मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे ११०१ ते ११५०

करुणासागर - पदे ११०१ ते ११५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


मी जरी आहें पामर । परी तुझाच आहें किंकर ॥ आतांच माझा समाचार । धांवोनि घेईं सर्वज्ञा ॥१॥
माझें धैर्य माझें पौरुष । माझी करणी माझे दोष ॥ माझी मूर्खता विशेष । सर्व जाणसी गोविंदा ॥२॥
सर्व कांहीं जाणसी । ऐसें असतां सत्त्व पाहसी ॥ दयालू असतां कष्ट देसी । शरणागतातें हें काय ॥३॥
सर्वज्ञ असतां मौन्य धरिसी । समर्थ असतां उपेक्षा करिसी ॥ पाहत असतां डोळे झांकिसी । सद्गुरुराया हें काय ॥४॥
कांहीं केल्या राहवेना । कैसें करूं मी नारायणा ॥ जाणसी तूं अंतरखुणा । सर्वसाक्षी सर्वज्ञा ॥५॥
आतां माझा तूंच वाली । तूं माझी माउली ॥ निजकृपेची साउली । करीं आतां सर्वज्ञा ॥६॥
माझी दशा कैसी झाली । सर्व तुतें कळों आलीं ॥ यांत माझी बुद्धी गेली । पाहिजे तें म्हणावें ॥७॥
मी काय करूं आतां । मज चैन नाहीं लक्ष्मीकांता ॥ माझें दुःख नाशकर्ता । तूंच अससी सर्वज्ञा ॥८॥
तुतें सर्वथा आहे शरण । करीं माझें समाधान ॥ करितों साष्टांग नमन । तुझे चरणीं दयाळा ॥९॥
कोट्यावधी कष्टी असती । लक्षावधी हाका मारिती ॥ मरती वांचती भोगिती । आपलें कर्म ॥१११०॥
त्यांत एक तूंही अससी । मरसी अथवा वांचसी ॥ आपलें कर्म भोगिसी । ऐसें मातें न म्हणावें ॥११॥
त्यांत मजला न लेखावें । मज आपलाच अंकित जाणाऎं ॥ शरण जाणोनि रक्षावें । आतांच मज ॥१२॥
सामान्य म्हणोनि उपेक्षूं नये । मूर्ख म्हणोनि छळूं नये ॥ मी तुझाच आहें तुझे पाये । सर्वभावें वंदितों ॥१३॥
मातें सर्व समान असती । समदर्शी ऐसी माझी ख्याती ॥ तूंचि एक मूढमती । काय अधिक ॥१४॥
ऐसें जरी म्हटलें । मज सामान्य जाणोनि लोटिलें ॥ तरी तुझेंच बोलणें तुतें घडलें । विरुद्ध देवा ॥१५॥
हा वद तो व्याघात झाला । विरुद्ध आलें आपल्याच बोला ॥ याचा विचार पुरता केला । पाहिजे स्वामी ॥१६॥
तुतें सर्व सारिखे । प्रल्हाद उद्धवासारिखे सखे ॥ लघू जाणोनि मजला पारखें । कैसें करिसी ॥१७॥
त्यांतें तत्काळ पोटीं धरिलें । मातें दूर लोटिलें ॥ म्हणोनि तुझेंचि बोलणें तुतें झालें । विपरीत पाहा ॥१८॥
म्हणोनि ऐसें बोलें । बहुतेकांतें कष्ट झालें ॥ बहुतेक जैसे वाहवले । तैसें मातें न करावें ॥१९॥
तूंच माझी गती । पायां पडतों रमापती ॥ फार अयेतों काकूळती । आतांच येईं सर्वज्ञा ॥११२०॥
कोठें माझी लघुता । कोठें तुझी चिन्मय सत्ता ॥ पाहीन म्हणतों रमाकांता । हे मूर्खता वाटे लोकांसी ॥२१॥
माझें वजन काय । पाहीन म्हणतों तुझे पाय ॥ तेही आतांच दत्तात्रेया याच वेळे ॥२२॥
जैसें श्वान अमंगळ । इच्छी पुरोडांश निर्मळ ॥ तैसा मी पापी केवळ । दर्शन इच्छी तुमचें ॥२३॥
आपलें पौरुष न पाहतां । आपलें आचरण न विचारितां ॥ पोरपणें रमाकांता । पाहीन म्हणतों आतांचि ॥२४॥
माझा अधिकार काये । मनोरथांचा पार नव्हे ॥ घटामाजी साठवूं पाहे । समुद्र जेवीं ॥२५॥
श्वानपुच्छाचा आश्रय केला । जेवीं सागर तरूनि गेला ॥ तैसे माझे दयाळा । साधन मनोरथ जाणावे ॥२६॥
नेम नाहीं धर्म नाहीं । तप नाहीं आचार नाहीं ॥ भक्ति भाव भजन नाहीं । मनोरथ एवढा धरिला म्यां ॥२७॥
मी आपली शक्ती । पाहिली नसतां विरक्ती ॥ एवढा मनोरथ रमांपती । धरिला आहे ॥२८॥
तोही आतांच येच वेळा । विलंब न लागतांचि दयाळा ॥ माझ्या हौसी सकळा । पुरविल्या पाहिजे ॥२९॥
खडक भुयीसीं संबंध । बीज पेरुनि कीडस्वाद ॥ जळेवीण पीक सिद्ध । साध्य व्हावें भजन ॥११३०॥
माझे सारिखा अनर्थी । इत्यंभूत मनोरथी ॥ आजपर्यंत कोणी अर्थी । नाहीं आला तुजपासी ॥३१॥
तुझा लौकिक ऐकिला । म्हणोनि तुतें शरण आला ॥ तूंही मनोरथ पुरवायाला । समर्थ अससी तैसाची ॥३२॥
तुझे ऐसे देण्यासी । माझे ऐसे मागण्यासी ॥ प्रसंग पडला हृषीकेशी । आतांच तुज ॥३३॥
आतां सार्थक व्हावें । माझे पूर्ण मनोरथ पुरवावे ॥ आणि तुतेंही कळों यावें । सामर्थ्य आपल्या देण्याचें ॥३४॥
उक्त प्रकारें दुर्घट पाहे । परी तुझें सामर्थ्य तैसेंच आहे ॥ ऐसेंचि जाणोनि तुतें पाहे । शरण आलों तुच्छ मी ॥३५॥
जरी ऐसा मी दुर्मती । तुतें शरण आलों श्रीपती ॥ माझे मनोरथ आतांच न पुरती । तरी गेलें ब्रीद साच तुझें ॥३६॥
सांग आतां नारायणा । काय केली योजना ॥ प्रसंग पडले तुतें नाना । परि ऐसा पडलाच नाहीं ॥३७॥
प्रसंग पडला याची सिद्धी । केलीच पाहिजे कृपानिधी ॥ आतां कांहींच अवधी । राहिली नाहीं सर्वज्ञा ॥३८॥
अजूनि तरी करसी कांहीं । धांव आतां पडतों पायीं ॥ सर्वज्ञा देवा सद्गुरु आई । आतांच येईं ॥३९॥
फार झाली जाचणूक । काय पहासी कवतुक ॥ जाणत असतां माझें दुःख । विलंब कैसा लाविसी ॥११४०॥
तूं म्हणसी तुज काय झालें । तरी तुतें सर्वही समजलें ॥ मीही तुतें निवेदन केलें । सर्वज्ञ देवा ॥४१॥
याहीवरि म्हणशील मातें । कीं वेडच लागलें तुतें ॥ विशेष केलें सर्वांपरतें । तुतेंच मी ॥४२॥
उत्तम नरदेह जाण । याहीवरी ब्राह्मण ॥ ब्रह्मविद्या पूर्ण । दिधली तुज ॥४३॥
अथायोग्य अन्न वसन । प्राधान्य प्रतिष्ठा मान ॥ करोनि ठेविला आपला प्राण । याहूनि काय असावें ॥४४॥
जें सुरनरां दुर्लभ असे । तें सर्व तुजपाशीं विलसे ॥ आतां तुतें लागलें पिसें । किन्निमित्त ॥४५॥
असावा शमदम्मदि अंगिकार । मुक्त असावें निरंतर ॥ करावा जगदुद्धार । निःसंगपणें ॥४६॥
प्रौढ वैराग्य असावें । निरभिमान वर्तावें ॥ मानापमानीं रहावें । तुल्य मन ॥४७॥
निंदा स्तुती समान । न पहावे मानापमान ॥ लाभ लाभ तुल्य जाण । असावे तुज ॥४८॥
जनी अथवा वनीं । अयाचित अथवा भिक्षा मागोनी ॥ कोरडें ओलें खावोनी । शांत असावें ॥४९॥
सुखदुःखप्राप्ती । संपत्ती अथवा विपत्ती ॥ असतां समान अंतरस्थिती । दृढ असावी ॥११५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP