मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
निरंजनमाधव ( बनाजी )

निरंजनमाधव ( बनाजी )

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


( चामरवृत्त. )

गुरू, गुणालया, परापराधिनाथ, सुंदरा,
शिवादिकांहुनी वरिष्ठ तूंचि एक साजिरा. ।
गुणावतार तूं धरोनि या जगासि तारिसी,
सुरां मुनीश्वरां अलभ्य त्या गतीस दाविसी. ॥१
तुझी अगाध कीर्ति. वर्णना परायुषें तरी
घडेचिना कदापि. तैं मदीय दीन वैखरे ।
वदेल केंवि ? मानमात्र मी करूं किमर्थ, जी ?
मनासि पैस ना घडे, न वेदही समर्थ, जी. ॥२
पुराण, शास्त्र, मंत्रजाल, तंत्र, यंत्र, सर्वही
तुझ्या कृपाबळेंचि साच रूढलें यया मही. ।
समस्त वाड्ययामृतासि हृत्सरोजकुप्पिका
तुझी विराजली. जगत्रयाद्य तूंचि देशिका. ॥३
गुरू जया नरा नसे, तयासि काय तें दिसे ?
असोनि नेत्र काय ते, मयूरपिच्छिंचे तसे ? ।
महाभ्रमें मदांध मोहसागरीं निमज्जती,
कलत्रपुत्रगेहवित्तचिंतनासि लागती. ॥४
अखंड कामिनी मनांत दामिनीसमान ते.
कुभोगपंक्ति सर्वही तयांसि साच वाटते. ।
अनश्वरत्व नश्वरीं विलोकिताति देखतां
परस्परेम जगांत याच मृत्युदु:ख भोगितां. ॥५
शरीर हेंचि आत्मभान जाहलें तयांप्रती;
तदर्थ इच्छिताति सौख्य, नाशिवंत संपती. ।
अमित्रमित्रभाव आपुल्या गुणेंचि जाणती,
समस्तभूतमात्रकीं दया कदापि नेणती. ॥६
न साधुवाद ठाउका असे तयांसि पामरां;
तदां विवेक, सद्विचार केंवि त्या घडे नरां ? ।
गुरांहुनी खरांहुनी तयांसि नीच बोलिजे,
अपार भार वाहते प्रकाम पुष्ट जाणिजे. ॥७
नसे जयांसि साधुसंगकामना मनांतरीं;
सदैव लोभपाशबद्ध गुंतले धनांतरीं. ।
न वेद, धर्म, कर्म, तीर्थ, यज्ञ, दान साधणें;
व्रतादिही न जाणताति; सज्जनासि बाधणें. ॥८
कुलांत कज्जळा समान तेचि शोभती बरे,
तयांसि वाहती धरा भरें बहूत हुंबरे. ।
वृथाचि वृक्षजीवनासमान दुष्ट वांचती,
पिशाचभूतराक्षसांसमान नीच नाचती. ॥९
कलींत ते कलिप्रियत्व पावले, सुशोभले;
तयांसि त्यांसमान लोक वानिती, ‘ भले भले. ’ ।
मरोनि ते कृतांतधाम पावती न चूकतां.
अनर्थ काळदंडदु:ख भोगिती यथार्थता. ॥१०
सुजारिणीसुतासि बापनांव ठाउकें नसे,
तयापरे गुरूविहीन तत्व जाणती कसें ? ।
गुरू जयांसि भज्य, तेचि पूज्य या जनांतरीं;
सुरीं, नरीं, महोरगीं तयांसि वंदिजे शिरीं. ॥११
गुरूविना अणीक तत्व मुख्य दुष्ट मानिती,
तयां नरांसि निश्चयें पहा घडे अधोगती. ।
गुरूचि देव, धर्म, सर्व तीर्थ; मोक्ष याविना
नसेचि, हाचि निश्चयो; नमो नमो तया जनां. ॥१२
जयां गुरुत्व बोधलें, तयांसि कार्य साधलें;
भवार्णवासि लंधिलें; सुविघ्नदुर्ग भंगिले; ।
सहा रिपूंसि जिंतिलें; निजामतत्व चिंतिलें;
परात्परासि पाहिलें; प्रकृष्ट दु:ख साहिलें. ॥१३
मनोजनाश जाहला; सुखात्मबोध बोधला;
मनासि वेध वेधला; स्वयेंचि वायु रोधला; ।

( अभंग १३ ते ३३ नाहीत. )

बलीयेसी याचे हृदयिं वसते जीवनकळा.
मिळाला विष्णूला वधिल तुमच्या दानवकुळा. ॥३३॥
पुसे, बा प्रल्हादा, प्रगट तरि दावीं नरहरी.
असे कोणे ठाईं वद मजपुढें तूं लवकरी. ।
न ये कां तो येथें, पळत फिरतो कां गिरिदरी ?
बलावी युद्धाला प्रगट तरि वैरी क्षणभरी. ” ॥३४
म्हणे, “ माझा स्वामी तवहृदयपद्मांत वसतो.
अनंत ब्रह्मांडें रचुनि तृणकाष्ठांत दिसतो. ” ।
असें बोले तेव्हां कनककशिपू त्रासुनि वदे,
सभास्तंभीं कां रे, त्वरित मजला दर्शन न दे ” ? ॥३५
पित्याच्या त्या बोलास्तवचि मग पुत्रें विनविलें.
तया श्रीरंगाचें त्वरित हृदयीं ध्यान धरिलें. ।
वराहाच्या रूपें धरणि धरिली त्या निजमुखीं,
सभास्तंभीं द्यावें त्वरित रिपुला दर्शन सुखीं. ” ॥३६
स्वपुत्राच्या बोलावरुनि मग हांसे खदखदां.
सभेच्या त्या स्तंभावरि सबळ हाणी असि तदा. ।
तये काळीं देवें त्यजुनि सहसा दूर अळसा,
सभास्तंभीं झाला प्रगट करि ब्रह्मांडवळसा. ॥३७
सभास्तंभीं झाला ध्वनि अवचिता तो कडकडां.
अनंत ब्रह्मांडें खचित समयीं ते गडबडां. ।
नृसिंहाच्या नेत्रीं निघति बहु ज्वाळा भडभडां.
पळाले दैत्यांचे अधिप निजपायीं झडझडां. ॥३८
नृसिंहाच्या तेजें गगनिं रविचंद्रादि जळती.
सडा नक्षत्रांचा धरणिधर, वाराह पळती. ।
प्रतापें दिग्पाळांसहित अमरां धाक पडला,
भुकेला कल्पांतप्रळयसमयीं रुद्र उठला. ॥३९
नृसिंहानें जानूवरि असुर धांवूनि धरिला.
नखाग्रानें त्याचा उदर उर संपूर्ण चिरला. ।
सभाद्वारीं संध्यासमयिं रिपुचा गर्व हरिला.
स्वभक्ताच्या रागें मग नरडिचा घोंट भरिला. ॥४०
तयाच्या त्या दाढा घनसर मुखामाजि विकटा.
नखश्रेणी वज्रापरिस कठिना, फार तिखटा. ।
मुखीं नेत्रीं ज्वाळा निघति जळती तैं दशा दिशा.
नृसिंहच्या दीर्घा पिंवळट सटा, पिंगट पिशा. ॥४१
चतुर्बाहु पीतांबर विलसतो हा कटितटीं.
मुखीं जिव्हा लोळे, रुधिररस चाटी सरकटी. ।
करी अट्टाहासा, असुरगजकुंभस्थल चिरी.
म्हणा, रे, तो आतां अभयवरदाता नरहरी. ॥४२
तये वेळीं देवाजवळि मग कोणीतरि न ये.
लपाले ते ब्रह्मादिक करिति धांवा जयजयें. ।
रमेनें प्रल्हादासहित चरणांभोज नमिलें.
म्हणे लक्ष्मी कांता, “ त्रिभुवनपते, विघ्न शमलें. ॥४३
नृसिंहाच्या माथां सुर वरुषती दिव्य सुमनें.
दुरूनीयां भूमीवरि करिति साष्टांग नमनें. ।
अनंता वाद्यांचे गजर उठती घोष बरवे.
सभास्थानीं सिंहासनिं कमलजाकांत मिरवे. ॥४४
रमा ज्याचे अंकीं अचल विलसे विश्वजननी,
सुखी ज्यानें केले मुनिजन पदांभोजभजनीं, ।
शिरीं ज्याच्या शोभे मुगुट, फणि छत्राकृति दिसे,
जयासाठीं झाले हरिहरविरिंचादिक पिसे. ॥४५
म्हणे, “ बा प्रल्हादा, तुज बहुत बाळास छळिलें,
तुझ्या रागें त्याला, सुमति, क्षणमात्रांत गिळिलें. ।
सुखी राहें आतां भजन करिं माझें अनुदिनीं.
तुझ्या भाग्याचा तो शुभ उदय झाला त्रिभुवनीं. ” ॥४६
“ दयाळा, म्यां तूझा अमल मनिं धांवा विनविला.
धनी त्रैलोक्याचा अभयवरदानी शिणविला. ” ।
तया प्रल्हादानें हृदयकमलीं देव नमिला. ।
म्हणे, “ स्वामी, स्थापीं चरणकमलीं मध्वमुनिला. ॥४७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP