मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १ ते ५०

करुणासागर - पदे १ ते ५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु परब्रह्मा । आत्मारामा पूर्णकामा ॥ भक्तवरदा आनंदधामा । दत्तात्रेया ॥१॥
अनंतनामा नामरहिता । सर्वरूपा सर्वातीता ॥ गति - भक्ति - ज्ञानदाता । दत्तदेवा ॥२॥
तूं असंग निरंजन । तूं विशुद्धज्ञानघन ॥ भावातीत परिपूर्ण । सदोदित ॥३॥
तूं देहत्रयविलक्षण । सर्वसाक्षी आपण ॥ सदा अससी भजकाभिन्न । सर्वेश्वरा ॥४॥
नित्यशुद्ध स्वयंबोध । नित्यमुक्त स्वतःसिद्ध ॥ नित्यानंद अगाध । अनंत तूं ॥५॥
तूं अज्ञानसाक्षी । ज्ञानकारणही अससी ॥ सर्वाधिष्ठान सर्वदेशीं । व्यापक तूं ॥६॥
जें मनवाणीतें अगोचर । सर्वशेष परात्पर ॥ तयातें मी रंक पामर । स्तवीन म्हणतों ॥७॥
जेथें निगम “ नेति नेति ” । “ तन्न तन्न ” बोलती ॥ तया दीन अल्पमती । काय वर्णूं ॥८॥
तथापि आवडी घेतली जीवें । बोबड्या शब्दें आळवावें ॥ माझें बोलणें आयकावें ॥ सर्वज्ञ देवा ॥९॥
तुझिये भेटीची धरूनि आस । केला संसाराचा नाश ॥ तुझेचि साठीं झालों उदास । सर्वत्र देवा ॥१०॥
पहावे तुझे पाय । म्हणोनि केले नाना उपाय ॥ ते सर्व झाले अपाय । सद्गुरु स्वामी ॥११॥
‘ वेदाभ्यासादि योगयाग केले । तेणें न देखिजे माझीं पाउलें ’ ॥ ऐसें गीतेंत आइकिलें । वचन तूझें ॥१२॥
तेंहि मज सामर्थ्य नाहीं । आतां करावें जी काई ॥ तथापि अनेक उपायीं । श्रमलों मी ॥१३॥
आतां उपायांची सीमा झाली । मनाची धांव मोडली ॥ देहाची अंतवेळा आली । सर्वज्ञ राया ॥१४॥
आतां आम्हीं काय करावें । कोठें कोठें फिरावें ॥ कोटःएं जाउनी मरावें । तुम्हांकरितां सद्गुरु ॥१५॥
माझें कर्तव्यज्ञान बुडलें । हें तुम्हांस सर्वही कळलें ॥ आतां मज सांभाळिलें । पाहिजे स्वामी ॥१६॥
आतां तुजवीण राहवेना । अंतरी फार झाली यातना ॥ आतांच येउनी समाधाना । केलें पाहिजे ॥१७॥
सर्वांचा माता पिता देख । तूंचि सर्वां स्वामी एक ॥ भक्तार्थ नानारूपधारक । तूंचि देवा ॥१८॥
ब्रह्मा विष्णु महेश । तूंचि झालासी सर्वेश ॥ परब्रह्म निर्विशेष । तूंचि देवा ॥१९॥
तूं सविता, तूं चंद्र । तूं प्रजापति, तूं सुरेंद्र ॥ तूंचि एकादश रुद्र । दत्त देया ॥२०॥
तूं ग्रह नक्षत्र तारागण । तूं सुर नाग गंधर्व आपण ॥ वरुण वायु परिपूर्ण । तूंचि देवा ॥२१॥
तूं सकळ जगव्द्यापक । सकळ जगाचा चाळक ॥ सकळ ब्रह्मांडनायक । तूंचि स्वामी ॥२२॥
तूंचि सेवक तूंचि स्वामी । तूं सकळांच्या अंतर्यामीं ॥ तूंच स्वाराम निजधामीं । रमतोसि देवा ॥२३॥
तूं गुरु, तूं शिष्य होसी । ब्रह्मज्ञानाचा उपदेश करिसी ॥ स्वतंत्र समर्थनाना विलासी । सद्गुरुराया ॥२४॥
तूं मत्स्यादि अवतार धरिसी । दुष्ट राक्षस संहारिसी ॥ निजभक्त प्रतिपाळिसी । गुरुदेवा तूं ॥२५॥
तूं अनंत रूपें धरिसी । अनंत नामें स्वीकारिसी ॥ नामरूपातीत अससी । निरंतर ॥२६॥
तूंचि अनादी अससी एक । तेथें मी कोठूनि आलों देख ॥ ऐसें पुसाल तरी कौतुक । तुमचेंच स्वामी ॥२७॥
जैसा मृत्तिकेंत घट असे । कां हे मीं नग दिसे ॥ तैसा मी शिष्य वसें । स्वरूपीं स्वामीचे ॥२८॥
जैसा जळीं तरंग दिसे । तंतूमाजी पट आभासे ॥ तैसा मी शिष्य नसोनि असें । स्वरूपीं तुमचे जी ॥२९॥
आम्हां स्वामीचा आधार । तुम्ही आमुचें सर्वसार ॥ स्वामीस करितों नमस्कार । एकभावें ॥३०॥
मी दास तूं राम स्वामी । मी शिष्य तूं गुरु अंतर्यामीं ॥ आम्हां विश्रांति तुझे नामीं । असे दयाळा ॥३१॥
मी तुसें अज्ञान बाळ । तूं माझा माता पिता बंधू सकळ । करीं माझा सांभाळ । दयाळूपणें ॥३२॥
तूं धेनू मी बाळ वत्स । मी चकोर तूं चंद्र स्वच्छ ॥ तूं जीवन मी दीन मत्स्य । सर्वज्ञराया ॥३३॥
तूं घन मी चातक । तूं पक्षिणी मी चक्षु - पक्ष हीन पिल्लुं देख ॥ तूं दाता मी भिक्षुक । भिक्षा मागें दर्शनाची ॥३४॥
मी अनाथ तूं अनाथनाथ । मी दरिद्री तूं श्रीमंत समर्थ ॥ भिक्षा मागतां मातें व्यर्थ । दवडूं नये सर्वज्ञा ॥३५॥
तूंचि माझें धन धाम । तूंचि माझा विश्राम ॥ तूंचि माझा पूर्णकाम । सखा त्राता सोयरा ॥३६॥
तूंच माझा देहप्राण । तूंच माझें इंद्रिय मन ॥ तूंच माझा आत्मा जाण । जिवींचा जीव ॥३७॥
तूं एकचि स्वयमेव ॥ मी शिष्य तुझेंच आडनांव ॥ तुजहून वेगळेपणासि ठाव । नाहींच मजला सर्वज्ञा ॥३८॥
म्हणोनी सर्वस्व आमुचें । हितगुजसुख अंतरींचें ॥ आहे सर्वज्ञ स्वामीचे । चरणाची सत्ता ॥३९॥
आम्हां तुजवीण थारा । कोठेंच नाहीं बोधसागरा ॥ आतां विलंब गुरुमाहेरा । लावूं नये सर्वथा ॥४०॥
मी तों अपराधचि मूर्तिमंत । तूं तों साक्षात् क्षमावंत ॥ काय पहासी सदसत् । गुणदोष आतां ॥४१॥
अपराध फार झाले । परी नमितों प्रणतवत्सलाचीं पाउलें । आतां स्वामी क्षमा केले । पाहिजेत सर्व ॥४२॥
मी तों अत्यंत आर्त देख । तूं प्रणतार्ति विनाशक ॥ नमन करितांही कौतुक । काय पाहसी सर्वज्ञा ॥४३॥
मी तो पातकांची राशी । तूं तो पतीतपावन होसी ॥ शरण येतांही अंत पाहसी । दीनदयाळा सद्गुरो ॥४४॥
मी तों हतभाग्यचि खरा । तूं अन्यथाकर्तुं समर्थ गुरुवरा ॥ मी दैवहीन म्हणोनि पाठमोरा । काय होसी दयाळा ॥४५॥
रंकाचा रजा करिसी । राजातें र्खत्व आणिसी ॥ मजविषयीं चौर्‍यांशीं । आणिली कां स्वामिया ॥४६॥
जरीं तूं कृपादृष्टी पाहें । तरी वीषचि अमृत होय ॥ म्हणोनि धरिले तुझे पाय । दीनबंधो सद्गुरो ॥४७॥
मृतातें जीवंत करिसी । काळाचाही काळ होसी ॥ मजविषयीं हृषीकेशी । सामर्थ्य कोठें गेलें तें ॥४८॥
तुझिये भ्रूभंगलेशें । त्रिलोकही क्षणांत नाशे ॥ तुझिये कृपाकटाक्षलेशें । अखंड लक्ष्मी होतसे ॥४९॥
ऐसा समर्थ आमुचा धनी । शिरीं जागा चक्रपाणी ॥ आमची पाहुनियां जाचणी । स्वस्थ कैसा राहिलासी ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP