मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
सीताकल्याण

सीताकल्याण

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


जें ब्रह्मवस्तु कथिलें निगमागमांनीं, । जें ध्याइलें स्वहृदयीं मुनिसत्तमांनीं, ।
तें दैवत प्रगटलें रघुभूपगोत्रीं, । रामाख्य सुंदर, जसा रवि पूर्वगोत्रीं. ॥१
तो श्रीराम सबंधु गाधितनयें प्रार्थोनियां आणिला.
आनंदें मिथिलापुरासि जनकें देखोनि वाखांणिला. ।
तेथें शंकरचाप वोढुनि करें जाला यशस्वी बरा.
घाली माळ गळां तया जनकजा, लाजोनि पीतांबरा. ॥२
कौशिकासि तंव त्या जनकानें । बोलिलें, परिसतां जन कानें. ।
“ आजि राघवविवाह कराया, । सांग यत्न मजला, मुनिराया. ” ॥३
“ रामासि देतों सुगुणा स्वपुत्रिका. ” । ऐसी लिहोनी शुभलग्नपत्रिका, ।
साकेतभूपाप्रति शीघ्र पाठवीं; । मैत्री मनीं पूर्विल नीट आठवीं. ” ॥४
मुनिवचन नयज्ञें ऐकुनी भूपतीनें, । हित समजुनि केलें तेंवि त्या सन्मतीनें. ।
दशरथनगरातें चार तैं शीघ्र जाती, । विसति निपुण जेथें तुष्ट सारे द्विजाती. ॥५
तैं दौवारिक भूपतीस कथुनी चारांसि त्या मागुती
नेती सन्मुख. ते तयासि नमुनी वृतांत पैं सांगती. ।
देती पत्र सकुंकुमांकित. सुखें वाचूनि राजा भला
बोले, “ आजि अपार पूर्व सुकृतें सत्संग कीं लाभला. ” ॥६
चारांसि तोषवुनि, पाठवुनी पुढारीं,
आला जना पुसुनियां ऑपुल्या बिढारीं. ।
तेव्हां ससैन्य, सकुटुंब, महोत्सवानें,
राजा निघे अतिशयें निजवैभवानें. ॥७
मार्ग क्रमोनि मिथिलेसि समीपदेशीं,
योग्य स्थळीं उतरला निजसंपदेशीं. ।
गाधेय जाणुनि उदंत सतोष जाला.
आला पुढें करुनि शीघ्र तदात्मजाला. ॥८
गौतमसुत जनकातें  बोले सानंद, “ रामजनकातें ।
भेटाया जा नवसा  द्या, हो, रामासि आजि जानवसा. ” ॥९
वचन शतानंदाचें  मानुनियां तें निधान आनंदाचें, ।
त्या स्कंधावारातें  आला घेवोनि सर्व परिवारातें. ॥१०
हृदयीं पटवासाचें  लावुनियां चूर्ण बहुत वासाचें, ।
भेटुनि, बैसति राजे,  ब्राह्मणही सकळ. तैं सभा राजे. ॥११
गाधेय बोले मिथिलधिपातें. । “ सीतेसि रामाप्रति पक्षपातें ।
देसी जसा, तेंविच लक्ष्मणाला । दे ऊर्मिळेतें, शुभलक्षणाला. ॥१२
दोघी बंधुसुता; तयांत भरता द्यावी तुवां मांडवी.
शत्रुघ्ना, श्रुतकीर्ति ते गुणवती, येक्याच त्या मांडवीं. ।
लग्नें चारि करोनि घे यश जगीं. हे, जाण, पात्रें भलीं.
वंशें आणि गुणीं तुम्हांसि समता. भाग्यें असीं लाभलीं. ” ॥१३
तेव्हां तो मिथिलेश वंदुनि, वदे. “ हो तेंवि, आतां वरां
पूजाया मज दे निरोप, हृदयीं चिंतोनि लक्ष्मीवरा. ” ।
ऐशी ऐकुनि ते सदुक्ति, अवघे तेथें तया वानिती.
आतां धीर, अभिज्ञ, यासम दुजा नाहीं असें मानिती. ॥१४
शतानंदाज्ञेनें तंव नृप गणेशार्चन करी.
वसिष्ठाला पूजी. मग सुवसनें दे झडकरी ।
वरांला त्या चौघां; बहुविध अलंकार करुनी,
मुद्या घाली बोटीं, रिझुनि हृदयीं हात धरुनी. ॥१५
हातीं देउनि नारिकेल, चवघां अश्वांवरी बैसवी.
वाद्यें गानरवें सुवारवनितानाट्येंहि उल्लासवी. ।
व्याह्यांसीं समवेत तो हळूहळू चालोनि आला पुरा.
त्यांतें हाटकमंदिरीं उतरवी. संतोष मानी पुरा. ॥१६
आला गृहासि जनकप्रभु त्याच काळीं.
रात्रि क्रमोनि, उठुनी मग तो सकाळीं, ।
स्थापावया त्वरित त्या कुलदैवतातें
सांगे, बलावुनि तया स्वपुरोहितातें. ॥१७
भार्येसमेत मग न्हाउनि संप्रदायें,
पुण्याहवाचन करोनि, समर्पि दायें. ।
ऐकोनि मात बरवी स्वपुरोहिताची,
तो स्थापना करि तदा कुलदैवताची. ॥१८
तैसाचि पंक्तिरथही कुलदैवतातें
पूजी, मनीं समजुनी ऑपुल्या हितातें; ।
ज्याला वसिष्ठ गुरु, बोधक तंत्रमंत्रीं,
राहे सदा जवळि सुज्ञ सुमंत मंत्री. ॥१९
करवुनी द्विजबांधवभोजना, । सरस अन्न दिलें इतरां जनां; ।
मग सुपीतपटेंचि सुवासिनी । बहुत भूषविल्या पुरवासिनी. ॥२०
आनंदें दुसरे दिनीं जनक तो घेवोनि त्या बांधवां
जातां पंक्तिरथालया, सकळ ते येते पुढें तेधवां. ।
बुक्का लावुनियां, परस्पर उरीं आलिंगुनी, भीतरीं
वेगें जाउनि, पंक्तिनें बसुनियां, उल्लासती अंतरीं. ॥२१
शेले आंथरुनी तळीं बसविले ते नोवरे, गोजिरे.
पागोटीं, पटके, झगेहि दिधले ते भर्जरी, साजिरे. ।
मोठे हार, तुरे, सुगंधहि विडे देवोनि लोकांसही,
तैसें आदरिलें नृपें न चुकतां दाटींत येकासही. ॥२२
सारे बाहेरि आले. मग वर चवघे पाहुनी योग्य वाहां,
हातें त्यां केसरांतें धरुनि वळॅंघले. चालिले त्या विवाहा. ।
वाद्यांचें घोष होती बहुविध; गणिका नाचती राजवाटे;
गाती गाणीं स्वरानें; परिसुनि बरवा तोष सर्वांसि वाटे. ॥२३
त्या द्वारदेशीं कुटिलालकांता । वोंवाळिती पाहुनि विप्रकांता. ।
ते नोवरेही उतरोनि खालें: । श्रीमंडपातें मग शीघ्र आले. ॥२४
चौरंगीं रामातें बैसवुनीयां, मनोभिरामातें, ।
गौतमतनयोक्तीनें पूजितसे तो क्षितीश भक्तीनें. ॥२५
क्षाळी पदकमलातें.  ओती भार्याविशुद्ध कमलातें. ।
मधुपर्काहि विधीतें  आणुनियां दे तया मग सुधी तें. ॥२६
लक्ष्मीपतितें स्मरुनी  ठेले अंत:पटा करी धरुनी. ।
मंगळ अष्टक गाती.  म्हणती भूसुर हरीच सांगती. ॥२७
तो हेरंब, समस्त विघ्न हरुनी, रक्षो तुतें सर्वदा.
गीर्देवी तुज वेदशास्रविषयीं हो अर्थदा, शर्वदा. ।
श्रीमद्देशिकवाक्यहृद्रत असो. जावोत मायामळें.
ब्रह्मेशादिसुरोघ नित्य तुजला, रामा, करो मंगळें. ॥२८
गौरीशंकर जेंवि नांतति, रमाविष्णुप्रभू ज्यापरी,
यावच्चंद्रदिनेश तेंवि ऑपुल्या मार्येसवें भूवरी, ।
रामा नंद सुखें. निशाचरगणां शिक्षीं सदा दोर्बळें.
पाळीं दीन जनां कृपे. प्रतिदिनीं होती तुला मंगळें. ॥२९
मुहूर्तविद झालर त्वरित वाजवी त्याक्षणीं.
द्विजीं पटहि काढिला रघुवराचिया वीक्षणीं. ।
सुखावलि महीसुता, पतित अक्षता वाहुनी;
तसाचि मग रामही बहु रिझे तितें पाहुनी. ॥३०
कन्यादान दिलें अभिज्ञ जनकें विध्युक्त त्या राघवा.
झाला मानवसंघ तुष्ट बरवा. त्या उत्सवें आघवा. ।
रामें मंगलसूत्र भूमितनयाकंठीं करें बांधिलें.
स्वर्गी बोलति देव कार्य ऑमुचें या ईश्वरें साधिलें. ॥३१
दोघां कंकण बांधुनी द्विजवरीं, त्यां बोहलीं बैसुनी,
लाजांचा मग होमही करविला अत्यंत उल्हासुनी. ।
ऐसे चारि विवाह एकसमयीं श्रीमंदिरीं जाहले.
तेथें उत्सव पाहुनी जन तदा मोदांबुधीं पोंहले. ॥३२
पाहूं सूनमुखें तिघीहि विहिणी प्रार्थोनियां आणिल्या.
पाटाऊं हिरवे, सकंचुक, बरे, देवोनि सन्मानिल्या. ।
अंकीं घेउनियां सुनांसि, चषकें गोक्षीर तैं पाजुनी,
देती अंबरभूषणें. निरखिती श्वश्रूंस त्या लाजुनी. ॥३३
आंबा सिंपवुनी, वधू मिळुनि त्या पूजोनि गौरीहरा,
आनंदें करवूं हळेदउटणें तेथें तयां वोहरां, ।
सार्‍या बैसुनि बोलती, “ नृपसुते, घेईं हरिद्रा करीं.
लावीं भर्तृपदासि. नाम बरवें घे आदरें लौकरी. ” ॥३४
देईं म्हणे त्यास पदांबुजातें, । भावें नमस्कारिति लोक ज्यातें. ।
राहे उगा तो मग रामराया. । ‘ दे दे ’ वदे ते ‘ मज उद्धराया. ’ ॥३५
लावोनियां चंदन, पुष्पमाला । घाली गळां त्या पुरुषोत्तमाला. ।
श्रीरामही घेउनि नाम तीचें, । तोषें करीं तैं उटणे सतीचें. ॥३६
कांचोळीची गांठि ते राघवानें । डाव्या हातें फेडिली लाघवानें. ।
सीता पाहे त्या जगन्नाथकाला. । वाटे मोठे चित्र त्या बायकांला ? ॥३७
त्यानंतरें जनक तो अजनंदनाला
देवोनि अक्षत, तथा सकळां जनांला, ।
“ यावें तुम्हीं द्रुत समस्तहि भोजनातें. ”
ऐसें वदोनि मग ये स्वनिकेतनातें. ॥३८
मांडोनि स्वर्णपात्रें, बहुविध वटकें, शाकसूपान्नभक्ष्यें,
वाढी सूदोघ खीरी, घृत; तंव जनकें सर्वकार्यार्थदक्षें ।
व्याही जामातृलोकां बसवुनि विनयें, ब्राह्मणां येक रीती,
“ घ्यावें आपोशनातें ” म्हणुनि विनवितां, तेहि तैसें करीती. ॥३९
जनकाची ते भार्या  सादर विहिणींस बैसवि सभार्या.
त्याही भोजन करिती.  श्रीरामातें सदा मनीं स्मरती. ॥४०
उठिले भोजन करुनी,  बैसविले ते सभेसि आदरुनी. ।
तांबूलगंधसुमनें  दिधलीं रायें, हिमांबुही, सुमनें. ॥४१
या रीती दिन चारी  आदरिले ते अनेक उपचारीं. ।
साडेही करवीले,  रात्रीं नवरे सतोष मिरवीले. ॥४२
जो थोर लोकपाळीं,  बांधी बासिंग त्यासिच कपाळीं; ।
हार गळां, दों हातीं  गजरे घाली; तयां जन पहाती. ॥४३
सुंदर नवरा, नवरी  शोभति ते थोर, मत्त हस्तिवरी. ।
सुटती बाण फुलांचे,  प्रकाश सर्वत्र बहु हिलालांचे. ॥४४
सुमुहूर्तींचि निशांतीं  सारे तेव्हां प्रवेशुनि निशांतीं, ।
श्रीदेवीचें पूजन  करितां, सानंद जाहलें स्वजन. ॥४५
धेंडे ते नाचविले,  देवुनि वस्त्रें स्वबंधु भूषविले. ।
पूजन कुलदेवाचें  केलें, तैसेंचि भूमिदेवांचें. ॥४६
श्रीसीतारामाचें  केलें कल्याण, सौख्यधामाचें. ।
वीरेश्वर सल्लोकां  वंदुनि, बोले, “ कृपेचि अवलोका. ” ॥४७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP