मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १३५१ ते १४००

करुणासागर - पदे १३५१ ते १४००

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


मी दीन तुझा शिष्य आहें । चिंताडोहीं बुडलों पाहें ॥ सद्गुरू तुझे वंदितों पाये । मार्ग तुझा दाखवीं ॥५१॥
मातें ऐसी बुद्धी देईं । जेणें भेटेल सद्गुरु आई ॥ माझी करुना येऊं देईं । सर्वज्ञ देवा ॥५२॥
जेथें तुझी होईल भेट । तेथें नेईं मातें नीट ॥ तुज व्हावी तैसी खटपट । करवीं आतां ॥५३॥
तेच करवीं माझे हातीं । जेणें तुझे चरण भेटती ॥ मायबाप कमळापती । कष्टी न करीं मज आतां ॥५४॥
मी तुझे आधीन आहें । आतां मजकडे पाहें ॥ माझी अवस्था कठीण आहे । सर्वज्ञ राजा समर्था ॥५५॥
सद्गुरुराजा आजच येईं । कृपाळूपणें पदरांत घेईं ॥ माथा ठेविला तुझे पायीं ॥ सर्वज्ञाच्या ॥५६॥
जो ज्याचा शरण असे । त्यास त्याची लज्जा असे ॥ शरणागतातें कोणी न त्रासे । समर्थ असतां सर्वज्ञा ॥५७॥
मी तुतें शरण आहें । तूं समर्थ अससी पाहें ॥ सर्व तुज ठाऊक आहे । उपेक्षा माझी न करीं तूं ॥५८॥
लोकीं राजे असती । ते शरणागतातें नेणती ॥ दाद लागेना श्रीपती । एकाएकीं ॥५९॥
येथें दाद लागेना । क्षुद्र राजा जाणेना ॥ मग लक्ष्मीपतीपासीं जाणा । दाद कैसी लागेल ॥१३६०॥
कोठें ब्रह्मांडांचा पती । कोठें पतीत मंदमती ॥ कोठें माझी विनंती । आयकेल देव ॥६१॥
ऐसी मातें शंका । सर्वथा नाहीं श्रीनायका ॥ सर्वज्ञ स्वामी माझ्या हाका । ऐक सत्य ॥६२॥
क्षुद्र राजे मदांध असती । अति उन्मत्त अल्पमती ॥ दुःख पराव्याचें नेणती । अज्ञान ते ॥६३॥
तुझा तैसा प्रकार नाहीं । तूं सर्वज्ञ समर्थ अससी पाहीं ॥ समदर्शी दयाळू देव कांहीं । उपेक्षीना सर्वथा ॥६४॥
ऐसें हृदयीं जाणोनी । शरण आलों चक्रपाणी ॥ आतांच येईं धांवोनि । नमन करितों सद्गुरो ॥६५॥
तूंच माझा प्राणप्रिय । तूं विश्रांति अक्षय ॥ सर्व कांहीं दत्तात्रेय । तूंच माझें ॥६६॥
तुझें दर्शन इच्छितों । नित्य तुझे अपराध करितों ॥ नाना दोष आचरतों । विरुद्ध कर्म ॥६७॥
आचरण तों ऐसें । साधन पाहतां शून्य असे ॥ आतां देवा करूं कैसें । आशा मोठी धरिली म्यां ॥६८॥
आतां तुझी भेट व्हावी । माझी आशा पुरवावी ॥ ऐसी कृपा करावी । शरण आलों म्हणोनी ॥६९॥
देवा माझा कांहीं । सर्वथा उपाय नाहीं ॥ नमन करितों तुझे पायीं । लज्जा माझी रक्षावी ॥१३७०॥
एक शरण आल्याचीच लाज । धरोनि देवा रक्षीं मज ॥ जाणोनि माझें हृद्गुज । आशा पुरवीं सर्वथा ॥७१॥
सर्वथा तुझेच पायीं पडतां । काय छळिसी कृपावंता ॥ मातें रक्षावें समर्था । आपला जाणोनी ॥७२॥
माझी तों क्षुद्र करणी । दयाळू तूं माझा धणी ॥ लोटांगण घालीं तुझे चरणीं । पाव आतां सर्वज्ञा ॥७३॥
विलंबाचा समय । आतां नाहीं दत्तात्रेय ॥ वेगीं धांवोनि अभय । देईंच देवा ॥७४॥
आतां कोणत्या युक्तीं । विनंति करूं मी सरली शक्ती ॥ सेवा माझी विमुक्ती । करीं दुःखापासोनी ॥७५॥
सद्गुरुराया आतां येईं । तुज पाहिजे तेथें मातें नेईं ॥ माझा समाचार घेईं । सर्वज्ञ दयाळा समर्था ॥७६॥
कधीं येईल ते वेळा । तुझे चरण पाहीन डोळां ॥ तुझे सेवेचा सोहळा । भोगवीं आतां ॥७७॥
एवं सोहळा भोगावा । ऐसा नाहीं पूर्व ठेवा ॥ तथापि नमितों सद्गुरुदेवा । हाच माझा ठेवा असे ॥७८॥
सद्गुरु माझें प्रारब्धकर्म । सद्गुरु माझा सकळ धर्म ॥ सर्व कांहीं सुकृत धर्म । सद्गुरूच माझा ॥७९॥
माझें जें जपादि साधन । सर्व तप अनुष्ठान ॥ सर्व कांहीं सद्गुरुचरण । आहेत माझे ॥१३८०॥
मी सर्वथा प्रारब्धहीन । परी सद्गुरूतें आहें शरण ॥ सद्गुरूचेच आधीन । आहें आतां ॥८१॥
जरी मी प्रारब्धाचा खोटा । परी सद्गुरु माझा समर्थ मोठा ॥ यद्यपी भाग्यहीन करंटा । तथापि लज्जा सद्गुरूतें ॥८२॥
मज तप जप रुचेना । योग साधन आवडेना ॥ आलस्यें कांहींच घडेना । स्नान संध्या व्रत नेम ॥८३॥
ऐसा मी कुश्चळ । फुटकें माझें कपाळ ॥ परी सद्गुरूतें वेळोवेळ । नमस्कार करीं ॥८४॥
आहें सद्गुरूतेंच शरण । सद्गुरूचेंच करितों स्मरण ॥ सद्गुरूचाच भरंवसा धरोन । बैसलों मी ॥८५॥
जळो प्रारब्धाची आशा । जळो साधनांचा भरंवसा ॥ लागलों सद्गुरूचे कासा । सद्गुरु माझा आधार ॥८६॥
सद्गुरूच माझी आई । पडिलों सद्गुरूचेच पायीं ॥ आतां सद्गुरूतेंचि कांहीं । करणें माझें ॥८७॥
सर्व कांहीं माझी चिंता । सर्व वाहे सद्गुरु दाता ॥ माझा भार वाहे माथां । आपला जाणोनि ॥८८॥
देवा सद्गुरु दयाळा । माझा प्राणांत समय आला ॥ अवकाश नाहीं राहिला । धांव आतां सर्वज्ञा ॥८९॥
देवा झाली विपरीत दशा । न करीं माझी निराशा ॥ अग्नि लागला दाही दिशा । ठाव नाहीं मज कोठें ॥१३९०॥
लोक दरिद्री असती । देशीं विदेशीं जाती ॥ खाती जेविती राहती । आपुलाले प्रकारें ॥९१॥
संपत्ति अथवा विपत्ति । सुखदुःख सारें भोगिती ॥ दिवस आपुले सारिती । आयुष्याचे ॥९२॥
तैसे दिवस मी काढावे । ऐसा माझा प्रकार नव्हे ॥ सर्व तुतें ठाऊक आहे । सर्वज्ञ देवा ॥९३॥
भिक्षा मागोनि खावें । अथवा अयाचित घ्यावें ॥ जनीं वनीं रहावें । देशीं विदेशीं आनंदें ॥९४॥
सुखदुःख भोगावें । सद्गुरूतें भजावें ॥ संतसंगें असावें । निरंतर ॥९५॥
अन्नवस्त्रास कांहीं । सद्गुरू उणें करणार नाही ॥ अशा प्रकारें पाहीं । कोठें तरी असावें ॥९६॥
हें सर्व सत्य आहे । परी राहवेना करूं काये ॥ सर्व कांहीं सद्गुरुमाये । ठाउकें तुज ॥९७॥
आजपर्यंत राहिलों । परंतु सर्वत्र भागलों ॥ दुःखीच असतां दयाळो । काळ गेला ॥९८॥
संपत्ति विपत्ती भोगिली । जनी वनीं वस्ति केली ॥ परंतु दुःखीच राहिली । स्थिती माझी ॥९९॥
जैसा कोणाचा बळी देती । आधीं न्हाऊं जेऊं घालिती ॥ तैसी माझी कमळापती । वर्तणूक समजावी ॥१४००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP