मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १५१ ते २००

करुणासागर - पदे १५१ ते २००

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


कोणा हातीं निरोप धाडिला । कैसा वृत्तांत कळला ॥ मजविषयींच स्वामीला । निद्रा कैसी लागली ॥५१॥
गजेंद्राची हांक । कैसी आइकिली रमानायक ॥ माझेंच कैसें पाप देख । ओढवलें दयाळा ॥५२॥
माझा स्वामी आनंदघन । मी तों भोगितों कष्ट दारुण ॥ याची लज्जा करुणाघन । असो द्यावी सर्वज्ञा ॥५३॥
माझी हांक चक्रपाणी । कैसी न पडे तुझिये कानीं ॥ सर्वज्ञता काय हिरोनी । नेली कोणी समर्थाची ॥५४॥
कटाहास लागतां अग्निज्वाळ । तूंतें आठवी मंडूक बाळ ॥ तयातें रक्षिलें तत्काळ । सर्वज्ञनाथा ॥५५॥
उपमन्यूतें क्षीरसागर दिला । ध्रुव अचळपदीं बैसविला ॥ लाक्षागृहीं पांडवांला ॥ रक्षियेलें ॥५६॥
सुदाम्यातें कांचनपुरी । बिभीषणातें लंकानगरी ॥ सुग्रीवातें किष्किंधा हरी । दिधली स्वयें ॥५७॥
गजघंटेखालीं । पक्षिणीचीं बाळें रक्षिलीं ॥तीं कैसीं विदित झालीं । पांडुरंगा ॥५८॥
कित्येक वर्णावे पवाडे । समर्थाचें दळ वाडे ॥ वेदशास्त्रां मौन पडे । गुण वर्णितां अनंताचे ॥५९॥
अनंताचे अनंत गुण । कैसा वर्णूं xन दीन ॥ आतां आपलें दयाळुपण । प्रकट कीजे मजविषयीं ॥१६०॥
जरी माझे अपराधाचा । रागाचे आला तुज साचा ॥ वधचि करिसी शराणागताचा । तरी विनंति परिसावी ॥६१॥
लोकीं प्राणांत दंड करिती । परीतयाचें अभीष्ट देती ॥ ‘ इच्छा असेल तें माग ’ म्हणती । मध्यातें ॥६२॥
तेवीं माझा मनोरथ जाण । जाणोनियां करीं पूर्ण ॥ मग माझा घेईं प्राण । सर्वेश्वरा सद्गुरो ॥६३॥
माझें आर्ताचें बोलणें । जरी बोलिलों अधिक उणें ॥ हेंही स्वामी क्षमा करणें । कृपाळूपणें ॥६४॥
दोघे येतां शरण । एकास देणें अभयदान ॥ एकाचा घेसी प्राण । हें उचित कैसें समदर्शी ॥६५॥
ध्रुवादिकांतें वरदान । माझा घेसी जाणोनि प्राण ॥ ऐसें सांप्रत नारायण । कैसें मानलें ॥६६॥
आतां ‘ ध्रुवादिकांसी । बरोबरी करितोस कैसी ’ ॥ ऐसें म्हणाल तरी समदर्शी । नाम स्वामीचें ॥६७॥
ध्रुवादिकांचे तपकरणी गुण । मी हीणाहूनी हीण ॥ परी स्वामीतें समसमान । दोघे असती ॥६८॥
‘ ध्रुवादिकीं करणी केली । तेणें आपुली कृपा झाली ’ ॥ ऐसें म्हणाल तरी फळली । त्यांची करणी तयांतें ॥६९॥
मी कमाईचा हीन । माझी उपेक्षा करिशी म्हणोन ॥ तरी तुझें ब्रीद लाजिरवाण । होईल स्वामी ॥१७०॥
आम्हीं करणीचें दक्ष असावें । करणीचें फळ पावावें ॥ मग तुज शरण यावें । कासयासी ? ॥७१॥
मग तों करणीच फळली ॥ ऐसें होईल वनमाळी ॥ तेणें तुझी ब्रीदावळी । कैशी राहील दयाळा ॥७२॥
करणी करूनि शरण यावें । मग आपण अभय द्यावें ॥ ऐसें असतां ब्रीद वागवावें । हेंही अनुचित ॥७३॥
करणीची अपेक्षा कीजे । मग त्यातें अभय दीजे ॥ ऐशियानें कैशी साजे । ब्रीदावळी अनंता ॥७४॥
तूतें करणीची अपेक्षा नाहीं । तूं स्वयें तृप्त अससी पाहीं ॥ समदर्शी समर्थही तैसाच अससी वासुदेवा ॥७५॥
आतां कैसी करावी विनंती । कैसा येऊं जी काकुळती ॥ कैसी करावी तुझी तृप्ती । नित्यतृप्ता आनंदघना ॥७६॥
पूर्वीं शरणागतांनीं आळविलें । त्यांतें तात्काळचि अंगिकारिलें ॥ मातें कैसें उपेक्षिलें । दयासिंधो ॥७७॥
त्यांहीं स्तवनांत काय मेळविलें । तेणें स्वामीतें गोड झालें ॥ माझें फिकें लागलें । कासयानीं ॥७८॥
त्यांहीं भक्तियुक्त आळविलें । माझें कोअरडेंचि आळवणें झालें ॥ तेणें अधीक उणें गमलें । असेल कांहीं ॥७९॥
समर्थाचें घृतयुक्त भोजन । अनाथाचें कोरान्न ॥ दोन्ही तूतें समसमान । आहेस समदर्शी ॥१८०॥
जो यज्ञीं यज्ञभाग लाहे । तो विदुराच्या कण्या खाये ॥ कोरडे फके मारीत आहे । सुदाम्याच्या तांदुळांचे ॥८१॥
तैसें मी कोरडें अथवा ओलें । यथामतीनें आळविलें ॥ तेणें आतां संतुष्ट झालें । पाहिजेच स्वामी ॥८२॥
तूं आमुचा धनी समर्थ होशी । आम्हां दारोदार हिंडविशी ॥ मुखाकडे पाहविशी । दुसर्‍यांच्या ॥८३॥
मज अधैर्यासी धैर्य नाहीं । म्हणोनि घाबरा झालों पाही ॥ आतां धांव लवलाहीं । सर्वज्ञ दयाळू समदर्शी ॥८४॥
मी अपराधी म्हणोनी । बोभाट यावा तुझे कानीं ॥ रागें भरोनि तरी चापपाणी । स्मरण करीं अनाथाचें ॥८५॥
कैसा तरी सर्वज्ञ देवा । माझा वृत्तांत कळावा ॥ माझा समाचार घ्यावा । आंगें आपुल्या ॥८६॥
काय माझी ओळखी मोडली । किंवा माझी विस्मृती पडली ॥ कैसी माझी सांड केली । सद्गुरु माये ॥८७॥
आतां आम्हीं काय करावें । कोठें कोठें फिरावें ॥ वांचावें किंवा मरावें । हेंही सुचेना ॥८८॥
तुझी आशा मोठीच धरिली । कैसी निराशा करितोस वनमाळी ॥ यद्यपि नाहीं माझे कपाळीं । तथापि भरंवसा तुझा असे ॥८९॥
काय मशकें सागर शोषिला । हयगजचि गोष्पदांत बुडाला ॥ सर्वसमर्थानें त्याग केला । शरणागताचा ॥१९०॥
तुझा क्षीरसागर झाला कोरडा । काय वैकुंठावर पडला दरोडा ॥ किंवा झाला निःशेष झाडा । भांडारगृहाचा ॥९१॥
किंवा लक्ष्मी हिरोनि नेली । किंवा वनमाळा गहाण पडली ॥ काय कौस्तुभमणीची चोरी झाली । सांग देवा ॥९२॥
चिंतामणी फुटले । किंवा कल्पतरू वाळले ॥ कामधेनूचे समुदाय नेले । वळोनि कोणी ॥९३॥
सुदर्शनाची धार मोडली । किंवा गदा समुद्रांत बुडाली ॥ असिलता सामावली । पातळांत ॥९४॥
काय तुझें धनुष्य मोडलें । बाणाचीं झालीं शकलें ॥ अस्त्रप्रयोगाचें पडलें । विस्मरण ॥९५॥
पूर्वींचा स्वभाव केला । काय दुःसंगाचा गुण लागला ॥ उपेक्षिसी शरणागताला । सर्वज्ञ समर्थ असोनी ॥९६॥
अनंत राक्षस वधिले । तेणें हृदय कठीण झालें ॥ सखया कांरे टाकिलें । दूर मज ॥९७॥
किंवा मजविषयीं कोणी । कांहीं सांगितलें तुझिये कानीं ॥ तेणें मातें अव्हेरुनी । बैसलासी सर्वज्ञा ॥९८॥
आतां कैसा राहूं । कोणाचे मुखाकडे पाहूं ॥ कैसे तुझे पाय पाहूं । कोणत्या प्रकारें ॥९९॥
सर्वत्र स्फुरसी ऐकसी । सर्वांचें सर्व जानतोसी ॥ माझेच मनावर न घेसी । दयाघन तूं ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP