मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे ९०१ ते ९५०

करुणासागर - पदे ९०१ ते ९५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


भक्त तुझें धाम धन । भक्त तुझा जीवप्राण ॥ स्वतंत्र असतां भक्ताधीन । अससी तूं ॥१॥
तुज नावडे आपली काया । अत्यंत आहे भक्ताची माया ॥ धांव आतां सद्गुरुराया । दत्तात्रेया तुज नमो ॥२॥
मी अतपस्क दुर्बळ । भाग्यहीन कुश्चळ ॥ परंतु माझा सद्गुरु प्रबळ । भरंवसा तुझा ॥३॥
जैसी पित्यानें संपदा मेळवावी । ती पुत्रानें भोगावी ॥ तैसी आपुले सद्गुरूची कमाई । भोगीन मी ॥४॥
आतां कितीक चाळविसी । किती विलंब लाविसी ॥ कितीक आतां भोगविसी । नाना कष्ट ॥५॥
आजपर्यंत कष्ट भोगविले । तेणें तुझें समाधान न झालें ॥ म्हणोनि नूतन नेम केले । कष्ट द्यावयाचे ॥६॥
अनंत राक्षस वधिले । असंख्य राजे संहारिले ॥ तेणें तृप्त न झाले । भुजदंड तुझे ॥७॥
मी भयभीत दुर्बळ । शरण आलों जाणोनि दयाळ ॥ माझाच नाश करोनि शीतळ । करूं पहासी करकंडू ॥८॥
चक्र तुझें तेजोरासी । तेणेंचि माझी मान कापिसी ॥ काय नवीन परिक्षा घेसी । शस्त्रधारेची ॥९॥
तुझा बाण प्रतापरासी । फार दिवसांचा उपवासी ॥ म्हणोनि माझें रुधिर पाजिसी । शरणागताचें ॥९१०॥
तुझी गदा काय भुकेली । नुचले तुतें गुर्वी झाली ॥ म्हणोनि माझाचि बळी । देणें योजिला ॥११॥
बापाचीं श्राद्धें केलीं उदंड । परंतु तृप्ति न झाली अखंड ॥ म्हणोनि माझे शरीराचा पिंड । देऊं योजिला ॥१२॥
तुझे घरीं दुष्काल पडला । तुझा परिवार उपासी मेला ॥ म्हणोनि त्याचे निर्वाहाला । मांस माझें योजिलें ॥१३॥
तुजला झाले कांहीं क्लेश । अथवा पडलें संकट विशेष ॥ म्हणोनि केला त्वां देवीस नवस । शरणागताचे वधाचा ॥१४॥
जंववरी मी जीत आहें एक । तंववर तुज वाटे कंटक ॥ माझा नाश करोति निष्कंटक । राहूं पहासी ॥१५॥
माझें घेऊनि प्राण । शीतळ करिसी आपलें मन ॥ होईल तुझें समाधान । निवतील डोळे ॥१६॥
भक्तरक्षक आहेसी । भक्तभक्षक होऊं पहासी ॥ काय तुतें ग्रहरासी । विपरीत आल्या ॥१७॥
काय तुजला झडपणी झाली । तेणें तुझी बुद्धि गेली ॥ शरणागताची मांडिली । दुर्दशा कैसी ॥१८॥
किंवा अनादि पुरातन । म्हणोनि आलें म्हातारपण ॥ तेणें तुझें लक्षण गुण । सटवलें काय ॥१९॥
फार केलीस रासक्रीडा । स्त्रीसंगतीनें झालासी वेडा ॥ कीं झालासी कानकोंडा । लपविलें मुख ॥९२०॥
केली गोकुळीं चोरी । म्हणोनि दडाला गिरीकपारीं ॥ किंवा कोठें परद्वारीं । रतलासी कुब्जेसी ॥२१॥
स्त्रीबुद्धीस लागावें । पुत्रास वनास काढून द्यावें ॥ किंवा ऐसाचि देवें । कुळधर्म आपुला स्वीकारिला ॥२२॥
वानराचि संगती केली । म्हणोनि तैसी मति झाली ॥ किंवा तुतें प्राप्त झाली । विपत्तिवेळा श्रीवरा ॥२३॥
भक्त फार झाले म्हणोनि तुतें दरिद्र आलें ॥ किंवा तुतें भोंवलें । कलियुग काय ॥२४॥
सांग आतां दयाळा । एवढा विलंब कां लाविला ॥ किन्निमित्त राग आला । क्षमावंता हें सांगें ॥२५॥
शरणागताची छळणा केली । यांत काय कीर्ति मेळविली ॥ किंवा कांहीं अधिक आली । शोभा तुज ॥२६॥
कैसा मूग गिळोनि बैसला । कानांत बोटें घालोन निजला ॥ किंवा कांहीं पाजिलें तुजला । महादेवें ॥२७॥
कोणता झाला प्रतिबंध । धांव आतां ब्रह्मानंद ॥ शरआण्गतातें परम सुखद । दुःख कैसा देतोसी ॥२८॥
केले पराक्रम गाढे । ऋषी गाती पवाडे ॥ माझें दुःख निरसितां पडे । संकष्ट कैसें ॥२९॥
पराक्रम केले अपार । परंतु कोणतें केलें सार ॥ जरी करिसी विचार । तरी फोल सारे ॥९३०॥
दुर्बळ नारी पूतना । तिचा प्राण घेतला जाणा ॥ यांत काय नारायणा । पराक्रम झाला ॥३१॥
वक दीन पाखरूं । त्याचा केला संहारू ॥ याचा केला विचारू । पराक्रम कायसा ॥३२॥
पाहूनि कीट विशेष । सर्पाचा केला दर्पनाश ॥ लोकांतही सपातें वश । गारोडी करिती ॥३३॥
एकटी वनांतरी । मारिली ताटिका नारीं ॥ दीन दुर्बळ बिचारी । शूर असतां ॥३४॥
भक्षित असतां तृण । मृग मरीची दीन ॥ त्याचा घेऊनि प्राण । पराक्रम केला ॥३५॥
जो वृक्षाचा विहारी । फळ पुष्पांचा आहारी ॥ वाळी वानर पृथ्वीवरी । वार्धिकपणीं मारिला ॥३६॥
जें युगादिचें पुरातन । शिवकोदंड जीर्ण ॥ त्याचें केलें खंडण । पराक्रम झाला ॥३७॥
विशेष कंदरा पाहोन । जो पोकळ पुरातन ॥ उचलोनि गोवर्धन । बळवंत झाला ॥३८॥
माझा दुःखरिपू मारवेना । माझें प्रारब्ध जाळवेना ॥ माझा भार झेलवेना । काय ऐसा पराक्रम ॥३९॥
जें तुतें शरण आले । त्यांतें दुःखचि दाखविलें ॥ तुझें दयाळुत्व कळों आलें । दत्तात्रेया ॥९४०॥
प्रल्हाद तुतें शरण आला । तो डोहामाजी लोटिला ॥ शेवटीं अग्नींतही टाकिला । दिधलें विष ॥४१॥
द्रौपदी तुझी बहिणोली । ते तुतें शरण आली ॥ तिची विटंबना केली । सभेमाजी ॥४२॥
पांडव तुझें भक्तजाण । त्यांतें फिरविलें रानोरान ॥ जटायूचा घेतला प्राण । भक्तवरदा ॥४३॥
मांडव तुझा भक्त हरी । त्यातें दिधलें शूळावरी ॥ पाणी भरविलें डोंबाघरीं । हरिश्चंद्रातें ॥४४॥
ऐसी तुझी विपरीत करणी । कोण जाणे कोण वर्णी ॥ जेणें बापासी म्हातारपणीं । दुःख्ह देऊनि मारविलें ॥४५॥
रेणुके मातेचा वध केला । देवकी जननीस बंधिशाळा ॥ उडविला गोपिकांचा मेळा । यशोदे समवेत ॥४६॥
ज्याणें तुझे पाय धरिले । त्यातें त्वां दुःखचि दिल्हें ॥ शरणागतातें रडविलें । जेथें तेथें ॥४७॥
नान अदेवांचे भक्त असती । सर्वच विलास करिती ॥ तूं निजभक्ताची फजिती । करिसी स्वयें ॥४८॥
नकळे कोणती मोहिनी । घालोनि लाविसी आपुले भजनीं ॥ भूलथाप देवोनी । फांसां घालिसी ॥४९॥
तुजसीं प्रसंग पडतां । तुझे पायीं प्रेम जडतां ॥ मग अनंत उपाय करितां । न सुटे मिठी ॥९५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP