मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
वीरेश्वरकृत

वीरेश्वरकृत

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


श्री शंकरप्रभु, अपारसुखांबुराशी,
रक्षी श्रितांसि जननीपरि लेंकरासी. ।
दे भुक्ति, मुक्ति, बहुसंपदभीष्टदानें.
ऐसी पुराण कथिते गिरीशापदानें. ॥ १
व्याघ्रपाद सुत तो उपमन्यु.। बोधिला स्वजनकें गतमन्यु. ।
दे म्हणे पुरहरासि पयातें. । तोषवी शिवहि शीघ्र तयातें. ॥ २
कथा तेचि पौराणिकी आयिका, जी, । सहाय प्रभू होतसे सर्वकाजीं. ।
जगीं येक मध्यंदिनाख्य द्विजाती । सदासक्त होता शिवांघ्र्यंबुजातीं. ॥ ३
सुमति सुत तयाचा, पंडित, ब्रह्मचारी,
निपुण पढुनि शास्त्रें आणि ते वेद चारी, ।
नमुनि विनवी बापा. “ जाउनी पुण्यदेशा
करिन तप. अपेक्षी चित्त हें त्वन्निदेशा. ” ॥ ४
वदे तात तेव्हां, “ तपाला न जावें. । सदा भक्तिनें ईश्वरातें भजावें. ।
मनीं जाणुनी सर्वभूताविभक्ता, । करीं ध्यान; तारील, हो, कीं, स्वभक्ता. ॥ ५
पुण्यक्षेत्र प्रथितचि असे पुंडरीकाख्य लोकीं,
जेथें शंभु प्रकट विलसे लिंगरूपी; विलोकीं. ।
दावी मोदें नटन ऑपुलें आदितेया मुनींद्रा. ।
शार्ङ्गी ईशालयपरिसरीं तो करी योगनिद्रा. ॥ ६
पुर्वीं वाक्कलि ( ? ) दैत्य जिंकुनि सुरां, स्वर्गाचिया संपती
भोगी. तो पुरुहूत जाणुनि मनी संरक्षिता श्रीपती, ।
क्षीरांभोधितटासि येउनि जगन्नाथा तया अच्युता
भावें वंदुनियां, म्हणे. ‘ अभय दे आम्हांसि नाकच्युतां. ’ ॥ ७
‘ जाईं सत्वस्र पुंडरीकनगरा तेथें तपें तूं करीं.
दैत्यातें वधुनी स्वराज्य तुजला देईन मी लौकरी. ’ ।
‘ स्वामी, पीडिल दुष्ट तो. मजसवें येईं कृपे, माधवा. ’
मोदें सेंद्र उपेंद्र ईशभवना आला भला तेधवां. ॥ ८
तया क्षेत्रा जाईं. सुखकर महदेवचरणां
मनीं ध्यायीं, पूजीं, नियमुनि सदा सर्व करणां. ” ।
अशा तातोक्तीतें परिसुनि नस्कार करुनी,
त्वरें आला माध्यंदिनि दृढ मनीं प्रेम धरुनी. ॥ ९
तीर्थीं स्नान करूनि, पूजुनि शिवा विध्युक्त, भावें मनीं
सप्रेम स्तवुनी, म्हणे “ मज कृपे रक्षीं; पहा, दीन मी. ।
स्वामी, भक्ति तुझी बरी दृढ असो, देवा, मृडानीवरा.
सेवा नित्य घडो, पदीं मन जडो, निर्विघ्न देईं वरा. ” ॥ १०
असें प्रार्थुनी आदरें शंकरातें, । विचारूनियां तेथिंच्या भूसुरांतें, ।
कुटी येक बांधोनियां राहिला, हो. । मनीं तैं म्हणे “ जाहला थोर लाहो. ” ॥ ११
नाना वन्य सुमें स्वयें प्रतिदिनीं आणोनि पूजी शिवा.
आनंदें द्विज नामकीर्तन करी, भक्तांसि जें दे शिवा. ।
तो येके दिवशीं म्हणे “ भ्रमर, हे काल्पीं सुमीं भोंवती;
रात्रीं मी जरि गेलिया वनचरें सत्वें वरी धांवती. ॥ १२
भृंगोच्छिष्टें सुमें केंवि । वाहूं मी ईश्वराप्रती ? ।
प्रसादें त्याचिया कांहीं । करावा यत्न संप्रती. ॥ १३
ऐशी आलोचना चित्तीं । करोनि, शिवसंन्निधीं ।
येवोनि, तो वंदे मोदें, । “ तारीं मातें घृणानिधी. ॥ १४
हे पाणिपाद मज होत मृगादनाचे; ”
ऐसें सुखें वदत विप्र समोर नाचे. ।
‘ होतील तेंवि ’ म्हणतांचि पिनाकपाणी,
जाला ऋषी तंव तरक्षुवरांघ्रिपाणी. ॥ १५
तो व्याघ्रपादाभिध विप्र जाला. । तेव्हां वदे त्या वृषभध्वजाला. ।
“ मन्नाम, देवा, तुझिया पुरा हो. । हे कीर्ति लोकीं बहुकाळ राहो. ” ॥ १६
असें प्रार्थुनी, तो यथापूर्व देवा । मनीं ध्यात, पूजी सुखें वामदेवा. ।
तदा तत्पिता पातला आश्रमातें, । सुता पाववूं त्या द्वितीयाश्रमातें. ॥ १७
देखुनी पितृपदाप्रति वंदी. । व्याघ्रपाद निजवृत्त निवेदी. ।
तो म्हणे, “ स्वकुलवारिजमित्रा, । हो सुखी सकलसज्जनमित्रा. ॥ १८
ब्रह्मचर्यें तथा श्रीशिवाराधनें । मान्य तूं या जगीं जाण सत्साधनें. ।
ऐकुनी वाक्य माझें गृहस्थश्रमा । पाव फेडावया शीघ्र देहश्रमा. ॥ १९
तो निष्काम; तथापि वाक्य गुरुचें मानोनी माध्यंदिनी
गेला शीघ्र तयासवें निजगृहा तेव्हां पहा त्या दिनीं. ।
मोदें येउनियां वसिष्ठ ‘ भगिनी देतों ययाला ’ म्हणे,
पीयूषापरि मनिलें वचन तें मध्यंदिन ब्राह्मणें. ॥ २०
तदुपरि सुमुहूर्तीं पूजुनी त्या वरातें,
विधिनिपुण वसिष्ठें चिंतुनी ईश्वरातें, ।
अवनिसुरसमाजीं कन्यकादान केलें.
सविनय दिधलीं तैं भूषणें आणि चैलें. ॥ २१
ऐसा होतां विवाह, द्विजवर अवघे बंधुगेहासि जाती,
तेव्हां तो व्याघ्रपाद स्थिर करुनि मना शंभुपादांबुजातीं ।
तेथें घस्त्रें कितेकें क्रमुनि, पुनरपि श्रीनटेशोपकंठीं
आला, घेवोनि संगें त्वरित गुणवते, गेहिनी, कंबुकंठी. ॥ २२
यथापूर्व होवोनियां क्षेत्रवासी, । महाभक्तिनें नित्य पूजी शिवासी. ।
तदा दैवयोगें तयां पुत्र जाला. । दिसे भानुसा द्रष्टृनेत्रंबुंजांला. ॥ २३
ठेवोनि नाम उपमन्यु म्हणोनि पुत्रा, । तें वृत्त पाठवि सुखें गुरुबंधुमित्रां, ।
आली वसिष्ठगृहिणी तंव तांतडीनें, । पाहे शिशूप्रति तया बहु आवडीनें. ॥ २४
योगक्षेम विचारुनी ऋषिवरा, तद्रेहिनीतें भली
बोले वाक्य अरुंधती, ‘‘ शिवकृपे संतुष्टता लाभली. ।
जाला पुत्र, परंतु पोषण घडे कैसें दुधावांचुनी ?
नेतें यास्तव मद्गृहा बहु घृतें म्यां ठेविलीं सांचुनी. ” ॥ २५
मोदें व्याघ्रपदें बरें म्हणितलें. तैं घेउनी लेंकरा,
आली ते निजमंदिरा स्वहृदयीं चिंतूनियां शंकरा. ।
तेथें पाजवि कामधेनुपय तें साज्य त्रिकाळीं सती.
पाळी वर्षचतुष्क यापरि, तया देखोनि उल्हासती. ॥ २६
होतां वत्सर चारि तो ऋषि सुता घेवोनि आला गृहा.
मानी सन्मति पात्र होइल भला लोकीं शिवानुग्रहा. ।
माता त्या तनयासि देखुनि म्हणे, “ बाळा, मनोरंजना,
जाला फार उशीर आजि तुजला; येईं त्वरें भोजना. ” ॥ २७
मोदें तेव्हां पाहुनी नंदनातें । पात्रीं वाढी वन्यधान्योदनातें. ।
“ मातें, क्षीरावीण हें पैं रुचेना. । या शुष्कान्ना भोजिल्याही पचेना. ” ॥ २८
ते सखेदचि वदे पृथुकाला, । “ माग दूध तुझिया जनकाला. ” ।
तो म्हणे मग सबाष्प तयातें, । “ दे कृपा करुनि शीघ्र पयातें. ” ॥ २९
कैंचें, बापा, दूध आम्हां दरिद्रां ? । निष्कामें म्यां पूजिलें, जाण रुद्रा. ।
आहे, नाहीं, हें कळे काय बाळा ? । मागावें जें पाहिजे तेंचि बाला. ॥ ३०
जे ज्या कामें पूजिती श्रीशिवातें, । ते प्राणी त्या पावती वैभवातें. ।
तूंही आतां माग त्याला स्वभावें. । तो इष्टार्था देइल स्वप्रभावें. ” ॥ ३१
“ कोठें असे तो शिव शीघ्र दावीं, । हे कामना ज्यासि मियां वदावी, ” ।
“ हा लिंगरूपी प्रभु तूं विलोकीं, । दाता, दयाळु, प्रथित त्रिलोकीं. ” ॥ ३२
तो बाळ, धीर, उपमन्यु तया शिवातें
पाहोनि, वंदुनि, सतोष करी स्तवातें. ।
“ शंभो, मृडा, पशुपते, श्रितपारिजाता, ।
दे दूध; दाखविं तुझ्या पदवारिजाता. ॥ ३३
भिक्षा मागासि तूं, तथापि सकळां देसी महासंपती.
देसी तें अमृत श्रितां, गरळ तूं खासी, मृडानीपती. ।
मोदें नाचसि तूं दिगंबर; तुझे हे भक्त दिव्यांबरें
लेती; अद्भुत हें चरित्रचि तुझें भासे तुला कीं बरें. ॥ ३४
केयूरहारकटकादि विभूषणांतें
नेघें तुवां दिधलिया जनभीषणांतें. ।
नाहींच चाड मजला भवडंबराची.
देईं तुझी अचल भक्ति चिदंबराची. ॥ ३५
दे क्षीरान्न कृपा करोनि मजला या देहसंरक्षणीं.
आतां तूं जरि नेदिसी, त्यजिन मी प्राणांसि पैं ये क्षणीं. ” ।
ऐसें ऐकुनि वाक्य तो प्रगटला तेथेंचि दिव्याकृती,
आम्नायप्रतिपाद्य, चिन्मय, विभो, जो नेणवे प्राकृतीं. ॥ ३६
आनंदें उपमन्य देखुनि, नमी भावें भवानीवरा.
अंकीं घेउनि त्यासि ईश्वर म्हणे, “ मागें त्वदिष्टा वरा. ” ।
“ देईं दूध सदा. दुजें मज नको, स्वामी, कृपांभोनिधी.
साक्षी तूं मतिचा, कसें अनृत मी बोलूं तुझ्या संनिधीं ? ” ॥ ३७
तेव्हां उमारमण सस्मित, चिद्विलासे
दुग्धाब्धि देउनि तया रिझवी मुलासी. ।
बोले “ सुखें असुनि भूवरि, नित्य मातें
भावें भजें निजमनीं अमरोत्तमातें. ” ॥ ३८
तो यापरी कथुनि भूमिसुरात्मजाला,
तेथेंचि सर्वगत ईश अदृश्य जाला.
ऐसाचि होउनि सदा सगुणावतारी
वीरेश्वरप्रभु कृपे स्वजनांसि तारी. ॥ ३९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP