मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
नारायण

नारायण

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


श्रीमंगलप्रद गनाधिप सौख्यदाता,
ज्यातें सदा स्मरतसे हृदयीं विधाता,
तो मी नमीं सकलकारण, पुण्यराशी,
जो पूजितांचि अति सत्वर विघ्न नाशी.  १
विघ्नाद्रितें ढकलुनी रगडी रदानें,
कुंभद्वयीं विलसती अतिरम्य दानें,
जो डोलतो गणपती बहुसा मदानें,
आधीं तयासचि नमीन मी निर्मदानें.  २

पद.
जय जय मंगलकर गजवदना,
जनपालन, सज्जनहृतसदना. ॥धृ०॥
दिनमणिशतकोटिरुचिसमरूपा,
दीनदयाळा, अमितप्रतापा. ॥१॥
पाशांकुशरदनायुधधरणा,
शेषविभूषण, संकटहरणा. ॥२॥
कांसे वसन शशिद्युति, सुंदर,
वासननुतपद, शक्तिमनोहर. ॥३॥  ३
त्यानंतरें मी विनवीन वाणी; । सुचे मला रम्य नवीन वाणी.
स्तोत्रात्मिका तेचि विरिंचिभामा । भक्तांसि देते अचिरेंचि भा, मा.  ४
हंसासना वंदिन वेदमाता; । जिच्या प्रसादें स्फुरताति माता,
ते शारदा देवि जगत्प्रधाना । आली दयेनें मज सन्निधाना.  ५

पद.
वाणी, वंदितसें तुजला. ॥ध्रु०॥
बालक मी लडिवाळ तुझें कीं, पालन करिं मजला. ॥१॥
माये, तव महिमा न समाये । त्रैलोक्यीं भरला. ॥२॥
सारासारविचार पहातां । तारक तूं सकलां. ॥३॥  ६
श्रीसद्गुरू वंदिन येकभावें, । गेलीं भवभ्रांति जया प्रभावें.
केली दया, बोध फळासि आला, । आनंद तेणें हृदयासि झाला.  ७

पद.
नमन करूं गुरुराजदयाळा, । सुमनसुमन ठेवुनि पदयुगळा. ॥ध्रु०॥
अज्ञानांधकतम परिहरि जो । सुज्ञानांजन घालुनि डोळां, ॥१॥
नांवरुपातित वस्तु अगोचर । दावितसे, अति अद्भुत लीला, ॥२॥
ताराया संसारसमुद्रीं । नारायणविभुवर अवतरला. ॥३॥  ८
विमलकमलनेत्रा, विश्ववंद्या, मुकुंदा,
मुरहर, मुनिगेया, चिद्घनानंदकंदा,
जय जय जगदीशा, केशवा, भक्तपाळा,
तव चरित वदाया स्फूर्ति देईं, कृपाळा.  ९

पद.
जय जय जगदीशा, जगदीशा सुररिपुनिकरविनाशा ! ॥ध्रु०॥
कनकांबर, शंबररिपुजनक कंजजमानसतोषा, ॥१॥
कौस्तुभधर, कस्तुरिकाभाला, कंसांतक, अविनाशा, ॥२॥
नारायण, निगमागमसारा, न कळे महिमा शेषा. ॥३॥  १०.
ऐका एकाग्रचित्तेंकरुनि हरिकथा. हे असे विश्वमाता,
नाशीं पापा समस्ता, परमसुखकरे, क्लेश जाती दिगंता,
वारी संसारचिंता, विषम उकलवी जन्मकर्मादि गुंता,
पावे श्रीकांत पूर्ता, सहज दृढ चढे मुक्तिसायुज्य हाता.  ११
‘ श्रीकांतें गजशक्र नक्रवदनीं संग्रस्ततां तारिला, ’
ऐशी भागवतीं कथा शुकमुनी जे संस्कृतें बोलिला,
जे आकर्णुनियां परीक्षिति मनीं लाभे सुखें संततें,
ते मी सांगतसें तुम्हांसि, परिसा, भाषांतरें प्राकृतें.  १२
इंद्रद्युम्न म्हणूनि पांड्यविषयीं झाला भला भूपती,
ज्याचा धाक धरोनि अन्य नृपती चित्तीं सदा कांपती,
जो अत्यंत उदार, शूर, सकलां पाळीतसे सज्जनां,
ध्यातो हृत्कमळीं अहर्निशि रमानाथा, जगत्कारणा.  १३

पद.
नृप तो साजला, माजला, रिपुनिकरिं गाजला. ॥ध्रु०॥
इंद्रद्युम्न विराजे, ज्याच्या धाकें कांपति राजे. ॥१॥
निरुपम भासे जगती, ज्यातें देखुनि सकलहि जगती. ॥२॥
देत असे धनदानें, नाहीं दिधलीं जें धनदानें. ॥३॥
पालन करित जनातें, दृढतर रत जो हरिभजनातें. ॥४॥
धीर, उदार जयाचे गुणगण शोभवि दिग्विजयाचे. ॥५॥  १४
हरीविना देव दुजा न जाणे. । तन्नामसंकीर्तन फार माने.
सर्वोपचारेंकरुनी हरीचें । करी सदा पूजन भूप साचें.  १५

पद.
पूजा करिताहे, राजा पूजा करिताहे. ॥ध्रु०॥
पूजा करि करि वोजा मजसम दूजा जगतिंत कोण म्हणूनी, ।
कंजाक्षप्रियरंजित ऐशा कंजाक्षांच्या xळा घालुनि. ॥१॥
ध्यानादिक विधि नानापरि हरि मानाया बहु मानी नृपती. ।
ज्ञानाधिक सुमनिं सुमनिं जनिं वानाया निजगुणगणसंपत्ती. ॥२॥
वीराग्रेसरराजित बहुविध नीराजननैवेद्याउपरी ।
अर्पण करुनि समर्पक लक्ष्मीनारायण सोल्हासोपचरी. ॥३॥  १६
एके दिनीं नृपति पूजन केशवाचें
भावें करूनि, हरिनाम जपोनि वाचे,
ध्यानीं अचंचल बसे; तंव त्या नृपाळा
भेटावयास मुनिमान्य अगस्त्य आला.  १७

पद.
जेणें गिरिवर निजवीला, । उदरीं दानव जिरवीला, ।
उदधि अपोशनसम प्याला, । तो मुनि तंव आला. ॥१॥
भजती सुरवर  वरदाला, । त्यजि तंव आला. ॥२॥
वारी राक्षसनिवहाला, । तारी जो निजभजकांला, ।
नारायण विभु मनिं ज्याला, । तो मुनि तंव आला. ॥३॥  १८
जैशा त्या रजताचलावरि लता चामीकराच्या भल्या,
तैशा दीर्घ, अपार, दिव्य मुनिच्या माथां जटा शोभल्या.
पायीं सुंदर पादुका, कटितटीं एणाजिनातें धरी,
लोकीं पातकि मानवांस ऑपुल्या जो दर्शनें उद्धरी.  १९
समीप येतां मुनिमान्य तो जन । ध्यानस्थ राजा नुघडीच लोचन,
बैसे; तयातें द्विज पाहुनी भला । क्रोधें महाव्याप्त; फिरोनि चालिला.  २०
बोले, “ गजाचेपरि मस्त होशी, । नेत्रद्वया झांकुनि बैसलासी.
नृपोत्तमा, त्यागुनि या वपूसी । वनांतरीं तूं गजजन्म घेशी.  २१
भूदेवा देवांसिहि मान्य; आदरें । करी हरी पूजन आमुचें बरें;
ऐसें कळूनि स्मरणासि टाकिलें, । भूपा, तुझें ध्यान असें कसें भलें ?  २२
पूर्वींही नहुषत्रिशंकु नृपती, जे थोर नामाथिले,
वेगीं विप्रअनादरेंकरुनियां ते दुर्गती पावले.
तूंही क्षत्रिय फार गर्व करिशी, भूपा तयांचेपरी.
शेखीं जन्मसि दंतियोनिस. ” असें बोलोनि गेल्यावरी  २३.
झालें वृत्त अमात्य सांगति नृपा, ‘ गेला मुनी शापुनी. ’
ऐसें ऐकुनि धांवला मग तयामागें भयें कांपुनी.
साष्टांगीं नमुनी तदा वदतसे, “ चित्तीं दयेतें धरीं,
अन्याय क्षमिजे, असे न कळतां जाला, मला उद्धरीं.  २४
मी बाळ फार लडिवाळ तुझें, दयाळा.
अन्याय तूं न धरि, रे, हृदयीं, सुशीला.
माता सुतावरि जरी करि पूर्ण कोपा,
वांचेल काय मग बाळक, मायबापा ?  २५

पद.
तारिं तारिं, दयाल, या. तां प्राशिलें वरुणालया. ।
अन्य तुजविण कोण मज करि धन्य, तारुनियां भया ? ॥१॥
राग हरिं, अनुराग करिं मज राजयावरि लौकरी; ।
राजविं उ:शाप देउनि, रंक जाणुनि उद्धरीं. ॥२॥
इंदिरामय मंदिरा मम येइं, गा, प्रभु, सत्वरें. ।
चंदनादिककुंदवृंदिं मि पूजितों अति आदरें. ” ॥३॥  २६
नृप तया विनवी बहुतां रिती. । परतली मुनिची मति तारिती.
सदय होउनियां, मग, “ वैखरी, ” । वदतसे, “ दृढ ऐक, नृपा, खरी.  २७
विप्राचा शाप कांहीं, समज निजमनीं, व्यर्थ होणार नाहीं.
केली म्यां जाण, भूपा, निरखुनि तुझिया प्रार्थनेला कृपा ही.
होसी दंती वनांती, स्मरशिल हरिला, पूर्वजन्मांतरींचें,
चित्तीं होईल तूतें स्मरण, मग वंरीं मुक्ति; हें वाक्य साचें. ”  २८
येणें रीती वदूनी, झडकरि मग तो चालिला स्वाश्रमाला.
राजा गेहासि आला, नमुनि मुनिवरा पावुनि विश्रमाला.
शापाची प्राप्ति झाली म्हणुनि नरपती खेद पावोनि भारी,
वैराग्यें चित्तवृत्तीप्रति करित असे बोध येणें प्रकारीं.  २९

पद.
“ हरिविणें तुझें कवण । हरिल, वो दु:ख ? जाण,
जाइं तयालगिं शरण, । मना, सदा. ॥१॥
दारा, सुत, गेह, धन, । कुणाचें, बा, हे कोण ?
शाश्वत निरंजन, । मना, सदा. ॥२॥
असार पहा संसार, । दु:खाचाचि सागर,
करिं, गा, याचा विचार, । मना, सदा. ॥३॥
नारायणविभू तूज । तारिल, वो; त्यासि भज,
सांगाती तोचि नीज । मना, सदा. ॥४॥  ३०
संसार शाश्वत म्हणूनि असें न मानी.
याकारणें हरिपदांभुजचिंतनातें,
चित्ता, करीं; गमत शाश्वत हेंचि मातें.  ३१
दारासुतादि धनगेह म्हणोनि, चित्ता,
स्वीयत्वबुद्धि धरुनी, तुज व्यर्थ चिंता.
काळेंकरूनि घडिमोडि समस्त लोकीं
होते, विवेकविभवें बरवें विलोकीं.  ३२

पद.
त्याला सुख लाधे, सुख लाधे, । परपद सत्वर साधे. ॥ध्रु०॥
हरिपदिं लावुनि चित्ता, । चुकवी भवविभवाची चिंता, ॥१॥
सांडुनि विषयी वाञ्छा । निशिदिनिं भजनीं ज्याची इच्छा, ॥२॥
जो नत गुरुचे चरणीं, । सज्जन वानिति ज्याची करणी, ॥३॥
ममताहंकृति टाकी, । कामक्रोधादिक रिपु जिंकी, ॥४॥
नारायणविभु सेवी, । आत्मानंदीं रति अति लावी. ” ॥५॥  ३३
स्थापूनि स्वसुतासि राज्यविभवीं, राजा वजा चालिला.
तेथें फार करूनियां तप, नृपें आत्मा सदा शोषिला.
जाला तो नवजाय शाप मुनिचा. देहांत झाल्यावरी
जाला त्या करिजन्म. कोण घडल्या कर्मासि पैं आंवरी ?  ३४

पद.
ऐशी तव लीला, तव लीला, । जलधररुचिसमनीला. ॥ध्रु०॥
जें जें तुज मानवतें, । तें तें सहजीं सहजचि होतें; ॥१॥
मतिगुणवित्तविहीना । करिसी सर्वजनोत्तमराणा; ॥२॥
पापी पतित जनांसी । येक्या भक्तिने मुक्तिसि नेसी; ॥३॥
रचिसी सर्वहि खेळां, । परंतु नाहोसी लिप्ताळा, ॥४॥
नारायणविभु, देवा, । तूझा महिमा कवणा ठावा ? ॥५॥  ३५
“ राजा तो करिजन्म पावुनि असे कोण्या स्थळीं राहिला ?
तो सांगें मज सर्वही, मुनिवरा, वृत्तांत जो जाहला. ”
त्याची ऐकुनियां अशी मृदु गिरा, बोले तया, “ आइकें,
चित्ता स्वस्थ करीं, परीक्षितिनृपा; ” हें बोलिजेलें शकें.  ३६
तरंग ज्यामाजि अपार रंगती, । येऊनि कांठीं ऑदळूनि भंगती, ।
तो क्षीरसिंधु ध्वनियुक्त जो भला, । तया तरंगीं गिरिराज शोभला.  ३७
ज्याची कांचनरौप्यलोहशिखरीं शोभा विकासे महा,
जेथें वाहति निर्मलोदक नद्या संपूर्णसंतापहा,
ज्याची आयुत योजनें मिरवते उंची, तसा रुंदही,
वाटे विस्मय तो त्रिकूट बघतां, ज्या साम्यता ही नाही.  ३८
रत्न, धातु जयासि मंडण, विविध तरुगन शोभती,
किन्नरादि मरुद्रणांसह सिद्ध जेथ विहारती,
करिति ते गंधर्व, गुह्यक गायना बहुता रिती,
सिंहगर्जना म्हणुनि त्यांप्रति सिंह रोषित गर्जती.  ३९
सुशोभला तो गिरिवर लोचल्नलोभनीय वीलासें,
जोहि भला रमणीयमणींसह कांचनकांति विकासे.  ४०
विंध्यमंदरां लाजविता जो त्रिकूटनामक भारी,
अयुत योजनें रुंद, उंचही, शृंगीं गगन उभारी.  ४१
पुष्पित तरुवर साज्ति अगणित, सेवित जे भ्रमरांनीं.  ४२
सरिताओघ अमोघ वहाती, विमल असे जल ज्यांचें,
मच्छकच्छपीं विलास, तेथें काननही जलजांचें.  ४३
उपवन वरुणाचें तेथ शोभे विशेषें;
वसति अमरनारी येउनी चित्ततोषें.
कुसुमित फलभारीं डोलती वृक्ष थाटें,
निरखुनि नयनांतें वाटतें सौख्य मोठें.  ४४
जंबू, बिल्व, कपित्थ, आम्र, कदली, पुन्नाग, मंदारही,
नीप, प्लक्ष, कदंब, चंपक, अशा वृक्षीं विराजे मही;
नानागुल्मलताविमानयुत त्या देखोनियां कानना,
वाटे साम्य जयासि नंदनवनावांचूनियां आन ना.  ४५
तेथें येक असे सुनिर्मल जलें संपूर्ण, ज्या अंतरीं
कल्हारें, कुमुदें, अनेक कमळें, नीलोत्पलें साजिरीं;
पक्शी त्यांवरि बैसले, जलचरीं जें सेविलें निर्भरें,
वाटे देखुनि तें सरोवर मनीं आनंद पैं विस्तरे.  ४६
तयाचे तिरीं मल्लिका आणि जाती । महापुष्पभारें सदा डोल देती.
पहा षडऋतूही विराजीत कैसे, । जनांच्या मना देखतां सौख्य पैसे.  ४७
ऐशिया वनीं नृपशिरोमणी । द्विरद जाहला, शाप लाधुनी.
तेथ अनुदिनीं वृद्धि पावुनी । फिरतसे महा मस्त होउनी.  ४८
अंजनाद्रिसा चित्र तो दिसे, । साम्य पाहतां दिग्गजीं नसे.
निरखुनी तया भीति लाहुनी । पळति दूरुनी श्वपदें वनीं.  ४९
वेष्टिला असे बहु करेणुंनीं, । धांवतां भरे गगन रेणुंनीं.
कलभही तयासह; जनां कसे । दिसति वारिदांपरि अनेकसे.  ५०
गर्जूनियां भीम घनस्वरानें, । मोडीतसे भूरुह पुष्कारानें.
ऐशापरी तो गजराज रानें । फिरे महामस्त सदा भरानें. ”  ५१
कथा अशी ऐकुनियां शुकाननीं, । परीक्षिती प्रश्न करी तदा. “ मुनी,
गंधर्व तो नक्र कसा जलांतरीं । जाला, वदा, जो निजवृत्ति अंतरीं. ”  ५२
हूहूनामक थोर येक गगनीं गंधर्व नामाथिला,
बाहूराजित वाजवीत विविधा विणास्वरीं माजला.
लाहूनि बहुमान इंद्रभुवनीं तो येत येतां भला
पाहूनि जनपावना, त्रिपथगा, गंगानदी पातला.  ५३

पद.
माधव बरा । माया मिथ्या मानुनियां मानसीं स्मरा, जनहो. ॥ध्रु०॥
तनुमनधन अर्पुनि तच्चरणीं ।
तमहरसुतदुतदमन करा. ॥१॥
विषय विषम समजुनि निज अंतरिं, ।
विरति धरुनि, निज मुक्तिसि वरा. ॥२॥
नानाजपतपसाधनश्रम कां ? ।
नारायणविभु स्मरण करा. ॥३॥  ५४

पद.
हरिभजनीं मन लावा केवळ, । विषय विषासम समजुनि सकळ. ॥ध्रु०॥
दानयज्ञादिक बहुधनसाधक । ध्यान केल्या पावे दिनदयाळ. ॥१॥
नामशक्ति करिं घेउनियां दृढ । कामक्रोधरिपु जिंका प्रबळ. ॥३॥
नारायणविभु भावें नमुनी । नरदेह दुर्लभ करा सफळ. ॥३॥  ५५
तों तेथें द्विजवर्य देवलमुनी स्नानार्थ आला पहा.
क्षाळी वस्त्र, तदा पडे चहुंकडे वारी, विराजे महा;
गंधर्ववरि येक बिंधु पडतां, सिंदूरवर्णापरी
रोषें नेत्र करोनि, बोलत महा घोषोनि नीचोत्तरीं.  ५६
वस्त्राचा टाकिला तां मजवरि, स्फुट जो पुण्य नासोनि टाकी.
घोकी अर्भाट लोकीं करिसि नुमजतां, भाससी भ्रष्ट मोठा,
पोटासाठीं पुराणें कथिशि घटपटा पाहुनी ग्रंथ मोठा. ”  ५७
गंधर्व बोले.  मुनि तो तटाकीं । उभा असे; त्या ढकलूनि टाकी
गंगाजळीं; खोल तळीं रिघाला, । जाला तयालागुनि थोर घाला.  ५८
सांवरूनि मग तो ऑपणाला, । बोलिला मुनि करूनि पणाला.
“ बुद्धि हे तव महामकराची; । पावशील तनु तूं मकराची.  ५९
ढकलिलें मजलागिं जलांतरीं, । म्हणुनि तेथचि वास निरंतरीं,
करिसि तूं; न चुके मम शाप हा. । सुसरिची तनु हो तुजला, पहा.  ६०
केला तुवां व्यर्थ कळीस ठाव कीं, । हे स्थीति ऐसी सकळांस ठावकी.
स्वशुद्धि नाहीं तुजलागिं, गावणा. । होसी क्रियानष्ट महाधिगावणा. ”  ६१
ऐसा ऐकुनि शापबोल मुनिचा, गंधर्व तो अंतरीं
धाके फार. विचार मानुनि म्हणे, ‘ शापासि या आंवरीं,
ऐसा कोण असे ? भया हरुनियां सौख्यासि पैं लाहिजे;
आतां मुख्य हरीच थोर; विनयें हा प्रार्थिला पाहिजे.  ६२

पद.
पतीतपावना, मज तारीं, वो शौरी. ।
स्वामी तुजविण भवभय हें कोण हरी ? ॥ध्रु०॥
आशानदि बहु थोर असे दुस्तर,
मनोरथतोयपूर येती अतिनिर्भर,
काम, क्रोध, मद, मान महामकर,
मोहपंकीं पडुनि बुडतसें, पाववीं पार. ॥१॥
अतिमित्र वाटताति मज दुर्जन.
दुष्ट वाक्यें ऐकावया माझे सावध कान.
परकांता पहावया तत्पर नयन.
स्वामी, क्षणभर तुझें ध्यान न करी मनं. ॥२॥
कंटाळलों निरंतर फिरूनि वणवण.
मायबाप तूंचि म्हणुनियां आलों शरण.
नारायणविभु, चुकवीं जननमरण;
स्वामी, दावुनियां संतोष, देईं त्वच्चरण. ॥३॥  ६३

पद.
दीनजनपालका, रे, । रमानायका, दीनजनपालका, रे. ॥ध्रु०॥
भवताप हा साहवेना. सांगू आतां, स्वामी, कवणा ? ।
मायबाप तूं धांवे लौकरि, करिं आतां करुणा. ॥१॥
बाळक तुझें लडिवाळ; कोप मनीं, स्वामी,  न धरीं. ।
अन्याय सर्व सोसुनियां, अति सत्वर तारीं. ॥२॥
नारायणविभु, तुजविण कवणा । जाऊं मी, स्वामी, शरणा ? ।
करुणापांग पाहुनियां करि मज रक्षणा. ॥३॥  ६४

पद.
देवा पावें वेगीं मजला. ॥ध्रु०॥
तारक तूं मायबाप म्हणोनि शरण आलों तुजला. ॥१॥
संसारीं सुख नाहींसें कळुनी, ध्यास तुझा धरिला. ॥२॥
नारायणविभु, करुणासागरा, तारीं, हरि, दयाळा. ॥३॥  ६५
बोलिला नमुनियां मुनिपायीं, । “ तारिं, तारिं मजलागिं उपायीं.
शाप हा तव अनावर लोकीं । तो हरूनि सदया अवलोकी.  ६६
गंगा पाप हरी; शशी परिहरी संताप; कल्पद्रुमु
दैन्य दूर करी; तयांहुनि महा हा थोर सत्संगमु.
जाई पाप अपाप, तापहि तसा, दे इच्छिली संपदा,
ऐसा संग घडोनिही तव, मुनी, हे कां मला आपादा, ?  ६७
सज्जन संगम तो । तारक बहु गमतो. ॥ध्रु०॥
दुस्तर हा भवसिंधु तराया सत्पथ कीं अवलीला.
स्वस्तिक्षेम करी संसारीं, लावुनियां निज माळा.  ६८
करितां सहजीं सोय तयाची, मोहपिसें दुरि पळतें;
धरितां बोध तयाचा चित्तीं, कवण मि ऐसें कळतें.  ६९
कामक्रोधमदादिक मत्सर यांचा थारा मोडी,
नामस्मरणीं रति अति होउनि नारायणविभु जोडी. ”  ७०
ऐशा गंधर्वबोला परिसुनि मुनि तो तोषला, रोष गेला.
जाल्या शापासि हेलाउनि, मनिं रचिला यत्न संरक्षणाला.
“ गंधर्वा, भर्वंसा हा दृढ धरिं हृदयीं, सर्वसाक्षी हरीच्या
चक्रें नाशोनि, पूर्वापरि तनु धरिशी संगतीनें करीच्या.   ७१

पद.
भावें श्रीहरि गायें । बरवें० ॥ध्रु०॥
मायिक हे तनु मानिं अशाश्वत, । मानसिं माधव ध्यायें. ॥१॥
स्वार्थ धरूनि यथार्थचि हा भव । व्यर्थचि मानिसि काये ? ॥२॥
भक्ति करूनि विरक्ति धरीं दृढ, । मुक्तिपदाप्रति जावें. ॥३॥
संसाराब्धि तरायालागुनि । समजें हाचि उपाये. ॥४॥
अंतरहित अनंतशय्याप्रति । अंतरसी ‘ हा ! हाय !! ’ ॥५॥  ७२.

पद.
रामनाम जप, रे, । सखया. ॥ध्रु०॥
दुसरें साधन या युगिं नाहीं, । हेंचि सुलभ तप, रे. ॥१॥
नारायणविभुध्यान करी जो । त्यासि कसें अघ रे ? ” ॥२॥  ७३
ये रीती मुनि बोलिल्यावरि, तया हूहू त्रिकूटाचळीं
जाला खोल सरोवरीं मकर तो; विक्राळ दाढावळी.
तेथें पावुनि वृद्धि तो अनुदिनीं मोठा कठोराकृती,
पाहूनी जलजंतु सर्व पळती राहे स्वतंत्रस्थिती.  ७४
“ ऐसे पावुनि शाप भूप ऑणि तो गंधर्व दोघे कसे
जाले मुक्त ? सविस्तरें मज कथीं. ” राजा मुनीला पुसे.
“ राहे तो गजराज थोर गहनीं; तो नक्रही जीवनीं;
ते तूं ऐक कथा, नृपा. ” म्हणुनियां सांगे तयाला मुनी.  ७५
एके दिनीं वांछुनियां जळाला । सरोवरातें गजराज आला.
पिपासिताशांति करी, सगोडी । सरोरुहांतें सहजेंचि तोडी.  ७६
असा जव करी करी परम खेळ नानापरी,
तळीं रिघुनियां बळी वितलतां जळें लौकरी,
तदा मकर पावला, निरखतांच झेंपावला,
बळेंचि दृढ ओडिला, गजबजोनि केला ढिला.  ७७
नयेचि तेथें दृढ गोंविला पती, । करेणु देखोनि असें विलापती.
भयें पळाल्या बहु दूरि, कां पती, । दु:खेंकरूनि हृदयांत कांपती.  ७८
सुहृद, आप्त, सखे बरवे तया । त्यजुनि ते पळती गजराजया.
प्रबळ येउनि जैं विपदा वरी, । तंव तयाप्रति कोणि न सांवरी.  ७९
बर्‍या काळीं बंधूजन सकळही सोय धरिती.
विपर्यासीं, माझा म्हणुनि मग कोण्ही न वदती.
बरें वेळोवेळीं हृदयकमळीं तूं भज तया.  ८०
फोडी हांका, न कांहीं स्मरण, मग तदा आपटी सोंड तोंडीं.
नक्राच्या वक्र दाढा तिखट, बळकटा, पाणियामाजि मोठें
वाटे; यालागिं पाहे, बळ बहुत करीं, वोढिता होय नेटें.  ८१
परस्परें वोढिति, वैर भाविती, । धरोनियां धैर्य बळासि दाविती,
बलाढ्य दोघे न कदापि भागती, । स्थिरावती आणि तसेच मागुती.  ८२
ये रीती गज, नक्र ते उभयतां क्रोधें बळे भीडती.
जाले वत्सर ते अनेक शतशा, नाहीं तयांची मिती.
जाळा तो द्विरदाधिराज परम क्लेशी, क्षुधा अंतरीं
बाधी, यास्तव रोड दुर्बळ दिसे, संतप्त  दु:खज्वरीं.  ८३
हरिविण अजि माझें दु:ख हें कोण वारी ?
सदयहृदय भावें चिंतिजे दानवरी.
तरिच सकल नाचे पाप जन्मांतरीचें;
म्हणुनि समजलें पैं चित्त तेव्हां करीचें.  ८४
हरिनारायणावीण । समयीं रक्षिणार कोण ?
तोचि भक्तपरायण, । भावें जावें तया शरण. ॥ध्रु०॥
दैत्यनाथें स्वतनयातें । पीडियेलें शस्त्रघातें.
सिंहरूपें वधुनी त्यातें । रक्षियेलें प्रल्हादातें. ॥१॥
शत्रुभ्राता बिभीषण । आला श्रीरामासि शरण;
लंका तयासी देऊन । रक्षीयेल अभिमान. ॥२॥
द्रौपदीचें वस्त्रहरण । करितां दुष्ट दु:शासन,
देवें वस्त्रें बहु पुरवून । रक्षीयेला तीचा मान. ॥३॥
ध्रुव केवळ बाळक, । भक्ति करितां निष्टंक,
नारायणविभु तारक । ध्रुवपदीं स्थापी देख. ॥४॥  ८५
श्रीकृष्ण जो दैत्यजनासि मारिता, । अनेक भक्तांप्रति होय तारिता,
दु:खें तयांचीं बहुसाल वारिता, । तयाविना ठव नसेचि कीं रिता.  ८६
तयासि आतां स्मरिजे रमाधवा, । येकाग्रभावें, दृढ, दीनबांधवा.
म्हणोनियां होय गजेंद्र चिंतिता, । तो जन्मकर्माप्रति होय जिंतिता.  ८७

पद.
श्रीहरि आतां तरि मजवरि दया करी. ॥ध्रु०॥
जन्मेजयें बहु घेऊनि वेषासि । नाचतसे श्रम करोनि तुजपाशीं. ॥१॥
पुरवीं सकळ मनोरथ तरी, । वेष घेवों नको म्हणुनि निवारीं. ॥२॥
संसारचक्रीं भ्रमून । नारायनविभु तुज आलों शरण. ॥३  ८८
अपार दु:खार्णव, खोल वारी, । न पाहवे, गा, मजला, मुरारी.
त्वन्नामनौका मजलागिं देईं. । तरेन मी सत्वर या उपायीं.  ८९

पद.
जय जय सुखकंदा, सुखकंदा, । परिपालित मुचकुंदा. ॥ध्रु०॥
मच्छकच्छपरूपा । मधुमदभंजन, मनुहृद्दीपा, ॥१॥
वराहनरहरिनामा, । वामन, बलिमददमनोद्दामा, ॥२॥
भृगुतनया, विश्रामा, । भूपति, भुविजावर, श्रीरामा, ॥३॥
कालियमर्दन कृष्णा, । हलधरअनुजा, हरिं भवतृष्णा. ॥४॥
वौद्धकलंकीवेषा, । बुधनुत नारायण, सर्वेशा, ॥५॥  ९०
अनंतशयना, हरी, त्वरित धांव, ये लौकरी.
जळीं मज जिवा, हरी, मकर फार कष्टी करी.
अपार दिन मी करी तवचि नाम चित्तीं धरीं,
नमीन तुज, पुष्करींकरुनि पूजितों, उद्धरीं.  ९१
नरहरि, मज पावें, भक्तपाळा, कृपाळा,
मुरहर, मुनिवंद्या, दीनबंधो, दयाळा.
झडकरि, करुणाब्धे, धांव, रे, धांव आतां.
भय परिहरिं माझें केशवा, श्रीअनंता.  ९२

चूर्णिका.
दीनबंधो । पावें, सौख्यसिंधो. ॥ध्रु०॥ दीनबंधु, दयानिधे, मुनिकिन्नरस्तुत, वीनवाहन, दीन मी मतिहीन तव पदिं लीन होउनि विनवितों, हरी. ॥१॥
काय करुं ? हा काय व्याकुल. पाय सुसरी खाय. वोढित जाय सुसरीं. सोय सोडुनि सोइरे बहु भोय पळती. साह्य कोण्हि न होय. दुस्तर तोय फार. अपाय जाणुनि, हाय ! हाय !! उपाय न दिसे. मायबाप तूं काय पाहसी ? ॥२॥ राव, राव, मि सावजें बहु घाव करुनी ताव हरिला. पूर्व समज अपूर्व गमतो. भर्वंसा, सर्वोत्तमा, दृढ, पाव सत्वर, पावना. तव नाम तारक या वनीं मज. धांव, धांव रमावरा, हरि, हाव भाव तुं सर्व जाणसी. ॥३॥
वीर परि हा धीर न धरे. क्षीरपारावारशयना, पार पावविं, सारसाक्षा; थार दे पदसारसीं. दृढ सार हेंच. असार हा संसार दुर्घट घोर चुकवीं, धीर, शूर, उदार, गुणगंभीरवर, नारायणप्रभु. ॥४॥  ९३

चूर्णिका.
अंबुजोद्भवतात, अंबुजेक्षण, हरे, अंबुजालया, सुखांबुधि विहारा; अंबुदप्रभ, दिव्य, तंबुरादिकसेव्य, कंबुकंधर देव दंभरहिता; मंदरोद्धरण, हे मंदहसिताब्जमुख, सुंदराकार, मुचकुंदवंद्या; देवकीतनय, वासुदेवहृदयानंद, देवदेवोत्तमा, वेदवेद्या; भक्तपालक, विभो, हरितत्रितापा; नक्तंचरदमन, अमितप्रतापा; मीनकेतनजनक, हे मीनरूपा; किन्नरादिकविनुत, हे चित्स्वरूपा.  ९४
वैकुंठाधिप, भक्तवत्सल, हरी, लक्ष्मीश, जो तारिता,
तो लक्ष्मीसह घेउनी निजकरी फांसे असे खेळता.
सारीपाट तवाव वीकरि तदा ऐकोनियां ते ध्वनी.
“ माझा भक्त विरक्त कोण ? कवणें केली, ” म्हणे, “ जांचणी ? ”  ९५
ऐसें बोलुनियां हरी मग करीं घेवोनि चक्रायुधा,
जाला तो गरुढाधिरूढ, भजकां संरक्षितो जो सुधा.
शोभे कौस्तुभ, वैजयंती रुळती आपाद माळा गळां.
भावें चिंतन त्या करील, सकळीं तो धन्य दैवागळा !  ९६
आला जेथ असे गजेंद्र मकरें पायीं मुखें वोढिला.
त्यातें देखुनि दीनबंधु हरि तो ‘ ना भी ’ असें बोलिला.
“ चिंताक्रांत अकांत कां करिसि तूं, वत्सा, मनीं कष्टुनी ?
माझें जें ब्रिद, भक्तवत्सल, जनीं तें सत्य मानीं मनीं. ”  ९७
दु:खार्त द्विरदाधिराज तंव तो बोभाय दीनस्वरें.
“ वेगीं ये, हरि, आपदा हरिं. ” असे ऐकोनि देवेश्वरें,
आश्वासोनि तयासि, नक्रशिरसा चक्रें द्विखंडा करी
विश्वासोनि पदाब्ज बंदित असे विश्वंभराचें करी.  ९८
चक्रें नक्र विदारिल्यावरि, तदा शक्रादि ज्या सेविती,
ठेवी हात पहात त्यास सदये माथां रमेचा पती.
होतां स्वस्थ करी, करें मग करी पूजा हरीची बरी.
बोले, “ धन्य जगांत मान्य तुझिया झालों दयेनें, हरी. ”  ९९

पद.
हरि देखोनि हरिख तो वाटला. ॥ध्रु०॥
भयवारी दानवारी येऊनि भेटला. ॥१॥
लौकिकाचा संग काचा मग तुटला. ॥२॥
बहु करि स्तुति करी, कंठ दाटला. ॥  १००
जाली दया, दुरित तें निरसोनि गेलें.
येतां शरत्समय जेंवि दिगंतराळें,
जावोनि अभ्र मग तें, बहुं शुभ्र होती,
दाटे अपार सुखसंभ्रम तेंवि चित्तीं.  १०१
स्तवुनियां परमेश्वर यापरी । गज तटस्थ उभा दृढ अंतरीं.
स्मरतसे रत होउनि माधवा, । परमशाश्वतसत्सुखवैभवा.  १०२
त्यजुनि गजवपूसी जाहला दिव्यदेही.
विलसति करिं चारी चक्र, अब्जें, गदाही.
दिसत हरिच ऐसा, कांस पीतांबराची;
निरुपम, शुभकारी मूर्ति भासे तयाची.  १०३

पद.
करिवर तो हरिरूपचि भासे. ॥ध्रु०॥
चिंतुनियां हरिचरण निरंतर । जिंकुनियां कळिकाळ उभासे. ॥१॥
शंखचक्रधर, दिव्यशरीरी, । सुंदर ज्याची मूर्ति विकासे, ॥२॥
निरुपम अद्भुत कांति जयाची, । शोभतसे पीतांबरे कांसे, ॥३॥  १०४
मकरहि मग जाला पूर्वगंधर्वरूपी.
नमन करुनि भावें, राग नाना ऑलापी.
हरि, तवकरचक्रें वक्रता आजि गेली,
परम सुखद ऐशी वेळ संप्राप्त झाली.  १०५
दाटे दुंदुभिनाद थोर गगनीं, आनंद देवां मनीं,
गंदह्र्वादिक सिद्ध, किन्नर, मुनी पुष्पीं हरी पूजुनी
स्तोत्रांतें करिती; “ जगत्रयगुरो, तूं रक्षिता येकला.
नादेखों तुजवीण अन्य दुसरा, चित्तीं आम्ही रेखिला. ”  १०६

पद.
पावला हरिराज याला, । पतितपावन बिरुद हें जयाला. ॥ध्रु०॥
पुंडरीकाक्ष जो, कुंडलेश्वरशयन, । चंडविक्रमहि दोर्दंड भारी; ॥१॥
चक्रे धरुनी करीं शक्रमंडित करी । वक्ररदनीं महानक्र मारी. ॥२॥
‘ ना भि ना भि ’ करी, कां भिसी ? झडकरी । घे करींच्या करीं अभय माझें. ॥३॥
साभिमानी महागंभीररव वदत । मद्रूपासमचि हो रूप तूझें. ॥४॥
पार न कळेचि, आधार जो या जगीं, । सार वेदांतिंचा ब्रह्मगोळा. ॥५॥
तारिता धरुनि अवतार नानाविधा, । आदिनारायनाधिप स्वलीला.   १०७

पद.
श्रीवर तो पाहिला आजि डोळां ॥ध्रु०॥
सुंदर सरसीरुहदललोचन । मंदरोद्धर सांवळा, ॥१॥
कमनीयाकृति, भूषणमडित, । वामांकीं कमला, ॥२॥
नारायणविभु हृदयीं राहुनि । पालन करि सकळां, ॥३॥  १०८
पूर्वीं भागवतीं नृपाप्रति शुकें जे सांगिजेली भली,
ते आतां वर विश्वनाथतनयें नारायणें वर्णिली;
ऐसी हे ‘ करिराजमोक्षण ’ कथा; जे वाचिती, ऐकती,
त्यांचे पूर्ण करी मनोरथ सदा संतोषुनी श्रीपती.  १०९

आरती.
जय देव, जय देव, जय, जी गोविंदा,
भय वारीं, मज तारीं झडकरि,  करिवरदा. ॥ध्रु०॥
सारसलोचन, श्रीधर, कस्तुरिकाभाळा,
मुरहर, मुनिजनवद्या, सुरनरपरिपाळा,
तारक सकल जनां अवतार तुझा, विमला,
मारजनक, कमलानन, दाखविं पद कमला. ॥१॥
मंगलदायक ऐशा देउनि सत्संगा,
रगविं निजभजनीं दृढ करुणांतरंगा,
अंगजकोटिनिभंगा, पदनिर्गतगंगा,
गंगाधरसुहृदा, देवा, श्रीरंगा. ॥२॥
पारावारसुतावर, सर्वजनाधारा,
धाराधरनिभश्यामल, सुंदर, सुकुमारा,
ताराया तव स्तवनीं मति दे, दातारा;
नारायणविभु, निरुपम, निगमागमसारा. ॥३॥  ११०

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP