मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
बापूवामन

संतमालिका - बापूवामन

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.

वंदूनियां प्रथम सद्गुरु वामनाला, । जो कां दिसे स्थिरचरी बरवा मनाला, ।
गाईन ते हरिकथा मग कौतुकानें, । जे वर्णिली नृपतिलागिं, अजी, शुकानें. ॥१॥
त्यानंतरें वंदितसें हरी तो, । जो भक्तदारिद्रपणा हरीतो; ।
स्मरोनियां नाम अनाम याचें । चरित्र गाईन सुदामयाचें. ॥२॥
राजा ह्मणे श्रीशुकयोगियाला । “ दे कृष्णमात्रा भवरोगियाला. ।
जें दीधलें चूर्ण, अजी, बळाचें । तेणें हरे दु:ख महाबळाचे. ॥३॥
करूनी कृपा आणखी कृष्णलीला । वदाव्या, जगीं नाशिती ज्या कलीला, ।
अनंता कथा श्रीहरीच्या मला, हो, । अजी त्याचि देती महानंदलाहो. ॥४॥
सेविता विषय कामकामना, । त्रास होउनि, विराग ये मना. ।
यत्कथा परिसतां श्रवणातें । वीट येइल जगीं कवणातें ? ॥५॥
वाचाचि ते सार्थक मानवाची । कथा हरेचीच अखंड वाची. ।
सेवा हरीचीच, अजी, कराया । निर्मण केलें हरिनें करां या. ॥६॥
तेंचि कीं स्मरण होय मनासी । जें नसे स्थिरचरीं अविनाशी; ।
सत्कथाश्रवण हो श्रवनांला । ग्राम्य गीत रुचतें कवणाला ? ॥७॥
होय सार्थक तरीच मस्तकीं । विश्वरूप नमिता समस्त कीं. ।
पाविजे सफळता तरि दृष्टी, । कृष्णरूप जरि पाहिल सृष्टी. ॥८॥
विष्णुभक्तपदपंकजवारी । सेवितां त्रिविधताप निवारी. ।
देह त्यांत करि नित्य मज्जना । मान्य तो सकळ लोकसज्जनां. ” ॥९॥
वदोनी असें श्रीशुका विष्णुरातें । बहू प्रार्थिलें जोडुनीयां करांतें. ।
वदे येथुनी श्रीशुक्राचार्य वाचा, । स्मरोनी हृदाब्जीं प्रभू माधवाचा. ॥१०॥
ह्मणे शुकाचार्य परीक्षितीतें, । असे सुदामा द्विज तों क्षितीतें. ।
ब्रह्मज्ञ तो ब्राह्मण जाण साचा. । सखा हरीचा बहुता दिसांचा. ॥११॥
पाहतां निजसुखें विषयांला । वाटतें परम, हो विष याला. ।
राहिला गृह करूनिच शांती । कोण त्यासि करि दु:ख अशांती ? ॥१२॥
इंद्रियें सकळ जिंकुनि माना । वश्यता करि त्यजूनि कुमाना. ।
ध्यातसे हृदयिं देवदेव तो; । विघ्न त्यासि करि कोण देव तो ? ॥१३॥
लाभीं यदृच्छा करि आश्रमाला; । द्वंदी नसे तो; न गणी श्रमांला; ।
ऐशी असे हो स्थिति त्या द्विजाची; । भार्येस त्याच्या परि खेद जांची. ॥१४॥
उदासीनता देखुनी त्या अप्तीची । न खंडे कधीं प्रीति त्या, हो, सतीची. ।
सदाअन्नवस्त्राविनी काळ जातो; । करी खेद कांहीं तिच्या काळजा तो. ॥१५॥
लेंकुरें क्षुधित अन्न मागती; । नागवींच कित्येक वागती; ।
जाचिती करुनि वेग तीव्रता; । याल ( ? ) यास्तव करी पतिव्रता. ॥१६॥
म्लानता करुनियां वचनाची, । टाकुनी सकळ लाज मनाची, ।
बोलते वचन एक पतीला, । लागला परम जो जप तीला. ॥१७॥
“ सखा आमुचा द्वारकाधीश नांदे; । पति श्रीसतीचा; विभूती जनां दे; ।
कृपाळू धनें वाटितो विप्रलोक; । त्वरें जाउनी पाय त्याचे विलोका. ॥१८॥
शरण जो हरिच्या चरणाला, । अर्पुनी सकळ आचरणाला, ।
कृष्ण देइल तुह्मां धनराशी. । वैभवें न गणुं त्या धनदासी. ॥१९॥
पती भोज जो वृद्ध कां यादवांचा, । प्रभू ईश तो कीं समस्तां जिवांचा, ।
असे त्या स्वकालीं प्रभू द्वारकेसी, । वधूनि स्वहस्तें तृणावर्त केशी. ॥२०॥
नि:ष्काम ध्याती पदपंकजाला । तेणें हरीला बहु भार जाला. ।
‘ नेवें धनातें ’ करि या पणातें, । तेव्हां तया दे हरि आपणातें. ॥२१॥
सकाम भक्तां न करीच वाणी. । बोलों किती ये विषयींच वाणी ? ” ।
प्रार्थूनि ऐशा वचनें द्विजा या । मौन्येंचि राहे मग विप्रजाया. ॥२२॥
ऐशी स्त्रियेची मृदु गोड वाचा । घेवोनि कानीं गडि माधवाचा, ।
भावार्थ जाणोनि तिच्या मनाचा, । हा लाभ मानी हरिदर्शनाचा. ॥२३॥
द्विज विचार करी स्वमनाशीं; । मग मती धरितो गमनासी. ।
शब्द येकचि सतीस वदे तो, । “ जो असे घरिं पदार्थचि दे तो. ॥२४॥
भेटों नये यास करें रिकामे, । हा जाण मुखार्थ असे, सकामें. ।
नामें जयाचेचि अपाय नाशी । दे त्यासि कांहीं स्वउपायनासी. ” ॥२५॥
भिक्षार्थ तेव्हां मग ते निघाली. । पोहे विशेषें जन तीस घाली. ।
बांधोनि वस्त्रें मग तीव्रतेनें । दिले पतीलागिं पतिव्रतेनें. ॥२६॥
घेऊनि चाले मग त्याचि वाटे; । द्वारावती ज्यास समीप वाटे. ।
होईल कैसें हरिदर्शनातें ? । चिंता तया हेचि असे मनातें. ॥२७॥
पुढें देखिली तिस्थळी. सैन्य वाटे, । भयत्रास ज्याचा अभक्तांस वाटे. ।
भयाचा जगीं माधवा हेतु केला, । तया लंघुनी विप्र द्वारास गेला. ॥२८॥
द्वारीं अपारीं गण यादवांचे । बैसोनि गाती गुण माधवाचे. ।
सोळा सहस्त्रा युवती जनांचीं । घरें विचित्रें, बहु सज्जनांचीं. ॥२९॥
त्यामाजि ते येक घरीं द्विजाला । प्रवेशतां सौख्यसुकाळ जाला. ।
विप्रें हरीचा मग देखियेलें, । जे रूप चित्तीं, अजि, रेखियेलें. ॥३०॥
पलंगावरी रुक्मिणीच्या विराजे, । जया वर्णिती सर्वही देव, राजे; ।
जसें देखिलें ब्राह्मणा त्या दुरूनी । उडी टाकिली श्रीपलंगावरूनी. ॥३१॥
नमस्कारुनी भेटला त्या द्विजाला. । तये भेटिचा थोर आनंद झाला; ।
स्त्रवे लोचनीं प्रेमसंयुक्त पाणी, । असा प्रीतिनें हर्षला चक्रपाणी. ॥३२॥
तयानंतरें त्या द्विजा देवदेवें । पलंगावरी बैसवीलें सुदैवें. ।
स्वयें घेउनी श्रीकरें पात्र पाणी । तयाचीं पदें धूतसे अब्जपाणी. ॥३३॥
स्वपादोदकें जो महापाप वारी, । स्वयें तो धरी विप्रपादाब्जवारी. ।
करी कर्म तो, लोक तैसें करीती; । ह्मणोनी हरी दाखवी लोकरीती. ॥३४॥
अगरुचंदनवासित चांगलें । परिमळे अति केसर रंगलें, ।
निज करें मग लावितसे हरी, । त्रिविधतापहि जो स्मरणें हरी. ॥३५॥
घेऊनियां सुरसुवासित दीप हातीं, । तो दावितां द्विजवरा, स्ववधू पहाती. ।
ज्योति:प्रकाशक जशी रविभा वदावी, । तो श्रीहरी मग तयाप्रति दीपा दावी. ॥३६॥
होता स्वभावें द्विज तो भुकेला; । पंचामृतें तो मग तृप्त केला. ।
तांबूल, गोदान तया निवेदी. । पूजा करी तो विधि जोच वेदीं. ॥३७॥
करूनि पूजा बहुतोपचारीं, । तयावरी स्वागत हो विचारी. ।
ह्मणे हरी, हो, मग त्या द्विजाला, । ‘ अपूर्व तूझा मज योग जाला. ’ ॥३८॥
वस्त्रें जुनीं पांघुरली द्विजाती, । जीं धूतल्याही मलही न जाती. ।
ढाळीतसे रुक्मिणि चामरातें. । आश्चर्य तेव्हां सकलामरातें. ॥३९॥
सोळा सहस्त्रा हरिच्या स्वजाया । पाह्यासि येती सकला द्विजा या. ।
तो कृष्ण सेवा करितो स्वहातीं, । आश्चर्य हें कृष्णवधू पहाती. ॥४०॥
स्त्रिया बोलती एकमेकांस वाचा, । बहू दीन पां हा सखा माधवाचा, ।
नसे वस्त्र आंगावरी पांघराया, । सभा जिंकिली येउनीयां घरा या. ॥४१॥
वस्त्रहीन, अवधूत, भिकारी, । श्री नसे, परम देह विकारी, ।
फार पुण्य घडलें अधमाला, । वंद्य विप्र तरि नीलतमाला. ॥४२॥
त्रिलोकीं गुरु स्वामि हा श्रीनिवास; । तया मान्य हा होतसे हीनवास. ।
रमा टाकुनी श्रीपलंगीं द्विजाला । पहा सेवितो, जेंवि, गे, अग्रजाला. ॥४३॥
गुरूचे घरीं ब्राह्मणा युक्त देवा । शिके ब्रह्मविद्या, पहा, वासुदेवा. ।
कथा तेथिल्या आठवूनी हरी तो । स्मृती दे द्विजा; विस्मृतीतें हरीतो. ॥४४॥
स्मरोनि कथा मग तेथिल्या, हो, । परस्परें ते अजि घेति लाहो. ।
करांवरी ते कर वाजवीती; । सुखें गुरूचें यश गाजवीती. ॥४५॥
बोले हरी द्विजवरा मग तो स्ववाणी. । “ विद्या दिली गुरुवरें न करूनि वाणी. ।
पूजूनि अर्पुनि तया गुरुदक्षणेला । आलों असें करुनि आजि प्रदक्षणेला. ॥४६॥
त्यानंतरें तों द्विजकन्यकेला । पाहोनि, मित्रा, स्वविवाह केला; ।
कीं, ब्रह्मचर्या निजआश्रमाला । तूं चालवीशी, नसतां श्रमाला ? ॥४७॥
मी जाणतों तुज जगीं धनकाम नाहीं; । पुत्रस्त्रियासदन तों न रुचे मनाही; ।
प्रारब्धभोगहरणार्थ विवाह केला; । दारासुतगृहधनां नसशी भुकेला. ॥४८॥
कर्म तूं करिशि; कामकामना, । वासना नसतसे तुझिया मना; ।
मी जसा त्यजुनि गूणआग्रहा । कर्म सर्व करितों, जनसंग्रहा. ॥४९॥
गुरुकुळीं वसतां बहुतां श्रमें, । तुज मल अघडलीं प्रथमाश्रमें. ।
स्मरशि किं गुरुच्या चरणासी, । वश नहोनि जननामरणासी ? ॥५०॥
प्रगटला हृदयीं गुरुराज तो, । म्हणुनि मानवजन्म विराजतो; ।
गुरुविना निज मानवदेहा । जन कसा जगिं मान वदे हा. ॥५१॥
करूनी कृपा दीधली ब्रह्मविद्या, । त्वरें नाशिली आमुची ते अविद्या, ।
सदा सर्वदा त्या गुरूतें स्मरावें. । स्मरेना गुरू तैं कसें हो तरावें ? ॥५२॥
देह मी, प्रथम वाटत होतें । वारिलें गुरुवरेंचि, अहो, तें; ।
जेथुनी परतली मनवाचा । तेथ भेद धरिला स्वजिवाचा. ॥५३॥
निरसुनि गुरुरायें, स्वात्विकें, मीपणातें, । मिळवुनि निजसौख्या आपुल्या आपणातें, ।
विफळ मृगजळातें चित्त होतें भुकेलें, । सकळ मग गुरूनें सच्चिदानंद केलें. ॥५४॥
लागतांचि गुरुहस्तक मस्तकीं । विश्वरूप मग तेंचि समस्त कीं ।
आपणांत जग, हें मज वाटे. । लाविलें गुरुवरें निज वाटे. ॥५५॥
तरंगीं स्फुरे जे रिती सिंधुपाणी, । जगीं ते रिती पाहतां चक्रपाणी. ।
अळंकार होती जसे सर्व हेमीं, । स्वरूपीं तसें पाहतों सर्व हें मी. ॥५६॥
गुरू मुख्य तीन्ही जगीं मानवांचे. । तयांचें तुतें सांगतों मान वाचे. ।
जयाचे स्वपोटीं सुता जन्म होतो, । पिता तो गुरू, जाण आधीं, अहो, तो. ॥५७॥
पूज्य तो निज पिता गुरु आधीं । सेविल्या हरति सर्वहि आधी. ।
मानिजे जगिं निरंतर त्यातें. । पापनाश नमितां स्वपित्यातें. ॥५८॥
गुरू दूसरा, वेदमाता निवेदी. । तयाचे कृपें अर्हता होय वेदीं. ।
क्रियाकर्म चाले द्विजां जन्मभावें. । पित्याहूनिही पूजिजे त्या स्वभावें. ॥५९॥
गुरू तीसरा, तो चहूं आश्रमांला । निजज्ञान देऊनि नाशी श्रमाला. ।
तया जाणतां मी जसा तो तसा, रे, । जया आरतें, तो गुरू भ्रांतसा रे. ॥६०॥
असोनि वर्णाश्रमिं हो द्विजाती । गुरूविणें मृत्युपथासि जातो. ।
सर्वज्ञ ते तों नव्हती कदापी, । ह्मणोनि त्यांतें मग काळ दापी. ॥६१॥
वर्णाश्रमीं विहित आदर मानसाचा, । कर्णीं गुरू वदतसे स्वसमान साचा, ।
ध्याती सदा गुरुवरा मज केशवाला, । प्राणप्रयाणसमयीं त्यजितां शवाला. ॥६२॥
गुरूच्या प्रसादें प्रपंचार्णवासी । उलंघूनि, होती स्ववैकुंठवासी. ।
सुखें पावती मुक्ति सायुज्यतेची. । न बोलें बहू. मोक्ष त्यांला जितांची. ॥६३॥
गुरू तो हरी मानुनी ऐक्य रीती, । यथाशक्तिनें स्वामिसेवा करीती. ।
गुरूसेवनीं मीं जसा तृप्त होतों । तसा अन्य योगें नव्हें मी, अहो, तो. ॥६४॥
पडे देह तों आचेर ब्रह्मचर्या, । समर्षी; मला आपुली कर्मचर्या; ।
नव्हे तृप्त अत्यंत मी या प्रकारें, । जसा होतसें स्वामिसेवानुकारें. ॥६५॥
गृहस्थाश्रमी जाउनीयां प्रयागा । करी मज्जनें, तर्पणे, सोमयागा; ।
नव्हें तृप्त अत्यंत मी या प्रकारें, । जसा होतसें स्वामिसेवानुकारें. ॥६६॥
वनस्थाश्रमी आचरे, हो, तपाला । वनामाजि भक्षूनियां वात, पाला; ।
नव्हें तृप्त अत्यंत मी या प्रकारें, जसा होतसें स्वामिसेवानुकारें. ॥६७॥
यतीधर्म चाले चतुर्थाश्रमीं, हो, । त्यजीती प्रपंचा न होती श्रमी, हो. ।
नव्हें तृप्त अत्यंत मी या प्रकारें, । जसा ओतसें स्वामिसेवानुकारें. ।६८॥
घडे स्वल्प सेवा गुरूची मला, हो, । बहू सेवनीं घेतला तोचि लाहो. ।
गुरूकामिनी पाठवी इंधनांला. । स्मरेनाच तें दृश्य तूझ्या मनाला. ॥६९॥
गेलों तुला घेउनियां वनाला, । तो देव वर्षे बहु जीवनाला ।
अकाळवृष्टी; पडताति गारा; । गर्जे नभीं मेघ, जसा नगारा. ॥७०॥
लवोनी पडे चालतां वीज, वाठे, । भय त्रास जीचा अकस्मात वाटे. ।
शरीरास लागे अती शीत वारा. । न कोठें मिळे त्या वनींही निवारा. ॥७१॥
अशामाजि गेला रवी अस्तमाना. । तमें सर्व जाल्या दिशा त्या समाना ।
वनीं उंचनीच भरे मेघवारी. । बुडे त्या जळीं कोण कोणा निवारी ? ॥७२॥
धरूनी तुझा हस्त म्यां, हो, करांनीं । तमें व्यापितां त्या जळामाजि रानीं ।
दिशा नेणतां लागलों कीं फिराया । बहू आप्त होऊनियां विप्रराया. ॥७३॥
गुरू वाट पाहे गृहीं अस्तमानीं. । न देखोनि आह्मां बहू खेद मानी; ।
म्हणे, ‘ शिष्य माझे वना आजि जाया, । तयां हेतु जाला, पहा, हे स्वजाया !॥७४॥
गृहीं कृष्ण टाकूनि गेलों फिराया, । म्हणोनी वना धाडिलें गोपिराया; ।
अहो, तोच मी राहतों येकवाटीं, । कशी पाठवीती वना हे तिवाटी ? ॥७५॥
जो शिष्य, वाटे गुरु आपला तो. । जो पुत्र, आत्मत्वपणें मला तो. ।
न भेटि होतां अजि त्या गुरूची । स्त्रीसंगतीची मज कोण रूची ? ॥७६॥
म्यां इला हरिविषीं वरजावें. । शोधनार्थ वनिं म्यां वर जावें. ।
भेटतां हरि मला, वरजाया । योग्य होईल कशी वर जाया ? ’ ॥७७॥
वदोनि ऐसे मग भूसुरानें, । रानें पहायासि निघे धिरानें. ।
तों शुभ्र पूर्वेस दिसे रवी तो; । वीतो प्रभा त्या जगिं दाखवीतो. ॥७८॥
पावला द्विज समीप वनातें. । सूटलें बळ बहू पवनातें. ।
वायु मेघ वरिच्यावरि वारी, । शोषुनी वनिं अशेषहि वारी. ॥७९॥
पुढें चालतां पाहतां जीवनासी । गुरू लक्षिती, हो, जगज्जीवनासी ।
धरूनि स्वहस्तें सुदाम्यास हातीं । हरी येतसे, तो गुरूही पहाते. ॥८०॥
देखतांचि हरि त्या गुरुराया । धांवला त्वरित पाय धराया. ।
पोटिशीं गुरु धरूनि हरी तो, । शिष्यशोकभयमृत्यु हरीतो. ॥८१॥
म्हणे श्रीआचार्या ‘ बहुत श्रमलासी यदुपती
नसे पायीं कांहीं, दगड वनिंचे फार खुपती. ।
शरीरीं या तूझ्या अति कठिण पर्जन्यधडसा
वनीं जाला, तेव्हां कवण परि वांचेल धडसा ॥८२॥
समस्तां हे काया प्रियतम गभे, हो, परम ते.
निजात्मत्वें येथें न कळत सदा बुद्धि रमते. ।
कळोनीयां स्वात्मा, निजतनु तुझी मतपर जनीं.
गुरूसेवेनें पां वनिं हरिशि अज्ञानरजनी. ॥८३॥
असा सेवावा कीं गुरु नरवरें निष्कपट तो,
स्फुरे सच्चित्तंतू, जड परिहरे अंत्रपट तो. ।
स्वभावें सेवावें गुरुसि; जरि देहार्पण घडे,
तया मोक्षाचें तें मनन नसतां द्वार उघडे. ॥८४॥
सेवेंकरूनि तुमच्या बहु तुष्टलों मी. । रोमांच, देहपुलकांचित, स्पष्ट लोमीं. ।
साफल्य सुष्टचि घडो स्वमनोरथाचें. । मारी अरी धरुनि चक्र, अजी, रथाचें. ॥८५॥
वेद म्यां शिकविले तुज चारी, । अर्थ त्यांत सुखरूपविचारीं. ।
पाठविस्मृति नसो निगमातें. । मान्यता त्रिजगिं हो अगमातें. ॥८६॥
बहु तुम्ही मजविषीं श्रमलां, हो. । सकळ मोक्ष तुमचाश्रम लाहो. ’ ।
वचन ये रिति वदे गुरुराणा, । विदित जो सकळ वेदपुराणां । ८७॥
सुदाम्यातें प्रीती हरि करित वार्ता स्ववदनीं.
म्हणें, ऐशीं कर्में बहुत घडलीं स्वामिसदनीं. ।
गुरूच्या वाक्यानें परम घडते शांति मनुजा;
चिदानंदीं पावे सहज जन मोक्षासि अनुजा. ” ॥८८॥
हरीची हे वाणी परिसुनि, सुदामा द्विजपती
ह्मणे, “ मोक्षालागीं सकळहि तुतें लोक जपती. ।
स्वयें होशी पूर्ण, प्रकट करिशी गुह्य गुरुचें,
तुझ्या देखों वेखीं नरगुरुवरीं सेवन रुचे. ॥८९॥
जगाचा गुरू तूं स्वयें; वास देवा
समस्तां सुरांमाजि, जी, वासुदेवा. ।
त्रिलोकांत या तूंचि नानावतारी.
तुझें हें समस्ता जनां नांव तारी. ॥९०॥
न पावे, पैं कृष्णा, गुरुविण कदापी निजकळे,
गुरूच्या वाक्यानें विहित मज आत्मा निज कळे. ।
न होशी तूं तैसा, विसर तुज कैंचा निजपणीं ?
अखंडत्वें आत्मस्फुरण तुज; आम्हांसि जपणी. ॥९१॥
स्वयें ब्रह्म, तूझी निजानंद काया; । तया राहणें ब्रह्मविद्या शिकाया ॥
गुरूच्या गृहीं, हेंचि आश्चर्य वाटे; । जनां लावितोसी स्वयें मोक्ष वाटे. ॥९२॥
बोले हरीप्रति असें बहु विप्रराणा,
पोहे न अर्पण करी पुरुषा, पुराणा. ।
थोडे म्हणोनि मनिं फारचि लाजिला, हो,
अर्पूनि अल्प हरिलागिं न घे स्वलाहो. ॥९३॥
सर्वज्ञ त्याच्या मनिंचें हरीतो, । जाणे स्वभक्तार्पण जो, हरी तो. ।
पाहोनि, हांसे, मुख ब्राह्मणाचें, । देखोनि खाजें पदरीं कणांचें. ॥९४॥
ब्राह्मण्य देव, हरि आपण देवदेव;
हांसोनियां द्विजवरासि करी सदैव. ।
प्रेमेंकरूनि करि त्यासि निरीक्षणातें,
देणार भाग्य हरि जो, न लवी क्षणातें. ॥९५॥
स्वयें बोलतो ब्राह्मणालागिं वाचा, ।
म्हणे, ‘ मी सखा, आप्त तूझ्या जिवाचा, ।
म्हणोनी दिला भेटिचा आजि लाहो, ।
तुवां आणिला काय मेवा मला हो ? ॥९६॥
थोडेंचि मातें बहु फार होतें । भक्ता जनाचें मजला, अहो, तें. ।
भक्तीविना अर्पण मेरु केला, । त्याचा नसें, हो, कधिं मी भुकेला. ॥९७॥
पत्र, पुष्प, फळ आणिक पाणी, । भक्तिनें दिधलिया मज पाणी,
स्वल्पही निजसुखेंचि भक्षितों । तृप्तता परम त्यांत लक्षितों. ॥९८॥
श्रीकांत ऐशीं वचनें वदे तो, । तर्‍ही सुदामा पृथुकां न देतो. ।
शंकोनियां मानचि खालिं घाली, । लज्जा जयाचे हृदयीं निघाली. ॥९९॥
जाणे हरी द्विजमनांतिल सर्वद्रष्टा, ।
निर्माण जो करि जगीं नसत्या अदृष्टा. ।
नाहींच केवळ मनीं धनकाम याला, ।
स्त्री पाठवी मनिं धरूनि सुदामयाला. ॥१००॥
दरिद्रें बहू पीडिली सारसाक्षी ।
म्हणे, ‘ नांदतो कृष्ण  संसारसाक्षी; ।
त्वरें जाउनी भेटिजे त्यास आधीं; ।
हरी भेटल्या नासती सर्व व्याधी. ’ ॥१॥
तिचा भाव घेऊनियां द्वारकेला. । स्वयें द्रव्यकामीं नसे हा भुकेला, ।
तथापी पहा दुर्लभा संपदा मी । घरीं देउनी तृप्त कर्ता सुदामीं. ॥२॥
चिंतुनी मनिं असें, हरी । वस्त्र विप्रकरिंचें स्वयें हरी. ।
ग्रंथि ते त्वरित माधव सोडी, । तोडुनी प्रकृतिबंधन सोडी. ॥३॥
काय हें म्हणुनि कृष्ण विचारी, । मुष्टि ते पृथुक हे मग चारी ।
देखुनी, हरि ह्मणे, ‘ भला भला । भक्तिचा परम लाभ लाभला. ’ ॥४॥
पव्हे तुझे मज सख्या बहु गोड भारी, ।
येणेंचि तृप्त जगिं मी मधुकैटभारी. ।
घे मुष्टि एक, दुसरीसहि हात घाली; ।
तों रुक्मिणी हरिकरासि धरूं निघाली. ॥५॥
धरुनि कर कराग्रें बोलते श्री प्रभूतें, ।
‘ पृथुककण मुखाग्रीं घालितां, सर्व भूतें ।
मजसहित सुदाम्या सेविती सर्व लोकीं. ।
विवर कवण नोहे ग्राममात्रें विलोकीं. ॥६॥
पावला द्विज, पहा, तुझी सरी; । आझुनी हरिसि मुष्टि दूसरी. ।
मी तुझी परम पादसासिका, । अर्पिशी मज तरी परासि कां ? ॥७॥
श्रीरुक्मिणीच्या परिसूनि भावा, । पुरे करी श्रीपृथुक स्वभावा. ।
त्यानंतरें सारिति भोजनातें । घेऊनि पंक्ती बहुतां जनांतें. ॥८॥
भोजनावरि किती रस नाना । प्राशिले, जंव ह्मणे रसना ना. ।
स्वर्गिंच्यापरि असें सुख मानी । बैसुनी हरि गृह्यंत विमानीं. ॥९॥
सुखें या क्रमूनी निशा याम चारी, । प्रभाते हरीतें सुदामा विचारी, ।
म्हणे, ‘ देइं आज्ञा मला आजि जाया, । घरीं येकली वाट पाहे स्वजाया. ’ ॥११०॥
विश्वकल्पक विशाळ मंदिरां । कल्पुनी, वसवि तेथ इंदिरा. ।
नाम ठेवुनि पुरीस तयाचें, । भाग्य दे परम जें हित याचें. ॥११॥
जो जयासि विधि हा तंव देतो, । त्या द्विजाप्रति हरी न वदे तो, ।
दान कीर्ति अपणें न वदावी, । भाव हा हरि जनाप्रति दावी. ॥१२॥
कृष्णजी म्हणति, ‘ भक्तसत्तमा, । तूं मला प्रियबहू द्व्जोत्तमा. ।
मित्र तो तुजसमान असेना, । पाहतां जर्‍हि चराचरसेना. ॥१३॥
भेटुनी मज सनाथचि केलें, । तृप्त होति जगिं जेंवि भुकेले. ॥
स्नेहभंग न घडो, सुखराशी. । जाय सत्वर, सख्या, स्वगृहासी. ॥१४॥
न दे श्रीहरी विप्रवर्या धनासी. । न मागे, न तोही करी शोधनासी, ॥
सलज्जेकरूनी निघाला घरासी । हरीदर्शनीं नासुनी पापराशी. ॥१५॥
द्वारवती सोडुनि ये स्ववाटे. । आश्चर्य ह्यातें बहु थोर वाटे. ॥
मर्गीं विचारीं मग तो मनाशीं, । निंदूनि चित्तीं धनकामनांसी. ॥१६॥
आश्चर्य हें मज गमें बहु कीं मनातें, ।
ब्राह्मण्य देव कासि पूर्णहि कामनांतें, ॥
तो श्रीहरी मज अशासि न दे धनातें, ।
प्रारब्ध थोर. किति, हो, करुं साधनातें ? ॥१७॥
वळखिलें जरि नसे मजला हें । म्हणुनियां जरि न तें धन लाहें; ॥
मज जसें नयनीं हरि पाहे, । तदनुरूप करि थोर कृपा हे. ॥१८॥
मंचकीं त्यजुनियां निज पद्मा, । लागला त्वरित या पदपद्मा, ॥
प्रेमयुक्त नयनीं जळ वाहे, । गोष्टि थोर गमतेचि जिवा हे. ॥१९॥
दरिद्री मी कोठें ? यदुपतिं रमेचा निजपती ।
मला आलिंगीतो, सुरवर जया नित्य जपती, ।
गुरूबंधू मानी, बसवुनि पलंगीं निज करें ।
पद प्रक्षाळूनी, पदजळ शिरीं ठेवि निकरें. ॥१२०॥
रुक्मिणी करिं धरूनि चामरा । ढाळिलें मज अखंड पामरा. ।
विंजितां मजवरी व्यजनातें । मी दिसें सकळ सेव्य जनांतें ॥२१॥
निज विमल पलंगीं श्रीहरी, देवदेव, । परम विनयतेनें, आदरें, वासुदेव ।
करि करकमलानें पादसंवाहनासी, । अकळ सकळ जो कां हंससंवाहनासी. ॥२२॥
हरीच्या पदा सेवितां सर्व सिद्धी, । जगीं याचि स्वर्गापवर्ग प्रसिद्धी, ।
तयानें, पहा, सेविलें या पदासी । करूनी रमा सादरें जेंवि दासी. ॥२३॥
परि नसे मजलागुनि तो निधी । मज गमे हरि तो करुणानिधी. ।
धनमदें प्रभुला द्विज नाठवी, । म्हणुन रिक्तकरें मज पाठवी. ॥२४॥
रे रिती द्विज करी मननातें, । अर्पुनी हरिपदीं धननातें. ।
पावला निज समीप पुरीतें । पाहिलें तंव घरा उपरीतें. ॥२५॥
रवीचंद्रतेजें रवी हो विमानें । पुरी वेष्ठुनी सांग एका क्रमानें. ॥
विचित्रें वनें, पुष्पितें, दिव्य भारी. । फळें नम्र वल्ले बहू वृक्ष भारीं. ॥२६॥
वनामाजि पक्षी बहूसाल जाती, । स्वरें मंजुळें तोषवीती द्विजाती. ॥
रमे लक्षणा पक्षिणी सारसासीं । द्विजा दावुनीयां रतीच्या रसासी ॥२७॥
रमत हंस मदें वरटा, हो, । शिखिमुखीं उठती वर टाहो, ॥
बहुत नाचति राजस मोरें, । मृगसत्या रमताति सामोरें. ॥२८॥
परिसवें रमती वरटा किती, । विरहिणी अपुली वर टाकिती, ।
रमति त्या पतितें मग खंजना, । नयनिं दिव्य नसोनिहि अंजना. ॥२९॥
मंद शीतळ सुगंधित वारे । स्पर्शता, त्रिविध ताप निवारे. ।
पुष्पितें उपवनें बकुळांचीं । पंक्ति त्यांवरि घनालिकुळांची. ॥१३०॥
सरोवरें निर्मळ अंबु ज्यांचें, । तयांमधें कानन अंबुजांचें, ।
जयांवरी षट्पद सर्व काळीं । रातोत्पळें ती दिसताति काळीं. ॥३१॥
रसाळद्रुमीं कोकिळा गाय, नाचे । ध्वनी ऊठती थोर त्या गायनाचे. ।
प्रसूता बहू तेथ कर्पूर केळी. । करीती स्त्रिया कांत देखोनि केली. ॥३२॥
अळंखारयुक्ता स्त्रिया हो अपारा । पतीयुक्त येती वनीं त्या दुपारां. ।
करें शिंपिती येकमेकां जळातें; । मृगाक्षीस नेत्रीं नुरे काजळातें. ॥३३॥
द्विजें ये रिती देखुनीयां वनासी, । विचारी बरें आपुल्या तो मनाशीं. ।
असें स्थान हें कोण त्याचें कळेना, । भ्रमें काय माझें मला आकळेना ? ॥३४॥
विचारी असें विप्र तो हो मनाशीं, । अशामाजि ते लोक येती वनासी. ।
दिसे दीप्ति त्यांचीच देवांसमान. । सुदाम्यास देती बहूसाल मान. ॥३५॥
वस्त्रें अलंकार अनेक रीती । देऊनि विप्रां, स्तवनें करीती. ।
वेगें सुदामा मग दिव्य यानें । वाद्यें पथीं वाजति, दिव्य यानें. ॥३६॥
गायनें करिति गायक नाना, । संगितासहित राग तनाना. ।
भाट गर्जति पुढें बिरुदांसी. । वारिताति चवरें निज दासी. ॥३७॥
समूदाय घेऊनियां तेथ रंभा । करी सांग नृत्यासि तेथें आरंभा. ।
स्वरें वाजवीती मृदंगादि वीणा, । पुढें नाचती गायनीं ज्या प्रवीणा. ॥३८॥
बहू भाव दावीतसे ते करांचे, । अळंकार लेऊनि चामीकराचे ।
गळां घालुनी उर्वशी दिव्य हारा । करीते पुढें सांग नृत्या विहारा. ॥३९॥
पुरामाजि ते आणिती या रितीनें । असें आइकीलें घरीं त्या सतीनें. ।
बहूसाल हर्षोनियां विप्रजाया । स्वयें सिद्ध जाली पुढें त्यास जाया. ॥१४०॥
सखी येउनीयां अळंकार घाली, । रमेच्या परी सुंदरी ते निघाली. ।
बहूसाल सेवा करीताति दासी, । कितीयेक, हो, लागती श्रीपदासी. ॥४१॥
करुनि चालतसे बहु तीव्रता । पतिनिमित्य पथीं सुपतिव्रता. ।
पतिस देखियलें नयनांबुजीं, । अति सुखें मग ये नयनांबु जी. ॥४२॥
प्रेमयुक्त भरला तिचा गळा, । शब्द एकहि निघे न वेगळा. ।
कांत हा म्हणुनि जाणवी मना । तृप्त जो करि समस्त कामना. ॥४३॥
देखिली द्विजवरें मग दारा, । लेइली नग अपार उदारा. ।
दासिका, पदकभूषणें गळां, । सेविताति सकळा सुमंगळा. ॥४४॥
गमे ती सुदाम्यास कीं देवदारा, । जिचा गंध वारीतसे देवदारा, ।
पहायासि येती जिला देवदारा, । अशी मानवी होय भूदेवदारा. ॥४५॥
कामिनी द्विजवरा समा गमे. । चालिला मग तिच्या समागमें. ।
पावला त्वरित विप्र मंदिरा, । राहिली सतत जेथ इंदिरा. ॥४६॥
पाहिलें द्विजवरें घराकडे, । दीप्ति थोर दिसते चहूंकडे. ।
स्थान हें द्विज म्हणे अमरांचें । कश्यपा अदितिच्या कुमरांचें. ॥४७॥
बहुत मरगजाचे स्तंभ ते दिव्य भारी, ।
जडित नवहि रत्नें दीप्ति त्यांची उभारी. ॥
किमपिहि मनुजाला नाकळे जे धरा ती ।
जडित दिनमणी ते रातिचे हो अराती. ॥४८॥
जडित बहु पलंगीं दीप्ति चामीकराची, ।
मृदु तदुपरि शय्या शुभ्र चंद्राकाराची, ॥
दुहित समयिं पात्रीं फेण जैसा दुधाला ।
मृदुतर अति शुभं उंच वाटे बुधाला. ॥४९॥
हेमदंडजडित व्यजनांचे । वारिताति कर दिव्य जनांचे. ।
रत्नदंड जडिले चवरांला । वारिती सकळ भूअमराला. ॥१५०॥
वितान दावी वरि शुभ्रकाला । नसे प्रभा ते, अजि, अभ्रकाला. ।
सद्गोणमुक्ताफळ, हो, वितानीं । विताळचंद्रा गमताति तानी. ॥५१॥
तिवाशा मृदू चित्रिता रेशिमानें । तळीं घातल्या, सांग एक्या क्रमानें. ।
हिरे थोर पायांवरी, हो, सुवर्णी । फुल्या मध्यभागीं; तयां कोण वर्णी ? ॥५२॥
स्फटिकजडित भिंती शोभती दिव्य भारी, ।
मरकत बहु मध्यें दीप्ति त्यांची उभारी. ॥
तदुपरि पुतळ्या त्या रत्नदीपास हातीं ।
धरिति, सकळ शोभा त्याचि तेजें पहाती. ॥५३॥
होतों दरिद्री बहुतां दिसांचा, । तो पावलों वैभवकामसाचा. ।
भाग्यास या हेतु हरीविनाही । समर्थ कोणी दिसणार नाहीं. ॥५४॥
अशा वैभवाला सुदामा विलोकी; । म्हणें हें नसे अन्य कोणा, विलोकीं. ।
कसें काय झालें मला हें कळेना. । विचारी मनीं, हेतुही आकळेना. ॥५५॥
कृपादृष्टिनें पाहुनीयां हरी तो । स्वभक्तां जनांच्या दरिद्रा हरीतो. ।
घरीं भाग्य दे, जें न इंद्रादिकांला. । न बोले तथापि स्वयें याचकाला. ॥५६॥
न बोलोनि वर्षें बहू मेघ पाणी, । असें भाग्य देतो जगीं चक्रपाणी. ।
स्वभक्तां जनांचें दिल्हें अल्प खातो, । असा यादवीं कृष्ण, माझा सखा तो. ॥५७॥
जया अर्पिती भक्त थोडें अमानी, । तयांचें हरी तो बहूसाल मानी. ।
स्वयें न श्रमे भाग्य देतां जनांला, । असें वाटतें श्रीहरीच्या मनाला. ॥५८॥
मुष्टीभरी त्या पृथुकांस ने मीं. । ते भक्षुनी, हें मग भाग्य नेमी. ।
मैत्री हरीची मज जन्मजन्मीं । घडो, म्हणोनी म्हणतो द्विजन्मी. ॥५९॥
पूर्ण बोध नसतां स्वजनासी । देइना हरि तयास धनासी, ।
भोग ते करिति देखुनियां धना. । नाठवे मग तयांस साधना. ॥१६०॥
मनीं ये रिती तो सुदामा विचारी. । हरीभक्तिनें घालुनी दीस चारी. ।
स्त्रियायुक्त भोगी महावैभवाला. । नव्हे सक्त अत्यंत; नाशी भवाला. ॥६१॥
स्वयें भक्त तो श्रीहरी, देवदेव, । दयाळू, अशा ब्राह्मणीं वासुदेव. ।
तयावांचुनी कोण भूदेव पूजी ? । सखा ब्राह्मणां, तोचि दैत्यां रिपू, जी. ॥६२॥
स्वभक्तां जनांच्या हरी आपदांला. । द्विजें ये रिती जाणुनी सौहृदाला, ।
करी ध्यान त्याचें सदा सर्वदा, हो । हरूनी मनांतील कामाग्निदाहो. ॥६३॥
अजित हो हरिभक्तहि जिंकिती. । तरति हा भवसिंधु असे किती. ।
द्विज मनीं मननादिक हो करी । श्रवणभक्तिस घेउनियां करीं ॥६४॥
प्रसादें हरीच्या भवग्रंथि सोडी. । जडी देखुनी आत्मतंतूसि सोडी. ।
अती सत्वरें मोक्ष त्यालागिं जाला, । महा अग्नि तापत्रयांचा निवाला. ॥६५॥
हरी पाहतां आपन देव । अशाला, महापूज्य हे भूमिदेव. ।
अशी ये रितीची असे हे कथा रे, । तरे लोक येथें जरी चित्त थारे. ॥६६॥
शुक म्हणे, ‘ परिसें सृपरीक्षिती । श्रवण हें करुनी जन रक्षिती, ।
तरति ते जन सर्वहि हा कली । श्रवणभक्ति पुरे तुज एकली. ॥६७॥
श्रीमद्भागवतीं नृपाप्रति बरें हें बोलिले कीं मुनी, ।
भक्तीवांचुनि मोक्ष साध्य न घडे, हें स्थापिलें नेमुनी. ।
त्याची हे पदपद्यकाव्यरचना टीका करी कौतुकें ।
बापूवामन सादरें हरिपदीं अर्पी गिराभातुकें. ॥६८॥
नेणे छंदकलाप्रबंधरचना, नेणें गिरा निर्मळा ।
नेणें नाटक, नागरा कविकला, नेणें पदा कोमला, ।
नेणें त्या मगणादि आठहि गणां, कोठें यती भंगती, ।
जाणें त्या गुरु वामना सुचरणा ते हे फले संगती ॥६९॥
आध्ये भागवतांत दोन दशमीं ते उत्तरार्धीं मना ।
आणूनी बरवे मनीं, शरण मी गेलों गुरू वामना. ॥
त्याचा हस्तक मस्तकीं मिरवतां ग्रंथार्थ जाला तरी. ।
टीका श्लोक समग्र सुंदर बरे हे एकशेंसत्तरीं. ॥१७०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP