श्रीआनंद - अध्याय अकरावा

श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.


श्रीगणेशायनम: ॥ श्रीआनंदमूर्तयेनम: ॥ शालिवाहन शके सोळाशें ॥ त्यावरी आठ विशेष ॥
क्षयनाम संवत्सरास । चैत्र शुक्ल नवमी दिनीं ॥१॥
भौमवार पुष्य नक्षत्र । सुकर्मनामा योग पवित्न ॥
तूळराशीस गुरु साचार । भाग्यें सुदिन उदेला ॥२॥
आनंदमूर्ती सांगलीहूनी । कृष्णातीरीं वृंदावनीं ॥
सन्निधानीं येऊनि मनीं । कल्पिलें तें परिसिजे ॥३॥
श्रीनें आपणा उपासना । रामचंद्राची कथिली जाणा ॥
तदनुसार श्रीच्या वचना । अनुरूप नोहे अजूनी ॥४॥
आज रामनवमी पुण्यदिन । व्हावें रामजन्म - कीर्तन ॥
उदयीक येथें पारण । ब्राम्हाण भोजन करावें ॥५॥
ऐसें चित्तीं धरिलें । स्नानसंध्यादिक साधिलें ॥
कीर्तनासी उद्युक्त झालें । मन अत्यंत त्या वेळीं ॥६॥
कीर्तन करावया हरिदास । नसे कोणी समयास ॥
शामभट जोशी आपुले शिष्य । सांगलीचे मिराशी ॥७॥
त्यांस आणोन केली आज्ञा । कीर्तन करावें गा सुज्ञा ॥
श्रीगुरु तुजला प्रज्ञा । देतील कीर्तनीं निश्चयें ॥८॥
आतां न करोन व्यवधान । करी रामजन्म - कीर्तन ॥
येरें अवश्य म्हणोन । उभा ठाकला कीर्तनीं ॥९॥
श्रीचे पादुकेवरील शमी । शामभटास देती स्वामी ॥
येरें भक्षोन मनोधर्मीं । श्रीपाद ह्रदयीं आठवी ॥१०॥
कीर्तन करावयाजोगी । बुद्धी अनुकूल तयालागी ॥
होऊन रामजन्मप्रसंगीं । अनुसंधान चालविलें ॥११॥
कीर्तन समारंभात । वृंदावनाचा डोल अदभुत ॥
होऊं लागला पै तेथ । लोक तटस्थ देखती ॥१२॥
नवमी दशमी रात्रिदिन । डोलतां न राह वृंदावन ॥
दशमीस ब्राम्हाण - भोजन । सामुग्री तैं मिळविली ॥१३॥
साहित्य आणिलें सांगलीहून । कृष्णातीरीं पाक करून ।
पारणें ब्राम्हण भोजन । संपादिलें यथासांग ॥१४॥
सांगली क्षेत्नास आमंत्रण । भिलवडीचे ब्राम्हाण ॥
अन्यत्र ब्राम्हाण तेलंग जाण । प्रसादास आले बहुसाल ॥१५॥
संतर्पण बहु सुंदर । डोल उत्साह अदभुत गजर ॥
हर्ष झाला तो प्रकार । मुखीं वर्णिला नवजाय ॥१६॥
पुढें आनंदमूर्तीस्वामी । सांगली आणि ब्रम्हानाळ ग्रामीं ॥
होते तंव प्रतिवर्षीं नवमी । उत्सव दहा जहाले ॥१७॥
शके सोळाश अठरोत्तर । धातानाम संवत्सर ॥
कार्तिक मास पुण्य पवित्र । वैकुंठ चतुर्दशी ते दिनीं ॥१८॥
ते दिवशीं आनंदमूर्ती । गेले निजधामाप्रती ॥
मागें उत्साह यथा निगुती । वंश - पुत्रें चालविले ॥१९॥
नवमीस उत्साहाचा पाठ । अष्टमी वृंदावन निकट ॥
कुटुंब परिवारसगट । यावें सर्वत्र वस्तीसी ॥२०॥
दशमीसहित त्रिरात्नीं । वास्तव्य करोनि पवित्रीं ॥
एकादशीस आपुले घरीं । यावें ब्रम्हानाळासी ॥२१॥
अद्यापवरी तोचि नेम । चालविती पुरुषोत्तम ॥
चिंतोन ह्रदयीं श्रीराम । आनदें काळ घालविती ॥२२॥
रामजन्म - कथेचा मानकरी । शामभट तयाचा अधिकारी ॥
प्रथम कथाप्रारंभ जरी । तोही मान तयाचा ॥२३॥
तदनुरूप अद्याप पर्यंत । चालविती तद्वंशजांत ॥
पाटील ऐसें वाखाणित । सर्वतोमुखीं ब्रम्हानाळीं ॥२४॥
पुण्यतिथी भाद्रपदींची । स्वामी श्रीरघुनाथांची ॥
स्वारी श्रीरंगनाथांची । यावें हा नेम प्रतिवर्षीं ॥२५॥
एके वर्षीं विस्मरण । पडलें श्रीरंगनाथाकारण ॥
माध्यान्हीं करावया स्नान । म्हाणीमाजि पै गेले ॥२६॥
संकल्प करितेवेळे । शुद्ध द्वितीयेतें उच्चारिलें ॥
एकाएकीं स्मरण झालें । पुण्यतिथी आज कीं ते ॥२७॥
तैसेच उठले झडकरी । जीन भिडविलें हयावरी ॥
तीन प्रहरां माझारीं । सव्वीस कोस पोंचले ॥२८॥
इकडे स्वामी आनंदराज । पंगती ब्राम्हण समाज ॥
बैसवोनी तृप्त केले द्विज । सांगोपांग यथारुचि ॥२९॥
वाढपे मंडळी सहित । स्नान करोन कृष्णेंत ॥
मार्ग - प्रतीक्षा करीत । बैसले श्रीरंगनाथांची ॥३०॥
येतां कधीं न राहे । आज जहालें कैसें काय ॥
पाव वेगें रंगमाये । धांवा थोर पै केला ॥३१॥
आज्ञा सर्वां लागुनि । दीधली आनंदमूर्तींनीं ॥
आम्ही न बैसूं भोजनीं । आल्या वांचोनी श्रीरंग ॥३२॥
रात्रप्रहर एक उलटला । घोडा स्वामींचा हिंसला ॥
तें ऐकोन आनंद झाला । स्वामी आनंदमूर्तींतें ॥३३॥
जवळ गेले धावोनी । नमस्कारिले लोटांगणीं ॥
बैसवोनी उत्तमासनीं । सक्तारिले अतिमानें ॥३४॥
स्वागत पुसलें निगडीहून । केव्हां केलें प्रयाण ॥
येरीं कथिलें वर्तमान । मध्यान्हीं स्नान समयीं ॥३५॥
तीन प्रहरांत सव्वीस कोस । पंथ क्रमोन सांगलीस ॥
येत असतां वाटेस । अस्ता गेला दिनमणी ॥३६॥
करूनिया संध्यास्नान । पंगती सारिलें भोजन ॥
घोडा आला श्रमोन । यास्तव तंग न सोडला ॥३७॥
दाणा पाणी देऊन । मग उतरिलें सामान ॥
तंगवार सुटतांचि जाण । घोडा पडला भूमीवरी ॥३८॥
रंगनाथांस कळों आलें । नाना औषध उपाय केले ॥
परंतु गुणास नाहींस पडलें । प्राण गेला घोडियाचा ॥३९॥
कीर्तन - श्रवणालागीं पाही । सर्व बैसले एके ठायीं ॥
त्या काळीं घोडयाच कांहीं । वर्तमान कोणी न बोलले ॥४०॥
कीर्तन झालें समाप्त । कळला सर्वांसी वृत्तांत ॥
रंगानाथजींचा अकस्मात । घोडा मृत्य़ू पावला ॥४१॥
ऐसें ऐकतां श्रीजयराम । आनंदमूर्तीं निजसुख धाम ॥
रंगनाथस्वामी मनोभिराम । घोडयापासीं पातले ॥४२॥
पहाती ते तंव घोडा मृत । झाला खरा पडलें प्रेत ॥
स्वामी बोलले जयराम रघुनाथ । ऐसें विपरीत कां केलें ॥४३॥
तांतडी पुण्य़तिथीस यावें । त्याचिया घोडयानें मरावें ॥
अपेश हें केंवि सोसावें । श्रीरघुनाथा दयाळा ॥४४॥
मग सर्वंत्रांस दिधला धीर । घोडा नाहीं मरणार ॥
ऐसें बोलून शवावर । हस्त फिरविला आनंदमूर्तीं ॥४५॥
चौकावरी पाय देतां । घोडा उठला ऊह म्हणतां ॥
फूत्कारोनी अंगावरुता । भोंवरा केला घोडियानें ॥४६॥
सर्वांनीं आश्चर्य पाहिलें । म्हणती नवल हें वर्तलें ॥
मृतप्रेत उठविलें । धन्य गुरुभक्त या जगीं ॥४७॥
ऐसा गुरुभक्तांचा महिमा । वर्णिंतां जहाली सीमा ॥
पुढें परिसवा गुणधामा । चरितामृत ग्रंथातें ॥४८॥
केशवस्वामी भागानगरीं । असतां ब्राम्हाणी म्हातारी ॥
दुर्बळ साध्वी परोपकारी । साधु - सेवनीं एकनिष्ठ ॥४९॥
तिचे चित्तांतील भाव । केशवस्वामींस पुसावें ॥
भोजना निमंत्रण द्यावें । उत्कंठा बहु लागली ॥५०॥
परंतु त्यांचे सोबतीस । शिष्य - समुदाय बहु असे ॥
इतुकें मजला अनुकूळ नसे । काय कैसें करावें ॥५१॥
एकाकी स्वामी येतील घरीं । तरी होईल बरवी परी ॥
ऐसें चिंतोन म्हातारी । गेली स्वामी जवळिके ॥५२॥
विनवीतसे जोडोनि पाणि । दयाळा आपण एकटेनी ॥
माझिये घरास येवोनी । आश्रम पवित्र करावा ॥५३॥
अकिंचन मी वृद्ध दुबळी । आपणासवें बहुत मंडळी ॥
प्रतिकूल सामुग्री तये वेळीं । दयावंता स्वामिया ॥५४॥
तुम्ही आणि मी एकाकी । सामुग्री जमवोनिया निकी ॥
तिजा समावेश स्वथंपाकीं । होय ऐसें दिसेना ॥५५॥
विनंती स्वामी परिसोन । मजला वदावें एकवचन ॥
बरें अवश्य म्हणोन । वचन दिधलें वृद्धेसी ॥५६॥
पाकसिद्धी करोन । आणिलें स्वामींस बोलावून ॥
बैसावया दिलें आसन । एक पाट तिचे घरीं ॥५७॥
तोचि दिधला बैसावयासी । पात्र वाढिलें भोजनासी ॥
स्वामींनीं रंगनाथांसी । मनीं आठविलें तेधवां ॥५८॥
निगडीमाजी पोचली खूण । श्रीरंगनाथांकारण ॥
केशव स्वामियें माझें स्मरण । केलें भागानगरासी ॥५९॥
तत्काल जावया उद्युक्त झाले । मंडळी सर्वांस आज्ञापिलें ॥
सर्वत्र भोजन करा वहिलें । माझा मार्ग न पाहणें ॥६०॥
तात्काळ तेथें झाले गुप्त । उमटले भागानगरांत ॥
वृद्धाबाईचे दरवाज्यांत । येवोन उभे ठाकले ॥६१॥
हांक मारून स्वामीतें । म्हणे मी आलों रंगनाथ ॥
येरें उघडोन द्वारातें । घेतलें आंत रंगनाथा ॥६२॥
आपण बैसला पाट होता । तोच दिधला रंगनाथा ॥
दुजा पाट श्रीखालता । होता तैसा आहेच ॥६३॥
यावर जयरामस्वामींचें । केशवस्वामी स्मरण करतांच ॥
एकांत चित्त जयाचें । खूण पोचली अंतरीं ॥६४॥
श्रीकृष्ण स्वामींचे वृंदावनीं । बैसले नैवेद्य दाखवूनी ॥
इतुक्यांत समजलें अंत:करणीं । केशवस्वामी स्मरती तें ॥६५॥
सर्वत्रांस केली आज्ञा । स्वस्थ करावें भोजन प्राज्ञा ॥
आमुचा मार्ग तो सुज्ञा । सहसा कोणी पाहूं नये ॥६६॥
ऐसें बोलून ते घडीं । पावनतीर्थीं टाकिली उडी ॥
भागानगरासी तातडी । येवोनिया पोचले ॥६७॥
बाईचिया द्वारदेशीं । येवोनि पोचले जयराम ऋषि ॥
हांक मारितां उभयतांसी । आंत घेतलें स्वामींतें ॥६८॥
बैसावयासी आसन । स्वामींनीं पाट दिधला जाण ॥
तिसरा पाट स्वामी लागून । आहे तैसा आहेच ॥६९॥
आनंदमूर्तींचें स्मरण केलें । तयांसी अंतरीं जाणवलें ॥
वृंदावनीं बैसले । होते पूजा करीत ॥७०॥
पूजासमाप्ती तेचि घडी । करूनि कृष्णेंत टाकिली उडी ॥
भागानगरासी तातडी । येवोनि पोचले द्वारांत ॥७१॥
हांक मारितां सवेगें । केशवस्वामी पावल अंगें ॥
द्वार उघडोन त्यांस संगें । घेवोनि आले गृहांत ॥७२॥
आपुला बैसावयाचा पाट । त्यांस देऊन आपुले निकट ॥
बैसविले तों चौथा पाट । कशवस्वामींस आहेच ॥७३॥
ऐसें दावून कौतुक । वृद्धेस आज्ञा केली देख ॥
संकोच न धरूनि कांहीं एक । वाढी आतां पात्र वेगें ॥७४॥
ऐसे साधू चौघे जण । ऋग - यजु:  सामाथर्वण ॥
कीं चारी पुरुषार्थ जाण । मूर्तिमंत घरा आले ॥७५॥
स्वल्प वरण स्वल्प शाखा । चौ पात्र वाढणेचा आवांका ॥
अन्न स्वयंपाक सर्व देखा । बाईस  सोडून गेला हो ॥७६॥
एकाचें साहित्य केलें । चौघे येथें प्राप्त झाले ॥
संकोचें मुख कोमाइलें । काय वाढूं म्हणोन ॥७७॥
खूण जाणोनी केशव मुनी । बोलले वृद्धे लागूनी ॥
कांहीं संशय न धरी मनीं । पात्रें वाढी निर्भय ॥७८॥
इतुक्या स्वयंपाका माजि जाण । पूर्ती सर्वांची होऊन ॥
यथेष्ट पुढें राहील अन्न । उणें न पडे सर्वथा ॥७९॥
चित्ता वाटला विश्वास । पात्रें वाढिलीं चौघांस ॥
तरी अन्न - भांडें जैसें । भरलें तैसें भरलेंच ॥८०॥
उल्हासोनी म्हतारी । वाढूं लागली उदार करीं ॥
अन्न पात्रा माझारीं । भरलें तैसें आहेची ॥८१॥
मग पावली अति विस्मय । म्हणे स्वामी गुरुमाय ॥
अद्‌भुत दाविलें आश्चर्य । अगम्य चरित्र आपुलें ॥८२॥
ऐसें आपुलें महिमान । नेववे मज मी दीन ॥
कृपाळू तुम्ही सज्जन । सनाथ मज करावें ॥८३॥
मग त्या बाईस भोजन करवून । करोन तिचें समाधान ॥
निरोप घेवोनी मग तेथोन । संत - मंडळी निघाली ॥८४॥
परस्पर बोलोन गोष्टी । प्रेमालिंगन देवोनी भेटी ॥
तिघे साधू उठाउठी । जाते झाले स्वस्थळा ॥८५॥
ऐसें साधूंचें वर्णन । करितां मन उन्मन ॥
बाष्प कंठीं दाटोन । प्रेमाश्रू नयनें ढाळिती ॥८६॥
येर दुष्ट जे अभक्त । तयां न वाटे कदा सत्य ॥
अभक्त मोह - फणिग्रस्त । नराधम शुद्ध ज्यां म्हणती ॥८७॥
ये विषयीं श्रीभागवतीं । वदले व्यास भारती ॥
द्वितीय प्रसंगाचे अंतीं । श्लोकार्थ मना आणावा ॥८८॥
सदबुद्धि अयुक्त नराप्रती । स्वप्नामाजी न होय प्राप्ता ॥
अथवा सद्‌भाव न ज्याचे चित्तीं । तैशा नरा नातुडे ॥८९॥
भाव नाहीं तेथें शांती । उत्पन्न न होय कल्पांतीं ॥
ऐशियासि सुखाची जाती । कैसी मिळेल सांग पां ॥९०॥
गोपाळसुताची विनवणी । परिसावी संतसज्जनीं ॥
तुमचें जें कां पायवणी । जान्हवी - तोय तें मज ॥९१॥
वायफळें आणि डोंगरसोनी । तिसिंगी ऐसे गांव तीन्ही ॥
तेथील मिराशी कुलकर्णी । आश्वलायन सूत्र जयाचें ॥९२॥
गोपाळ नामक माझा पिता । सोनूबाई माझी माता ॥
विठ्ठल ऐसें उभयतां । नांव ठेविती या देहा ॥७३॥
परंतु शब्द हा गौण । अमंगळा मंगळ अभिधान ॥
जैसें अभद्रा भद्र नामकरण । तैसेंचि हेंही गमतसें ॥९४॥
नामा ऐसी करणी । कैसी होईल मज पासोनी ॥
कृपावलोकें सज्जनीं । निरीक्षावें मज दीना ॥९५॥
अगा पवित्रा सुहाडा । तुमचे द्वारींचा झाडफुडा ॥
मम दृष्टकृताचा करूनि रगडा । सेवेसी लावा आपुल्या ॥९६॥
इति श्रीआनंदचरितामृत । बापानंदविरचित ॥
सदा  परिसोत साधूसंत । एकादशोध्याय गोड हा ॥९७॥

॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु ॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP