मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे ५०१ ते ५५०

करुणासागर - पदे ५०१ ते ५५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


यांत कांहीं न्यून झालें । विलंब लावूनि दर्शन दिलें ॥ तथापि न्यूनत्वचि आलें । ब्रीदावळीसी ॥१॥
आतांचि द्यावें दर्शन । आतांच द्यावें अभयदान ॥ तरीच माझे मनोरथ पूर्ण । केले ऐसें होईल जी ॥२॥
विलंब लावूनि दाविले पाय । तरी माझी हौस पुरली काय ॥ म्हणोनि आतांच माझी हायहाय । शांत करणे दयाळा ॥३॥
आतांच लागली तळमळ । काळांतरी करिसी शीतळ ॥ तरी कैसें घननीळ । व्हावें तैसें मिळावें ॥४॥
व्हावें तैसें आतांच देईं । देऊनि ठेवीं आपुले पायीं ॥ ह्याच प्रसंगीं सद्गुरू आई । हौस माझी पूर्ण करीं ॥५॥
क्षणक्षण काळ चालिला । अंतरीं लागली हे ज्वाळा ॥ दयासिंधो गोपाळा । शीतळ करणें आतांची ॥६॥
तूं कैवल्य कल्पतरु अससी । काय अशक्य समर्थासी ॥ पाहिजे तैसे पूर्ण करिसी । मनोरथ माझे सर्वज्ञा ॥७॥
भरंवसा धरोनि वाट पाहतों । जीवें भावें करुणा भाकितों ॥ शरण येऊनि विनंती करितों । मस्तक ठेवूनि पायांवरी ॥८॥
अंजुळी पसरोनि भिक्षा मागें । आतांच देईं आपुल्या अंगें ॥ सर्वज्ञ समर्था ऐसिया प्रसंगें । उपेक्षूं नको समदर्शी ॥९॥
थोडक्यासाठीं नारायणा । कासया करितोसि विटंबना ॥ फार भोगिल्या यातना । पाव आतां सद्गुरो ॥५१०॥
अनाथावरी क्षोभ करिसी । दीनावरी अस्त्र बांधिसी ॥ पायां पडतां लोटोनि देसी । योग्य कैसें दयाळा ॥११॥
मी तों सर्वस्वी अन्यायी । हात जोडॊनि पडतों पायीं ॥ आतां गुणदोष कायी । विचारिसी माझे ॥१२॥
तुझिये विरहग्राहें । ग्रासलों मी पाहसी काय ॥ धांव घालोनि लवलाहें । सोडवीं मज ॥१३॥
चिंताधामीण डसली । तेणें अज्ञानमूर्च्छा आली ॥ गुरू गारोड्या धांव घालीं । वेगें मातें वांचवीं ॥१४॥
भ्रमव्याळें गिळिलें । देवा कंठीं प्राण उरले ॥ चक्रधरा धांवोनि सोडविलें । पाहिजे आतां ॥१५॥
मोहांधकाराची रजनी । घोर जाळीं पडलों व्यसनीं ॥ सद्गुरू तूं प्रचंड तरणी । उदयास येईं दयाळा ॥१६॥
दुःखप्रळयहुताशन । चहूंकडे भडकला जाण ॥ कृपावलोकनाचे सिंचन । करीं वेगें दयाळा ॥१७॥
नाना क्लेशांचा सागर देखा । त्यांत बुडालों लक्ष्मीनायका ॥ आतां आपुली चरणनौका । दावोनि तारीं समर्था ॥१८॥
कितीक द्यावा परिवार । सर्व जाणसी अंतर ॥ करितों साष्टांग नमस्कार । सद्गुरूराया ॥१९॥
माझें दुःख तूंच जाणसी । कोणी न जाणे हृषीकेशी ॥ मातें तूंच तारिसी । दुःखसागरापासोनी ॥५२०॥
प्राण जायाची वेळा । सन्निध आली दयाळा ॥ अजूनि कैसा कळवळा । नये माझ्गा ॥२१॥
माझें काय काय पाहसी । मे तों अवगुणांची राशी ॥ वेयें काय निवडिसी । शुभाशुभ ॥२२॥
माझेसाठीं देवाधिदेवा । आपुला भांडार खर्चावा ॥ माझा अंजुळी भरावा । भिक्षा घालोनि उदारा ॥२३॥
भांडार तुझा असे पूर्ण । भिक्षा देतां नव्हे न्यून ॥ होऊं नको लोभाधीन । भिक्षा घालीं श्रीवरा ॥२४॥
आतां सोडावा आळस । बैसूं नको सावकाश ॥ मजविषयीं उदास । होऊं नको सद्गुरो ॥२५॥
तुम्हांस संकटीं पाडिलें । शरण येऊनि वंदिलीं पाउलें ॥ माझेसाठीं कुंठित झालें । सामर्थ्य सद्गुरूचें ॥२६॥
दैवहीन शरण आला । म्हणोनि मोठा विचार पडला ॥ कोठें जावोनि बैसला । चिंताक्रांत होउनी ॥२७॥
जरी ब्रीद गाजविलें नुसतें । कोणीच शरण न येतें ॥ मीही तें भोगिलें असतें । प्रारब्ध आपुलें ॥२८॥
तुझिये ब्रीदांचा महिमा । आयकिला पुरुषोत्तमा ॥ आशा धरोनि पूर्णकामा । भिक्षार्थी आलों तुजपाशीं ॥२९॥
सेवाहीन तुच्छ दीन । जाणोनि पापी साधनहीन ॥ देवा न देसी अभयदान । तरी माझें कोण असे ॥५३०॥
तुजवांचोनि सद्गुरूराया । कोणास येईल माझी दया ॥ समर्था तुझेच पायां । पडतों आतां ॥३१॥
दुःखी होतां अंतर । कोणी न घे समाचार ॥ देवा तूतें नमस्कार । करितों स्वामी ॥३२॥
दयासिंधो करुणाघना । समदर्शी पतितपावना ॥ दिनानाथ अससी जाणा । दत्तात्रेया तुज नमो ॥३३॥
सर्वतः स्फुरसी ऐकसी । सर्वांचा समाचार घेसी ॥ मातें कैसा न देसी । अभयदान ॥३४॥
कोणता राग आला । ममता लावूनि कापिसी गळा ॥ होऊं पाहसी मोकळा । मारूनि मज ॥३५॥
आधीं लाविलें सेवे । आतां आम्हीं कैसें राहावें ॥ कोठें जाऊनि पहावें । हृदयस्थासी ॥३६॥
देवा तूतें आळवितां । अंतकाळ झाला अनंता ॥ तूज आहे माझी ममता । दत्तात्रेया ॥३७॥
अत्यंत अंत पाहणें । तूतें नाहीं श्लाघ्यवाणें ॥ पायां पडतां लोटोनि देणें । योग्य नाहीं तुज गुरो ॥३८॥
आम्हीं कोणाचे मुखाकडे पहावें । कोणास काकुळती यावें ॥ कोणें मातें सांभाळावें । तुजवांचोनि ॥३९॥
एवढा करुणेचा सागर । कैसें द्रवेना अंतर ॥ करुणा भाकितां उशीर । फार झाला दयाळा ॥५४०॥
तुझिये निद्रेचे वेळां । येऊनि करितों गलबला ॥ म्हणोनि माझा कंटाळ । करितोसि काय ॥४१॥
नकळे कोणता राग आला । हांका मारितों वेळोवेळां ॥ आतां धांवणें दयाळा । सद्गुरू स्वामी ॥४२॥
तुम्हीं जरी त्याग केला । तरी माझा जन्मचि व्यर्थ गेला ॥ तुमचे ब्रीदासि लागला । बोल स्वामी ॥४३॥
तुज भक्त असती अनेक । परी मजला स्वामी तूंचि एक ॥ आतां विलंब रमानायक । लावूं नको दयाळा ॥४४॥
तूंचि माझा विश्राम होसी । तूंचि माझा आश्रय अससी ॥ तुझियेवांचोनि परदेशीं । पडलों देवा ॥४५॥
आतांचि अनाथनाथा । धांव घालीं सद्गुरू दत्ता ॥ तुझे पायीं ठेविला माथा । समर्थ देवा सर्वज्ञा ॥४६॥
देवा तुझा मी मूर्ख पुत्र । कामीक खोटा अपवित्र ॥ उपेक्षूं नको तुझेंच तंत्र । आहें आतां सद्गुरू ॥४७॥
मी तुझा दीन सखा । मातें लेखूं नको परका ॥ नमन करितों लक्ष्मीनायका । भेट देईं मज आतां ॥४८॥
देवा तुझा दीन दास । आतां देऊं नको त्रास ॥ नमस्कार जगन्निवास । करितों तुज ॥४९॥
नमस्कारावांचोन । आम्हीं काय करावें साधन ॥ काय द्यावें नारायण । जेणें प्रसन्न होसी तूं ॥५५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP