मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १४०१ ते १४५०

करुणासागर - पदे १४०१ ते १४५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


फाशी द्यावया नेती । त्यातें लाडू खाऊं घालिती ॥ जैसी त्याची स्थिती । तैसी माझी जाहली ॥१॥
नाना भोग भोगिले । परंतु मातें रोगचि गमले ॥ हें तुतेंच कळों आलें । सर्वज्ञातें ॥२॥
सुखी दुःखी दिवस गेले । परंतु मला तो कष्टचि झाले ॥ जेवी कारागृहीं राहिले । बंदीजन ॥३॥
तुम्हीं नाना भोग दिले । परंतु मातें सर्वथा नाहीं रुचले ॥ सौख्य नाहीं वाटलें । आण तुझी सर्वज्ञा ॥४॥
आतां मातें हृषीकेशी । अणिमादि संपत देशी ॥ तथापि माते दुःखराशी । आहे सर्व ॥५॥
तुजवांचोनि सर्व कांहीं । मातें दुःखदायक पाहीं ॥ दत्तात्रेया सांगूं काई । जाणसी सर्व ॥६॥
जरी देसी इंद्रपदा । तेही होईल आपदा ॥ तुजवांचोनि सच्चिदानंदा । सर्व कांहीं नलगे मज ॥७॥
तुजवांचोनि सर्व कांहीं । मज दुःखप्रदचि पाहीं ॥ म्हणोनि मातें कोठेंहीं । राहवेना ॥८॥
तुजवांचोनि देवा आन । जरी कांहीं मागेन ॥ तरी देवा तुझीच आण । आत्मा माझा तूं अससी ॥९॥
तुजवांचोनि सर्व कांहीं । मज रोग गमे पाहीं ॥ जाणसी तूं सर्व काम्हीं । अंतर माझें ॥१४१०॥
मज तुझीच आशा असे । तुझेच साठीं व्याकूळ असें ॥ तुजवांचोनि इच्छा नसे । आण तुझी दयाळा ॥११॥
शपथेचें प्रयोजन नाहीं । सर्वज्ञ जाणे सर्व कांहीं ॥ राहवेना करूं काई । म्हणोनि देवा सांगतों ॥१२॥
सर्व कांहीं सांगितलें । सर्व कांहीं कळों आलें ॥ आतां माझे डोळे । निवतील ऐसें करावें ॥१३॥
शांत रहावयाचा । प्रकार कळविला साचा ॥ म्हणोनि माझे विनंतीचा । कळवळा यावा ॥१४॥
ऐसें असतां स्वभावें । कोठें कैसें रहावें ॥ म्हणोनि मातें जाणावें । निराधार ॥१५॥
चक्षूपादहीनाची । अवस्था झाली मज साची ॥ आण तुझे चरणाची । अन्यथा नाहीं सर्वज्ञा ॥१६॥
अन्यथा असल्या गोविंदा । मातें घडो नरक आपदा ॥ आतांचि येऊनि माझी आपदा । दूर करावी समदर्शी ॥१७॥
माझेसारिखे अनाथाचा । तूं रक्षक आहे साचा ॥ म्हणोनि तुझेच चरणाचा । आश्रय केला ॥१८॥
शरण आल्याची लाज । धरोनि मातें रक्षीं आज ॥ आपला जाणोनि मज । रक्षीं आतां सर्वज्ञा ॥१९॥
तुझी कांस धरिली । त्याची हाणी झाली ॥ त्याची आशा न पुरली । ऐसें नाहीं ऐकिलें ॥१४२०॥
तुज शरण नसतों । तरी प्रारब्ध भोगितों ॥ तुझी पाउलीं वंदितों । आतां प्रारब्ध कायसें ॥२१॥
माझें प्रारब्ध हीन होतें । म्हणोनि शरण आलों तूतें ॥ आतां कैसा म्हणसी मातें । प्रारब्ध भोगीं आपुलें ॥२२॥
प्रारब्धाचा भरंवसा सोडिला । तुझाच आश्रय केला ॥ प्रारब्ध कैसें दयाळा । भोगविसी तूं समर्थां ॥२३॥
जे तुझे विन्मुख असती । ते आपलें प्रारब्ध भोगिती ॥ मरती अथवा वांचती । आपल्या कर्में ॥२४॥
मी तों तुतेंच शरण आलों । तुझे पायीं येऊनि पडलों ॥ तुझेच हातीं दयाळो । हात दिले ॥२५॥
सर्वज्ञ समर्था तुझाच असें । मज प्रारब्धासी नातें कायसें ॥ तुतें नमितां होतसे । प्रारब्ध भस्म ॥२६॥
आतां प्रारब्ध राहिलें नाहीं । तूंच माझें सर्व कांहीं ॥ येऊनि आतां भेट देईं । अन्यथा कर्तुं समर्था ॥२७॥
करुणा तुतें भाकिताहें । पळ पळ तुझी वाट पाहें ॥ देवा प्रसंग हाच आहे । भेट देण्याचा ॥२८॥
मज दुःखी कष्टी केलें । रानोरान रडविलें ॥ शीत उष्ण सोसविलें । तरी कोणता पुरुषार्थ ॥२९॥
मी क्षुधे तृषेंनें पीडिलों । जनीं वनीं भागलों ॥ यांत कोणता दयाळो । पुरुषार्थ तुझा ॥१४३०॥
आदीं माझी छळणा केली । मागूनि मातें भेट दिली ॥ यांत कोणती मिरवली । कीर्ति देवें ॥३१॥
कष्ट घेऊनि तुष्ट व्हावें । दुःखी करूनि अभय द्यावें ॥ सर्वज्ञ दयाळू म्हणवावें । हें योग्य नाहीं समर्था ॥३२॥
नाम तुझें समदर्शी । माझे दोष काय पाहसी ॥ देवा आतां कधीं रिझसी । नित्यतृप्ता सर्वज्ञा ॥३३॥
आतां सकल कलावंता । येईं अनंत गुणमंडिता । नीति निपुणा महापंडिता । दत्तात्रेया तुज नमो ॥३४॥
शरणागताचा वाली । तूंच अससी उडी घालीं ॥ आतांच अभय भिक्षा घालीं । शरण तुतें सर्वज्ञा ॥३५॥
सर्वज्ञातें आळविलें । मी क्षुद्र म्हणोनि वृथा गेलें ॥ ऐसें न करीं, पाउलें । आतांच दावीं समर्था ॥३६॥
तुतें आळवावें कैसें । हेंही मातें ठाऊक नसे ॥ यथाशक्ति जैसें तैसें । आळवितों ॥३७॥
चित्त माझें चंचळ । देह अस्थिर अमंगळ ॥ विधि मर्यादा सकळ । कांहीं न घडे दयाळा ॥३८॥
मंद मूढ बाष्कळ । बालबुद्धी अनर्गळ ॥ परी तुझा आहें कळवळ । यावी माझी सर्वज्ञा ॥३९॥
मी जे केली विनंती । तिची असावी तुतें स्मृती ॥ अधिक उणें बोलाची क्षिती । नको मानूं दयाळा ॥१४४०॥
सर्वज्ञातें हाका मारीं । तुझा आहें घेईं पदरीं ॥ आतांचि येऊनि माझें करीं । समाधान ॥४१॥
माझें क्षुद्रपण पोरपण । सामान्यपण मूर्खपण ॥ नको पाहूं दावीं चरण । शरण आलों म्हणोनी ॥४२॥
तुझी कृपादृष्टी होतां । वरद हस्त माथां ठेवितां ॥ क्षुद्रचि होतो दयावंता । शंभू स्वयें ॥४३॥
एक पळही न लाविसी । यवनाचा ब्राह्मण करिसी ॥ सर्व सामर्थ्य तुझेपासीं । ब्रह्मानंदा कैवल्या ॥४४॥
अर्ध निमिषाभीतरीं । सृष्टी सारी संहारी ॥ निमिषार्धांत ऐसीच सारी । रचना रची ॥४५॥
ऐसा तूं समर्थ अससी । सर्व कांहीं जाणसी ॥ विलंब कासया लाविसी । दीन दयाळू असतांही ॥४६॥
देवा माझी अवस्था पाहें । धांव तुतें शरण आहें ॥ आजच देवा दाखवीं पाय । सद्गुरू माये रक्षीं मज ॥४७॥
दुःखी असतां संसारीं । आर्त कोणतें कर्म न करी ॥ शुभाशुभ ही आचरी । तैसें देवा मज झालें ॥४८॥
तुझेच साठीं आर्त आहें । कधीं येशील वाट पाहें ॥ शरण येऊनि वंदितों पाये । म्हणोनि येईं दयाळा ॥४९॥
सुर नर अनेक असती । स्वार्थाकरितां करिती प्रीती ॥ सेवकाची सेवा घेती । इच्छित देती सेवका ॥१४५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP