मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १५५१ ते १६००

करुणासागर - पदे १५५१ ते १६००

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


दयासिंधो जगन्निवासा । आहे तुझा भरंवसा ॥ शरण आलों आपले दासा । भेट देईं मज देवा ॥५१॥
मी अत्यंत कुश्चळ । कैसा तरी तुझें बाळ ॥ आतां मातें शीतळ । करीं वेगीं सर्वज्ञा ॥५२॥
माझीं पातकें अन्याय । नको पाहूं दत्तात्रेय ॥ नमन करितों दाखवीं पाय । आतां दयाळा सर्वज्ञा ॥५३॥
तुतें सर्वथा शरण असतां । तुझा भरंवसा धरितां ॥ माझी दुर्दशा करितां । संकोच तुतें असावा ॥५४॥
एवढी निष्ठुरता वरावी । माझी दुर्दशा करावी ॥ ऐशी कुश्चित हीन पदवी । योग्य नाहीं तुज देवा ॥५५॥
नाशिवंत माझी काया । बुद्बुदापरी जाईल विलया ॥ प्रयत्न करिसी दत्तात्रेया । शरण असतां नाशाचा ॥५६॥   
तूं जगातें पोषिसी । शरणागतातें पाळिसी ॥ माझाच कैसा संहार करिसी । उपासी ठेवोनी ॥५७॥
प्रणतदुःख निवारिसी । शरणागतातें बुद्धि देसी ॥ सर्वज्ञ म्हणोनि दाखविसी । मार्ग शरणागतातें ॥५८॥
मी भाकित असतां करुणा । माझी नायकसी दयाघना ॥ शरण असतां तुझे चरणा । कैसें मातें मोकलिशी ॥५९॥
जेणें माझें कल्याण होई । ऐसी मातें बुद्धि देईं ॥ जेणें प्रत्यक्ष तुझें पायीं । ठेवीन माथा ॥१५६०॥
मी तुझे आधीन आहें । हातीं धरोनि माझी बाहे ॥ माझे हातें करवीं पाहें । रुचेल तैसें ॥६१॥
प्राणिमात्राचें सूत्र । तुझे हातीं स्वतंत्र ॥ मी तों सर्वथा तुझेंच तंत्र । आहें आतां ॥६२॥
मालिकाचे वंदितों पाये । धन्यातें शरण आहें ॥ सर्वथा स्वामींचे स्वाधीन आहें । लज्जा माझी सद्गुरूतें ॥६३॥
माझे गुण दोष गणिसी । तरी विरुद्ध कर्म करिसी ॥ जरी क्षमावंताचा अससी । शिरोमणी ॥६४॥
मी कोणता योग करावा । कोणता प्रकार योजावा ॥ कोठें कैसा रहावा । देह माझा ॥६५॥
माझी मती खुंटली । स्फुर्ती चालेनासी झाली ॥ आतां माझी योजना केली । पाहिजे स्वामीतें ॥६६॥
निराधार पक्षहीन । सर्वथा तुतेंच आहें शरण ॥ देवा आतां माझा प्राण । जावयाची वेळ हे ॥६७॥
सर्वज्ञ दयाळा पेशा समयीं । आतां मातें बुद्धि देईं ॥ जेणें माझे सद्गुरू आई । प्रत्यक्ष आतां भेटसी ॥६८॥
घेईं आतां समाचारू । सर्वथा करितों नमस्कारू ॥ नको लावूं उशिरू । सर्वज्ञ देवा ॥६९॥
देवा आजच समय आहे । आतां विलंब लावूं नये ॥ सांग कांहीं सद्गुरू माये । उपाय जेणें भेटसी ॥१५७०॥
कांहीं माझा कावू आहे । किंवा सर्वथा नोहे ॥ सर्वज्ञ देवा शोधूनि पाहे । ठाऊक आहे तुज सर्व ॥७१॥
आतां देवा माझी गती । सर्वथा तुझेच आहे हातीं ॥ दयाळा माझी विपत्ती । न करीं तुतें शरण मी ॥७२॥
जरी बरें वाईट झालें कांहीं । सर्वथा मजकडे नाहीं ॥ मी तों सर्वज्ञ स्वामींचे पायीं । पडलों सत्य ॥७३॥
आतां व्हावा तैसा प्रकार करीं । सर्वथा माझा अभिमान धरीं ॥ प्रत्यक्ष येऊनि अंगिकारीं । तुझा आहें म्हणोनीं ॥७४॥
मज कोणाचेही आधीन । न करीं आतां नारायण ॥ तुझा आहें प्रत्यक्ष चरण । दावीं आतां सर्वज्ञा ॥७५॥
माझें धैर्य पौरुष बळ । अंतरींची हळहळ ॥ हित जाणोनि दयाळ । उचित असेल तें करावें ॥७६॥
आतां देवा माझी लज्जा । अंगें रक्षीं सर्वज्ञराजा ॥ कैसा तरी आहें तुझा । पुत्र सेवक शिष्य मी ॥७७॥
आतां विशेष बोलूं काय । सर्वज्ञा तुझे वंदितों पाय ॥ सद्गुरुराया दत्तात्रेय । धांव घालीं समर्था ॥७८॥
तुझे ब्रीदांची आशा । धरोनि शरण आलों जगदीशा ॥ माझी दुर्गती दुर्दशा । न करीं आतां दयाळा ॥७९॥
धांव भक्तरक्षका । शरणागताचे पाळका ॥ सकळ दुःखनाशका । दत्तात्रेया सद्गुरो ॥१५८०॥
आतां कोणती अवधी पाहसी । सर्व कांहीं जाणसी ॥ कोणता दुर्विचार करिसी । समर्थ दयाळा सर्वज्ञा ॥८१॥
तुझा आहें तुझाच आहें । आतां मजकडे पाहें ॥ सांग आतां करूं काये । विश्वंभरा सद्गुरो ॥८२॥
ऐशा प्रसंगीं दत्तात्रेया । कोणास नाहीं माझी दया ॥ धांव आतां सद्गुरूराया । तुझा आहें सर्वज्ञा ॥८३॥
अशा प्रसंगीं केशवा । काय करूं मी तुझी सेवा ॥ माझी अवस्था दत्तदेवा । ठाऊक आहे तुज सर्व ॥८४॥
तुझा महिमा ऐकिला । म्हणोनि तुझा आश्रय केला ॥ न करीं माझा कंटाळा । दयासिंधो सद्गुरो ॥८५॥
ऐसिये विपत्तिचे ठायीं । काय करूं मी सद्गुरू आई ॥ अजूनि पाहसी काई । सर्वज्ञ दयाळा ॥८६॥
माऊली वांचोनि कांहीं । कोणास कींव येणार नाहीं ॥ दत्तात्रेया माझे आई । तूंच मातें कुरवाळीं ॥८७॥
तुतें करितों विनवणी । शरण आलों तुझे चरणीं ॥ आतां कोणाची मनधरणी । माझे हातीं करविसी ॥८८॥
तुझे मुखाकडे पाहतों । तुतेंच करुणा भाकितों ॥ तुतेंच काकुलती येतों । समर्थातें सर्वज्ञा ॥८९॥
सर्वज्ञाची कास धरिली । समर्थें माझी दुर्दशा केली ॥ सर्वज्ञ देवा कोठें गेली । अपार करुणा समदर्शी ॥१५९०॥
सर्वज्ञ देवें माझे वेळे । अनंत कर्णीं घातले बोळे ॥ समर्थ असतां झांकिले । अनंत डोळे ॥९१॥
माझा आतांच अंगिकार करितां । तुज अशक्य नाहीं समर्था ॥ तुझा नांवलौकिक समर्था । जाणार नाहीं सर्वज्ञा ॥९२॥
आतां कैसें हृदय दावूं । अनंत बळाचे अनंत बाहू ॥ दुःखसागरीं कैसें वाहूं । देती शरणागतातें ॥९३॥
तूं कैवल्यानंद अससी । तुज द्वैत नाहीं सुखरासी ॥ तथापि शरणागताचे कौतुकासी । करूं जाणसी अभिज्ञा ॥९४॥
तुम्हीं निजानंदीं रमावें । एकाकीच रमावें ॥ मग दुःखितानें शरण जावें । कोणास देवा ॥९५॥
सुखरूपी तो सुखीच आहे । परी दुःखित दुःखचि भोगी पाहे ॥ जेणें माझें दुःख जाये । ऐसें कांहीं करावें ॥९६॥
देवें मज कांहीं । सर्वथा उणें केलें नाहीं ॥ जें द्यावें तें सर्वही । दिधलें तुम्हीं ॥९७॥
तथापि माझें समाधान । नाहीं नाहीं नारायण ॥ शरण तुतें वंदितों चरण । धांव आतां सद्गुरो ॥९८॥
तूं सर्वज्ञ आहेसी । लोकत्रयीं नांदसी ॥ विलंब आतां गुणराशी । नको लावूं सद्गुरो ॥९९॥
दोन्ही जोडुनि कर । पायीं तुझे ठेविलें शिर ॥ दर्शन देईं सत्वर । दत्तात्रेया तुझा असें ॥१६००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP