनी ॥७४॥
डोहो भरले अगाधसलिलीं । अनुभवाची अगाध खोली । माजीं पंकजें विकासलीं । जीं सेविली सद्भ्रमरीं ॥७५॥
नीलोत्पलें श्वेतोत्पलें । कुमुदें कल्हारें निर्मळें । कुशेशयें हेमकमळें । रातोत्पलें रत्नाभ ॥७६॥
इंद्रोत्पलें गजोत्पळें । मल्लिका सरसिजें कुड्मळें । श्रीशतपत्रें सहस्रदळें । सुपरिमळें मघमघति ॥७७॥
पद्माप्राणेश्वराचे जन्म । म्हणोनि पद्मेसि आनंद परम । तिनें अलंकारिलें धाम । पद्माराम पद्माकर ॥७८॥
मानसादि सरोवरें । भागीरथ्यादि सरितातीरें । पुष्करपृथूदकादि अपरें । पुण्योदारें सुतीर्थें ॥७९॥
एवं सर्वही जलाशय । श्रिया जुष्ट आनंदमय । तेथ द्विजकुलांचे समुदाय । त्रिदशप्राय संतुष्ट ॥८०॥
अनंत तपें तपूनि मुनि । जन्म पावले पक्षियोनीं । श्रीकृष्णाचें जन्म भुवनीं । देखों नयनीं याहेतु ॥८१॥
गंधर्व जन्मले भ्रमरकुळीं । श्रीकृष्णावतार भूमंडळीं । तया सुखाची नवाळी । सुकृतबहळीं सेवावया ॥८२॥
जंववरी कृष्णावतारचरित्र । तंववरी तृणादि प्राणिमात्र । अपारपुण्यें धरोनि गात्र । कैवल्यपात्र पैं जालें ॥८३॥
गंधर्व स्तविती सामगायनीं । मुनीश्वरांच्या वेदध्वनि । तैसे द्विजालिकुळांचे पंकजवनीं । मधुरध्वनि विराव ॥८४॥
ऐशा सनाद नाना गुच्छ - । पंक्ति शोभा दाविती स्वच्छ । हरिप्रेमापुढें तुच्छ । इहामुत्रेच्छ नेच्छिती ॥८५॥
भूमि जळ आणि आकाश । तिहीं भूतांचा कथिला तोष । आतां वायु आणि जो हुताश । त्यांचा विशेष मुनि बोले ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP